सकाळी सकाळी उठून तयार होऊन आम्ही सगळे बाहेर उभे होतो. मग वीस सीटर कँटर गाड्या आल्या. स्थानापन्न होऊन आम्ही अभयारण्याकडे निघालो. दवबिंदूंनी ओलसर झालेले गवत, धूसर प्राचीतून अलगद डोकावत असणारे सूर्यबिंब, मंद गार वारा अशा उत्साहवर्ध वातावरणात कॅमेरे सज्ज करून आम्ही हळूहळू अरण्यात शिरलो. समोरच रणथंभोरचा किल्ला सारखा दर्शन देत होता. तो चढून जाणे सहलीत अंतर्भूत असायला हवे होते असे वाटू लागले. खूप मज्जा आली असती. असो. सध्यातरी त्याच्या सान्निध्यातूनच आम्ही वाट चालत होतो. अचानक हिरवळीत, झाडाझुडूपांत मोर दिसू लागले. झाडावर बसलेले एक घुबडही दिसले. एका नैसर्गिक जलाशयाच्या तीरावर उगवत्या हिवाळ्याची प्रसन्न सकाळ अलगद अवतरत होती. इथे नक्कीच काहीतरी पाहायला मिळणार म्हणून कँटर थांबले. मार्गदर्शकाने हातावर बिस्किटाचे तुकडे धरले. आणि काय आश्चर्य, सोनचिडिया म्हणून ओळखला जाणारा एक कावळ्याहून किंचित लहान आकाराचा दिमाखदार पक्षी हातावर बसून ते तुकडे टिपू लागला. त्याच सोनचिडीयाचा हा फोटो.

सारे दृश्यच भारलेले होते. सकाळच्या अरण्यातले तर्हतर्हेचे आवाज, किलबिल अनोखी वातावरणनिर्मिती करत होते. आम्ही पुढे निघालो. वाघ दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र वाघ दिसला नाही. काळतोंडी माकडे भरपूर दिसली. तसेच अस्ताव्यस्त पसरलेले वटवृक्षही इतस्ततः विखुरलेले दिसत होते. आतापर्यंत पाहिलेल्या मेवाडातील भूमीवर एवढे विशालकाय वृक्षच आम्ही बघितलेले नव्हते. इथे मात्र भव्य वडाची झाडे सर्वत्र दिसून येत होती. दोन तासांनी आम्ही परतलो.
जेवण झाल्यावर दुपारी जयपूरच्या “चोखी धानी”मधे जायचे होते. जेवणही तिथेच होणार होते. हाही प्रवास तसा मोठाच होता. मात्र आता एखादा तास वेळ होता. शेजारीच हस्तकलेच्या वस्तुंचे एक दुकान होते. तिथे जाऊन मनसोक्त खरेदी केली. कोरीव लाकडाच्या वस्तू, कपडे, रणथंभोरच्या शिक्क्यांचे, बोधचिह्नांचे रेशमी भरतकाम केलेले टी-शर्ट, बांधणीचे कापड इत्यादी.

.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा