20111004

मराठी उच्च शिक्षण समिती - “मुशिस”

पार्श्वभूमी

देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे.

चीन, जपान व कित्येक युरोपिअन देशांत सर्व प्रकारचे उच्च शिक्षण त्यांच्या त्यांच्या भाषांतून उपलब्ध आहे. त्या अनेक देशांच्या त्या त्या भाषा बोलणार्‍या लोकांहूनही मराठी बोलणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर इतकी वर्षे उलटूनही आपले उच्च शिक्षण इंग्रजीच्या दावणीलाच बांधलेले आहे.

ज्या देशांत त्यांच्या स्वभाषेत उच्च शिक्षण उपलब्ध असते, त्यांच्या भाषेचा त्यामुळे विकास होत राहतो. ते लोक इंग्रजी न शिकताही आपापला विकास करून घेऊ शकतात. त्यामुळे इंग्रजी शिक्षणात जे मनुष्यबळ आपण वाया घालवतो आहोत, ते त्यांच्या देशात त्यांच्याच विकासाकरता उपयोगात येते. त्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. तिथे, इतर देशांशी ज्यांची गाठ पडते अशा १०-१५% टक्के लोकांखेरीज जनसामान्यांना अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत नाही. आपल्याला अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागायची कारण इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते. आता ते राहिलेले नाही. तरीही आपली मनोवृत्ती गुलामगिरीस इतकी धार्जिणी झालेली आहे की, आपल्या भाषेचा, विभागाचा विकास हे मुख्य ध्येय राहिले नसून, इंग्रजी भाषा प्रथम अनिवार्यपणे शिकून घेऊन मग विश्वाच्या प्रांगणात उच्च शिक्षणाचा शोध आपण घेऊ लागतो. मातृभाषेत ते उपलब्ध नाही याची आपल्याला ना खंत असत, ना खेद.

शालांत परीक्षेपर्यंत अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत असल्याने काय बिघडते? शिकावी की आणखी एक भाषा, आपल्यालाच उपयोगी पडेल. असे लोक बोलतात. हो. शिकावी. पण परकी भाषा अनिवार्यपणे का शिकावी? तिला शेकडो इतर पर्याय का उपलब्ध नसावेत. निदान आपल्याच भारतातल्या १४ मान्यताप्राप्त भाषा, इंग्रजीला पर्यायी का नसाव्यात? ह्याचा विचार होण्याची गरज आहे. इंग्रजी हवी त्यास ती शिकण्याचा पर्याय अवश्य असावा, मात्र हल्लीप्रमाणे ती अनिवार्य नसावी हे निश्चित.

कारणे अनेक आहेत. दहावी, बारावीचा उत्तीर्णता-दर आपण दरसालच्या परीक्षांत पाहतो. तो सुमारे ५०% च्या आसपास असतो. त्यातील बव्हंशी विद्यार्थी इंग्रजीत नापास होतात. त्यातील कित्येकांना पुढे शिक्षणच घेता येत नाही. तदनंतर उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते. किंबहुना तिचा त्यांना फारसा उपयोग तर होत नाहीच, मात्र तिचा दुस्वास मात्र वाटू लागलेला असतो. प्रगत “इंडिया” आणि “नापास” भारतातील ही तफावत आपण हकनाकच वाढवत आहोत. हे शैक्षणिक धोरण मुळातच चुकीचे आहे. इंग्रजी शिक्षण उपलध असावे. मात्र ते अनिवार्य नसावे.

मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही?

मुंबई विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकरता नियुक्त केलेल्या पुस्तकांवर आणि त्यांच्या लेखकांवर नजर टाकली तरीही एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती ही की त्यातील बव्हंशी लेखक मराठी आहेत. ते इंग्रजीत पुस्तके लिहीतात. इंग्रजीतून आपल्याच विद्यापीठांतून ती शिकवतात. मराठीच विद्यार्थी ती इंग्रजीतून शिकतात. आणि माझे काही मित्र, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून, आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालायचे, आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याने इंग्रजी उच्च शिक्षणालाच काय ते विद्यार्थी मिळायचे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले तरीही ते कुणी खरोखरच घेईल काय? अशी परिस्थिती! त्यामुळे इथे अंडे आधी की कोंबडी आधी असा प्रकारच दिसून येतो.

मात्र राष्ट्रीय योजना आयोगाने ह्याचा विचार करायला हवा आहे की, आपण आपल्या उपलब्ध मनुष्यबळापैकी किती टक्के मनुष्यबळ, अनिवार्य इंग्रजीच्या उपासनेत वाया घालवतच राहणार आहोत. आपल्याच मायबोलीत उच्च शिक्षण मिळू लागेल, तर हे मनुष्यबळ कायमस्वरूपी मुक्त होईल. इंग्रजीत नापासाचा शिक्का बसून आयुष्यभराकरता नाउमेद होण्याची पाळी, आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या हिश्श्यावर येणार नाही. पण आजवर कुठल्याही योजना आयोगाने इतका मूलभूत विचार केलेला दिसत नाही. मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही? ह्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

दुसरे एक कारण आहे, ते म्हणजे पुस्तकच नाहीत हो मराठीत. ती इंग्रजीतून अनुवादित करायला हवी आहेत. आता उच्च शिक्षण नाही म्हणून पुस्तके नाहीत की पुस्तके नाहीत म्हणून उच्च शिक्षण नाही, हा एक तसलाच न सुटणारा प्रश्न आहे. मुळात स्वतःच्या, स्वभाषेच्या, देशाच्या विकासाशी आपण प्रामाणिकच नाही. हे खरे आहे.

काय करायला हवे आहे?

मराठी विचारवंतांनी आपल्या मायबोलीच्या लेकरांच्या विकासाकरता, मायबोलीच्या विकासाकरता, हे एकदा आणि नेहमीकरता नक्की करण्याची गरज आहे की मायबोलीतून उच्च शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. आधुनिक शास्त्र हे मान्यच करते की असे झाल्यास व्यक्तींचा विकास झपाट्याने होईल. मात्र हे साधावे कसे?

याकरता एक “मराठी उच्च शिक्षण समिती-मुशिस” असावी. तिने पाच-दहा वर्षांच्या सुनिश्चित कालावधित महाराष्ट्रात, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध होईल अशाप्रकारचे नियोजन, कार्यान्वयन करावे आणि शिक्षणसंस्थांनी, शिक्षणमहर्षींनी, राज्यकर्त्यांनी त्यात आपापल्या अधिकारास, क्षमतेस साजेशी भूमिका प्रामाणिकपणे निभावावी. तरच हे साध्य होण्यासारखे आहे.

संकल्पना अशी आहे की जे प्राध्यापक स्वतःच लिहिलेली विज्ञान व तंत्रज्ञानाची इंग्रजी पुस्तके, इंग्रजीतून विद्यार्थ्यांस शिकवत आहेत, त्यांनीच त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करावेत. त्यांनीच ते मराठीतून शिकवावेत. त्याकरता इंग्रजीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांनी पुढे यावे आणि जे इंग्रजीने दिले नाही ते मायबोलीकडून हक्काने मागून घ्यावे.

मी काय करू शकतो?

७ डिसेंबर २००४ रोजी माझी अँजिओप्लास्टी झाली. लोकं “गेट वेल सून” म्हणायला येत. कसे? ते मात्र मला माहीत नव्हते. ते शोधून काढण्याच्या प्रयत्नात “डॉ. डीन ऑर्निशस प्रोग्रॉम फॉर रिव्हंर्सिंग हार्ट डीसीज”, डॉ. डीन ऑर्निश, पृष्ठसंख्या: ६७१, बॅलंटाईन बुक्स, १९९०, हे पुस्तक माझ्या वाचनात आले. मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. स्वतःस ते शब्द-न्‌-शब्द समजावे म्हणून मी त्याचा मराठीत अनुवाद केला. त्या पुस्तकातील सल्ल्याबरहुकूम जीवनशैली परिवर्तने घडवत घडवत मी माझ्या हृदयविकाराची माघार घडवली. आज किमान औषधे घेऊनही माझा रक्तचाप १००/७० मिलीमीटर पारा, असा राहत आहे. मग ह्याच संबंधात मी “बायपासिंग बायपास सर्जरी”, डॉ.प्रतीक्षा रीग डेब, एम.बी.बी.स., एम.डी.(मुंबई) व डॉ.एल्मर म.क्रँटन, एम.डी.(अमेरिका), पृष्ठसंख्या:२६७, प्रतिबंधक हृदयोपचार संस्था प्रतिष्ठान, २००७ ह्या पुस्तकाचाही मराठीत अनुवाद केला. त्यानंतर मला वैज्ञानिक पुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्याचा छंदच लागला. रुची आणि गतीही प्राप्त झाली. त्यानंतरही मी आणखी तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानातील किमान ५० पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध झाल्याखेरीज कुठलाही अर्थपूर्ण, उच्च शिक्षण अभ्यासक्रम सुरू होऊच शकत नाही. ह्यासंदर्भात अशाप्रकारचे अनुवाद करणे मला वरील पार्श्वभूमीमुळे शक्य झालेले आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी ह्यात जे काय करू शकतो, ते करायचे असा निर्णय घेतला आहे.

मी स्वतः अनुवाद करू शकतो, इतरांना मदत करू शकतो, “मुशिस” च्या कार्यात मोलाचा वाटा उचलू शकतो. इतर कोण कोण, काय काय करू शकतात हे त्यांच्याजवळ ही संकल्पना मांडून समजून घेऊ शकतो आणि एकूणच ह्या संकल्पास सशक्त आधार देऊ शकतो. तो देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मान्यवर, तुमचा काय विचार आहे. तुम्हालाही असेच वाटते का? तुम्ही ह्याकरता काय करू शकता?

संकल्पनाः नरेंद्र गोळे २०१११००४

6 comments:

Anonymous said...

मराठीतून उच्चशिक्षण उपलब्ध होण्यासाठी मराठी पारिभाषिक शब्दांचे प्रमाणीकरण व्हावयास हवे. तसे होईपर्यंत उच्चशिक्षणासाठी आवश्यक पुस्तके निर्माण होणार नाहीत. तोपर्यंत भाषांतरकर्त्यानी मराठी विद्यार्थ्याना तंतोतंत भाषांतराऐवजी संबंधित विषय मराठी या परिचित भाषेत समजून घेता यावा एवढेच माफक उद्दिष्ट ठेवले तर पारिभाषिक शब्दांच्या प्रमाणीकरणाला वेग येईल.

ऊर्जस्वल said...

माफक उद्देश ठेवला तर "वेग" कधीच प्राप्त होणार नाही. गेली ६४ वर्षे याची साक्ष आहेत. उद्देश संपूर्ण आणि गती दैदिप्यमान साधली तरच उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे! मी याकरता कटिबद्ध आहे! तुम्ही?

aativas said...

माझ्या माहितीप्रमाणे 'एकलव्य' संस्थेने हिंदी भाषेत असे बरेच काम केले आहे. मी शिकत असताना प्रा. भालबा केळकर यांनी लिहिलेली सोप्या भाषेतली विज्ञानावरची (की बाबतची?) पुस्तक वाचल्याच आठवतंय. प्रश्न असा आहे की सगळ्यांना फक्त घोकंपट्टी करून जास्त गुण (आणि त्यातून जास्त पैसे ) मिळवायचे असतात. नुसत (!) ज्ञान पाहिजे असेल तर भाषेची फार अडचण जाणवत नाही असा माझा तरी अनुभव आहे.

नरेंद्र गोळे said...

aativas,

ज्ञान पाहिजे असेल तर भाषेची फार अडचण जाणवत नाही असा माझा तरी अनुभव आहे. >>>> मग इंग्रजी शिक्षणाची लोकांना इतकी अपार ओढ का?

एवढी की स्वभाषेतील शिक्षणही त्यांनी नाकारावे!

अनिवार्य इंग्रजी शिक्षणाच्या धोरणाबाबत आपले काय मत आहे?

मराठी माध्यमाच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात आकडे इंग्रजीत लिहावेत ह्या शासकीय धोरणाबाबत आपले काय मत आहे?

स्वभाषेत उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास व्यक्तित्वविकास झपाट्याने आणि सर्वंकष साधतो असे आपल्याला वाटते काय?

-नरेंद्र गोळे

aativas said...

या विषयावर बरच काही लिहिता येईल पण तूर्त फक्त तुमच्या प्रश्नांवरची माझी मत सांगते - ती अर्थातच 'उत्तर' नव्हेत याच मला भान आहे.

१. मी स्वत: खर इंग्रजी खूप उशीरा - जेव्हा मी मराठी न बोलता येणा-या लोकांमध्ये राहिले तेव्हा शिकले - आणि व्याकरण नाही शिकले अजूनही बरोबर - पण संवाद साधायला आणि रोजच्या उपयोगाच्या गोष्टी शिकले. पण मी शाळेत इंग्रजी शिकले नसते तर मला या संधीचा उपयोग करून घेता आला नसता हेदेखील वास्तव आहे. त्यामुळे निरुपयोगी वाटल त्यावेळी तरी काही 'अनिवार्य' शिक्षण नंतर उपयोगी पडत. कोणतच शिक्षण 'अनिवार्य' असू नये अस माझ मत आहे - पण ते टोकाच आहे!

२. मराठी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकात इंग्रजी आकडे वापरण हास्यास्पद वाटत - कारण आकडे हे त्यातल्या त्यात शिकायला सोपे असतात - अक्षरांपेक्षा. गणित अर्थातच अवघड असत भाषेपेक्षा. कारण गुंतागुंतीची भाषा आपण रोज जितकी वापरतो तितक गुंतागुंतीच गणित रोज वापरत नाही. एखादा मुलगा मुलगी इंग्रजी अक्षरे चांगली जाणतो/ते पण आकड्यात त्याचा/तिचा गोंधळ होतो अस माझ्या तरी पाहण्यात नाही .. कदाचित शासनाने अस काहे पाहिलं असेल आणि म्हणून हे धोरण असेल :-)

३. स्वभाषेतून शिकण केव्हाही सोप! पण आता शहरात बहुभाषिक वातावरण असल्याने स्वभाषा कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे. शिवाय लहान वयात जास्त भाषा शिकता येतात - त्यामुळे अनेक भाषा शिकवायला हरकत नाही. पण त्या शिक्षणाची नाळ परिस्थितीशी जुळलेली हवी. मेरीपेक्षा मीराची गोष्ट इंग्रजीतून सांगितली, शेतीची गोष्ट इंग्रजीतून सांगितली (अशी अनंत उदाहरणे देता येतील)तर ते इंग्रजी तितके अवघड वाटणार नाही. अर्थात मराठीही मजेदारच शिकवतात म्हणा शाळेत!

४. एकदा 'भाषा' (मग ती कोणतीही असो) आवडायला लागली की सगळ्या भाषांबद्दल प्रेम निर्माण होते आणि त्या सोप्या होऊन समोर येतात असा माझा अनुभव आहे. पण हेदेखील टोकाचे मत असू शकते!

सविता

नरेंद्र गोळे said...

aativas,

सविस्तर उत्तर दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

एकदा 'भाषा' (मग ती कोणतीही असो) आवडायला लागली की सगळ्या भाषांबद्दल प्रेम निर्माण होते आणि त्या सोप्या होऊन समोर येतात असा माझा अनुभव आहे. >>>>>

दुर्दैवाने आपले इंग्रजी भाषेबाबत आपल्या नेत्या समाजाचे असेच झालेले आहे. त्यामुळे त्या भाषेबरोबरच आपली संस्कृतीही आपण विसरू लागलो आहोत. इंग्रजी आपल्यापैकी अनेकांना आवडू लागली आहे. उर्वरित ६०% समाज त्यामुळे अगतिक झाला आहे. त्याला इंग्रजी पेलतही नाही आणि पचतही. असे होणे चांगले आहे की वाईट? याचे तुम्ही दिलेले वरील निस्संदिग्ध उत्तरच आपल्या बुचकळ्यात पडलेल्या धोरणाचे उत्तम प्रतीक आहे.

अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही!