२००९-०५-१२

तू संघ संघ जप मंत्र निजांतरात


व्यक्तींमधे प्रबळ संघटना असावी । व्यक्तींतली विघटना अवघी टळावी ॥
व्यक्तीत्त्ववर्धन घडो म्हणुनी तदर्थ । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ १ ॥

झाले किती खचित होतिलही अनेक । राष्ट्रा समर्थ करण्या झटले कृतार्थ ॥
त्यांना सदैव स्मर तू तव मानसात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ २ ॥

जी भारती, सुजल, श्यामल आणि शस्य । शोभे समुद्रवलयांकित जी प्रशस्त ॥
आभूषणे स्मर तिची तव मानसात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ३ ॥

झाली अनेक नगरे, वसले प्रदेश । शास्त्रे अनेक स्फुरली, स्फुरलेहि धर्म ॥
त्यांचा समग्र महिमा, धर मानसांत । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ४ ॥

विद्युल्लता जशि प्रदीप्त करे वनास । पूर्वी स्त्रियाहि लढल्या भर संगरात ॥
होत्या न त्या, तर कसे असतो सुखात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ५ ॥

का लोटसी उगिच जीवलगांस दूर । का मोकळे करसि तू फुटिरांस रान ॥
स्वकीय ओळख, तसे परकेहि त्यांत । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ६ ॥

वाटे जरी सकल मी करतो स्वतःच । नाही जरूर मदतीचि मला कशात ॥
देती तरीहि जन सोबत संकटात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ७ ॥

मौखीज्ञान मिळतेच परंपरेने । व्यक्ती न एकटि जे पेलु शके मुळीच 
ते ज्ञान संघ जपतो स्मर भारतात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ८ ॥

लोकांत वृत्ति तुसडी भरलेलि आहे । एकाकि लोक जगती, जगती कसे हे ॥
हिंडून ये खरच तू तरि माणसांत । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ९ ॥


नरेंद्र गोळे २००५०५०४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: