२०२०-०१-१२

माझी शाळा



मी प्राथमिक शाळेत शिकत असे तेव्हा माझ्या वर्गशिक्षिका चारही वर्षे श्रीमती शांता वझे ह्या होत्या. शाळेचे नाव होते ’भारत प्राथमिक शाळा’ आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या श्रीमती लीला काळे. ही शाळा अभ्यंकरनगर उद्यानाच्या एका बाजूस असलेल्या श्री. मल्हारराव ना. काळे ह्यांच्या राहत्या घरीच भरत असे. १९६४ साली मी ह्या शाळेत इयत्ता १ लीत दाखल झालो आणि इयत्ता ४ थी संपल्यावर म्हणजे १९६८ साली इयत्ता ५ वी पासून ते ११ वी पर्यंत म्हणजे १९७४ मार्च अखेरपर्यंत मी ’नूतन भारत विद्यालया’त शिकलो.

ही शाळा अभ्यंकरनगरातच मात्र अभियांत्रिकी विद्यालयाच्या क्रिकेट मैदानाला लागून असलेल्या भूखंडावर बांधलेली होती. चौरस भव्य मैदानाच्या मुख्य दरवाजानजीकच्या तिन्ही बाजूंना वर्गाच्या खोल्या होत्या. क्रिकेट मैदानालगतची बाजू मोकळी होती. शाळेच्या मैदानाच्या मध्यभागी विख्यात शेतीतज्ञ डॉ. खानखोजे ह्यांचा पुतळा होता. त्याचे लक्ष शाळेच्या मुख्य द्वारावरच असे. आम्ही गोपाळनगर, भामटी, परसोडी इत्यादी भागातील मुले दूरवर चालून ह्याच शाळेत जात असू. कारण आम्हाला सर्वात नजीक हीच शाळा पडत असे. नागपूर शहरातील सोमलवार, हडस, सरस्वती विद्यालय (देवेंद्र फडणवीसांची शाळा), धरमपेठ, कुर्वेज न्यू मॉडेल ह्या इतर शाळा तर तुलनेत खूपच दूर होत्या. ह्या दोन्हीही शाळांचे संस्थापक होते श्री. मल्हारराव नारायणराव काळे सर. डॉ. खानखोजे हे काळे सरांचे सख्खे मामा लागत. काळे सर पंचक्रोशीत विख्यात होते. अथक प्रयास करून त्यांनी शाळा नावारूपस आणलेली होती. ते एक लोकप्रिय लोकप्रतिनिधीही होते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे ते अनेक वर्षे सदस्य होते.

काळे सर काहीसे सडपातळ, उंच, चष्मा घातलेले असे होते. मुद्रा करारी आणि विद्वान भासे. मला मात्र काळे सर आठवतात ते हातात वेताची छडी घेऊन शाळेच्या मुख्य दाराशीच उभे असलेले. हिवाळ्याचे दिवस असत. सकाळी सातलाच शाळा भरे. खूप मुलांना थंडीमुळे जागच न आल्याने उशीर होत असे. उशीर झालेल्या मुलांना दाराशीच थांबून राहावे लागे. प्रार्थना झाली, इतर मुले वर्गात गेली की मग काळे सर ह्या मुलांना उशीर का झाला ह्याचा एक एक करून जाबजबाब घेत असत. बहुतेकांना समाधानकारक कारण न देता आल्याने हातावर छडीचा प्रसाद घेऊनच वर्गात प्रवेश घेता येई. माझ्यावर बहुधा असा प्रसंग आला नसावा. मात्र इतरांच्या अनुभवाने धडकी भरत असे. ह्यांपैकी कुणीही पालकांपाशी ह्याची तक्रार करत नसे. मात्र उशीर केल्याबद्दल छडी खावी लागली असे घरी कळले तर घरीही मार पडत असे.

काळे सर आमचे मुख्याध्यापक होते. मात्र आम्ही ११ वी पार झालो त्याच वर्षी म्हणजे १९७४ साली श्रीमती रजनी मांडवगणे बाई मुख्याध्यापिका झाल्या. पुढे मला शाळेत येण्याचा प्रसंग एकदाच आला. शाळेचे स्नेहसंमेलन डिसेंबर-जानेवारीत होत असे. तेव्हाच शाळेतून मॅट्रिकच्या परीक्षांमध्ये गुणवत्ताप्राप्त केलेल्यांचा गौरव केला जात असे. ११ वीत मी शाळेतून पहिला आलो होतो. मला अनेक पारितोषिकेही मिळालेली होती. आता मी विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. तिथेही मी आजवर पायजमा शर्ट घालूनच जात असे. त्या सुमारासच मला मीनाकाकूने पहिला फुलपँट शर्ट शिवून दिला होता. मग मी तो घालून ऐटीत मिरवत १९७४ सालच्या स्नेहसंमेलनात खूप पारितोषिके घेतल्याचे मला आठवते.

इयत्ता ५ वी पासून दरवर्षी निरनिराळे वर्गशिक्षक असत. चित्रकला शिकवणार्‍या भिशीकरबाई ५ वीला वर्गशिक्षिका होत्या. माझा मात्र चित्रकलेशी छत्तीसचा आकडा असे. इंग्रजी शिकवणार्‍या कर्दळेबाई ६ वीला वर्गशिक्षिका होत्या. इंग्रजीशीही माझी फारशी दोस्ती कधीच झाली नाही. ७ वीला आम्हाला कमल देशपांडे बाई इतिहास शिकवत असत. त्याच आमच्या वर्गशिक्षिका होत्या. प्लासीची लढाई, सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह ह्यांच्यात २३ जून १७५७ रोजी झाली. पुढे दोनशे वर्षांनी १९५७ मध्ये माझा जन्म झाला आणि २३ जून ह्या तारखेलाच पुढे जाऊन माझे लग्न झाले. म्हणून आज ही तारीख मला लक्षात ठेवायला सोपी झाली आहे. त्यावेळी मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने क्लाईव्ह जिंकला. त्यामुळेच भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. हे सर्व मला आजही त्यांच्यामुळेच लक्षात आहे. ९ वीत श्यामला धालगावकर बाई वर्गशिक्षिका होत्या. त्या मराठी शिकवत असत. १० वी आणि ११ वी मध्ये दामले बाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्या इंग्रजी शिकवत असत. मुलांनी वर्गात इंग्रजी बोलावे अशी त्यांची इच्छा असे. अर्थात आम्हाला कुणालाही हे त्यांच्या मनाप्रमाणे जमलेच नाही. त्यांची मुलगी आमच्याहून वरच्या वर्गात शिकत असे. ती जीवशास्त्र विषयात मेरीटमध्ये आली होती. शाळेच्या वार्षिकांकात तिचे नाव फोटोसहित छापून आल्याचे मला आठवते. आमच्या शाळेतून क्वचितच मेरीटमध्ये झळकलेल्या मुलांतील ती एक होती.

त्या काळी दरसाल आमच्या शाळेत दोन सणांची आम्हाला ओढ असे. त्यातले एक म्हणजे वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि दुसरा म्हणजे सरस्वती पूजन. सरस्वती पूजनच्या दिवशी वर्गावर्गांतून सरस्वतीची पूजा होत असे. शाळा सर्व विद्यार्थ्यांना गोडाधोडाचे बहुधा जिलबीचे जेवणही देत असे.

हस्तकलेच्या शिरसीकर बाई, संस्कृत शिकवणार्‍या मुजुमदार बाई, संगीत शिकवणारे राजहंस सर, शारीरिक शिक्षण शिकवणारे बोडखे सर, कॉमर्सचे वर्ग घेणारे झाडे सर हे त्यांच्या सर्वव्यापी वावराने सर्वश्रुतच असत, तर पत्तरकिने सर गणित आणि केदार सर भौतिकशास्त्र शिकवत असत. ह्यांच्याच शिकवण्याचा मला नंतर पदोपदी उपयोग झाला. ठोसर सरही गणित शिकवायचे. नंतर ते वनखात्याच्या पर्यावरण रक्षक समितीवरही काम करत असत. सोनेगाव तलाव वाचवण्याच्या कामात ते हिरीरीने अग्रेसर असत.

भारत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लीला काळे ह्या काळे सरांच्या पत्नी होत्या. त्यांचे सुपुत्र किशोर काळेही पुढे नूतन भारत विद्यालयातच शिक्षक झाले. ते इंग्रजी शिकवत असत. आमच्या भागातील अनेकांची शिक्षणे ह्या काळे कुटुंबियांच्या देखरेखीतच झालेली होती. ही सारी शिक्षणाची नवी दुनिया त्यांनी निर्माण केली त्यास आजमितीला पन्नासहूनही अधिक वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र आजच हे सर्व आठवण्याचे निमित्त म्हणजे आज काळे सरांचा स्मृतीदिन आहे. आज रविवार असल्याने उद्या सोमवार रोजी तो यथासांग शाळेत साजराही केला जाईल. त्यानिमित्ताने मी अशी कामना करतो की, हजारो विद्यार्थीरूप कमळे ज्या शिक्षणसूर्याच्या साक्षीने विकसित झाली, होत आहेत, त्या सूर्याचा सदैव उदयच होवो. आपल्या शाळेचा –नूतन भारत विद्यालयाचा- सदैव उत्कर्ष होवो हीच सदिच्छा!

तस्यैव अभुदयो भूयाद्‌ भानोर्यस्योदये सति ।
विकासभाजो जायन्ते गुणिनाः कमलाकरा : ॥

 











1 टिप्पणी:

अरविंद प्रधान म्हणाले...

वा सुंदर लेख लिहलांय. मी तुमच्या तेरा एक वर्ष पुढे आहे आणि मी शाळेंत गेलो मुंबईला पण तुम्हीं लिहलंय तें सगळं मी अनुभवलंय फक्त नावं आणखी तारखा बदला. अगदी मला माझ्या शाळेची आणि शिक्षक शिक्षीकांची आठवण आणून दिलींत.