२००८-११-१५

अक्षरधाम मंदिर, नवी दिल्ली

अक्षरधाम मंदिर, नवी दिल्ली

१७८१ साली अयोध्येत एका घनश्याम नावाच्या मुलाचा जन्म झाला. तो बुद्धिमत्तेने कुशाग्र आणि आरोग्यवान होता. वयाच्या चवथ्या वर्षी त्याने वेदाध्ययनास सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षी त्याचे वेदाध्ययन पूर्ण झाले. परिचित परिसराचे ज्ञान पूर्ण होताच, त्याला अपरिचित परिसराचे, अज्ञाताचे वेध लागले. अकराव्या वर्षीच तो घर सोडून अज्ञाताच्या शोधात बाहेर पडला. फिरत फिरत हिमालयात गेला. तिथे त्याने तपश्चर्या केली. तिथे तो नीळकंठ म्हणून ओळखला जाऊ लागला. मग भारत दर्शनार्थ पूर्वोत्तर राज्यांत फिरला. गुवाहाटीस कामाख्या मंदिर पाहिले. पूर्व किनाऱ्यावर भुवनेश्वरला गेला. सूर्यमंदिर पाहिले. मग रामेश्वरमला गेला. दक्षिणेतील राज्यांचा प्रवास करत, मग तो त्र्यंबकेश्वरला आला. तिथून पुढे चालत चालत, वयाच्या अठराव्या वर्षी, गुजरातेतील लोज या गावी पोहोचला. वयाच्या अकराव्या वर्षापासून अठराव्या वर्षापर्यंत सात वर्षांच्या कालावधीत १२,००० किलोमीटरचा प्रवास पायी करून त्याने भारतदर्शन केले.

लोज इथे स्वामी रामानंद यांचा आश्रम होता. त्यांना कल्पना होती की असा एक दिव्य पुरुष इथे येणार आहे. तो तिथे पोहोचताच त्यांनी त्याचे स्वागत केले. आपल्या अनुयायांना तोच आपला उत्तराधिकारी असल्याचे सांगितले. तेव्हा तो स्वामिनारायण म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वामिनारायण वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी, १८३० साली निवर्तले. त्यांच्या उण्यापुऱ्या एकोणपन्नास वर्षांच्या आयुष्यात त्यांनी असंख्य अनुयायी मिळवले. मृत्यूची भीती सोडल्यास जीवनातील आनंदाचा उत्तम आस्वाद घेता येतो आणि चराचर सृष्टीतील प्रत्येक सजीव आपल्या प्रेमास पात्र आहे. प्रेम करण्यात आनंद आहे. अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या मृत्यूपश्चात आज दोनशे वर्षे लोटून गेलेली आहेत. तरीही त्यांच्या अनुयायांची संख्या वाढतीच आहे. त्यांच्या अनुयायांनी जगभर निर्माण केलेल्या अक्षरधाम मंदिरांची मालिकाही सदा समृद्ध होत आहे. अशातच नवी दिल्ली इथे नुकतेच बांधले गेलेले अक्षरधाम मंदिर भारताच्या समृद्ध परंपरेचे अत्याधुनिक प्रदर्शनच ठरावे एवढे भव्य, दैदिप्यमान आणि संस्मरणीय आधुनिक तीर्थक्षेत्र आहे.

या मंदिरास भेट देण्याचा योग मला नुकताच लाभला. त्या मंदिरास भेट देऊन जो दिव्यतेचा स्पर्श माझ्या मनाला झाला, त्याची माहिती ज्यांनी ते मंदिर अजूनही पाहिलेले नाही त्यांचेकरता करून द्यावी असे मला प्रकर्षाने वाटले. म्हणूनच मी हा लेख लिहिण्यास प्रवृत्त झालेलो आहे.

प्रमुख स्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेले हे मंदिर, नवी दिल्ली शहराबाहेर, पूर्वेला, गाझियाबादच्या वाटेवर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४), यमुनेवरील निझामुद्दीन पुल पार करताच, दिसू लागते. १०० एकर जागेवर निर्माण केलेले हे मंदिर, निव्वळ नैसर्गिक दगडांना एकावर एक ठेवून तयार केलेले आहे. निर्मितीत लोखंडाचा वापर केलेला नाही. मुख्य मंदिरात ११ फूट उंचीची, भगवान स्वामिनारायण यांची पद्मासनस्थ, भव्य मूर्ती प्रतिष्ठित आहे. ती पंचधातूंची घडवलेली असून सुवर्णमंडित आहे. मंदिरास आपल्या भारतीय परंपरेनुरूप हत्तीशिल्पांचे तोरण असलेला उंच पाया आहे. त्यातील १४८ हत्तींपैकी एकही हत्ती दुसऱ्यासारखा नाही. वालुकाश्मातून, एक एक हत्ती दहा दहा फूट उंच आणि प्रमाणबद्ध घडवलेला आहे. प्रथमच पाहणारा भाविक केवळ भव्यतेनेच भारून जातो. २३४ स्तंभांवर तोललेले, १४१ फूट उंच मंदिर, १३६ फूट रुंद असून ३५६ फूट लांब आहे. ते गुलाबी पत्थर व शुभ्र संगमरवरातून घडवलेले आहे.

मंदिर परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वदूर असलेली कमालीची स्वच्छता, शांतता, शिस्त आणि सुव्यवस्था. परिसरातील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाच्या प्रवेशापाशीच असलेली पुरेशी प्रसाधन व्यवस्था आणि जागोजागी असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. कित्येकदा तर मला इथे माणसांपेक्षा कचराकुंड्याच जास्त आहेत की काय असा संशय येई, इतक्या कचरा कुंड्या इथे आहेत. एकही ओसंडून बाहेर वाहताना दिसली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात पर्स-पाकिटे, पिशव्या, मोबाईल इत्यादी वस्तू जवळ बाळगण्यास मनाई आहे. मात्र प्रवेशापाशीच त्या वस्तू बाहेर मंदिर व्यवस्थापनाकडे जमा करून परतताना परत घेण्याची छान व्यवस्था विनामूल्य केलेली आहे. परिसरात उपाहारगृहे यथास्थित उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यात वाजवी दरात गरजेचे पदार्थ मिळण्याची सुंदर व्यवस्था आहे. दररोज लाखो लोक संकुलास भेट देत असूनही कुठे गर्दी, गोंधळ, गैर-व्यवस्था होत असल्याचे दिसत नाही. कॅमेरे व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही बाहेरच सोडावी लागतात. मात्र उपलब्ध सी.डी.ज व पुस्तकांतून परिसराचे उत्तम छायाचित्रण वाजवी दरात सहज उपलब्ध करून दिलेले आहे. संकुलाबाहेरच वाजवी दरातील वाहनतळाची पुरेशी व्यवस्था आहे.

मंदिराची विस्तृत माहिती http://www.akshardham.com/ किंवा http://www.swaminarayan.org/ या संस्थळांवर सहज उपलब्ध आहे.

संकुलात स्वामिनारायण मंदिराव्यतिरिक्त एक भव्य संगमरवरी राममंदिर, तीन प्रदर्शने आणि एक रंगप्रकाशित, संगीतावर थिरकणारे कारंजे आहे. मंदिर पाहण्यास ३० मिनिटे, राममंदिरास ३० मिनिटे, पहिल्या सहजानंद प्रदर्शनास ५० मिनिटे, दुसऱ्या भव्य पडद्यावरील नीळकंठदर्शन चित्रपटास ४० मिनिटे, तिसऱ्या संस्कृतीविहार नौकानयनास १५ मिनिटे आणि खानपानास ६० मिनिटे, याव्यतिरिक्त मोठाली अंतरे चालणे व प्रतीक्षाकाल गृहीत धरता किमान साडेचार तास (४ तास ३० मिनिटे) इतका वेळ मंदिर संकुलाच्या अर्थपूर्ण दर्शनास आवश्यक आहे. खरे तर अनेक दिवस दिल्लीत राहून सावकाश हे मंदिर पाहण्याची इच्छा ह्या पाहण्यानंतर उत्पन्न होते. तीन प्रदर्शने व कारंजे यांखेरीज इतर सर्व संकुलात प्रवेश विनामूल्य आहे.

तिन्ही प्रदर्शनांत प्रवेश शुल्क आकारण्यात येते. सर्व मिळून रु. १२५/- दर व्यक्तीस पडतात. प्रदर्शने क्रमानेच उघडत जात असल्याने क्रमानेच पाहता येतात. पहिले प्रदर्शन साधारणतः सकाळी अकरा वाजता उघडते. त्यात अनेक दालनांतून पाच पाच मिनिटांचे ध्वनी-प्रकाशांकित, संजीवित प्रसंग स्वामिनारायणांच्या जीवनातील प्रसंग पुन्हा साकार करतात. त्यातील देखावे सत्य वाटावेत इतके हुबेहुब साकारलेले आहेत. त्या त्या व्यक्तींचे पुतळे हालचाल करतात, बोलतात आणि त्यांचे हावभावही ते जिवंत भासावेत असेच आहेत. दुसऱ्या प्रदर्शनात स्वामिनारायणांची जीवनगाथा ८५ x ६५ फूट आकाराच्या भव्य (आय मॅक्स) पडद्यावर एका अद्भुत चित्रपटाद्वारे दर्शवण्यात येते. स्वामिनारायणांचे पात्र साकारणारे बाल कलाकार संस्मरणीय आहेत. चित्रपटाचा दर्जा अप्रतिम आहे. तिसरे प्रदर्शन एका वातानुकूलित भव्य दालनांतर्गत निर्माण केलेल्या छतावृत्त नदीमधील १५ मिनिटांच्या नौकाविहारात, त्या नदीच्या दुतर्फा संजीवित करण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या देखाव्यांद्वारे प्रबोधन करते. इथे तक्षशीला विद्यापीठ, सुश्रुताचे शुश्रुषालय, नागार्जुनाची रसशाळा इत्यादी सांस्कृतिक स्थळे पुनर्जीवित केलेली आहेत.

याव्यतिरिक्त ३०० x ३०० फुटाची भव्य पुष्करणी, हृदयकमल, परिक्रमा, यज्ञकुंड इत्यादी यथासांग माहिती वरील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेच. केवळ उत्सुकता जागृत व्हावी, माहिती व्हावी आणि आज मितीस भारतात इतरांस अभिमानाने दाखवता यावे असे एक भव्य मंदिर इथे आहे हे कळावे ह्यासाठीच हे सव्यापसव्य. आपल्याला ही माहिती आवडेल हीच अपेक्षा आहे.

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

नाव मेघश्याम नसून घनश्याम होते.
बाकी लेख छान आहे.

-- जय स्वामीनारायण

Deepak म्हणाले...

अतिशय महत्त्वपुर्ण माहिती ...!
कालच्या रविवारी - १६ नोव्हें २००८ - आम्ही नेस्डेन - लंडन येथे असणारे, जगप्रसिद्ध स्वामी नारायण मंदिरात गेलो होतो.... अक्षरधाम अजुन झाले नाही, मात्र त्याचीच प्रतिकृति वाटावी इतपत सुंदर हे मंदिर आहे. आपल्या मुलुखापासुन दुर, या ठीकाणी आपल्या संस्कृतिचा जतन पाहताना मन अगदी धन्य होऊन जाते.... !

कधी संधी मिळाली तर जरूर भेट द्या:

Shri Swaminarayan Mandir (B.A.P.S.),
105-119 Brentfield Road, Neasden,
London NW10 8LD, U.K.
Tel: (44-20) 8965 2651
Fax: (44-20) 8965 6313
Web: http://www.mandir.org/

मी काढलेले काही फोटोग्राफसः
http://lh3.ggpht.com/__X91DnmTxec/SSHakNaZgWI/AAAAAAAAC_w/D1yq1PJLra8/DSC04814.JPG?imgmax=1600

http://lh4.ggpht.com/__X91DnmTxec/SSHag4F_X5I/AAAAAAAAC_o/dO2dhKrtbD0/DSC04813.JPG?imgmax=1600

http://lh3.ggpht.com/__X91DnmTxec/SSHaqzR2lcI/AAAAAAAADAA/4NOMJs_xjlk/DSC04819.JPG?imgmax=1600

http://lh5.ggpht.com/__X91DnmTxec/SSHauJ5_VuI/AAAAAAAADAI/wgjhmsg-6mU/DSC04820.JPG?imgmax=1600

आभार,
डी.

नरेंद्र गोळे म्हणाले...

अनामिक महोदय आपल्या मार्गदर्शनार्थ धन्यवाद.
आपली सूचना योग्य असल्याने यथोचित बदल केला आहे.

बम्बलबी आपली माहितीही अमूल्य आहे.
शक्य झाल्यास मीही ते मंदिर अवश्य पाहेन.

- नरेंद्र गोळे २००८११२१