२०१५-०४-१६

चिनाब नदीवरला लोहमार्ग पूल



वरील प्रकाशचित्रात, भारतीय लोहमार्ग प्रशासनाद्वारे अंगिकृत, २०१६ साली पूर्ण होत असलेल्या प्रकल्पामधील, प्रस्तावित चिनाब पुलाचे, कलाकाराच्या कल्पनेतील आरेखन दर्शवलेले आहे. पुलावरील रस्त्याच्या, पाण्यापासूनच्या उंचीसंदर्भात, हा पूल जगातील सर्वात उंच [१] लोहमार्ग पूल ठरणार आहे.

भारतात हे एक जागतिक नवलविशेष आकारास येत आहे. काश्मीरमध्ये घातल्या जात असलेल्या नवीन लोहमार्गावर, चिनाब नदीवरला लोहमार्ग-पूल तयार होत आहे. हा पूल असणार आहे जगातला सर्वात उंच पूल. हल्लीचा जगातील लोहमार्गांवरील सर्वात उंच  पूल फ्रान्समधील टेम नदीवर आहे. त्याची उंची ३४३ मीटर आहे. ह्याची उंची ३५९ मीटर इतकी असणार आहे. तुलनेकरता इथे हे सांगायला हवे की जगद्‌-विख्यात आयफेल टॉवरची उंची ३२४ मीटर आहे तर, नवी दिल्लीमधील कुतुबमिनारची उंची ७२ मीटर आहे.

जम्मू-आणि-काश्मीर राज्यातील, रिअसी जिल्ह्यातील, कुरी गावातून बक्कल गावाकडे सुरू होणारा त्या पर्वतीय मार्गावरचा चढाचा प्रवास हा अत्यंत त्रासदायक, पाठीचा कणाच मोडणारा असतो. मात्र, आजूबाजूच्या नैसर्गिक रौद्र सौंदर्यामुळे तो काहीसा सुसह्य होतो. चिनाब नदीही बाजूला वरून खाली वाट उतरत असतेच. रस्ता वर चढत जातो तसतसे, दोन्ही किनार्यां वरील उंचच उंच कड्यांतून खोलवर वाहणार्‍या शक्तीशाली चिनाब नदीच्या, छोट्याशा दिसणार्‍या पात्राचे, विहंगम दृश्य दिसू लागते. नदीचे दोन्हीही तीर परस्परांना जोडणारे कुठलेही बांधकाम आज इथे अस्तित्वात नाही.

जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतीय भागांत प्रवास करणे स्थानिकांकरता अत्यंत कठीण असते. भारत सरकारने, इथे चांगली दळणवळणाची साधनसुविधा पुरवण्याची निकडीची गरज जाणून घेऊन, जम्मू आणि काश्मीर राज्याला उर्वरित भारताशी जोडणारा राष्ट्रीय लोहमार्ग निर्माण करण्याचा प्रकल्प ऑगस्ट २००३ साली हाती घेतला. हा प्रकल्प मार्च २०१६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा लोहमार्ग जम्मू-उधमपूर-कटरा-काझीगुंड-बारामुल्ला ह्या एकूण ३४५ किलोमीटर मार्गावर घडवला जाणार आहे. जम्मू ते उधमपूर भागाचे बांधकाम पूर्ण होऊन एप्रिल २००५ मध्ये तो खुलाही करण्यात आला. उधमपूर ते बारामुल्ला ह्या मार्गावर काम आता सुरू आहे. त्यातीलही कटरा ते धरम हा ७० किलोमीटरचा मार्ग अतिशय अवघड आहे. म्हणून त्याचे बांधकाम कोकण लोहमार्ग महामंडळाला सुपूर्त करण्यात आलेले आहे. अवघड चढ-उतारांच्या डोंगरी भागातूनच जात असल्यामुळे, प्रकल्पांतर्गत अनेक पूल आणि बोगदे बांधावे लागणार आहेत.

चिनाब नदीवरला पूलही ह्यांपैकीच एक आहे. उधमपूर पासून काश्मीरला जात असतांना, खोल दरीतल्या चिनाब नदीला पार करून जाण्याकरता, तो उभारला जाणार आहे. १,३१५ मीटर लांब असणारा हा पूल एक अभियांत्रिकी आश्चर्यच ठरणार आहे. अनेक बाबतीत तो अद्वितीय वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहे. पुलावरून जात असतांना गाड्या ताशी १०० किलोमीटर वेगाने जाऊ शकणार आहेत. पुलाच्या भूकंप-प्रवणता-सोशिकतेकरता कमानीचे अभिकल्पन पक्षकर असते. म्हणून अशा संरचनेची निवड करण्यात आली आहे [२]. अशा अभिकल्पनात, कमानीच्या पायांवर पडणारा पुलाचा भार नदीच्या तीरावरील उतारांना स्थिरता प्रदान करत असतो. इतर संरचनांपेक्षा पोलादी संरचना बांधणे, सांभाळणे आणि प्रसंगी तिचे पुनर्वसन करणेही तुलनेत सोपे ठरत असते. म्हणूनही पोलादी संरचनेची निवड करण्यात आलेली आहे.

ह्या भागात खूप जोरदार वारे वाहत असतात. हवेच्या वेगापुढे पूल टिकून राहील का? अशाप्रकारच्या शंकाही उपस्थित झाल्या होत्या. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणारे वारेही सोसू शकेल, असे त्याचे अभिकल्पन आता करण्यात आलेले आहे. पुलाच्या जागेवर हवेचा वेग मोजणारे उपकरण बसविण्यात येणार असून, त्यावर अवलंबून, पुलावरील गाड्यांची ये-जा स्वयंचलितरीत्या नियंत्रित केली जाणार आहे. हवेचा वेग मर्यादेबाहेर असल्यास, पुलावरून गाड्यांची ये-जा आपोआप थांबविली जाईल. त्याकरता, संकेत-व्यवस्थापन सुसज्ज केले जाणार आहे.

चिनाब नदी अतिशय वेगवान आहे. तिला येणारे पूरही, खूप उंचीपर्यंत चढतात. पूल त्याही उंचीच्या सुरक्षितरीत्या वरच असायला हवा! अशा काही अपेक्षाही अध्याहृतच होत्या. त्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी २००८ साली हे काम थांबविण्यात आलेले होते. अभ्यासानंतर पुनरीक्षण करून २००९ साली प्रकल्पास पुन्हा मंजुरी देण्यात आली. पुलाचे अभिकल्पन मात्र २०१२ सालीच मंजूर होऊ शकले. पूल मार्च २०१६ मध्ये पूर्ण होईल. त्याचे अनुमानित आयुष्य त्यानंतर १२० वर्षांचे असेल.



सध्या सामानाची ने-आण करण्यासाठी आणि नंतर नदीवर पुलाचे घटक बसविण्याकरता, किनार्‍यावर लक्षवेधी उंचीचे चार मनोरे (टॉवर्स) उभारण्यात आलेले आहेत. पहिल्या प्रकाशचित्रात दोन्ही तीरांवरील मनोरे आणि त्यांच्या रचनात्मक जागा दिसत आहेत. तर, पहिल्या प्रकाशचित्रातील लहान लहान दिसणार्‍या काँक्रीटच्या स्तंभांचे प्रत्यक्षातील आकार नीट लक्षात यावेत म्हणून, दुसर्‍या प्रकाशचित्रात तुलनेकरता कामगारांच्या झोपड्या दाखवलेल्या आहेत. चित्रातील झोपडीनुमा बांधकामे, पुलानजीकच्या रस्त्याखालील स्तंभांच्या अजस्त्रतेची पुरेशी कल्पना करून देत आहेत.

पुलासंदर्भातील रोचक आकडेवारी [३]
पाण्यापासूनची रस्त्याची उंची (डेक हाईट)= ३५९ मीटर
पोलादी बांधकामाची कमाल उंची = १३३.७ मीटर
मुख्य पल्ल्याच्या कमानीची एकूण लांबी = ४८५ मीटर
पुलाचे एकूण पल्ले (स्पॅन्स)= १७
एकूण पोलादी बांधकामाचे वजन = २५,००० टन
पुलाची एकूण लांबी = १,३१५ मीटर
वार्या चा अनुज्ञप्त कमाल वेग = १०० किलोमीटर/तास
पुलाच्या बांधकामाचा अंदाजे खर्च = ५१२ कोटी रुपये
प्रकल्पाचा एकूण खर्च = २०,००० कोटी रुपये

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मग देश-उभारणीच्या नवीन कामांना गती मिळाली. भाक्रा-नांगल, हिराकुंड इत्यादी धरणे बांधली गेली. जमशेदपूर, भिलाई ह्यांसारखे पोलादाचे अवाढव्य कारखाने उभे राहिले. स्वतंत्र भारताच्या उभारणीचा नवा काळ समोर आला. त्यावेळी १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ’नया दौर’ चित्रपटातील एका गीतात सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी म्हणतात:

फौलादी हैं सीने अपने, फौलादी हैं बाहें ।  हम चाहे तो पैदा कर दे, चट्टानों में राहे ॥

हिमालयी, पीर-पांजाल पर्वतराशींतील चिनाब नदीपात्रासारख्या खोल दर्यांवर पूल बांधत आणि उंचच उंच पर्वतांतून लांबच लांब (त्यातील एक तर सुमारे ११ किलोमीटर लांब आहे.) बोगदे खणत तयार होणारा हा लोहमार्ग; हा आमच्यातील अशाच आंतरिक शक्तीचा प्रकट आविष्कार आहे. भारतीय जनजीवनात तो विकासाचा खरोखरीच एक ’नया दौर’ आणणार आहे. काश्मीर खोर्‍यातील विकासाची नवीन कवाडे उघडणार आहे. कटर्‍यापासून वैष्णोदेवीस यात्रा करणार्‍यांचे (२०११ साली सुमारे १० लाख लोकांनी वैष्णोदेवीची यात्रा केली होती) अपार कष्ट तो वाचविणार आहे. काश्मीरला अवनीतलावरील स्वर्ग मानतात. थेट ह्या स्वर्गाप्रत नेणारा लोहमार्ग स्थापन झाल्यावर स्वर्गाची यात्रा सुलभ होणार आहे. त्यामुळे काश्मीरातील पर्यटन व्यवसायास बहारीचे दिवस येणार आहेत.

आपण नेहमीच म्हणत असतो की, भारत सरकारने भारतीय जनतेस काय दिले? कोणता असा खास विकास केला? मात्र, सरकार कोणत्याही पक्षाचे असो. लोकशाही व्यवस्थेत निर्माण केली गेलेली नोकरशाही, यथाशक्य प्रयत्न करतच असते. सतत विकासाचे मार्ग हुडकतच असते. शिवाय, सगळ्यांनी मिळून जे प्रकल्प घडवलेले असतात, त्यांची फळे एक ना एक दिवस दृष्टीस पडतातच पडतात. असाच आपल्याला आता दिसू लागला आहे जगातील सर्वात उंच पूल. चिनाबवरला लोहमार्गपूल. भारतीय अभियांत्रिकी इतिहासातील एक देदिप्यमान कर्तब! ह्यामुळे आपल्या देशाची मान जगभरात गौरवाने उन्नत होईल. एवढेच नव्हे तर आपल्याकरता आर्थिक विकासाचे नवे पर्वच उघडेल. काश्मीर खोर्‍यातील लोक उर्वरित देशातील लोकांशी घट्ट दळणवळणाच्या सोयीने जोडले जातील. शिवाय, देशाच्या संरक्षणातील एक मोठी उणीव  कायमची दूर होईल.

संदर्भः
१. नवभारत टाईम्समधला १७-०६-२०१२ रोजीचा एक लेख http://navbharattimes.indiatimes.com/india/national-india/-/articleshow/14201564.cms
२. ऍफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड ह्या कंपनीचे जून-जुलै २०१३ चे मुखपत्र http://www.afcons.com/downloads/news/2013/Efficient%20Infrastructure%20_%20worlds%20tallest%20bridge.pdf
३. लोहमार्ग-तंत्रज्ञानावरचे अधिकृत संकेतस्थळ http://www.railway-technology.com/projects/chenab-bridge-jammu-kashmir/

२ टिप्पण्या:

आशा जोगळेकर म्हणाले...

खूप सुरेख माहितीपूर्ण लेख, ह्या पुलामुळे खूपसे प्रश्न सुटणार.

ऊर्जस्वल म्हणाले...

हो. बरोबर आहे. काश्मीरला तो उर्वरित भारताशी घट्ट जोडेल!