20090830

जीवनात "प्रमाणाला" अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट प्रमाणशीर असावी. प्रमाणबद्ध असावी. प्रमाणात असावी.
या परंपरागत धारणेला सुंदर शब्द दिले आहेत कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी.

प्रमाण

कृष्णाजी नारायण आठल्येअतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

रामदासस्वामींप्रमाणेच या कवितेत "भुजंगप्रयात" वृत्ताचा दैदिप्यमान वापर केलेला दिसून येईल.
यातील तत्त्वसार सदा संजीवित आढळून येईल.

6 comments:

Anonymous said...

श्री गोळे: तुकारामांना शोभेल अशी 'आधी बीज एकले' ही रचना शांताराम आठवल्यांनी जशी केली, तशी ही रामदासांना शोभेल अशी कृष्णाजी नारायण आठल्ये यांची रचना आहे. ती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. कवींविषयी आणखी काही माहिती मिळू शकेल काय?

नरेंद्र गोळे said...

माझ्या अनुदिनीस भेट दिल्याखातर हार्दिक धन्यवाद!

मला स्वतःला कवींविषयी फारशी माहिती नाही. पण त्यांची कविता हीच त्यांची उत्तम ओळख आहे असे मला वाटते. ही कविता "आठवणीतल्या कवितां"मधेही प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे त्या पुस्तकात कदाचित आणखीही माहिती सापडू शकेल. कळल्यास मलाही सांगा.

Shripad Muley said...

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे १८५२ साली कराडजवळच्या टेंभू नावाच्या एका चिमुकल्या गावात एका व्युत्पन्न दशग्रंथी ब्राह्मणाच्या कुळात कृष्णाजी नारायण आठल्ये या श्रेष्ठ कवीचा तसेच अत्यंत उत्तम चित्रकाराचा जन्म झाला. वयाची पहिली बारा वर्षे त्यांचे शिक्षण घरीच झाले. कृष्णाजी पंतांच्या वडिलांनी त्यांना वेदवाङ्मय तसेच शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंट इत्यादी ग्रंथांचा परिचय करून दिला. संस्कृत वाङ्मयात पारंगत केले. वयाच्या तेराव्या वर्षी कृष्णाजीपंतांचे लग्न झाले. सासूरवाडी अतिशय सुसंस्कृत आणि श्रीमंत होती. त्यांची इच्छा होती की, आपल्या जावईबापूंनी कोल्हापुरास जाऊन इंग्रजी शिकावे, परंतु कृष्णाजीपंतांना वडिलांनी तशी परवानगी न देता १८६६ साली कराडच्याच शाळेत घातले. तिथे थोडेबहुत इंग्रजी शिक्षण झाले. नंतर ते पुण्यात येऊन त्यांनी मराठी भाषेचा अभ्यास केला आणि सातार्‍यात शिक्षकाची नोकरी पत्करली.
पाच वर्षे ते शिक्षक म्हणून सातार्‍यात कार्यरत होते. त्या काळात कृष्णाजीपंतांवर कृपेचा वर्षाव झाला. सातार्‍याचे सबजज्ज रावबहादूर चिंतामणराव भट यांच्याशी कृष्णाजीपंतांचा परिचय झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेचा नाद होता. कृष्णाजीपंत उत्तम चित्रे काढीत हे चिंतामणराव भटांनी हेरले आणि त्यांनी कृष्णाजीपंतांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्याप्रमाणे कृष्णाजीपंत यांनी मुंबईत आर्टस् स्कूलमध्ये तीन वर्षे राहून तैलचित्रकलेचे ज्ञान संपादन केले. सातारच्या आबासाहेब महाराजांनी कृष्णाजीपंतांकडून आपल्या चित्राची मोठी तसबीर काढून घेतली होती. मुंबईचे आर्टस् स्कूलमधले शिक्षण पूर्ण करून ते पुढे बडोद्याला गेले.
कृष्णाजीपंतांच्या आयुष्याला कोची मुक्कामी खर्‍या अर्थाने भाग्याचे वळण लाभले. एका फार मोठ्या कवीची प्रतिभा कोची मुक्कामात फुलू लागली. याच मुक्कामात ‘केरळ कोकीळ’ या अप्रतिम मासिकाचासुद्धा जन्म झाला. हे मासिक कृष्णाजीपंतांच्या संपादनाखाली सुरू झाले. साहित्य आणि काव्य तसेच पुस्तक परीक्षणे या ‘केरळ कोकीळ’मधून प्रसिद्ध होऊ लागली आणि कृष्णाजी नारायण आठल्ये हे ‘केरळ कोकीळ’कार कृष्णाजी नारायण आठल्ये या बिरुदावलीने ओळखले जाऊ लागले. या काळात तीन हजार वर्गणीदार असलेले ‘केरळ कोकीळ’ हे एक महत्त्वाचे मराठी मासिक म्हणून साहित्यविश्‍वात तेजाने चमकू लागले. पहिली पाच वर्षे कोचीहून प्रसिद्ध होत असलेले ‘केरळ कोकीळ’ मुंबईहून नंतर गुर्जर कंपनीकडून प्रसिद्ध केले जाऊ लागले, परंतु या मासिकाने कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे वाङ्मयीन विश्‍व अक्षरश: फुलवले.
‘एका नाटक्याचा पश्‍चात्ताप’, ‘तुफान’सारख्या काही कविता जरी गाजल्या तरी कृष्णाजी नारायण आठल्ये यांच्या ‘सासरची पाठवणी’, ‘माहेरचे मूळ’ आणि ‘मुलीचा समाचार’ या तीन दीर्घकाव्यांनी त्यांचे नाव या कविताविश्‍वात अजरामर झाले. विशेषत: ‘सासरची पाठवणी’ या दीर्घकाव्याला अपरंपार लोकप्रियता लाभली. ‘सासरची पाठवणी’ या दीर्घकाव्यातून कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी मुलीच्या आईचे समंजस चित्रण जे उभे केले आहे ते मराठी काव्यविश्‍वातले एक लखलखीत असे रत्नजडित शब्दकोंदण आहे. अत्यंत प्रासादिक रचना हे कृष्णाजी नारायण आठल्ये यांच्या काव्याचे प्रधान वैशिष्ट्य आहे. ते जसे श्रेष्ठ चित्रकार होते तसेच शब्दचित्रे रेखाटण्यात ते पारंगत होते. कवितेबरोबरच त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या ‘कर्मयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘राजयोग’ यांचा मराठीमधून स्वैर अनुवाद केला. ‘लोकहितवादी’ आणि ‘समर्थ रामदासस्वामी’ यांची चरित्रे लिहिली. १८८४ साली त्यांनी महाकवी कालिदासाच्या ‘शृंगारतिलक’ या खंडकाव्याचे मराठीमधून पद्यात्मक पातळीवर भाषांतर केले. ‘टिळक माहात्म्य’ हा फटका लिहिला. ‘दंपत्यसुखाचा ओनामा’ हे पद्य प्रसिद्ध केले. एकूण सदतीस पुस्तके आणि पद्यलेखन कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केले. त्यांच्या काव्यातून तत्त्वज्ञान सहजपणे पाझरत असे. ‘प्रमाण’ नावाची त्यांची वीस कडव्यांची कविता तर आजही पाठ्यपुस्तकांमधून पुन्हा प्रसिद्ध करावी आणि मुलांवर छान संस्कार करावेत अशी आहे-
अती कोपतां कार्य जातें लयाला
अती नम्रता पात्र होते भयाला
अती काम तें कोणतेंही नसावें
प्रमाणामधें सर्व काहीं असावें...
‘केरळ कोकीळ’ या अभिरुचीसंपन्न मासिकामधून कृष्णाजी आठल्ये यांनी असे काही अप्रतिम साहित्य त्या काळात प्रसिद्ध केले की, वाचकांना चांगल्या साहित्याची, वाचनाची आवड लागली. ‘केरळ कोकीळ’वर अक्षरश: उड्या पडत. पंच्याहत्तर वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या या श्रेष्ठ संपादक , टीकाकार, कवी आणि चित्रकार असलेल्या कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी २६ नोव्हेंबर १९२६ या दिवशी शेवटचा श्‍वास घेतला.

ऊर्जस्वल said...

श्रीमान मुळेसाहेब,

अतिशय मार्मिक काव्य लिहिणार्‍या, बुद्धिप्रामाण्यवादी, सिद्धहस्त कवीबाबत अत्यंत मोलाची माहिती, आपण इथे स्वतःहून पुरवलीत त्याखातर आपणास मनःपूर्वक धन्यवाद!

ह्या अनुदिनीवर असाच कृपाकटाक्ष असू देत, हीच विनंती. लोभ आहेच. वृद्धी व्हावी, हीच सदिच्छा!

आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे

Amardas Swami said...

khup khup dhanyavad..... jawalpaas 5-6 yrs pasun shodhat hoto hi purna kavita.... aaj milali tumchyamule..... dhanyavaad....

ऊर्जस्वल said...

धन्यवाद स्वामीजी!