२००९-०५-१४

वनस्पती

वनस्पती तुझे रूप देखणे । मजेत डोलणे, फुलून राहणे ॥
रंग वेगळे, नेत्ररंजना । गंध आगळे, मोहिती मना ॥ १ ॥

सावली तुझी, शुद्ध गारवा । ‘अपान’ घेउनी, ‘प्राण’ दे नवा ॥
वापरून तू, सौरशक्तीला । ‘अन्न’ घडविशी मनुजपोषणा ॥ २ ॥

(चाल बदलून)
भूस्थिर राहून, मृद संधारिशी । दूर प्रदूषण, तू पिटाळसी ॥
जगशी, मरशी, इथे राहसी । सोडुनी ना कधी अम्हास जाशी ॥ ३ ॥

आम्ही तुजसी कृतज्ञ राहू । वंशसंपदा तुझी वाढवू ॥
तुला सोडुनी जगणे आम्हा । पळ तरी शक्य असे का? ॥ ४ ॥

तस्र्वर आणि मानव भाऊ । अवनीवरती सर्वही राहू ॥
भूचर, खेचर, जलचरांशी या । परिसरी जुळवून घेऊ या ॥ ५ ॥

नरेंद्र गोळे १९९७१००९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: