२०११-०४-२२

पुस्तक परिचय: परत मायभूमीकडे

समकालीन प्रकाशनच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ६ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाली. किंमत फक्त रु.१२५/-. पृष्ठे १०७.

मायबोली डॉट कॉम वर “परतोनी पाहे” सदरात अनेक लोकांनी आपापले विचार मांडले. पुढे परतून पाहणारे यशस्वीही होतांना दिसू लागले. अशांपैकीच एक आहेत डॉ.संग्राम पाटील. पाटील लिहीतात, “अविकसित ग्रामीण व दुर्गम जगतात समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी शांत व निस्वार्थीपणे अविरत काम करणार्‍या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक अर्पण.”

डॉ.अभय बंग प्रस्तावनेत लिहीतात, “संग्राम व नूपुर पाटील हे महाराष्ट्रातले एक तरूण डॉक्टर जोडपे एका वेगळ्या प्रवासावर निघाले आहे. डॉक्टरांनी आयुष्यात काय करावे याचा रूढ व प्रतिष्ठित मार्ग चालता चालता त्यांनी अचानक वाट बदलली आहे. ब्रिटनहून परतून ते एरंडोलच्या वाटेने चालायला लागले आहेत. माझ्या मते, संग्राम व नूपुरची कहाणी हे एक आश्वासक चिन्ह आहे. एका संवेदनाशील तरूण मनाचा डोळस प्रवास, एक अंतर्द्वंद्व व त्यातून विवेकाने घेतलेला साहसी निर्णय याची कहाणी संग्रामने उत्तम व रोचकपणे या पुस्तकातून मांडली आहे. ती कहाणी समाजाला समृद्ध करणारी, शिवाय तरूण पिढीसमोर एक उत्तम उदाहरण पेश करणारी आहे.”

“मला डॉक्टर व्हायचाय”, “एम.बी.बी.एस. ते एम.डी. व्हाया मेळघाट”, “चलो परदेश”, “इंग्लंडच्या वैद्यकीय सेवेत”, “इंग्लंडची अपुर्वाई”, “ब्रिटनमधली ’पूर्वाई’ ”, “मी इथे काय करतोय” आणि “एक प्रयत्न... ग्रामीण आरोग्याच्या दिशेने” या आठ प्रकरणांतून हे पुस्तक मांडलेले आहे.

पहिल्या चार प्रकरणांतील हकिकती नेहमी घडतात तशाच आहेत. निराळे आहे ते त्यांनी केलेले प्रेम, लग्न. त्याची लपवलेली माहिती. परस्परांवरील अतूट प्रेम. घरच्यांची अतूट जातनिष्ठा. विमनस्क अवस्थेत घर सोडून जावे लागणे. मात्र परदेशात जाणार हे समजल्यावर घरच्यांनी, देशातून जाऊ नये म्हणून त्यांचा स्वीकार करणे, त्यांचे मन वळवण्याचा प्रयास करणे, मला निराळे वाटले. ग्रामीण समाजातल्या समजूतदारीचे ते चिरंतन प्रतीक वाटले. असे प्रयास पुण्या-मुंबईतील कुटुंबांत होत असल्याचे दृश्य फारसे पाहण्यात नाही. कदाचित ग्रामीण कुटुंबांतल्या परस्पर संबंधांच्या घट्ट वीणीचे ते अपरिहार्य पर्यवसान असावे.

चौथ्या प्रकरणात इंग्लंडमधल्या वैद्यक सेवेचा स्वानुभवातून घेतलेला आढावा डॉक्टरांनी यथातथ्य चित्रित केलेला आहे. रोचक आणि वास्तव. वृद्धापकाळ ब्रिटनमधेच घालवलेला बरा. स्वदेशात वृद्धापकाळ घालवणे निव्वळ कष्टमय. ही त्यांची टिप्पणी क्लेशदायक असली तरीही वस्तुस्थितीला धरूनच आहे.

इंग्लंडची अपूर्वाई सांगतांना ते म्हणतात, “”ब्रिटनच्या शैक्षणिक व्यवस्थेतल्या पारदर्शकतेचा प्रत्यय माझ्या व नूपुरच्या ब्रिटनमधील वास्तव्यात वेळोवेळी आला. विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासतांना गोरा किंवा काळा अथवा स्थानिक किंवा परदेशी असा भेदभाव मला अजिबात दिसून आला नाही.” लंडनहून मुंबईस परततांना एकदा त्यांना बोलक्या वृद्ध गोर्‍याशी संवाद साधावा लागला. तो ८९ वर्षांचा आहे हे कळल्यावर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो त्यांना ७० वर्षाचा असावा असेच वाटले होते. पुढे मुंबई विमानतळावर ७० वर्षे वयाच्या भारतीय महिलेला सामान ट्रॉलीवर चढवण्यात मदत करतांना पाहून, डॉक्टरांना युरोपिअन आरोग्य-व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. ही इंग्लंडची अपूर्वाई.

ब्रिटनमध्ये राहणार्‍या पौर्वात्य लोकांचा सुरेख आढावा त्यांनी पुढल्या प्रकरणात घेतलेला आहे. मुळातच वाचायला हवा इतका तो सुरस आहे. मात्र भारतातून तिथे गेलेले कित्येक लोक, पात्रतेपेक्षा कितीतरी निम्न दर्जाची कामे पत्करूनही ब्रिटनमध्येच का राहतात ह्याचे त्यांना आश्चर्य वाटे.

“मी इथे काय करतोय” प्रकरणात त्यांनी परतण्याचा निर्णय कसा घेतला त्याची कारणमीमांसा दिलेली आहे. यथातथ्य आणि निखळ राष्ट्राभिमानी. पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्वखुशीने, अत्यंत असुरक्षित अवस्थेतही परत जाण्यास उत्सुक मित्र भेटले तेव्हा, त्यांना भारतात परतण्याचा निर्णय घेणे सोपे वाटले. ते मित्र म्हणाले इतर लोकांना पाकिस्तान असुरक्षित वाटतो. असेलही. आमचे मात्र तेच घर आहे. आम्ही घरी जायला का घाबरावे? आपली मुले कदाचित, “मी भारतीय नाही, माझे आई-वडील भारतात वाढले” असे म्हणतील ही शक्यताही त्यांना नको वाटली. हे निराळे आहे. हे आगळे आहे.

अखेरीस डॉक्टर म्हणतात, “भारतात परतण्याने आमच्या मनातील ध्येयाला, आपल्या लोकांसाठी काम करण्याविषयीच्या खोलवर रूजलेल्या आमच्या भावनांना व आमच्या एकूण अस्तित्वालाच आम्ही न्याय दिला असं आम्हाला वाटतं. याच मार्गावर चालत राहिलो तर एक जन्मही अपुरा वाटेल एवढे काम इथे पडले आहे. ही फक्त सुरूवात आहे.”

वयाच्या तिशीतच, दोन छोट्यामुलांसह, पाच वर्षांच्या ब्रिटनमधील यशस्वी कारकीर्दीस पूर्णविराम देऊन संग्राम-नूपुर भारतात परतले. मलेरिया, व्यसनाधीनता इत्यादी शत्रूंशी मुकाबला करता करताच, आपल्या मुलांनाही व्यवस्थित शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नवीन शाळाच उघडणार्‍या या डॉक्टर दांपत्यास पुढील सर्व वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!

मला ही “परत मायभूमीकडे” चाललेली वाट, तिचे वर्णन आणि हे एकूण पुस्तकच आवडले. तुम्हालाही नक्कीच आवडेल. विचारास प्रवृत्त करेल. कुणी सांगावे, कदाचित आचारासही प्रवृत्त करेल!
.

२०११-०४-०७

अनुदिनी परिचय-५: सेव्ह अँटिबायोटिक्स

७ एप्रिल २००११ रोजी जागतिक आरोग्यदिन साजरा करण्यात आला. यावर्षी, ‘प्रतिजैविक अवरोध’ हा विषय यासाठी निवडण्यात आलेला होता. याच कारणाने, भारतात हे काम हाती घेतलेल्या एका संघटनेच्या अनुदिनीची आज ओळख करून देत आहे.

अनुदिनीः सेव्ह अँटिबायोटिक्स http://save-antibiotics.blogspot.com/
(ह्या अनुदिनीशी संलग्न आणखीही दोन आनुदिन्या आहेत http://antibio-resistance.blogspot.com आणि http://wewantantibiotics.blogspot.com/. ह्या तीन्ही अनुदिन्या मिळून संस्थेच्या उद्दिष्टाच्या प्रचाराचे काम करतात.)

अनुदिनी लेखकः डॉक्टर अशोक ताम्हनकर antibio.resistance@gmail.com. राष्ट्रीय समन्वयक, प्रतिजैविक अवरोधाच्या व्यवस्थापनाकरताचा भारतीय पुढाकार. अनुदिनीवरही त्यांचा तपशीलवार परिचय उपलब्ध आहेच.

अनुदिनीचे घोषवाक्यः “Let us all JOIN together and spread a word for prudent use of antibiotics.”
आपण सर्व एकत्र येऊन प्रतिजैविकांच्या सुयोग्य वापरासंबंधीची जागरूकता निर्माण करू या.

अनुदिनीची सुरूवातः मे २००८

अनुदिनीतील नोंदीः

http://save-antibiotics.blogspot.com/ -२००८ मध्ये एक, २००९ मध्ये नऊ, २०१० मध्ये आठ आणि २०११ मध्ये दोन अशा एकूण वीस नोंदी आहेत.

http://antibio-resistance.blogspot.com - २००८ मध्ये अकरा, २००९ मध्ये चौपन्न, २०१० मध्ये पस्तीस आणि २०११ मध्ये तेरा अशा एकूण ११३ नोंदी. तसेच,

http://wewantantibiotics.blogspot.com/ -२००८ मध्ये २६, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ४२ आणि २०११ मध्ये १४ अशा एकूण १४२ नोंदी या अनुदिनी समुहात आढळून येतात.

अनुदिनीस मिळालेले पारितोषिकः अनुदिनीस “टॉप अँटिबायोटिक्स ब्लॉग-२०१०” हे पारितोषिक मिळालेले आहे.

अनुदिनीचे वाचकः क्लस्टर मॅपनुसार १७ एप्रिल २०१० ते ६ एप्रिल २०११ दरम्यान, या अनुदिनी समुहास जगभरातील एकूण ९० देशांतील, २,१४४ वाचकांनी भेटी दिल्या आहेत.

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे?

अनुदिनी पूर्णतः इंग्रजीत आहे. मुख्यतः वैद्यकीय व्यावसायिकांकरता आणि सुबुद्ध व जागरूक वाचकांकरता उपयुक्त अशी आहे. मात्र, यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचा संदेश घेऊनच ती उभी आहे. लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्याकरताच हा सर्व खटाटोप आहे. म्हणूनच तिची दखल इथे घेत आहे. काय आहे बर तो संदेश? तो आहे खालीलप्रमाणे.

खालील पुस्तिका डॉ.अ.ज.ताम्हनकर यांनी तयार केलेली आहे. अनुदिनीवर तिचा थेट दुवा नाही. मात्र लेखकाशी झालेल्या प्रत्यक्ष संपर्कातून, लोकप्रबोधनार्थ तयार केलेल्या जागरण पुस्तिकेचा हा तर्जुमा, हाती आलेला आहे.

(ही माहिती निरनिराळ्या स्त्रोतांतून आणि प्रतिजैविक अवरोध विकसन थांबवण्याच्या/कमी करण्याच्या/मंदावण्याच्या उदात्त हेतूने गोळा केलेली आहे. कुणाही व्यक्ती/अधिकारी/कुठल्याही समाजाचा घटक यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. वैद्यकीय डॉक्टर्स आणि सरकारचे आरोग्य खाते, याबाबतीत कुठलेही निर्णय घेण्यास आणि कृती करण्याचा अंतिम अधिकार बाळगतात, ह्याची आम्हाला जाणीव आहे. जर कुणा वाचकास यात काही चूक आढळली तर त्यांनी ती आमच्या निदर्शनास आणावी. आम्ही ती दुरुस्त करू. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याकरता आम्ही क्षमा प्रार्थितो. -डॉ.अ.ज.ताम्हनकर)

प्रतिजैविके म्हणजे काय? प्रतिजैविक-अवरोध म्हणजे काय?

प्रतिजैविके (antibiotics) म्हणजे, जिवाणूंमुळे होणार्‍या न्युमोनिया, कॉलरा, टायफॉईड इत्यादी रोगांवर, उपचार करण्याकरता वापरली जाणारी (अमोक्सिलिन, एरिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन, सिप्रोफ्लोक्सासिन इत्यादींसारखी), महत्त्वाची औषधे असतात. जेव्हा आपण सतत प्रतिजैविके घेत राहतो, तेव्हा जिवाणू, प्रतिजैविकांच्या प्रभावापासून वाचण्याचे मार्ग शोधून काढू शकतात आणि “प्रतिजैविक-अवरोधक” बनतात. मग प्रतिजैविके काम करत नाहीत. जेवढी जास्त वेळा आपण प्रतिजैविके वापरू तेवढीच, जिवाणू प्रतिजैविक-अवरोधक बनण्याची शक्यता बळावते. म्हणून आपण गरज नसतांना प्रतिजैविके वापरू नयेत. महागडी आणि नवी प्रतिजैविके प्रभावी असू शकतात, मात्र त्यांचे उप-प्रभावही अनेक असू शकतात आणि अखेरीस जिवाणू त्यांनाही अवरोधक बनू लागतील. अलीकडील काही वर्षांत फारच थोडी, नवी प्रतिजैविके शोधली गेलेली आहेत. म्हणून जर आपण आजची प्रतिजैविके योग्य प्रकारे वापरली नाहीत आणि संसर्गकारक जिवाणू जर त्यांकरता अवरोधक झाले, तर आपल्याला आपल्या रोगांचे निवारण करतांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल.

प्रतिजैविकांबाबतचा अवरोध ही विश्वव्यापी समस्या होऊ पाहत आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे, भारतात ही समस्याही जास्त तीव्र असेल. प्रतिजैविक-अवरोधक जैवसृजन व त्यांचा आढळ आपल्या सभोवताल जिकडे तिकडे –चिकित्सालये, आरोग्यकेंद्रे, मनुष्यमात्र, शेती, प्राणी, खते, अन्नपदार्थ, दूध, गटारे, पाणवठे, सांडपाणी, ज्याचा ज्याचा आपण विचार करू तिथे तिथे- होऊ लागलेला आहे. हे प्रतिजैविकांच्या बेदरकार/ अति-/ गैर- वापरामुळे घडून येत आहे. म्हणून आपण अवरोध विकसनाच्या संभाव्यतेस कमी करणारी उपाययोजना सुरू करायलाच हवी आहे. आपण सगळ्यांनी, योग्य उपाययोजना सुरू करण्यासाठी आणि या समस्येबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी एक झाले पाहिजे.

जर आपण प्रतिजैविके गरज नसतांना वापरली, तर त्यांची गरज असेल तेव्हा ती काम करणार नाहीत. प्रतिजैविकांचा सर्वात अनावश्यक वापर सर्दीकरता होत असतो.

मी माझ्या सर्दीचा इलाज कसा करावा?

बहुधा सर्दी, खोकला किंवा घशाला पडणारी कोरड यांवरचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे भरपूर पेय पान (पाणी पिणे) आणि विश्रांती घेणे हाच आहे. सर्दी एखादा हप्ता टिकू शकते, तिचे पर्यवसान खोकल्यात होऊ शकते ज्यात कफ पडतो. लक्षणे मोकळी करणारे अनेक सोपे उपाय आहेत, उदाहरणार्थ- पॅरासिटामोल. आरोग्यकेंद्रांतून राबवला जाणारा एक साधा उपक्रम, अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर लक्षणीयरीत्या घटवतो असे दिसून येते. यात डॉक्टर रुग्णांना, सर्दी-खोकल्याकरता वापरावयाच्या, औषधांचा संचच देतात. त्यात दुःख-निवारक, श्वास-विमोचक, विना-प्रतिजैविक खोकल्याचे औषधी द्रावण, गरम पाणी प्यावे असा सल्ला देणारी पदके असतात. जर सर्दी एका हप्त्याहून जास्त टिकून राहिली किंवा श्वसनास त्रास जाणवू लागला अथवा छातीत दुखू लागले वा आधीचीच काही छातीत दुखण्याची तक्रार असेल तर, तुमच्या डॉक्टरला भेटा. साध्या सर्दीकरता प्रतिजैविके मिळणार्‍या रुग्णास कुठलाही लाभ वा सुधारणा पदरी पडत नाही, मात्र प्रत्यक्षात अनेक उप-प्रभावांस सामोरे जावे लागते.

मुलांना तर सारखाच सर्दी-खोकला होत असतो, त्याचेबाबत काय करावे?

जेव्हा ते शाळेत जातात आणि इतर मुलांसोबत मिसळतात तेव्हा, मुलांना सर्दी व खोकला होणे खूप सामान्यपणे घडणारी घटना आहे. जर लक्षणे टिकून राहिली तर, डॉक्टरांना भेटा मात्र प्रतिजैविके देण्याचा आग्रह धरू नका.

सर्दी-खोकल्याच्या उपचाराकरता प्रतिजैविके का म्हणून वापरू नयेत?

सर्व सर्द्या आणि बहुतेक खोकले व घशाला पडणार्‍या कोरडी ह्या विषाणूंमुळे होत असतात. प्रतिजैविके विषाणूंविरुद्ध काम करत नाहीत.

मग माझ्याकरता प्रतिजैविकांची उपाययोजना केव्हा केली जाईल?

मूत्रपिंड संसर्ग किंवा न्युमोनिया, दंतसंसर्ग, घावसंसर्ग यांसारख्या आजारांवर आणि मेनेंजायटिस सारख्या संसर्गांवर प्राण-रक्षक औषधी म्हणून तुमचे डॉक्टर प्रतिजैविके देतील.

प्रतिजैविक-अवरोध कसा टाळता येईल?

जर आपण प्रतिजैविके क्वचितच वापरत असू, तर आपण अवरोध विकसनाची गती मंद करू शकू. जेव्हा प्रतिजैविके दिलेली असतील तेव्हा त्यांची दिलेली पूर्ण मात्रा जिवाणूंचा संपूर्ण नायनाट करण्याकरता घेणे आवश्यक आहे. जर ती अर्धवट घेऊन सोडून दिली तर, काही जिवाणू अवरोध-विकसन करण्यासाठी मोकळे राहतील.

आम्ही रुग्णास खालील गोष्टी सुचवतो

१. रुग्णांनी प्रतिजैविकांचा अति-/अल्प-/गैर- वापर करू नये.

२. तुम्ही पुन्हा आजारी पडाल त्यावेळी वापरण्याकरता काही प्रतिजैविके शिल्लक ठेवू नका.

३. डॉक्टरने दिलेली सर्व औषधे संपेस्तोवर पूर्णपणे सेवन करा.

४. इतर कुणाकरता दिलेली प्रतिजैविके सेवन करू नका.

५. सर्दी व खोकल्या सारख्या विषाणूंसंसर्गांकरता प्रतिजैविके सेवन करू नका.

६. प्रतिजैविक-अवरोध टाळण्याकरता रुग्णांनी, नमुन्याचे योग्य वैद्यक-निदान केल्याशिवाय प्रतिजैविके स्वीकारू नयेत.

७. प्रतिजैविके डॉक्टरने सांगितली नेमकी तशीच घ्या.

८. सुधारित स्वच्छतासवयींनी संसर्ग टाळल्यास प्रतिजैविकांची गरजच कमी करता येईल. कुठलेही घाणीशी संबंधित काम केल्यावर आणि जेवणापूर्वी नेहमीच हात धुवावेत. परिसर स्वच्छ ठेवावा.

९. संसर्ग-साखळी तोडा. आजारी असाल तेव्हा घरीच राहा.

१०. “संसर्गांचा –विशेषतः अतिसार, उलट्या, सर्दी आणि खोकला यांमुळे होणार्‍या संसर्गांचा- प्रसार नियंत्रणात ठेवण्याचा, हात स्वच्छ धुणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.”

११. गैरसमजः जर नाकातून वाहणारा स्त्राव पिवळा किंवा हिरवा असेल तर प्रतिजैविके आवश्यक असतात. वस्तुस्थितीः स्त्रावाचा रंग आणि प्रतिजैविकांची गरज यात कुठलाही संबंध असत नाही.

१२. गैरसमजः जर सर्दी तीन दिवसांहून जास्त टिकून राहिली तर प्रतिजैविके आवश्यक असतात. वस्तुस्थितीः सर्दी सर्वसामान्यपणे पाच ते सात दिवस टिकते क्वचित १० दिवस वा अधिकही टिकू शकते.

सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात “जिवाणूंनी, नेहमीच वसाहत केलेली असते. हे जिवाणू आपल्याला कुठलाही रोग न जडवता आपल्या शरीरात व आपल्या शरीरावरही राहतात. एवढेच काय ते आपल्याला उपयुक्तही असतात. उदाहरणार्थ आपल्या आतडीतील काही जिवाणू जीवनसत्त्वे तयार करतात. जेव्हा आपण प्रतिजैविके घेतो तेव्हा, आपण आपले जिवाणूंसोबत असलेले संतुलन विचलित होऊ देण्याचा धोका पत्करत असतो. असे संतुलन ढळल्यामुळे, आपल्या शरीरात असणार्‍या “सामान्य जिवाणूं” पैकी काही जाती प्रतिजैविक अवरोध विकसित करू शकतात आणि मग त्यांचा नायनाट करणे अवघड ठरू शकते. आपले जिवाणूंसोबत असलेले संतुलन बदलल्यास, सामान्यतः निरामय वसाहत करून राहणारे हे जिवाणू आपल्याकरता आजार आणू शकतात. इतकेच नव्हे तर ते नंतर हा अवरोध संसर्गकारक जिवाणूंनाही देऊ शकतात.

लक्षात ठेवाः अवरोधक जिवाणू श्रीमंत आणि गरीब, जाती आणि धर्म यांच्यात भेदभाव करत नाहीत. ते आपणा सगळ्यांनाच संसर्ग पोहोचवतात. जर आजची प्रतिजैविके निरुपयोगी झाली तर, आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. भवितव्य अंधकारमय होईल.
.

२०११-०४-०४

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांस नवे "खर नाम संवत्सर" उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमाधान देवो!

डोंबिवली शहराने, नववर्षाची पहाट नव्या उत्साहाने, प्रभातफेरी काढून, रस्ते स्वच्छ करून साजरी करण्याची प्रथा पुनरुज्जीवित केली. त्याच नववर्ष स्वागत यात्रेतील ही काही परिदृश्ये!



या म्हणताहेत की सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणजे "गुढीपाडवा", व म्हणून हाच हिंदूंचा वर्षारंभदिन आहे.

हिंदू संस्कृती जोपासा! वाढदिवस केवळ केक कापून नव्हे तर तिथीनुसार औक्षण करून साजरा करा! असेही म्हणणारा एक फलक दिसून येतो.

शिक्षणानेच देश घडतो. म्हणून शिक्षणाचा प्रसार करा सांगणारेही मिरवणुकीत सहभागी होते.

सर्व समाजांच्या, सर्व थरांतील लोक उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले.


यावेळचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे जाणीवपूर्वक टाळलेले फटाक्यांचे प्रदूषण आणि विजेवर चालणार्‍या स्वयंचलित वाद्यांचे दूर ठेवले जाणे. लेझिम, ढोल, ताशा, झांझा, टाळ या पारंपारिक वाद्यांवर सुरेख लयबद्ध नृत्य करत पथ आक्रमणारी मिरवणूक नेत्रसुखद होती. गुलाल, बुक्का, भंडारा इत्यादी रंगद्रव्यांचा वापरही मर्यादित राखल्याने उत्साहास गालबोट लागले नाही.

सचिन-धोनीच्या संघाने दैदिप्यमान सांघिक खेळी करून भारतास क्रिकेटचा "विश्व-कप" मिळवून दिल्याची स्मृतीही रस्त्यावर ताजीच दिसत होती!

अशाच विजयी पताकांनी नवे वर्ष सुखसमाधान आणि भरभराट घेऊन येवो हीच प्रार्थना!

अनुदिनी परिचय-४: अक्षरधूळ

अनुदिनी: अक्षरधूळ Chandrashekhar's Marathi Blog http://chandrashekhara.wordpress.com/

अनुदिनीकार: चंद्रशेखर आठवले, पुणे

अनुदिनीची सुरूवातः जानेवारी १३, २००९ च्या सुमारास झाली असावी. कारण त्यावेळी लेखक लिहितात, “ गेली कांही वर्ष़, वेडेवाकडे कां होईना, मराठीतून कांहीना कांहीतरी लिहित आलो आहे. त्याचीच ही ब्लॉग साखळी. वाचकांना आवडेल अशी मनापासून इच्छा.”

अनुदिनीकाराची ओळख: लेखक स्वतःची ओळख पुढील शब्दांत करून देतात, “मी पेशाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता व उद्योजक होतो. आता निवृत्त. माझ्या व्यावसायिक आयुष्यामधे मी निरनिराळ्या विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आराखडा बनवणे व त्यांचे नंतर उत्पादन यामधे कार्यरत होतो. निवृत्तीनंतर मी एक छंद म्हणून लेखन करण्यास सुरवात केली. मी माझ्या इंग्लिश व मराठी ब्लॉग्समधे लेखन करतो. या ब्लॉग्सचे दुवे उजव्या बाजूच्या कॉलममधे सापडतील. माझ्या व्यावसायिक जीवनात मी नेहमीच हाताने काम करत आल्याने सध्या सुद्धा, कधी मधी नवनिर्मितीची उर्मी येते. पेपर मॉडेल्स बनवणे व प्लायबोर्डवर फ्रेटकाम करणे या कामातून मी ही उर्मी शमवतो. मला ज्योतिर्विद्याशास्त्रात खूप रुची आहे. माझ्याकडे असलेल्या मीड ETX 90C दुर्बीणीतून तारे बघण्याचा मला छंद आहे. परंतु पुण्याच्या सध्याच्या परिस्थितीत ही दुर्बीण आता क्वचितच वापरता येते. मला ललित लेखनाची आवड नाही. इतिहास, भूगोल, शास्त्र हे विषय माझ्या आवडीचे आहेत. माझे बहुतेक लेख या विषयांवरचेच असतात. आंतर्राष्ट्रीय राजकारणातल्या खेळ्यांचा अभ्यास करण्यातही मला खूप रुची आहे. या विषयावरचे बरेच पोस्ट तुम्हाला येथे सापडतील.”

अनुदिनीची सांख्यिकी: क्लस्टर मॅपनुसार २८-०५-२०१० ते ०६-०२-२०११ दरम्यानची अभ्यागतसंख्या २२,६००. या अनुदिनीस शंभराहून अधिक देशांतून वाचक लाभलेले आहेत. दिवसात शंभराहून अधिक पाहुणे या अनुदिनीस भेट देतात. अनुदिनीची एकूण वाचकसंख्याः ७५,७४३ (ब्लॉग-स्टॅटसनुसार).

अनुदिनीची नोंदणी: मराठी ब्लॉग विश्व, ब्लॉगारामा, ब्लॉगपेडिया
अनुदिनी वरील मालिका लेखन: अगदी अलीकडील आठ भागांची प्रवासवर्णनात्मक मालिका, “दक्खनच्या पठारावर”. पूर्वीची गाजलेली सहा भागांची मालिका प्रवासवर्णनात्मक मालिका, “देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही)”. त्याआधीची चार भागांची मालिका, “पळा, पळा, कोण पुढे पळे तो!”. तीन भागांची मालिका “विश्वासघात”. चार भागांची “कूर्गची डायरी”.

अनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदी (टॉप पोस्टस): आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक, बाल्खच्या सोन्याची गोष्ट, श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे), गळचेपी का अनुशासन?, सत्तांतर, दख्खनच्या पठारावर -1, कर्करोगींचे गाव, कोडागुच्या दर्‍याखोर्‍यांमधली फुले, दख्खनच्या पठारावर -5, 400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक.

अनुदिनीचे विषयविभाग: मुखपृष्ठ, एक वर्षापूर्वी, पेपर मॉडेल्स, भुणभुण, माझ्याबद्दल About, मी वाचलेली काही पुस्तके- Books I have read, वूडन फ्रेटवर्क, ताज्या घडामोडी Current Affairs, अनुभव Experiences, Musings-विचार, History इतिहास, Travel-पर्यटन, Health- आरोग्य, Environment-पर्यावरण, People व्यक्ती, Science, Uncategorized

चौदा कागदी प्रारूपे आणि एक लाकडी घराचे प्रारूप या त्यांच्या कलाकृतींची प्रकाशचित्रेही इथे प्रस्तुत केलेली आहेत. लेखकाने वाचलेल्या एकूण अठरा पुस्तकांची यादीही दिलेली आहे. ज्यात “श्रीमंत महाराज भोंसले यांची बखर” हे पुस्तक मराठी आहे, तर इतर सर्व इंग्रजी.

अनुदिनीकाराची तीन ई-पुस्तके:

१. अनुदिनी: Excess Baggage, A Book of Blogs about Travels and Countries, Exasperation, Musings,Curiosity and About Books, Author: chandrashekhar, Added: 08 Feb, 2009, Last updated: 08 Feb, 2009, Category: Arts and Literature, No. of pages: 92, Views: 114859

२. अनुदिनी: ऋणानुबंधांचे देणे(Runanubandhanche Dene), MARATHI book of short articles. Consists of pen sketches, Childhood and young age experiences of author, and an article on Dnyaaneshwar. मराठी इ-पुस्तक, काही व्यक्ती-चित्रे, लेखकाचे बालवयातील व शिक्षणसंस्थेतील अनुभव आणि ज्ञानेश्वरीतील काही भावलेल्या ओव्या या लेखांचा संग्रह, Author: chandrashekhar, Added: 23 May, 2009, Last updated: 24 May, 2009, Category: Arts and Literature, No. of pages: 144, Views: 74264

३. अनुदिनी: ध्यास(Dhyaas), नारायण महादेव आठवले यांची जन्मकहाणी (life story of Narayan Mahadev Athavale), Author: chandrashekhar, Added: 24 Jan, 2009, Last updated: 04 May, 2009, Category: Arts and Literature, No. of pages: 176, Views: 163792.

अनुदिनीकाराची नवी अनुदिनी: याविषयी लेखक लिहितात, “हा ब्लॉग कशासाठी? दक्षिण पूर्व एशिया मधल्या माझ्या वास्तव्यानंतर, चीन या देशाचे जागतिक महत्व माझ्या लक्षात आले. आपण भारतीयांना, चीन बद्दल फारच कमी माहिती असते. आपल्याकडची प्रसारमाध्यमे, राजकीय महत्वाच्या सोडल्या तर चीनबद्दलच्या बाकी कोणत्याच बातम्या देत नाहीत. चिनी लोकांची रहाणी, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांच्या व्यथा, दु:खे आपल्याला माहितीच नाहीत. चीनच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक अगदी प्राथमिक प्रयत्न आहे. माझे इतर ब्लॉग्स, पुस्तके यांच्याप्रमाणेच हा ब्लॉगही वाचकांना आवडेल ही आशा करतो.”

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे? लेखक अवकाशप्राप्त अभियंत्रज्ञ, उद्योजक आणि सृजनकर्ता आहे. जगभर विपुल प्रमाणात, चोखंदळपणे प्रवास करून त्या प्रवासांची चित्त-चक्षु-चमत्कारिक प्रवासवर्णने लिहून, त्यांनी इतरांना त्यांच्या नजरेतले जग सुरेख सादर केलेले आहे. जग पाहण्याच्या दृष्टीने काढलेली, लक्षपूर्वक निवडलेल्या चौकटींतील उत्तम प्रकाशचित्रे हे या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य आहे. अंगकोरच्या अप्सरा, गंधविश्व इत्यादी अनेक वाचनीय लेख हे या अनुदिनीचे वैशिष्ट्य आहे. ताज्या घडामोडी, संपर्कातील व्यक्तीरेखा, स्वानुभव यांवर ओघवते भाष्य करण्याची लेखकाची शैली सुरस आहे. खरे तर कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करण्याची क्षमता आणि जगाकडे पूर्णत्वाने बघण्याची नजर यामुळे यांचे लेखन वाचनीय ठरते आहे.
.