कोणार्क
सूर्यमंदिराची प्रकाशचित्रे आजवर काही कमी प्रकाशित झालेली नाहीत. महाजालावरही अनेक चित्रे सापडू शकतात. आम्हीही भरपूर चित्रे काढली. मात्र तिथल्या नागकन्यांची कमनीयता आणि मानवी मूर्त्यांची प्रमाणबद्धता अवर्णनीय आहे. त्यात वर्णिलेल्या विषयांइतके विषय महाराष्ट्रातल्या लेण्यांतही वर्णिलेले नाहीत. शिल्पकाराला असलेली मूळ वर्ण्य विषयाची जाण, एवढी भव्य शिल्पाकृती करण्यासाठी लागणारा राजाश्रय, त्या त्या राजांची ते ते विषय शिल्पाकृतींसाठी निवडण्यातली दृष्टी, हे सारे आपल्या पूर्वजांच्या मानवी जीवनाविषयीच्या तपशीलवार ज्ञानाविना शक्य होणारे नव्हते. धन्य ते शिल्पकार, धन्य ते प्रजापती आणि धन्य आपले पूर्वज. हे सारे पूर्वापार चालत आलेले ऐश्वर्य पाहण्यासाठी आम्ही इथे आलो हे आमचे सुदैव. वाचकांनीही आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे असेच हे सारे वैभव आहे.
सूर्यमंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच आम्हाला छत्र्या भाड्याने घ्याव्या लागल्या. कारण पाऊस सुरू झालेला होता. मग आम्हाला भारतीय पुरातत्त्व खात्याने संमत केलेल्या जेष्ठ मार्गदर्शकाने गाठले. त्याला फोटोग्राफीचा गजबचा शौक असल्याने कोणार्कला आमचे फोटो कोण काढेल ही आमची चिंता समूळ नष्ट झाली. तो कधी आमचा क्लोज-अप काढे. कधी विशिष्ट जागेचाच हट्ट धरे. कधी पायरीवर चढवून उंचीत साम्य आणू पाहे. तर कधी चाकासोबत फोटो काढण्यास विशिष्ट रचना करवून घेत असे. कधी बगीच्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढे. तर कधी विशिष्ट जागी उभे करून फोटो काढे. कधी चाकाच्या या बाजूने फोटो काढे. तर कधी त्या बाजूने फोटो काढे. असे कित्येक फोटो त्याने काढले. त्यात आम्हीही होतो. तसेच इतर प्रेक्षकही होते. मात्र, गोल फिरून आल्यावर, मुख्य द्वारापाशी वर चढण्याची वेळ येताच, कुठलाच मार्गदर्शक वर चढत नाही, असे सांगून त्याने आमचा निरोप घेतला.
मग आम्ही हिरव्यागार बगीच्याचा फोटो काढला. इसवीसनाच्या बाराव्या शतकातही आपल्याला जिराफ माहीत असल्याचा पुरावा कॅमेऱ्यात बंद केला. वेगवेगळ्या वादक आणि नर्तकांच्या शिल्पांचे प्रकाशचित्रण केले. चाकाच्या आसातील चक्रांमधली मदभरालसा चित्रित केली. बाहेरच्या दगडी भेट-वस्तूंच्या दुकानाचा एक फोटो काढला.
तालपत्रांवरची चित्रकारी
तालपत्रावर अणकुचीदार हत्याराने कोरून चित्ररेखा तयार करायच्या. त्या कोरलेल्यावर मग दालच्या (दाल: कमळाच्या जाळ्यांप्रमाणे पाण्याच्या डबक्यांत अनिर्बंध वाढणारी अळूसारख्या हिरव्यागार पानांची आणि हळदीच्या फुलाच्या आकाराची, फिकट जांभळी फुले असणारी वनस्पती) पानांचा रस चोपडून काळसर हिरव्या चित्ररेखांची चित्रे बनवणे, म्हणजे तालपत्रांवरची चित्रकारी.
या चित्रात आठ इंची लांब आणि जवळपास एक इंची (नैसर्गिकरीत्या ठरणाऱ्या) रुंद पत्रांवर सुरेख मंगल-कलश चितारला आहे. आपल्या कालनिर्णयच्या आकाराचे चित्र ह्यातून निर्माण होते. ते साधारणपणे तीनशे रुपयांना विकतात. देवादिकांची किंवा जनजीवनाची चित्रे या शैलीत रेखाटली जातात. कोणार्क शैलीतील कामचित्रेही या शैलीत रेखाटण्याची प्रथा आहे. या प्रकारे पुस्तक-खुणा, भेटपट्या इत्यादीही बनवल्या जातात, ज्या दहा दहा रुपयांना विकल्या जातात.
देवादिकांची, प्राण्यांची आणि कामजीवनाची कोणार्क शैलीतील चित्रे दशावतारांच्या स्वरूपातही उपलब्ध असतात. अशा चित्रांत वर एक देवाचे चित्र. खाली त्याचे दहा अवतारांची दहा चित्रे अशी रचना असते. या दशावतारांना, "आवाज" दिवाळी अंकात असतात तशा द्वयर्थी खिडक्यांसारख्या त्रयर्थी खिडक्या काढून दहाही अवतार, दहा निरनिराळे प्राणी अथवा दहा कामचित्रे, खिडक्या उघडून पाहता येतात. घड्या घालून हे सर्व चित्र एका आठ इंच लांब व सुमारे दोन इंच रुंद पट्टीच्या आकारात गुंडाळून ठेवता येते. चित्राच्या पाठीमागे पोथीला वापरतात तसे कापड लावलेले असल्याने त्याचाच गुंडाळण्यासाठी उपयोग होतो. दोन तालपत्रे एकमेकास बिजागरींनी जोडावीत तद्वत काळ्या दोऱ्यांनी शिवलेली असतात. ती शिवण वर्षानुवर्षे टिकते असा दावाही केला जातो.
आणखीही एका लोक कलेचा उल्लेख इथे करावाच आगेल. तो म्हणजे पट्टाचित्रणाचा. कपड्यावर वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून, रासक्रीडा, कृष्णचरित्र, दशावतार, कंदर्परथ इत्यादी रेखाटणारी उडिशा शैलीतील चित्रे लक्षवेधक असतात. बारीक बारीक वक्ररेषांच्या मोहक आकृतीबंधांनी ती आणखीनच सुशोभित केलेली असतात. याशिवाय उडिशात बहारीची नृत्यकला विद्यमान आहे. मात्र तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग आम्हाला आला नाही.
जगन्नाथपुरी
पुरी हे आपल्या चार धामांपैकी एक ठिकाण. जगन्नाथपुरी. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरील एक सुंदर शहर. पुरी शहरात, पुरीला ‘नीलाचल’ही म्हणतात. जगन्नाथाचे मंदिर गंगवंशाच्या कोडगंग राजाने ११३५ ते ११५० दरम्यान बांधून काढले. मंदिराच्या गाभाऱ्यात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या आहेत. आषाढ शुद्ध द्वितीयेपासून आषाढ शुद्ध दशमीपर्यंत (जून-जुलैमध्ये) इथे रथयात्रा असते. मूर्त्यांना रथारूढ करून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील गुंडेचा मंदिरात रथ नेऊन स्थानापन्न करतात. सात दिवस त्यांचा मुक्काम गुंडेचा मंदिरातच असतो. मग पुन्हा रथयात्रा गुंडेचा मंदिराकडून मूळ मंदिराकडे येते आणि मूळ मंदिरात मूर्त्या प्रतिष्ठित करून रथयात्रा संपन्न होते. ही रथयात्रा फार पूर्वीपासून सुरू आहे. चौदाव्या शतकातील इटालियन प्रवाशाच्या दैनंदिनीत याचे उल्लेख सापडतात.
जगन्नाथाचे मंदिर हे उडिशातील सर्वात भव्य मंदिर आहे. मंदिरात फोटोग्राफी निषिद्ध आहे. मंदिराला चारी बाजूंनी मजबूत तटबंदी असून पूर्वेला सिंघद्वार, पश्चिमेला व्याघ्रद्वार, दक्षिणेला अश्वद्वार, आणि उत्तरेला गजद्वार आहे. सर्व द्वारांवर गोपुरे आहेत. सिंघद्वाराशी पोहोचण्यास बावीस पायऱ्या चढाव्या लागतात.
पुरीचे मंदिर दूरून नीट दिसत नाही कारण त्याच्याभोवती तटबंदी आहे आणि खरेतर सारे गावच त्याच्याभोवती वसलेले आहे. कोणार्कला सूर्यमंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असल्याने तेथे स्वतंत्र व्यवस्था शक्य आहे आणि मंदिरापासून गाव बराच दूर आहे. पुरीचे मंदिर जवळूनही नीट पाहता येत नाही. याचे कारण मात्र मनोरंजक आहे. मंदिर परिसरात भक्तांचा अविरत राबता असतो. पंडे, पोलिस, श्वेतवस्त्रधारी स्त्रिया यांची सारखीच लगबग चाललेली असते. परिसरातच खिचडी शिजविण्याकरता अगणित चुली सारख्या पेटलेल्या असतात. पूजा सामान, प्रसादाची दुकाने इत्यादीची रेलचेल सतत फिरती असते. मंदिराच्या शिखरावर बाहेरच्या बाजूने सुंदर शिल्पकला सजवलेली आहे. मात्र मंदिराचे शिखर अतिउंच आहे आणि समकक्ष उंचीवर जाऊन कलेचा जवळून आस्वाद घेण्याची कुठलीही सोय नाही. जमिनीवरून मान उंचावून पाहायला अडथळेच फार. शिवाय कॅमेरा निषिद्ध असल्याने क्लोज-अप घेऊन पाहण्याचीही सोय नाही. त्यात आम्ही गेलो तेव्हा बारीकसा पाऊसही पडत होता. त्यामुळे मंदिर परिसर आणि बडा डंडा यांचे मनसोक्त दर्शन झाले नाही. पुरीच्या पंथनिवासात खाल्लेले दही आणि प्यायलेले सूप मात्र लक्षात राहिलेले आहे. उत्तम चवीमुळे.
नंदनकानन
भुबनेश्वरपासून २० किलोमीटर उत्तरेला भुबनेश्वर व कटक या जोड शहरांच्या मध्यभागी, महानदीच्या किनाऱ्यावर नंदन कानन हे विशाल प्राणीसंग्रहालय वसलेले आहे. प्राणीसंग्रहालयातील सर्व प्रदर्शनीय भाग सर्व सुविधांसहित पाहण्यास ४ ते ६ तास लागतात. आम्हाला दोन तासच काय ते उपलब्ध होते. म्हणून आम्ही खेळण्यातील आगगाडी, नौकाविहार, रज्जूमार्गाने उंचावर जाऊन भुबनेश्वर दर्शन इत्यादींवर पाणी सोडले. व्हाईट टायगर सफारी आणि लायन सफारीचा अनुभव मात्र घेता आला. नैसर्गिक रहिवासातील सिंहाचे जोडपे पाहता आले.
प्राणीसंग्रहालयात, सिंह, वाघ, पांढरा वाघ, तरस, मगर, सुसर, पाणघोडा, गेंडा, अजगर, हरणे, नीलगायी इत्यादिकांचे व्यवस्थित दर्शन झाले. इथे अधिकृत मार्गदर्शक सोबत नेता येतो. अर्थातच मोल देऊन. प्राणीसंग्रहालय विस्तृत आणि प्रेक्षणीय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा