20081118

"उडिशा" दर्शन-२

भुबनेश्वर
ओरिसा कलेचे आगर आहे. भुबनेश्वरच्या रस्त्यांवरील दुभाजक असू देत, खासगी घरांकरता निवडलेले ग्रिलचे डिझाइन असू दे, रस्त्याकाठच्या दिव्यांकरता निवडलेले कलापूर्ण खांब असू देत, मोहक वक्ररेषा आणि बारीक-बारीक कलाकुसर मनाला सारखी मोहवत राहते. जरी आम्ही आमच्या पर्यटनात रुपेरी तारेच्या अलंकारांचे माहेरघर ‘कटक’ समाविष्ट केलेले नव्हते, तरी तसल्याच पितळी तारेच्या कलाकुसरीच्या वस्तूंनी 'एकम्रा हाटा'त आमचे लक्ष वेधून घेतले होते. 'एकम्रा हाट' हे उडिशा सरकारने भुबनेश्वरला उभारलेले एक कायमस्वरूपी हस्तकला प्रदर्शन आहे. पर्यटकाने खेरिददारीत रुची नसली तरी अवश्य पाहावेच असे आहे. भुबनेश्वरच्या बिजू पटनाईक विमानतळापासूनच उडिया कलात्मकतेचे दर्शन होऊ लागते. एकम्रा हाटातील स्वागत कक्षात ते अधिकच प्रकर्षाने प्रकट होते. ओरिसा सरकारच्या अधिकृत प्रवासीनिवासांना (हॉटेलांना) "पंथनिवास" म्हणतात. सर्वच पंथनिवासांतील खोल्या बैठकीच्या सामानांनी (फर्निचरने) सुसज्ज असत. पंथनिवासातील उपाहारगृहा (रेस्तराँ) मध्ये परवराच्या कापांना बेसन लावून तळलेले काप क्षुधोत्तेजक (स्टार्टर्स) म्हणून देत असत. ही पाककृती (रेसिपी) आम्हाला बेहद्द आवडे. याला ते लोक ‘परवर भाजा’ म्हणत.

02 Paravara Bhaja

राजाराणी मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाचे ताब्यात आहे. त्यांच्या ताब्यातील अत्यंत सुव्यवस्थित स्मारकांचे (मॉन्युमेंट्स) हे एक उदाहरण आहे. हल्ली ओरिसात "राजाराणीय" म्हणून ओळखल्या जात असलेल्या वालुकाश्माने हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. सध्या त्यात मूर्ती नाही. मात्र ती शिवाची मूर्ती वा लिंग असावे, याचे पुरावे बाह्य बांधकामात सापडत असल्याचे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पुस्तकात म्हटले आहे. कदाचित या मंदिरावरूनच या प्रकारच्या दगडांना "राजाराणीय" म्हणू लागले असावेत. डौलदार बांध्याच्या देखण्या नर्तिका आणि दिक्पाल हे राजाराणी मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सलग दगडातून कोरून काढलेल्या उभ्या कलात्मक गजांच्या खिडक्या हे ही एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्या खिडक्यांमुळे, मंदिराला खऱ्याखुऱ्या वास्तवास, दगडात साकार करण्याचे श्रेय लाभते. खिडकीच्या प्रत्येक गजावरील नक्षी निराळी असून, सहज नजरेत भरते.

03 Sinha-Hatti

उदयगिरी आणि खंडगिरी या दोन जवळजवळच्या टेकड्यांवरील लेण्या, भुबनेश्वरच्या नैरृत्येकडील खुर्दा मार्गावर शहराबाहेर आहेत. उदयगिरी भारतीय पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असून त्यावर चढण्यास तिकीट आहे. त्यावर चढल्यावर तिथून खंडगिरीची टेकडी दिसते. ओरिसात जागोजागी दिसणाऱ्या पांढऱ्या चाफ्याचा विशाल वृक्ष, उदयगिरीच्या जिन्याकाठीही आहे. खंडगिरीवरूनही उदयगिरीच्या लेण्या दिसतात.

मुक्तेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, लिंगराज मंदिर ही सगळी मंदिरे आसपासच आहेत. लिंगराजमंदिरात फोटोग्राफीस मनाई आहे. सिद्धेश्वर मंदिराला सलग दगडातून कोरलेल्या खिडक्या आहेत. त्या म्हणजे कोरीव खिडकीकलेतील कमालच आहे. नागकन्यांचे स्तंभ आणि भूमितीय आकृत्यांची नक्षी जागोजाग दिसून येते. नागकन्यांची कमनीयता नेत्रदीपक आहे. सिंहाचे हत्तीवर वर्चस्व दाखवणारी शिल्पे दारांवर दिसून येतात. ती बुद्ध धर्मावर हिंदू धर्माने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानली जातात.
बरकूल

04 Chilika Sarovar
भुबनेश्वर, खुर्दा, बरकूल, रांभा, गोपालपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या दोन्ही बाजूस नजर पोहोचेतोवर भाताची शेती पसरलेली आहे. हिरव्या पोपटी रंगाच्या सर्व छटांनी समृद्ध हिरवाईने डोळे निवतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या भातशेतीमधून सरळसोट जाणारा रस्ता आकाशातून पाहताना 'नो एंट्री' च्या चिन्हासारखा दिसत असावा. राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचा तो एक हिस्सा असल्याने त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. जिथे काँक्रीटीकरण झालेले आहे तिथे रस्त्याची अवस्था छानच आहे. एरव्ही अतिशय खराब.

बरकूलच्या पंथनिवासाचे कार्यालय म्हणजे एक कौलारू टुमदार बंगला होता. मात्र, आम्ही राहिलो ती इमारत जुन्या प्रकारची सिमेंट काँक्रीटची दुमजली इमारत होती. जिच्या वरच्या मजल्यावर आम्ही राहिलो. उतरायला सरळसोट उतरता जिना दाराबाहेरच होता. जिन्याच्या चौकातून समोरचे धाब्याचे घर व्यवस्थित दिसे. उपाहारगृह दूरवर होते. त्याच्यामागे वरकरणी तंबूसारखी दिसणारी सिमेंट काँक्रीटची टुमदार घरे ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची सुट्टीकालीन घरे (हॉली-डे होम्स) होती.

मात्र सकाळी जेव्हा आम्ही जलप्रवासाला बाहेर पडलो होतो तेव्हा, सूर्य तळपत होता. ऊन लागू नये म्हणून आम्ही डोक्याला फडकी ओली करून बांधलेली होती. त्यातही उकाडा होऊन फडके उतरवावे लागे. सभोवताल क्षितिजापर्यंत हिरवेगार पाणी दिसे. क्षितिजापर्यंत वर्तुळाकार कुठल्याही दिशेला किनारा दिसू नये एवढा चिल्का सरोवराचा विस्तार भव्य आहे. पावसाळ्यात एकूण १, १६५ वर्ग किलोमीटर्स एवढे विस्तृत क्षेत्र या जलाशयाने व्यापलेले आहे.

05 Bandista Bandhara

बरकूलच्या पंथनिवासा पाठीमागे असलेल्या जेटीवरून आपण नेहमी चित्रात पाहतो तसल्या बदक, राजहंस इत्यादी आकारांच्या सुरेख नावा जलाशयात बांधून ठेवलेल्या दिसत. तिथे विस्तीर्ण चिल्का सरोवराचा साधारणतः एखाद किलोमीटर व्यासाचा भाग दगडमातीच्या बंधाऱ्याने बंदिस्त केलेला आहे. त्याला मुख्य जलाशयात शिरण्यासाठी एक तोंड होते. मुखातून लांबवर प्रवास करणाऱ्या स्वयंचलित होड्या व पडाव बाहेर जाऊ शकतात. उडिशा शैलीचे शिकारा (छताच्या नावा) मात्र या पाळीच्या मर्यादेतच प्रवाशांना फिरवून आणतात. त्यांच्या फेरीची वेळ संध्याकाळची ठरवलेली असते. गुडुप अंधार, निरव शांतता आणि वेड लावणारे गार वारे, अशात केवळ एक नावाडी तीन-चार प्रवाशांना छताच्या नावेत बसवून, बांबूने वल्हवत साधारणतः तासाभराचा फेरफटका, बंदिस्त जलाशयात, बांधाच्या काठाकाठाने घडवून आणतो. हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जलाशयाची खोली कुठेही दहा पंधरा फुटांहून जास्त नसली, तरीही बांबूच्या एका वल्ह्यासरशी हळूच, नाव बरेच अंतर पार करून नेण्याचे कसब आश्चर्यकारक होते.

बरकूलमध्ये स्वयंचलित होडीने चिल्का सरोवरात दूरवर फेरी करून कालीजय मंदिराचे बेट आणि नालबन नावाचे बेट दाखवले जाते. कालीजय बेटावर एक विहीर होती. बेटावर आम्हाला एक सौर दिवाही पाहायला मिळाला. भारत सरकारच्या, अपारंपरिक, पुनर्नविनीक्षम, ऊर्जास्त्रोतांच्या खात्यात आमचे वैदर्भीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार साहेब आल्यापासून, अशा गोष्टींकडे आमचे हमखास लक्ष जाते. कालीजय मंदिराची एक कथा पर्यावरणीय प्रशिक्षण केंद्राने (Enviromental Education Center) तिथे एका फलकावर नोंदवून ठेवलेली आहे. ती खाली दिलेलीच आहे.

06 Swayamchalita Hodi Ani Shikara

नालबनात आम्ही पोहोचलो ते वनखात्याच्या शेवाळं-भेदक होड्यांनी निर्माण केलेल्या कालव्यांतून. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते तेव्हा हे सारे कालवे कोरडे पडून मोठे विस्तीर्ण बेट दिसू लागते, असे नावाडी सांगत होता. आम्ही मात्र ज्या निरीक्षण घराच्या पडवीतून आजूबाजूचा पाण्यात बुडालेला परिसर पाहत होतो त्या निरीक्षणघरापुरतेच ते बेट सीमित झालेले दिसत होते. नाव मनोऱ्याच्या चौथऱ्याशी उभी करून आम्ही वर निरीक्षण करण्यास गेलो.

सभोवताल सर्व पाणथळ भाग दिसत होता. कुठे कुठे जमिनीत रोवलेल्या बांबूची टोके वर दिसत. त्यावर पाण्यात बुडी मारून नुकतीच माशाची शिकार साधलेले पाणकावळे पंख सुकवताना दिसत. यांव्यतिरिक्त एक मोठासा करकोचा आणि एक भला थोरला बगळाच काय तो पाहता आला. नाही म्हणायला छोटे छोटे पक्षी, टिटव्या दर्शन देत होत्याच. जानेवारीत इथे लाखो स्थानांतर करणारे पक्षी येतात असे जरी सारखे ऐकत आलेलो असलो तरी सध्या ऑक्टोबर अखेरीस मात्र अगदीच तुरळक आणि लहान सहान पक्षी आसपास दिसून येत होते.
कालीजय मंदिराची कथा आणि अग्नीपंखी पक्षांचे सैन्य

07 Kalijay Ani Nalban
परिकुडा वंशाच्या भागिरथी मानसिंगाच्या कारकीर्दीत, खुर्दाच्या राजाने मानसिंगाशी युद्ध पुकारले. पराभवाच्या नामुष्कीतून सोडवण्यासाठी, मानसिंगाने कालीदेवीची प्रार्थना केली. लढाई सुरू होण्याआधीच अग्नीपंखी पक्षांचा मोठा थवा उपजीविकेच्या शोधात, युद्धभूमीजवळच येऊन दाखल झाला. खुर्दाचा राजा ससैन्य येऊन पोहोचला. त्याला वाटले की हे मानसिंगाचेच सैन्य असले पाहिजे. त्यांच्या प्रचंड संख्येपुढे आपले सैन्य टिकाव धरणार नाही असे वाटून तो तसाच माघारी परतला. अशाप्रकारे अग्नीपंखी पक्षांची कुमक येऊन पोहोचल्यानेच मानसिंगाचा पराभव टळला. त्या पक्षांना कालीदेवीनेच पाठवले असावे असा मानसिंगाला विश्वास होता. तेव्हापासून त्याच्या राज्यात कालीजय देवीची पूजा केली जाते. ते बेटही कालीजय बेट म्हणूनच ओळखले जाते. मंदिराच्या आसपास हर तऱ्हेची दुकाने प्रसादाचे, कलाकुसरींचे ऐवज मांडून थाटलेली होती.

No comments: