20130403

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे 

(जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी –
मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) 

हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचेआज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्यात झाले. ते १९४० साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे त्यांनी इंडियन एअर फोर्समध्ये ग्राऊंड इंजिनिअरिंग कोर्प्समध्येलाहोरकोलकाता व सिकंदराबाद येथे नोकरी केली. १९४४ साली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात नाव नोंदवले. १९४६ साली ते संस्कृत विषय घेऊनविशेष प्राविण्यासह बी.ए. झाले. पुढे बी.एड. आणि एल.एल.बी.ही झाले.

१९४८ साली संघावर बंदी आली होती तेव्हा भैयाजी सहा महिने तुरूंगात गेले. १९५० मध्ये ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. १९५८ पर्यंत एकूण आठ वर्षे मंगलोरगुलबर्गारायचूर ह्या भागात प्रचारक राहिले. ते कुशल संघटक होते. उत्साही प्रशिक्षक होते आणि निष्ठावान स्वयंसेवक होते. उंचगोरेपानप्रसन्न व्यक्तीमत्त्वाचे भैयाजी जिथे जिथे गेलेतिथले लोक त्यांची आजही आठवण काढतात.

१९५८ ते १९७१ भैयाजींनीसिन्नर (नासिक)चिंचणी (ठाणे)जशपुरनगर (छत्तीसगड)वसईनिर्मळभुईगावकळंबवाघोली (ठाणे)कोंढ्ये (तालुका राजापूरजिल्हा रत्नागिरी) इत्यादी निरनिराळ्या गावांत शिक्षकाची नोकरी करून उपजीविका चालवली. स्वतःचे पायावर उभे राहूनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. ते उत्तम मल्लखांबपटूप्रशिक्षक आणि प्रणेते होते. संस्कृत साहित्याचा अपार अभ्यास आणि अनेकविध स्तोत्रांचे अफाट पाठांतर असल्याने त्यांना व्यक्तीस वश करून घेण्याची कला सुरेख साधलेली होती. आदर्श शिक्षकाचा जणू ते वस्तुपाठच होते. ह्या सार्या कौशल्याचा त्यांना संघकार्यात भरपूर उपयोग होत असे.

१९७१ सालच्या जून महिन्यातकोढ्ये येथील नोकरी सोडून ते जाणीवपूर्वक पूर्वांचलात गेले. प्रथम इंफाळमधील पंजाबी हायस्कूलमध्ये नोकरी केली. मग १९७३ च्या जूनमध्ये ते कोंढ्याच्या जयवंत कोंडविलकर ह्या बारा वर्षे वयाच्यासातवीत शिकणार्या मुलासहमणिपूर राज्यातीलउख्रूल जिल्ह्यातीलन्यू तुसॉम गावात एका ख्रिश्चन-उच्च-माध्यमिक-शाळेत नोकरी करू लागले. हे त्यांच्या शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय-एकात्मता साधण्याच्या ध्येयास अनुसरूनच केलेले होते. उत्तम शिक्षण आणि बहिःशाल कार्यक्रमांद्वारे ते प्रथम विद्यार्थीप्रिय झाले आणि पुढे पालकांच्याही पसंतीस उतरले. मराठीकानडीहिंदीइंग्रजी,संस्कृतमैतेयी भाषांवर त्यांची उत्तम पकड असल्याने लोकांना समजून घेऊ शकले. त्यांच्याशी सुसंवाद करू शकले. शिवायप्रेमळआर्जवीआनंदी आणि उत्साही स्वभावामुळे ते लोकांच्या मनांत प्रवेश करू शकले. शाळेचे व्यवस्थापन ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असून आणि भैयाजी स्वतः हिंदू असूनहीत्यांना वसतीगृहाचे पर्यवेक्षक नेमले गेले. पूर्ण वेळ मुलांसोबत राहून, पहाटेपासून मुलांना एकात्मतेची जाण दिली.भारतीयत्वाची जाण दिली. शारीरिक शिक्षण दिले. त्यांना मल्लखांब, निरनिराळे खेळ शिकवले. भारतीय भूप्रदेशांची, संस्कृतीची आणि प्रातस्मरणीय व्यक्तीत्वांची सम्यक ओळख करून दिली. आजारपणांत पालकांप्रमाणे शुश्रुषा केली. त्यामुळे ख्रिश्चनबहुल समुदायात त्यांचे अल्पावधीतच स्नेहबंध निर्माण झाले.

पूर्वांचलातील कामांत त्यांनी संघसंपर्कांचा मुळीच उपयोग केला नाही. कुठेही ते दीर्घकाळ राहिले नाहीत. त्यांना कायमस्वरूपी असे घरच नव्हते. गोळवलकर गुरूजींनी एकदा त्यांना विचारले, “भैय्यातू सारखा फिरत असतोसस्थिर का होत नाहीस?” तेव्हा भैय्याजी म्हणाले होते, “मी अनिकेत आहेपण स्थिरमति!” ह्याला गीतेच्या बाराव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे. तो श्लोक असा आहेः

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ॥ - भगवद्गीता-१९-१२
म्हणजेच
निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो ।
स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ - गीताई-१९-१२

अनिकेतः स्थिरमतिः” हे भैयाजींनी केलेले स्वतःचे वर्णनच त्यांचे सर्वात यथार्थ वर्णन आहे. त्यामुळे अर्थातच ते भगवंतांचे प्रिय व्यक्ती असायलाच हवेत.

१९७३ च्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या मातोश्री निवर्तल्याची तार आल्याने त्यांना नाईलाजानेच परतावे लागले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनीलालमोहन शर्मा ह्या मैतेयी आणि शंकन ह्या तांगखूल नागा मुलासही जाणीवपूर्वक सोबत घेतले. जयवंतही सोबत होताच. सांगलीत आईचे दिवस पूर्ण होताच त्यांनी स्वतः शिक्षकी पेशा पत्करला आणि मुलांना सोबत घेऊन राहू लागले. पुढे ह्या मुलांना घेऊन ते जेव्हा न्यू तुसॉमला परत गेले तेव्हा त्यांची प्रगती झालेली पाहून इतर पालकही आमच्या मुलांना घेऊन जा. शिकवा. असे मागे लागले. जास्त विद्यार्थ्यांची सोय करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या झेपणारे नव्हते. पण असल्या बारक्या समस्यांना दाद देतील तर ते भैय्याजी कसले! त्यांनी सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनाही ह्या चांगल्या कामास हातभार लावण्यास विनंती केली. समाजानेही त्यांचा शब्द वाया जाऊ दिला नाही. मग १९९२ पर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थी महाराष्ट्रकर्नाटक आणि आंध्रात आणलेशिकवून मोठे केले आणि त्यांना प्रेरित करून पुन्हा पूर्वांचलात पाठवले. आज ते विद्यार्थीच जबाबदार नागरिक झालेले आहेत. त्यांचे उद्दिष्टास पुढे नेत आहेत.

१९९२ नंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम पत्करला. एकाकी जीवन जगणे पसंत केले. कुठेही दीर्घकाळ राहिले नाहीत. कुणासही भारभूत झाले नाहीत. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते. २६ ऑक्टोंबर १९९९ रोजीबंधूंचे घरीच कोल्हापूरातमेंदूतील कर्क अर्बुदा (ब्रेन ट्युमर) मुळे त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळली तेव्हा जागोजाग त्यांच्या विद्यार्थांना पोरके वाटू लागले. २६ ऑक्टोंबर २००० रोजी न्यू तुसॉम येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि गावकर्‍यांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचे शब्द मुळातच वाचण्यासारखे आहेत [१].

२००२ साली त्यांच्या एका मित्रानेश्री.अ.गो.कुंटे ह्यांनी त्यांचे एक चरित्र प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन उपलब्ध आहे [२]. मात्रभैय्याजींसारख्या प्रसिद्धीपराङगमुख व्यक्तीचा माग काढणे मुळीच सोपे नाही. तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनांत त्यांच्या आठवणी सदैव ताज्या आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि पुढे दहाहून अधिक वर्षे पूर्वांचलात राहून त्यांच्या कामास पूर्णत्व देणारे श्री. जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित उख्रुलचे आव्हान” [३] हे पुस्तकही मुळातच वाचनीय आहे. एवढेच सांगून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो. त्यांच्या कामाचे वर्णन करणारे ओज-शंकराष्टक आपणास सादर करतो!

संदर्भः
१.       एका शाळामास्तरची भारत परिक्रमादे.कों.सातभाईप्रकाशकः पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठान१६ ऑक्टोंबर २००१पृष्ठसंख्या-१५२किंमतः रु.६०/- फक्त.
२.       अलौकिक कर्मयोगी स्वयंसेवकअ.गो.कुंटेप्रकाशकः जयवंत गणपत कोंडविलकर२४ जुलै २००२पृष्ठसंख्या-१३८किंमतः रु.६०/- फक्त.
३.       जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित उख्रुलचे आव्हानशब्दांकन पुरूषोत्तम रानडेपृष्ठसंख्या-५७. (हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. वाटेवर आहे.)

ओज शंकरा

तुझीच ओज-शंकरास्मृती मनात वाहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ धृ ॥

प्रसार संघशक्तिचाविचार भावला तुला ।
जगात आचरून प्रेममार्गपाय रोविला ॥
कसा मिळेल वारसा तुझाविचार राहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ १ ॥

कधी सुरेल बांसरी, ’प्रहार’ तू प्रशिक्षिले ।
कुमारबालवा युवातुवा पुरे खुळावले ॥
व्यक्तीव्यक्तीशिबीर-साक्षतेच दीस शोधतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ २ ॥


कसाकुठेकधीकुणीविचार प्रेरिला मनी ।
अपूर्व-पूर्व अंतरा[१] न थोर मानले जनी ॥
तुझेच शिष्यचाहतेतुला मनात बाहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ३ ॥

तळात कोकणातुनीहि नागभूमि[२] गाठली ।
एकात्मता धरून नेम देशभक्ति पेरिली ॥
मितेयनागतांगखूलमुंबईस जोडतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ४ ॥

ब्रम्हचर्यी कुणास काय प्राप्त होत संतती ।
तुला मुले अनेकती तुझेच नाव सांगती ॥
न पुत्र वागला कुणीअसाच निष्ठ राहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ५ ॥

निवासती मुलेमुलीअशी गृहेहि राखली ।
मुलांसपालकांसना मुळीच धास्ति वाटली ॥
जपेल पालकापरीअसे समाज मानतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ६ ॥

मराठमोळकानडी असोहि तेलुगू कुणी ।
मितेयनागतांगखूलशिष्य सर्वही गुणी ॥
तुम्हास लोभलाखचीत ध्येय शुद्ध गाठतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ७ ॥

असेच दीप दाखवूअशीच रीत नांदवू ।
एकात्मता फिरून, देशबांधवांत जागवू ॥
पथावरून जाऊ त्याचब्रीद हेच सांगतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ८ ॥


[१]  मुंबई ते कोलकाता १,६६४ किमी अंतर, अधिक कोलकाता ते उख्रुल १,५७८ किमी अंतर, अधिक उख्रुल ते न्यू तुसॉम १०० किमी अंतर असे एकूण ३,३४२ किमी अंतर, भैय्याजींनी क्षुल्लक भासावे इतक्यांदा पार केले, इतक्यांदा शेकडो मुलांची तिथून इथवर ने-आण केली.
[२]  कोकणातील कोंढ्ये गावातून ते थेट मणिपूर राज्यातील म्यानमारच्या सीमेवरील न्यू-तुसॉम गावात, शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या आपल्या ध्येयाच्या साधनेकरता, १९७१ साली रवाना झाले होते.

5 comments:

mannab said...

ओज-शंकराची कहाणी मनाला भिडणारी आहे . असे फार थोडे ओज-शंकर आजही असतील . पण त्यांना कोण ओळखणार ? आपण ही माहिती सविस्तर दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
मंगेश नाबर

mannab said...

श्री. भय्याजी काणे यांच्यावरील श्री नरेंद्र गोळे यांचा लेख अतिशय सुंदर आहे. एक जुनी आठवण जागृत झाली. मी स्वत: १९४३ ते ४६ या काळात रॉयल इंडियन एअर फोर्स मध्ये ग्राउंड इंजिनीअरिंग खात्यात फ्लाईट मेकॅनिक(इंजिन्स) होतो व लाहोर आणि सिकंदराबाद येथे काम केले होते. त्यावेळी भय्याजी काणे यांची गाठ पडल्याचे अंधुक आठवते. ते एवढे विद्वान संन्यासी होतील असे तेव्हां वाटले नव्हते. माझ्या कोल्हापूर गावी त्यांनी देह ठेवला हे वाचून मन उचंबळून आले. माझ्या सध्याच्या ८८ वर्षे आयुष्यातील पहिली ३५ वर्षे मी कोल्हापुरातच काढली होती. तिथूनच १८ व्या वर्षी एअर फोर्स मध्ये गेलो होतो. भय्याजींच्या आत्म्यास माझे प्रणाम.
यशवंत कर्णिक (भाई).

ऊर्जस्वल said...

मंगेशजी,

अभिप्रायांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

Maharaja said...

Wow..That's the way to live our life..
Salute!

Maharaja said...

Wow..That's the way to live our life..
Salute!