२००९-०८-२८

जीवित महिमा

असार जीवित, केवळ माया! रडगाणे हे गाऊ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ धृ ॥

वस्तुस्थिती ही असार भासे, परि अंतरि बहु सार असे । जाणुनिया हे निज कर्तव्ये मन लावुनिया करा कसे ॥
सुखांत मेलो म्हणजे झाले सार्थक न धरा मनी असे । माती अससी मातीत मिळसी आत्म्याला हे लागु नसे ॥
सुख दुःखाचे भोग भोगणे हा मुळि जीवित हेतु नसे । उद्या आजच्यापेक्षा काही पुढेचि जाऊ करा असे ॥
अपार विद्या काळ अल्प हा झरझर कैसा धावतसे । शूर छातिचे किती असाना हळुहळु मृत्यू गाठितसे ॥
अफाट ऐशा विश्व रणांगणि जीवित युद्धचि चालतसे । त्यात लढोनी बहु धीराने नाव गाजवा शूर असे ॥
मुकी बिचारी कुणी हाका! अशी मेंढरे बनू नका । गेल्या गोष्टी स्मरू नका, गत काळाचा शोक फुका ॥

पुढचा भासो किती सुखाचा काळ भरवसा धरू नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ १ ॥

जाते घडि ही अपुली साधा, करा काय ते आता करा । चित्तामध्ये धैर्य धरा रे, हरिवरि ठेवा भाव पुरा ॥
थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ॥
जग हे त्यजिता भव-सागरिच्या वाळवंटिवर तरि जरा । चार पाऊले उमटवु अपुली, ठेवु खुणेचा मार्ग बरा ॥
जीवित-सागर दुस्तर मोठा, त्यातुनि जाण्या पैले तिरा । खटपट करितो, गोते खातो, निराश होऊनि जाय पुरा ॥
अशा नराच्या दृष्टिस पडता, तीच पाऊले जरा जरा । कोणि म्हणावे नाही म्हणुनी? येइल त्याला धीर बरा ॥
उठा उठा तर, निजू नका, होइल कैसे म्हणू नका । कशाहि विघ्ना भिऊ नका, दीर्घोद्योगा सोडु नका ॥

असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाउ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ २ ॥

मराठी अनुवादः हरी नारायण आपटे

मूळ इंग्रजी कविताः 'साम ऑफ लाईफ' - हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो, मृत्यूः २४ मार्च १८८२

ज्या अनुवादातले चरण, भाषेत वाक्प्रचार बनून राहतात त्या अनुवादाचा दर्जा यात स्पष्टपणे दिसून येतो.
मूळ सुंदर, अर्थपूर्ण कवितेचे हे सुरेख अर्थपूर्ण भाषांतर झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: