२०१०-०४-२५

सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी

१७ मार्च २०१० ते २६ मार्च २०१० दरम्यान नऊ रात्री आणि दहा दिवसांची सिक्कीम-दार्जिलिंग सहल साजरी करून २७ मार्च २०१० रोजी सकाळी ०१:३० मिनिटांनी आम्ही डोंबिवलीस परत आलो. सचिन ट्रॅव्हल्ससोबत आम्ही ही सहल अनुभवली. त्याच प्रवासाचे हे वर्णन आहे. सिक्कीम-दार्जिलिंग सहल काय शेकडो लोक करत असतात. त्याचे प्रवासवर्णन ते काय लिहीणार? आणि लिहीले तरी कोण वाचणार? शेकडो लोक जातात हे खरय. मात्र सगळेच काही लिहीत नाहीत. शिवाय मी जे पाहिलय, त्यापेक्षा पाहण्याच्या दृष्टीने अभ्यासच जास्त केलाय. त्या सगळ्याचे सार, नव्याने पर्यटनास उद्युक्त झालेल्यांना, नक्कीच उपयोगी ठरू शकेल. म्हणूनच तर हा सगळा खटाटोप करतो आहे. होतकरू प्रवाशांना काय पाहावे याचा अंदाज आला आणि कधीच तिथे न गेलेल्या व न जाऊ शकणार्‍यांना तिथे काय खास आहे ते समजले, तर या प्रवासवर्णन लिहीण्याचे सार्थक झाले असे मी समजेन.

१७ मार्च २०१० ला इंडियन एअर लाईन्सच्या, संध्याकाळी सहाच्या विमानाने, आम्ही कोलकात्यास पोहोचलो. तिथे गरियाहाटमधील हॉटेल-पार्क-पॅलेस मधे आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. १८ मार्चला आम्ही कोलकाता शहरात स्थलदर्शन केले. रात्री दहा वाजताच्या “दार्जिलिंग मेल”ने “न्यू-जल-पैगुडी म्हणजेच एनजेपी” ला निघालो. सकाळी आठ वाजता तिथे जाऊन पोहोचलो. तिथपासून १x२ तेवीस आसनी आरामगाडीने एनजेपी-मिरिक(१-रात्र)-दार्जिलिंग(२-रात्री)-गान्तोक(३-रात्री)-एनजेपी असा सहल कार्यक्रम पार पाडला. २५ मार्चला रात्री आठ वाजता एनजेपी मधे “दार्जिलिंग मेल” गाठली. सकाळी सहा वाजता कोलकात्यास जाऊन पोहोचलो. कोलकात्यात भारतीय-वनस्पती-उद्यान पाहिले आणि मग रात्री आठ वाजताच्या विमानाने निघून, २७ मार्च २०१० रोजी सकाळी ०१:३० मिनिटांनी आम्ही डोंबिवलीस परत आलो.

सिक्कीम राज्य १९७५ मधे भारतीय संघराज्याचा घटक झाले. ईशान्य भारताच्या सात राज्यांत, देवतात्मा हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांच्या परिसरात वसलेल्या या पर्वतीय राज्याची, आठवे राज्य म्हणून भर पडली. सिक्कीम राज्यात विमानतळच काय, पण रेल्वेस्थानकही नाही. त्यामुळे दूरवरून या राज्यात सहलीस यायचे झाल्यास, पश्चिम बंगाल राज्यातील नजीकचे विमानतळ बागडोगरा अथवा पश्चिम बंगाल राज्यातील नजीकचे रेल्वेस्थानक न्यू-जल-पैगुडी यांचाच मार्ग धरावा लागतो. ही दोन्हीही ठिकाणे दार्जिलिंग जिल्ह्यात आहेत. पश्चिम बंगाल राज्याच्या दार्जिलिंग जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय सिलिगुडी शहरात आहे.


सुरवातीसच मी हा तक्ता गान्तोकच्या हवामानकेंद्राच्या संकेतस्थळावरून मिळवला होता. त्यावरून मार्च महिन्यात आम्हाला मानवणारे तापमान असल्यामुळे मार्च महिन्यातच सहल करण्याचे नक्की केले. सचिन ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पूर्वी मेवाडला गेलेलो होतो. त्यांचे पर्यटन-व्यवस्थापन पसंत असल्याने, त्यांच्यासोबतच प्रवास करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले. त्यांच्या सिक्कीम सहलींचे दिवस माहीत करून घेतले. सगळ्यात कळीचे आरक्षण कोलकाता ते एनजेपी आणि परत हेच असल्याने प्रथम ते स्वतःच करून घेतले. नंतर सचिनसोबत सहल नोंदवली. त्यानंतर विमानाच्या प्रवासाचेही आरक्षण करून टाकले. सरतेशेवटी २६ ला आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा मोकळा वेळ मिळत होता. तो भारतीय-वनस्पती-उद्यान पाहण्यात सत्कारणी लावण्याचा निर्णय झाला. म्हणून दिवसभराकरता हाजरारोडवरील महाराष्ट्रनिवास खोलीचेही आरक्षण करून झाले.

सिक्कीमची राजधानी गान्तोक शहर. ते बागडोगरापासून १२४ किमी, एनजेपीपासून १२४ किमी, दार्जिलिंग शहरापासून ९४ किमी, तर सिलिगुडीपासून ११४ किमीवर आहे. प्रवासादरम्यान एनजेपी-(५५-किमी)-मिरिक-(४५-किमी)-दार्जिलिंग-(५१)-कॉलिंपाँग-(७७-किमी)-गान्तोक-(५६-किमी)-नातू-ला-(५६-किमी)-गान्तोक-(१२४-किमी)-एनजेपी, असा जवळपास ४५४ किमी चा पर्वतीय प्रदेशातील बसप्रवास आम्ही केला. मुंबईच्या समुद्रसपाटीवरून निघून ६,६०० फूट उंचीवर दार्जिलिंगला पोहोचलो, १४,२०० फूट उंचीवरील नातू-ला इथे भेट दिली आणि पुन्हा समुद्रसपाटीवर परत आलो. मुंबईच्या ३७ अंश सेल्शस पासून नातू ला इथल्या -४ अंश सेल्शस तापमानापर्यंत जाऊन आलो. या प्रवासात प्रत्यक्षात जो कार्यक्रम आम्ही अंमलात आणला तो इथे देत आहे.

सिक्कीमचा पूर्वेतिहास

सिक्कीम म्हणजे लिंबू भाषेत “देवभूमी”. “लिंबू” ही नेपाळात बोलली जाणारी तिबेटो-बर्मी भाषा आहे. पश्चिम सिक्किममधील युक्सोम-नॉर्बुगँगमधल्या देवदार वृक्षराजीत वसलेल्या शांत टेकडीवर, सिक्कीमचे पहिले चोग्याल (राजे) म्हणून, फुंत्सोग नामग्याल यांचा, इसवी सन १६४२ मधे राज्याभिषेक झाला होता. तेव्हापासूनच आधुनिक सिक्कीमच्या इतिहासास सुरूवात होते.


नामग्याल म्हणजे पूर्व तिबेटच्या खाम प्रांतातील मिन्याक घराण्याचे वंशज होत. असे सांगितले जाते की, खाम प्रांतातील मिन्याक घराण्याचे प्रमुख, तीन भाऊ होते. स्वर्गातून एक पत्र आले. ज्यात मधल्या भावास दक्षिणेकडे सिक्कीमला जाण्याचे संकेत दिले होते, जिथे त्याचे वंशज राज्य करणार असे विधिलिखित होते. सर्वात वडील भावाने एकट्याच्या बळावर शाक्यमठाची स्थापना केली आणि लोकप्रियतेतून, स्वतःकरता “ख्ये बुम्सा- म्हणजे लाखांचा पोशिंदा” हा खिताब मिळवला. शाक्य घराण्याच्या राजकन्येचा हातही ख्ये बुम्साने प्राप्त करून घेतला व तो चुम्बी खोर्‍यात स्थिरस्थावर झाला. पुढे दीर्घकाळपर्यंत सिक्कीमच्या राजघराण्याचे ते केंद्र राहिले. राजा व राणीस बरीच वर्षेपर्यंत मूलबाळ न झाल्याने ते संत्रस्त होते. म्हणून त्यांनी लेपचा प्रमुख थेकोन्ग टेक यांचा आशीर्वाद मागितला. थेकोन्ग टेक पुत्रप्राप्तीचा वर देण्याकरता विख्यात होते. ख्ये बुम्साच्या पत्नीला मग तीन पुत्र झाले. नंतर ख्ये बुम्सा आणि थेकोन्ग टेक यांच्यात उत्तर सिक्कीममधील काबी लाँग्टसोक येथे चिरंतन मैत्रीचा ऐतिहासिक करार झाला.

ख्ये बुम्सा यांच्यापश्चात त्यांचा तिसरा मुलगा मिपोन राब गादीवर बसला. त्याच्यानंतर त्यांचा चवथा पुत्र, गुरू-ताशी राजा झाला, जो गान्तोकला जाऊन राहिला. दरम्यान थेकोन्ग टेक मृत्यू पावला. विघटित होणारी लेपचा जमात मग गुरू ताशीकडे नेतृत्व आणि संरक्षणाकरता अपेक्षेने पाहू लागली. सिक्कीमचे राज्याभिषेकपुस्तक, गुरू ताशीचा “नियमित राजघराण्याची सुरूवात करणारा पहिला शास्ता” म्हणून उल्लेख करते. पाच पिढ्यांनंतर; उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडून आलेल्या तीन थोर लामांनी; फुंत्सोग नामग्याल यांचा, सिक्कीमचे पहिले “डेन्जोंग ग्याल्पो” किंवा सिक्कीमचे राजे म्हणून, पश्चिम सिक्किममधील युक्सोम नॉर्बुगँग इथे, ख्रिस्तोत्तर १६४२ या वर्षी; उद्घोष केला. गुरू रिंपोचे यांनी भाकीत केल्याप्रमाणेच ही घटना घडून आली होती. तिचे वर्णन त्यांनी “नाल्जोर चेझी” म्हणजे चार योगिक संतांचा सत्संग असे केलेले होते.

तिबेटच्या निरनिराळ्या भागांतून तीन थोर संत “बायुल डेमाजोन्ग म्हणजेच सिक्कीम” येथे, सिक्कीमच्या अप्रकट भूमीवर धर्मसाराचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्याकरता, चालून येतील, असे विधिलिखित होते.

म्हणूनच ल्हात्सुन नाम्खा जिग्मे, कथोग कुंटू झांग्पो आणि ग्नाडक सेंपा फुंत्सोग रिग्झिन स्वतंत्रपणे आणि अनुल्लंघनीय मार्गांनी सिक्कीममधे आले. तीन पवित्र लामांचे हे एकत्रिकरण “युक्सोम” म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ लेपचा भाषेत “त्रिमूर्ती” असा होतो.

ल्हात्सुन चेंपो यांनी इतर दोघांवर असे ठसवले की आपण सारेच लामा आहोत आणि राज्यशासन सुरळीतपणे चालवण्याकरता एका सामान्य माणसाची गरज आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणले की गुरू रिंपोचे यांच्या भाकीतानुसार चार विद्वान बंधू सिक्कीममधे जमतील आणि सिक्कीमचे प्रशासन निर्माण करतील. उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडून आलेले आपण त्यापैकी तीन आहोत. पूर्वेसंदर्भात त्यांनी रिंचेन लिंग्पा यांच्या गूढ मार्गदर्शक पुस्तकातील अवतरण दिले. ज्यात म्हटले होते की, “माझ्या चार अवतारांपैकी एक सिंहाप्रमाणे (पशूंचा राजा) असेल, जो आपल्या शूरतेने आणि सामर्थ्याने राज्याचा सांभाळ करेल.” पुस्तकात असाही उल्लेख आहे की, “फुंत्सोग नावाचा एक मनुष्य गान्ग च्या दिशेने प्रकट होईल.”

अशाप्रकारे ल्हात्सून चेंपो यांनी, टोग्डेन थोन्डुप नावाच्या साधूस व पास्सांग नावाच्या एका सामान्य माणसास बोलावले, आणि गान्तोकला एका दळभारासहित जाऊन, फुंत्सोग नावाच्या माणसास, युक्सोम नॉर्बुगॅंगला येण्यास आमंत्रित करण्यास सांगितले. अनेक साहसांपश्चात सर्व दळभार गान्तोकला पोहोचला. तिथे त्यांना फुंत्सोग गायींचे दूध काढत असतांना सापडला. फुंत्सोगने त्यांना घरात बोलावले, गाईचे ताजे दूध सेवन करण्याची विनंती केली आणि त्यांना सांगितले की माझे नाव फुंत्सोग आहे. त्याने तीन लामांचे ते आमंत्रण सर्वात अवचित लाभदायक घटना मानली आणि क्षणभरही व्यर्थ न दवडता युक्सोम नॉर्बुगॅंगला जाण्याकरता; आपल्या सर्व अनुयायांसहित, अधिकार्‍यांसहित व घरातील माणसांसहित, प्रस्थान केले.

राज्याभिषेक “चु-टा”मधे म्हणजे पाणघोड्याच्या वर्षात किंवा ख्रिस्तोत्तर १६४२ मधे साजरा झाला. अशाप्रकारे फुंत्सोग नामग्याल यांची सिक्कीमच्या राज्यसिंहासनावर प्रतिष्ठापना झाली. त्यांना “चोग्याल” म्हणजे आध्यात्मिक आणि कालसंभव अधिकारप्राप्त राजा, ही पदवी मिळाली. त्या तीन लामांनी सिक्कीममधे बुद्धधर्माचा प्रसार केला, तर फुंत्सोग नामग्याल यांनी राज्य संघटित करण्यास सुरूवात केली. चोग्याल यांच्या बारा पिढ्यांनी ३०० वर्षांहून अधिक काळपर्यंत सिक्कीमवर राज्य केले. या छोट्याशा हिमालयन राज्याने १९७२-७३ दरम्यान मोठ्या उलथापालथी अनुभवल्या. १९७५ मधे चोग्याल ही संकल्पनाच नामशेष झाली आणि १६ मे १९७५ रोजी सिक्कीम, अधिकृतरीत्या भारताचे बाविसावे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. तिथे झालेल्या सार्वमत चाचपणीत, स्थानीय जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसारच हे विलिनीकरण घडून आले.

सिक्कीमचा भूगोल

आजचे सिक्कीम राज्य ७,३०० वर्ग किलोमीटर भूभागावर विस्तारलेले असून लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चार जिल्ह्यांमधे ते विभागलेले आहे.

पूर्व जिल्ह्याचे मुख्यालय तसेच संपूर्ण राज्याची राजधानी गान्तोक आहे. उत्तर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असून त्याचे मुख्यालय मंगन इथे आहे. पश्चिम सिक्कीम जिल्ह्याचे मुख्यालय गेयझिंग इथे आहे तर दक्षिण सिक्कीम जिल्ह्याचे मुख्यालय नामची येथे आहे. भुतिया भाषेत “नाम” म्हणजे “आकाश’ आणि “ची” म्हणजे “उंच”. म्हणून नामची म्हणजे “उंच आकाश”. नामची येथे रिंपोचे यांची ३६ मीटर (१२० फूट) उंचीची जगातील सर्वात भव्य मूर्ती आहे.

हे क्षेत्र पर्वतीय प्रदेशात वसलेले असल्याने इथे प्रवासास किती वेळ लागेल याचे गणित अंतराच्या अंदाजावरून काढता येत नाही. उदाहरणार्थ सिलिगुडी ते गान्तोक अंतर ११० किलोमीटर आहे. आपल्या मैदानी प्रदेशातील अंदाजानुसार आपण सहज समजू की फार तर फार तीन तास लागतील. प्रत्यक्षात या प्रवासाला सहा तास लागतात. दुसरे म्हणजे नकाशात सरळसोट दिसणारी अंतरे प्रत्यक्षात वळणावळणांनीच साध्य होणारी असतात. उदाहरणार्थ दार्जिलिंगहून गान्तोक नकाशात दिसणारे अंतर प्रत्यक्षात दार्जिलिंग-कॉलिंपाँग-गान्तोक असेच जावे लागत असल्याने बरेच जास्त पडते. कारण प्रत्येक गाव एका पर्वतराशीवरील एका टेकडीवर वसलेले असते. ती टेकडी, तो पर्वत उतरून खाली यायचे नदीच्या काठाकाठाने पुलापर्यंत प्रवास करायचा (पूलही जागोजागी बांधलेले आढळत नाहीत, कुठेतरी स्थानिकांच्या सोयीने बांधलेले मोठे पूलच दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाकरताही वापरावे लागतात). पुन्हा नदीच्या काठाकाठाने पूर्वस्थळावर पोहोचायचे आणि मग दुसर्‍या तीरावरला पर्वत चढू लागायचे, त्यावरली ईप्सित टेकडी गाठायची आणि घाटरस्त्याने गंतव्यस्थळी पोहोचायचे.

वर्तमान पर्यटनानुकूलता

हिमालयन शिवालिक पर्वतराशींच्या पट्टीतील रंगीत आणि तिस्ता या दोन नद्यांच्या खोर्‍यात (खरे तर पाणलोट क्षेत्रात) हल्लीचे सिक्कीम वसलेले आहे. तिस्ता हा “त्रिस्था” या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असावा. तिस्ता नदी पूर्वी तीन प्रवाहांद्वारे दक्षिणेकडे वाहत असे. पूर्वेला करतोया, पश्चिमेला पुनर्भवा आणि मध्यभागी आत्रेई. पुनर्भवा पुढे महानंदेला मिळाली. आत्रेई एका चिखल-पाणथळ-स्वरूपी जागेतून वाहत वाहत करतोयेस मिळाली व मग पुढे वाहत वाहत जफरगंज नजीक पद्मा नदीस मिळाली.


१७८७ च्या विध्वंसक पुरानंतर, तिस्ता पुन्हा जुन्या प्रवाहास लागून आग्नेयेस वाहत वाहत ब्रह्मपुत्रेस मिळाली. नदीला नेपाळी भाषेत खोला म्हणत असल्याने तिला “तिस्ताखोला” असेही म्हणतात. येत्या दहा वर्षात एकूण ५०,००० मेगॅवॉट क्षमतेचे छोटेछोटे जलविद्युत प्रकल्प या नदीवर होणार आहेत. या माहितीवरून तिच्या ऊर्जस्वल प्रवाहाची कल्पना करता येईल. रंगीत नदी जोरेथाँग, पेलिंग, लेग्शिप मार्गे वाहत वाहत तिस्ता बाजार येथे तिस्ता नदीस मिळते. हिचा प्रवाह फारच खळबळजनक असल्याने ही तराफा-तरण-कर्त्यांच्या (राफ्टींग) फारच आवडीची आहे. या नदीवर राष्ट्रीय जलविद्युत निगमाचे ६० मेगॅवॉट क्षमतेचे विद्युत संयंत्र बसवलेले आहे.

गान्तोक शहर उंच पर्वतात समुद्र सपाटीपासून ६,००० फूट उंचीवर वसलेले आहे. तरीही अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज आहे. सोबतच्या प्रकाशचित्रात दूरदर्शनचा मनोरा दिसत आहे. गान्तोकचे ऊर्जा-उद्यान संपूर्णतः सौर ऊर्जेवर संचालित आहे. तिथे सौर ऊर्जेला सामान्य जीवनात कसे उपयोगात आणता येईल याचे उत्तम मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे समूर्त साकार केलेले आहे. सिक्कीम राज्याने पर्यटन-स्नेही धोरण स्वीकारलेले आहे. समुद्रसपाटीपासून १४,२०० फूट उंचीवरील “नातू ला म्हणजे ऐकत्या कानांची खिंड”, या अति-अंतरंगातील, किंबहुना चीन सीमेवरील पुरातन रेशीममार्गातील खिंडीपर्यंतही पर्यटकांना जाण्यास अनुमती देतात.


सोबतची पाटी, नातू ला मधे येणार्‍या पर्यटकांकरता लावलेली आहे.

सिक्कीममधे पर्यटकांकरता किती प्रचंड नैसर्गिक वैविध्य आहे आणि सिक्कीम, पार सीमेपर्यंत पर्यटनास किती सुरक्षित आहे याची ती ग्वाहीच आहे. केवळ पराकोटीच्या नैसर्गिक परिस्थितींचा सामना करणे ह्याचीच काय ती तयारी सिक्कीम पर्यटनाकरता करायला हवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: