20150417

गती

अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते. चर म्हणजे हलत्या, सजीव वस्तू. अचर म्हणजे रूढार्थाने अचल, स्थिर निर्जीव वस्तू. मात्र सृष्टीच्या अनेकविध घडामोडींत, त्याही सतत आपली जागा बदलतांना दिसून येतात. सृष्टीचे जलचक्र, जलराशींची उठाठेव करत असते. समुद्रांवरून पर्वतांवर आणि उंचीवरून गुरूत्वाने खाली वाहत, पुन्हा समुद्रांपर्यंत; जलराशी अव्याहत प्रवास करत असतात. कधी संथ तर कधी जलद. मात्र गतीहीन झाल्यास पाणी सजीवांकरता धार्जिणे राहत नाही. पाणी तुंबले तर तळ्याला डबके म्हणतात. वार्‍याच्या लहरींवर सरकत, थिरकत राहते, ते सर. सरोवर. त्या प्रवाहाने वाहत जाते ती सरिता. नदी. नदी हे गतीचे प्रतीक आहे. नदीला जीवनदायिनी मानतात. माता समजतात. म्हणजे खरे तर गतीलाच माता मानत असतात. आदी शंकराचार्यांचे भवानि अष्टकम् तर ह्या संकल्पनेवरच आधारित आहे. त्यात ते म्हणतातः “गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि”. म्हणजे हे भवानी, आमची सर्व स्वरूपाची गती तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. त्या गतीचा आधार तूच आहेस. किंबहुना तू स्वतःच गतीस्वरूप आहेस. गती आहेस.

उन्हाळा बहरात असतो. ग्रीष्मातले ऊन मी म्हणत असते. झाडाचे एक पानही हलत नसते. वारा पडलेला असतो. अशा वेळी साधेसे तापमानही सजीवाला कष्टदायक वाटू लागते. कुठलेही अवजड काम न करताही, घामाच्या धारा वाहू लागतात. हवा असलेला प्राणवायू आसपासच विहरत असतो. मात्र वार्‍याची झुळूकही न आल्याने, सजीवाशेजारची अपानमिश्रित, ऊष्ण हवा त्याला तशीच वेढून राहते. जीव नकोसा होऊन जातो अगदी. पंखे लावून आपण मग हवेला, हवी ती गती देतो. वातावरण त्यामुळे कृत्रिमरीत्या सुसह्य होऊ लागते. अशाचवेळी मग हलकेच कुठूनशी मंद वार्‍याची झुळूक येते. अगदी स्वाभाविकपणे. तो सुखद गारवा हवाहवासा वाटू लागतो. कारण त्यामुळे सभोवतालच्या हवेला गती प्राप्त होऊन, तिची जागा ताजी, थंड हवा घेत असते. असे आहे गतीचे माहात्म्य.

गतीने गुंफला वारा, हवा वाटे, समीर सारा ।
न हले पर्णही जेव्हा, नको वाटे, कहर सारा ॥

अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर माऊंट अबूला आहे. त्याचे नाव गुरूशिखर. गुरूशिखरावर वाहणार्‍या वार्‍याचे वर्णन गोरखनाथांनी खालीलप्रमाणे केले आहे.

पवनही भोग, पवनही योग । पवनही हरे छत्तीसो रोग ॥

म्हणजे वाराच भोग देतो, वाराच योग होतो, सर्व रोगांचे निवारणही वाराच करत असतो. मात्र वारा म्हणजे काय तर गती प्राप्त झालेली हवा. किंबहुना गतीच.

“ऋषीमुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा” असे एक गाणेच पूर्वी ऐकल्याचे मला आठवते. मनुष्याला भूक लागते. मग तिच्या शमनार्थ तो जी काही कर्मे करतो, त्यांतच तो गुंतत जातो. उपजीविकाच मनुष्याला गती देत असते. ती असते अपरिहार्य गती. स्वाभाविक गती. पण मनुष्य मनुष्य असतो. तो अंतर्प्रेरणेनेही भारलेला असतो. त्या प्रेरणांमुळे तो जी गती प्राप्त करत असतो, ती स्वाभाविक उपजीविकेच्या प्रेरणेहूनही असामान्य असू शकते. गतीमान असू शकते. लोकनेत्यांना वास्तविक उपजीविकेपाठी गतीमान होण्याची आवश्यकताच नसते. मात्र आपल्या सगळ्यांपेक्षा तेच सर्वात अधिक सक्रिय असलेले दिसून येतात. दिवसाचे सोळा सोळा तास केवळ अंतर्प्रेरणेमुळे कार्यरत असतात. स्वयंप्रेरणेच्या अपार गतीने, मानवी संस्कृती झपाट्याने प्रगतीपथावर अग्रेसर होत असते.

जे उपजीविकेचीही पर्वा करत नाहीत, ते प्राणी आळशी होत जातात. सृष्टीचक्रात ते टिकाव धरू शकत नाहीत. मनुष्यांत मात्र अशा आळशांना इतर अतिसक्रिय निकटवर्ती, लाडाने, प्रेमाने भरवत राहतात असे दिसून येते. तरीही, मानवी संस्कृतींतूनही आळसास निंद्यच मानले गेले आहे. पंचतंत्रातील खालील श्लोक ह्याचीच ग्वाही देत असतो.

षड् दोषा: पुरूषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्रा भयं क्रोध: आलस्यं दीर्घसूत्रता ॥ पंचतंत्र

म्हणजे

संपदा इच्छित्या व्यक्तिने सोडावे षट्‍ दोष हे ।
निद्रा, तंद्रा, तशी भीती, राग, आळस, मंदता ॥ पंचतंत्र

पंचतंत्रात झोप, तंद्री लागणे, भीती, आळस आणि वर्तनमंदता हे सहा दोष मानले गेलेले आहेत. मनुष्याने त्यांपासून दूरच राहावे अशी शिकवणही पंचतंत्रातून प्राप्त होत असते. जगात वागावे कसे? ह्या प्रश्नाचे उत्तर अनेक लोक आपापल्या दृष्टीनुरूप निरनिराळे देतीलही, मात्र जगात गती-प्रगत होत असावे, तल्लख वागणुकीतून अभिव्यक्त व्हावे. अशी त्यांचीही अपेक्षा असतेच.

मानवी शरीरात तर अन्नापासून ऊर्जा आणि ऊर्जेपासून उपजीविकेकरताची हालचाल साधली जात असते. ह्याकरता प्रथमतः रासायनिक, मग यांत्रिक आणि अंतिमतः वैचारिक उलाढाली आकारास येत असतात. त्यांना जैवविज्ञानात चयापचय म्हणतात. चयापचय म्हणजे निरंतर होत असणारी हालचाल. गतीमानता. त्यासाठी प्राण-अपान वायू रक्तातून सारखे फिरवले जात असतात. त्याकरता, मिनिटाला ७२  ठोके दराने, जन्मापासून तर मरणापर्यंत ६०, ७०, ... १०० वर्षे हृदय, सतत स्पंदत असते. न कुरकुरता. तुम्ही कदाचित असेही म्हणाल की, त्यात काय एवढे? आम्ही हवे तेव्हा ते थांबवून दाखवू. मात्र तसे करणे सजीवास शास्त्रीयदृष्ट्या शक्यच नसते. अगदी श्वासोच्छवासाची गतीही आपण फारशी नियंत्रित करू शकत नाही. थांबवूही शकत नाही . काहीशी नियंत्रणात आणू शकतो. तशी आणतो, तेव्हा त्यास प्राणायाम करणे म्हणतात.

दररोज किमान १०,००० पावले चालत राहिल्यास म्हातारपणी संधीवाताचा त्रास होत नाही असा सल्ला डॉक्टर देतात. म्हणूनच पदभ्रमण करणारे आरोग्यपूर्ण जीवन जगतांना दिसतात. पदभ्रमणकर्त्यांचे एक बोधवाक्य आहे “चरन्‌ वै मधु विन्दन्ति”. म्हणजे सतत फिरत राहूनच मधुमाशा मध गोळा करू शकत असतात. तसे सदैव फिरते राहा. मधुरता मिळवू शकाल. आरोग्य मिळवू शकाल.

गतीची आराधना ही भारतीयांची संस्कृती आहे. ज्योतिर्मय जीवन ही आपली धारणा आहे. ती साजरी करण्याकरता, नदीत दीपदान केले जाते. गंगा नदीवर हरिद्वारमधील हर-की-पौडी येथे, गेल्या हजारो वर्षांपासून दररोज, संध्यासमयी, पानांच्या द्रोणात वाती पेटवून, ते दिवे गंगेत सोडून दिले जातात. त्या ज्योतीस प्राप्त होते तशीच गती, आमच्या जीवनांनाही प्राप्त होवो अशी प्रार्थनाही दररोज लाखो लोक करत असतात. विख्यात समाजसेवक आणि कवीवर्य बाबा आमटे, “गतीचे गीत” ह्या आपल्या अजरामर कवितेत असे म्हणतात की:

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई ।
दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही ॥

गतीचा शोध घेत, त्यांनी जसे कुष्ठरुग्णांचे जीवन आरोग्यपूर्ण आणि समृद्ध घडवले होते, तसेच आरोग्यपूर्ण, समृद्ध जीवन आपणही घडवू या. चला, आपणही गतीचे गीत गाऊ या.

No comments: