20170727

विकसित भारताची संकल्पना - डॉ.अब्दुल कलाम

आज डॉ.अब्दुल कलाम ह्यांचा स्मृतीदिन आहे! त्यानिमित्त त्यांची ’विकसित भारताची संकल्पना त्यांच्याच शब्दांत. त्यांच्याच ’स्वतःकरता नोंदी’ ह्या आत्मचरित्रातून.
ह्या भागाचा मराठी अनुवाद, मूळ पुस्तकातही मीच केलेला आहे.


विकसित भारताची संकल्पना

’दूरदृष्टी नसेल तर लोक नामशेष होतात’ [१]
२०२० सालच्या विकसित भारताची संकल्पना घडवण्यासाठी, मी तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि अनुमान परिषदेत (टी.आय.एफ.ए.सी.-टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल) ५०० तज्ञांच्या चमूने केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर देखरेख करत होतो. एखाद्या देशास नेमके काय विकसित करते, ह्याचे विश्लेषण आणि परावर्तन आम्ही करत होतो. थोडक्यात सांगायचे तर, आम्ही अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की, ज्या देशातील लोकांचे राहणीमान समाधानकारक असते, आंतरराष्ट्रीय समुदायात ज्याची प्रतिष्ठा असते, अशा संपन्न देशास विकसित देश म्हणावे.
राष्ट्राची संपत्ती मोजण्याकरता अनेक आकडे सांगता येतात. सकल राष्ट्रीय उत्पादन (जी.एन.पी.- ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट), सकल आंतर्देशीय उत्पादन (जी.एन.पी.- ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट), शिल्लक देय (बॅलन्स ऑफ पेमेंटस), आर्थिक वाढीचा दर, परकीय चलन साठा, दरडोई आय इत्यादी. आर्थिक निर्देशांक म्हणून हे सर्व मिळून राष्ट्राच्या संपदेचे वाजवी प्रतिनिधित्व करतात. मात्र हे केवळ निर्देशांकच आहेत, सुटे सुटे पाहिले तर सामान्य जनतेची दयनीयता ते सन्माननीयतेत दडवूनही टाकू शकतात.
आमच्या कामाने एक विस्तृत दृष्टीकोन धारण करणे आवश्यक होते. भारतास २०२० पर्यंत विकसित करण्याची आम्ही एक योजनाच तयार केली. ’भारत-२०२०: नव्या सहस्रकाकरताची एक संकल्पना’ ह्या नावाने आमची ती योजना आम्ही प्रकाशितही केली. केवळ आर्थिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन, राष्ट्राच्या समृद्धीसोबतच लोकांच्या राहणीत सुधार व्हावा ह्याबाबतचे मुद्देही ही योजना लक्षात घेत होती.
भारत-२०२० ने प्रगतीकरता अनेक क्षेत्रे शोधून काढली. शेतकी आणि अन्नप्रक्रिया उत्पादने दुप्पट करणे; विश्वसनीय पायाभूत वीजपुरवठा प्रस्थापित करणे; ग्रामीण भागास शहरी सुविधा पुरवणे ज्यात सौरवीज संचालने वाढवण्यावर भर दिलेला असेल; शिक्षणात साक्षरतेचे लक्ष्य ठेवणे; आरोग्यनिगा, सामाजिक सुरक्षा आणि भारतीय लोकसंख्येचे एकूण आरोग्य ह्यांवर भर देणे; वाढत्या विजकीय प्रशासनाकरता (ई-गव्हर्नन्स) माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आणि दूरस्थ भागांत शिक्षणास प्रोत्साहन देणे, दूरसंचार (टेलेकॉम्युनिकेशन) आणि दूरचिकित्सा (टेलेमेडिसिन), क्रांतिक (क्रिटिकल) तंत्रज्ञान आणि व्यूहरचनात्मक (स्ट्रॅटेजिक) उद्योग, विशेषतः अणुतंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण तंत्रज्ञान.
आता आपल्यापाशी, २०२० पर्यंत भारत जगातील पहिल्या चार आर्थिक सत्तांत कसा येईल ह्याबाबची संकल्पना तयार होती. त्या अजूनही बदलता येतील. मात्र त्या संकल्पनेशी बांधिलकी असायला हवी आणि लोकांत, क्षुल्लक लाभांऐवजी, देशाच्या भल्याकरता व दीर्घकालीन संपदेकरता काम करण्याची इच्छाशक्तीही हवी. हेच आता देशाच्या युवाशक्तीपुढील आव्हान आहे.
’स्वर्ग तलवारींच्या छायेत राहतो’ [२]
१९९५ च्या सुमारास आम्ही जेव्हा संकल्पना-२०२० वर काम करत होतो तेव्हा, आपल्या आण्विक अवस्थेची दखल घेण्यास आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने सुरूवात केली. वैज्ञानिक समाजास आणि संरक्षण आस्थापनांना दीर्घ काळापासूनच हे स्पष्ट झालेले होते की, भारताच्या आण्विक क्षमता अपल्या संभाव्य शत्रूंच्या क्षमतांच्या तुलनेत धोकादायकरीत्या मागासत आहेत. भारताने पूर्णतः आण्विकदृष्ट्या सक्षम राष्ट्र होण्याची आवश्यकता आहे आणि ह्याकरता अणुचाचणी करण्याची आवश्यकता आहे. १९९१ चे आर्थिक संकट आता मागे पडले होते, अर्थव्यवस्था आता खूप कणखर (रॉबस्ट) झालेली होती, त्यामुळे चाचणीकरताची योग्य वेळ आलेली होती.
पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव ह्यांनी शांतपणे चाचणीचे वेळापत्रक निश्चित केले. १९ डिसेंबर १९९५ रोजी ती करण्याचे ठरले होते. डिसेंबरच्या मध्यात स्फोटक, त्याच्या जागेवर, प्रज्ज्वलनास तयार ठेवण्याच्या मनस्थितीत ते होते. मात्र चाचणी होणार नव्हती. १५ डिसेंबर रोजी न्यूयॉर्क टाईम्सने बातमी दिली की, अमेरिकन हेरगिरी उपग्रहांनी राजस्थानातील वाळवंटात अणुचाचणीच्या तयारीची काही चित्रे टिपली आहेत. मग मुख्यतः अमेरिकेकडून, चाचणी रद्द करण्याकरता पंतप्रधानांवर लक्षणीय राजकीय दडपण आणण्यात आले. चाचणी होऊ नये ह्याकरता आश्वासन मिळवण्यासाठी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांनी व्यक्तिशः पंतप्रधान राव ह्यांना दूरध्वनी केला.
माझ्या मते, भारताच्या अण्वस्त्रे विकसित करण्याच्या आवश्यकतेवर निर्णय घेण्यापासून भारतास रोखण्याचा कुठल्याही इतर अण्वस्त्रधारी राष्ट्रास अधिकारच नव्हता. विशेषतः आपल्या शेजारील शत्रुराष्ट्रांकडे आधीच अण्वस्त्रे असतांना. मी १४ जानेवारी १९९६ रोजी पंतप्रधानांना लिहिले की, सुरू असलेल्या सर्वसमावेशक चाचणी बंदी कराराच्या (सी.टी.बी.टी.-कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी) वाटाघाटींतून भारताने अंग काढून घ्यावे आणि शक्य तितक्या लवकर अणुचाचणी करावी. खासगीत ते आपल्या उद्दिष्टाकरता कटिबद्ध होते तरी, आपल्या योजनांना त्यांनी रोखून ठेवले. ते योग्य त्या वेळेच्या प्रतीक्षेत होते, असे वाटत होते.
१९९६ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणूक झाली. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव ह्यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकार पराभूत झाले आणि त्रिशंकू संसद निर्माण झाली. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा ह्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अटल बिहारी वाजपेयी ह्यांना सरकार स्थापनेकरता बोलावले. पंतप्रधान वाजपेयी, ५४५ सदस्यांच्या संसदेतील २०० हून अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. प्रमोद महाजन संरक्षणमंत्री असलेल्या तेरा दिवसाच्या सरकारचा शेवट झाला.
मात्र दरम्यानच्या अल्प काळात, मावळते पंतप्रधान नरसिंह राव ह्यांनी, नवे पंतप्रधान वाजपेयी ह्यांना परिस्थितीची कल्पना दिली. सरकार कोसळण्याच्या काहीशाच आधी पंतप्रधान वाजपेयी ह्यांनी चाचणीकरता पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.
पुढील पंतप्रधान एच.डी. देवे गौडा ह्यांनी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव ह्यांची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती केली. मुलायमसिंहांसोबत माझे व्यक्तीशः सशक्त संबंध प्रस्थापित झाले. त्यांनी मला हिंदीचे काही धडेही दिले. ८ डिसेंबर १९८५ रोजी स्थापन झालेल्या दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटनेबाबतची (एस.ए.ए.आर.सी.-साऊथ एशिअन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन) त्यांची संकल्पनाही त्यांनी मला समजावून सांगितली. भारतीय उपखंडात आर्थिक संलग्नता आणि मुक्त संचार साध्य झाल्यास, युरोपिअन युनिअनच्या धर्तीवर बृहत्‌ भारतीय संघटन होण्याची शक्यता त्यांना जाणवत होती.
देशाने अण्वस्त्रसक्षमता विकसित करावी ह्याकरताही ते इच्छुक होतेच म्हणून ते मला म्हणाले की, अणुसाधनांच्या चाचणीकरता तयार रहा. मात्र पंतप्रधान देवे गौडांना तेवढी उत्सुकता नव्हती. त्यांनी कुठलीही अणुचाचणी करण्यास अनुमती देणे नाकारले.
सरकारात आणखीही एक बदल झाला. वर्षात तिसरा. एप्रिल १९९७ मध्ये काँग्रेस (आय) पक्षाने संयुक्त आघाडीला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने, देवे गौडा सरकार कोसळले. सर्वदूर शांततेचे पुरस्कर्ते म्हणून विख्यात असलेले आणि गौडांच्या सरकारमधे परराष्ट्रमंत्री असलेले इंदर कुमार गुजराल ह्यांना आघाडीचे नेते म्हणून निवडण्यात आले. पंतप्रधान गुजराल ह्यांनी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव ह्यांच्यासह गौडा मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना पुनर्नियुक्त केले.
पंतप्रधान गुजराल अशा मताचे होते की १९९७ साल ही काही भारतास अणुचाचणी करण्यासाठी योग्य वेळ नव्हती. त्यांचा समज असा होता की, अणुचाचणी केली असता, भारतीय अर्थव्यवस्था विशेष रूपाने आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करण्यासाठी सिद्ध होण्याची आवश्यकता होती. त्यांना हेही माहीत होते की त्यांच्या कमजोर आघाडी सरकारला, अणुचाचणी केल्यास उद्भवू शकणार्यास आंतरराष्ट्रीय निषेधवादळावर मात करणे शक्य होणार नाही.
ह्याचा अर्थ असा नव्हे की गुजराल सरकार राष्ट्रीय संरक्षणाच्या बाबतीत मऊ होते. भारताचे आण्विक सामर्थ्य उभे करण्यात सहभागी असलेल्या कळीच्या शास्त्रज्ञांतील मी एक शास्त्रज्ञ होतो. पंतप्रधानांनी लवकरच, अधिक नेमकेपणाने सांगायचे तर नोव्हेंबर १९९७ मध्ये, हे घोषित केले की मला भारतरत्न प्रदान केले जाणार आहे. सरकार राष्ट्रीय सुरक्षेला किती महत्त्व देत होते ह्याबाबतचे हे एक, सुस्पष्ट सार्वजनिक आणि आंतरराष्ट्रीय विधान होते. शिवाय, हा पुरस्कार प्राप्त करणारा, सर सी.व्ही.रमन ह्यांच्यापश्चात मी दुसराच शास्त्रज्ञ होतो. सर सी.व्ही.रमन ह्यांना १९५४ मध्ये भौतिकशास्त्रातील त्यांच्या सहयोगाकरता भारतरत्न देण्यात आलेले होते.
जरी संभाव्य शत्रुंच्या क्षमतांच्या किमान तुल्यबल अणुक्षमता भारताने बाळगाव्यात ह्याच्या महतीबाबत माझा समज पक्का होता तरी, संरक्षण आस्थापनेने धीर धरायला हवा हे मला माहीत होते. मात्र आम्ही तयार राहिलो.
’एक अब्ज लोक दोन सहस्रके एकजुटीने नांदत असलेल्या देशाच्या इतमामाने भारताने जगासमोर उठून उभे राहावे. गेल्या काही शतकांत एकत्रित झालेल्या, जेमतेम काही लाख लोकांच्या देशांनी ह्या महान संस्कृतीच्या भवितव्याचा निर्णय करू नये.’ [३]
अणुचाचणीच्या मुद्याला १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुका एक अर्थ प्राप्त करून देणार होत्या. भारतीय जनता पार्टीला (बी.जे.पी.) पूर्ण बहुमत मिळाल्याने राजकीय स्थैर्य परत आले. निवडणुकांच्या प्रचारात, बी.जे.पी.ने सत्तेत आल्यास अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेण्याचा मनसुबा घोषित केलेला होताच. निवडणुकीतील विजयामुळे अणुप्रश्नाबाबतची साशंकता लोकांच्या मनातून दूर झालेली होती. भारताने अणुचाचणी करावी आणि न कचरता आण्विक सत्ता म्हणून सिद्ध व्हावे, ह्याबाबत आता एक सर्वसाधारण सहमती निर्माण झालेली होती. इतर अणुसक्षम राष्ट्रांकडून संभवणार्यात हल्ल्यांना परावृत्त करण्याकरता, देशाकडे अण्वस्त्रसामर्थ्य असायलाच हवे आणि जागतिक पार्श्वभूमीवर देशास उचित सन्मान मिळवून दिलेलाच असला पाहिजे.
आघाडीच्या सरकारने संसदेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पंधरा दिवसांतच पंतप्रधान वाजपेयींनी मला आणि आर.चिदंबरम ह्यांना अणुचाचणी करण्यासाठी पाचारण केले आणि अधिकार दिले. पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि वाजपेयींचे सर्वात विश्वासू सहाय्यक ब्रजेश मिश्रा, ह्यांना आमच्या नोकरशाहीसोबतच्या संबंधांकरताचा एकमेव अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. चाचण्या करण्यास जबाबदार असणार्यांरकरता तीस दिवसांचा पूर्वसूचना अवधी वाजवी समजण्यात आला. पौर्णिमेबाबत उत्साही असल्याने, मी बुद्धपौर्णिमेचा दिवस चाचणीकरता सुचवला. तो ११ मे १९९८ असणार होता. अल्पशाच चर्चेनंतर सर्वजण ह्या शुभदिवसाकरता मनःपूर्वक सहमत झाले.
ही संपूर्ण घटना गोपनीय राहायला हवी होती. अणुस्फोटकांच्या चाचणीचा बेत अमेरिकेला समजताच आलेला १९९५ चा कडवट अनुभव प्रत्येकाच्या मनात ताजाच होताच. पंतप्रधान वाजपेयींनी त्यामुळे असा निर्णय घेतला की, आगामी अणुचाचण्या उघड होण्यापासून वाचाव्यात म्हणून सर्व प्रकारे काळजी घेण्यात यावी. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनाही त्यांनी ही योजना सांगितलेली नव्हती. अगदी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस ह्यांनाही आमच्या तयारीची माहिती दिलेली नव्हती. ह्याकरता आम्ही निवडलेली चमूही लहानशीच होती, ज्यामुळे गोपनीयता सांभाळणे सोपे जाणार होते.
चाचणीचे दूरस्थ स्थान जगास ज्ञातच होते. भारताने १९७४ मध्ये जिथे पहिली अणुचाचणी केली होती तीच पोखरण चाचणी क्षेत्रातली जागा. १९७४ मधल्या चाचणी प्रमाणेच, आमच्या चाचण्याही भूमिगत असणार होत्या. [४] राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण, हे थरच्या वाळवंटातील एक दूरस्थ लहानसे शहर आहे. हे स्थान खडक, वाळू आणि पाच मिठागरांनी वेष्ठित आहे. पोखरण म्हणजे पाच मृगजळांची जागा. ह्या शुष्क, संतप्त, पडीक जमिनीस हे नाव साजेसेच आहे. चाचणीचे क्षेत्र हे शहरापासून काहीसे दूर अंतरावर आहे.
पोखरण चाचणी क्षेत्र हे, भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या ५८-इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या अखत्यारित होते. हेरगिरी करणार्‍या उपग्रहांपासून होणारी देखरेख टळावी ह्याकरता, गेल्या अनेक वर्षांत रात्ररात्र काम करून, रेजिमेंटने तीन खोल विहिरी खणूनच ठेवलेल्या होत्या. शिवाय त्या भागात अनेक शुष्क कोरड्या, टाकून दिलेल्या विहिरीही होत्याच. त्यांपैकी तीन विहिरींना रुंद आणि ५० मीटर खोल करण्यात आले. ह्या एकूण सहा विहिरींना संकेताक्षरे देण्यात आली. त्या क्षेत्रातील सर्व सुविधा गेल्या वर्षभरापासून सतत कार्यरत ठेवण्यात आलेल्या होत्याच. ज्यामुळे दहा दिवसांइतक्या अल्पशा पूर्वसूचनेने चाचण्या करता आल्या.
चाचण्यांपूर्वी अनेक दिवस आधी स्फोटके पोखरणला जागेवर पोहोचविण्यात आलेली होती. व्हाईट हाऊस संकेताक्षराच्या (२०० मीटरहून जास्त खोल असलेल्या) एका विहिरीत एक औष्णिक-अणुसाधन बसविण्यात आले. विदलन (फिजन) स्फोटक ताजमहाल संकेताक्षराच्या (१५० मीटरहून खोल असलेल्या) विहिरीत बसविण्यात आले. पहिला किलोटनाखालील धमाका (शॉट) कुंभकर्ण संकेताक्षाराच्या विहिरीत प्रज्ज्वलित केला जाणार होता. दुसर्‍या मालिकेतील चाचण्यांकरता राखून ठेवलेल्या तीन इतर ५० मीटर खोलीच्या विहिरींना ’नवतल’ (नव्या विहिरी) संबोधण्यात आलेले होते. त्यांना एन.टी. ही अद्याक्षरे देण्यात आली. जसे कीः NT-१, २ आणि ३.
चाचणीच्या दिवसापर्यंत काही बिघडण्याच्या शक्यतेस वावच ठेवलेला नव्हता. पोखरणपर्यंतचा प्रवास शास्त्रज्ञांनी काळजीपूर्वक एकेकट्यांनीच केलेला होता. जेव्हा शास्त्रज्ञांनी चाचणीच्या जागेला भेट दिली तेव्हा आम्ही लष्करी वेषातच असायचो आणि आम्हाला लष्करी ओळखही दिलेली होती. पोखरण चाचणी क्षेत्रात मला मेजर जनरल पृथ्वीराज म्हणून ओळखले जाई. चाचणी होणार आहे ह्याची कुणकुणही लागू नये ह्याकरता सर्व काळजी घेण्यात आलेली होती.
११ मे १९९८ चा दिवस उगवला. हवेच्या जोरदार झोतांनी वाळूची बारीक पूड पोखरणवर उडत होती. भूमिगत स्फोटांमुळे किरणोत्सार सुटून हवेत उडण्याची शक्यता नगण्य होती, तरीही आम्ही धोका पत्करू शकत नव्हतो. वारा, स्फोटाने उडवलेला धुराळा पोखरण शहराकडे नेऊ शकत होता. आम्हाला थांबायला हवे होते. पंतप्रधान वाजपेयींनी त्यांच्या त्या दिवसभरातील सर्व पूर्वनियोजित भेटी रद्द केल्या आणि ते घरीच, चाचणीस्थळापासूनच्या सुरक्षित-संजीवित-संपर्कसाधनापाशी (सिक्युअर हॉटलाईन) बसून राहिले. तरूण असतांना वाचलेले एक खूप सुंदर वाक्य मला आठवते. ’ज्या करता प्रतीक्षा करावी असे काहीतरी व्हावे ह्याकरता तुम्हाला प्रतीक्षा करावीच लागते.’ माझे सहकारी आणि मी ह्या चाचण्यांकरता अनेक वर्षे प्रतीक्षा करत होतो. काही तास आणखी प्रतीक्षा करावी लागली तरी आम्हाला त्याची चिंता नव्हती.
मी पंतप्रधानांना दुपारी ३ वाजता फोन केला. हे सांगण्याकरता की वारे मंदावत आहेत आणि पुढल्या तासात चाचण्या करता येऊ शकतात. ३:४३:४४:२ वाजता मोठी तीन अणुसाधने एकाचवेळी प्रज्ज्वलित करण्यात आली. धमाक्यांच्या संयुक्त धडकेने एका क्रिकेट ग्राऊंडच्या आकाराचा भूभाग जमिनीच्या वर काही मीटर उंचीवर उडाला. त्यामुळे धूळ आणि वाळूचे ढग हवेत उसळले. १९७४ च्या स्फोटाविपरित, आता हे स्फोट शांततेकरताच करण्यात आल्याचा कुठलाही दावा केला गेला नाही. खरोखरीच, सरकारी अधिकार्‍यांनी जलदीने स्फोटांच्या लष्करी स्वरूपावर भर दिला. ’ह्या चाचण्यांनी हे सिद्ध केले आहे की, भारताजवळ अण्वस्त्रसज्ज अणुकार्यक्रमाचे सामर्थ्य आहे.’ ब्रजेश मिश्रांनी पत्रकारांना सांगितले.
दोन दिवसांनंतर, १३ मे रोजी दोन, किलोटनाखालील साधने NT-१ आणि NT-२ भूमिगतरीत्या प्रज्ज्वलित करण्यात आली. स्फोटक NT-३ हे बाहेर काढण्यात आले आणि आर.चिदंबरम ह्यांच्या हुकूमाने पुन्हा सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कारण त्यांना असे लक्षात आले की, आवश्यक असलेले सर्व निष्कर्ष पाच स्फोटांतच प्राप्त झालेले आहेत. चमूला ते थोडक्यात इतकेच म्हणाले होते की ’कशाला वाया घालवा?’.
पोखरण-२ अणुचाचणीने अधिक शक्तिशाली आणि हलक्या अण्वस्त्रांचे आगमन सिद्ध केले होते, जी प्रक्षेपणास्त्रांद्वारे वाहून नेली जाऊ शकतील. भारत आता एक पूर्णतः अण्वस्त्रसिद्ध शक्ती झालेला होता.
२८ मे १९९८ रोजी पाकीस्तानने बलुचिस्तान प्रांतातील, चगाई जिल्ह्यातील, रास कोह टेकड्यांवर अणुचाचणी केली. ३० मे १९९८ रोजी एक आणखीही चाचणी करण्यात आली. तेव्हा पंतप्रधान नबाब शरीफ ह्यांनी त्यांचे विख्यात झालेले पुढील विधान केले. ते म्हणाले की, ’जर भारताने स्फोट केला नसता तर पाकीस्ताननेही केला नसता. जर नवी दिल्लीने ते केले असेल, तर आम्हाला जनतेच्या दबावाखाली पर्यायच राहत नाही’.
मे १९९८ च्या स्फोटांपश्चातच्या पाश्चात्य माध्यमांतील गदारोळावर मी हसलो. अण्वस्त्रे ब्रिटनपाशी का असावीत, आणि भारतापाशी ती का नसावीत? जेव्हा फ्रेंच वसाहतयुक्त अल्जिरियात खुल्या वातावरणातच अणुचाचण्या करत होते तेव्हा कुणी काहीच का बोलले नाही? हे प्रश्न वाजवी नाहीत का? अण्वस्त्रे बाळगण्याचा दैवी अधिकार ब्रिटन आणि फ्रान्स ह्यांना आहे असा दावा करण्यात काही ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. खर्याआ अर्थाने नैतिक असलेल्या एकतर्फी आण्विक निरस्त्रीकरणात ती आहेत. पाश्चिमात्य किंवा रशिया अथवा चीनला ह्यात रुची नाही. भारतास त्यामुळे, अण्वस्त्रसिद्ध जगात आपले स्थान निश्चित करण्यासाठी फारच अल्प पर्याय शिल्लक राहतात, आणि तेच त्याने अवलंबले आहेत.
’जर तुम्हाला तुमच्या शत्रुसोबत शांतता प्रस्थापित करायची असेल तर, तर तुम्हाला शत्रुसोबत काम करावे लागेल. मग तो तुमचा सहकारी होईल’ [५]
२० फेब्रुवारी १९९९ रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नबाब शरीफ ह्यांनी वाघा बॉर्डरवर दरवाजे उघडून इतिहास घडवला. गेल्या एक्कावन वर्षांत, भारत-पाक संबंधांचा स्वभाव ठरलेल्या तिरस्काराच्या भिंती ढासळल्या. जेव्हा पंतप्रधान वाजपेयी बावीस विख्यात भारतीयांसोबत सीमाचौकीवर दिल्ली-लाहोर बसमधून पोहोचले, तेव्हा पंतप्रधान नबाब शरीफ त्यांच्या स्वागतार्थ तिथे उभे राहिले.
जेव्हा दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि परस्परांना भेटले तेव्हा, दोन्ही बाजूंना शेकडो लोक सीमेवर उभे होते. ती घटना साजरी करत होते. उपखंडाच्या इतिहासातला तो एक कळीचा क्षण होता. सीमेच्या दोन्हीही बाजूंना अणुचाचण्या होऊनही, दोन्ही देशांचे नेते शांततामय सहजीवन प्रस्थापित करू पाहत होते.
अनेक महिन्यांनंतर १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू झाले. नियंत्रणरेषा ओलांडून पाकीस्तानने सैन्य सीमेपार काश्मीरात घुसवले होते. पाकीस्तानी सैन्यास हाकलून देऊनच त्या युद्धाची सांगता झाली. एवढी ही शांतता तकलादू होती, हेच त्यातून सिद्ध झाले. अधिक नेमके सांगायचे तर, त्यामुळे असे दिसून आले की, शक्तीशाली दले शांततेचे महत्त्व कमी लेखू पाहत होती.
संघर्ष उजागर करण्याच्या काही प्रवृत्तींनिरपेक्ष, उपखंडातील शांतता टिकवून धरण्याच्या संधीचा लाभ घेणे आपल्या नेत्यांनी सुरूच ठेवले पाहिजे. बहुधा महाभारतातील प्राचीन शहाणपणा इथे उपयोगाचा ठरेल. जेव्हा भीष्म जखमी होऊन शरशय्येवर मरणाची वाट पाहत पडले होते, तेव्हा पांडव त्यांच्यापाशी त्यांना भेटायला आले, त्यांनी त्यांचा सल्ला विचारला. भीष्म म्हणाले, ’कुणीही कुणाचा मित्र नसतो. कुणीही कुणाचा शत्रू नसतो. परिस्थितीच शत्रू आणि मित्र घडवत असते’. जग बदलेल. व्यूहरचनात्मक विचार तरल आणि त्यानुरूप बदलते असावेत. जशी एखाद्या व्यक्तीला परिस्थितीची जाण असावी लागते आणि त्यानुसार आपला पवित्रा बदलावा लागतो, तशीच देशालाही ती जाण असावी लागते.
१९९९ च्या उत्तरार्धात, डी.आर.डी.ओ.मधून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे हे मला माहीत होते. पण भारत सरकार मला निवृत्त करण्याच्या मनस्थितीतच नव्हते. १९९९ नोव्हेंबरमध्ये ’प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडव्हायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ हे पद निर्माण करण्यात आले. ते पद भूषविणारा मी पहिला होतो. हा अधिकारी नवनिर्मितीच्या दृष्टीने धोरणे, व्यूहरचना आणि मोहिमा उत्क्रांत करेल. क्रांतिक पायाभूत सुविधांत, विज्ञान व तंत्रज्ञान उपक्रम निर्माण करेल. सरकारी खात्यांसोबतच्या आर्थिक व सामाजिक सहभागाने संस्था आणि उद्योग निर्माण करेल. ह्या पदावर असतांनाही मी मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्षपद, तसेच सचीवपदही भूषवायचेच होते.
मला नव्या पथावरून चालवणारा ईश्वरी हात मला जाणवत होता. हा रस्ता मला कुठे नेईल ते स्पष्ट नव्हते. मी ईश्वरी इच्छेचा आदर करायला हवा होता. तिच्यानुसार वागायला हवे होते. हेच तर मी आयुष्यभर करत आलो होतो. मी माझ्या आईच्या मांडीवर पहुडलेला असे तेव्हा, मला आठवते, माझे वडील आईला हे सांगत:
’श्रद्धेचे दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे धीरोदात्तता (सब्र) आणि दुसरा भाग म्हणजे समाधान (शुक्र). धीर धरण्याचा अर्थ असा आहे की मी कुणाकडे तक्रार करू नये, माझ्या सोयी आणि हक्कांना मी चिकटून राहू नये, वाईट दिवसांचा तिरस्कार करू नये आणि ते जावेत ह्या विचारावर मी प्रेमही करू नये. जो धीर सोडतो तो तुटून जातो आणि जो दृढ राहतो तो दृढच राहतो.’[१] द बायबल, प्रॉव्हर्ब्स, २९:१८ (किंग जेम्स व्हर्शन)
[२] इस्लामिक धार्मिक संहितांत हा वाक्यांश आढळून येतो. त्यांत मोहम्मद इब्न इस्माईल अल बुखारी ह्यांच्या विख्यात संग्रहाचाही समावेश होतो. डॉ.कलाम त्याचे समाकलन, ’ज्यांना शांतता हवी आहे त्यांनी युद्धाकरता तयार रहावे’ असे करतात.
[३] अरूण तिवारी, इंडियन अबाव्ह ऑल - ए.पी.जे.अब्दुल कलामः ए लाईफ, हार्पर-कॉलिन्स, २०१५, पृ. (व्ही.आय.आय.).
[४] आंशिक चाचणी बंदी करार (पी.टी.बी.टी.-पार्शल टेस्ट बॅन ट्रिटी) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो ऑक्टोंबर १९६३ पासून अंमलात आला. ह्या करारान्वये, फेब्रुवारी १९६० मध्ये करण्यात आलेल्या फ्रेंच गर्बॉईज ब्लेऊ टेस्ट सारखी, भूमिगत नसलेली सर्व प्रकारची आण्विक प्रज्ज्वलने निषिद्ध होती.
[५] नेल्सन मंडेला (१९१८-२०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे वंशभेदविरोधी क्रांतिकारक होते. १९९४ ते १९९९ दरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. डॉ. कलाम त्यांची खूप स्तुती करत असत. अंतिमतः ते त्यांना १६ सप्टेंबर २००४ रोजी, त्यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या शासकीय भेटीदरम्यान भेटले होते.

- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

No comments: