२०१३-११-१४

नवे व्यवसाय

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. शिवाय, साखरेच्या हव्यासाने, सर्व जमिनी ऊस पिकवू लागल्याने, भूजल पातळीचा झालेला र्‍हास आणि इतर आरोग्यपोषक अन्नधान्याखालील जमिनींत झालेली लक्षणीय घट पाहता (साखरेचा भाव आज गव्हापेक्षाही घटलेला दिसून आल्यास नवल नाही!), आजला साखर व्यवसायही समाजविघातक मानावा काय, ह्यावर चर्चा होऊ शकेल. मात्र आजमितीस निर्माण होणारे काही कालसापेक्ष नवे व्यवसाय समाजास पोषक आहेत की घातक ह्याचाच उहापोह इथे करायचा आहे.

हे व्यवसाय, त्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आधार आहेत ह्यात काही संशय नाही. मात्र त्यांच्या ग्राहकांना, त्यांच्या व्यवसायाने प्रभावित होणार्‍या समाजाला, कितपत लाभकारक आहेत, हे निश्चितपणे कळू शकेल, अशी आज परिस्थिती नाही.

धर्मगाय

आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य रस्त्यांवरच्या पदपथांवर तुम्हाला, डौलाने गायी बांधलेल्या दिसतील. त्यांना आवश्यक असलेल्या सकस खाद्यपदार्थांचे लाडू, गवत, चारा इत्यादींच्या साठ्यांसह त्यांचे मालकही ऐसपैस दुकान लावून बसलेले असतात. अशा दुकानांचा एकूण थाट आणि रुतबा पाहता, पदपथ रिकामे करत फिरणार्‍या महापालिकेच्या मोटारींपासून त्यांना अभय मिळत असावे, असे वाटण्यास वाव राहतो. अशा दुकानांच्या आसपास मंदिरही हमखास आढळून येते. मात्र हा व्यवसाय अमूक लोकच करत असावेत, असे निश्चयाने सांगता येणार नाही. हिंदू लोक, जैनांच्या पुण्यसंचयार्थ गायी पाळण्याचा व्यवसाय करतात, असेही असण्याची शक्यता दाट आहे. एरव्ही सन्मानाने मालकाच्या घरात राहणार्‍या ह्या गायी, व्यवसायाच्या वेळात मात्र महापालिकेच्या पदपथावरील मोक्क्याच्या जागांवर, हक्काने पुण्यवितरणाचा “धर्मगाय” व्यवसाय करण्यास हजर होत असतात. गायीचा मालक, व्यवसायाच्या वेळापत्रकानुसार ठराविक जागी; गाय, गायचारा, दुकानचालक इत्यादी सामग्री वेळेवर उपस्थित राहील ह्याची दक्षता घेतो. दुकानचालक, पुण्यसंचयार्थ येणार्‍या ग्राहकांकडून पैसे घेऊन, आपल्याच गायीला, आपलाच चारा, ग्राहकाच्या पैशाने भरवतो. ह्याकरता वापरलेली जागा महापालिकेची असते. त्या जागेवरून चालणार्‍यांना, तेवढ्यापुरते रस्त्यावर उतरून घ्यावे लागते. रस्त्यावर त्यामुळे रहदारी तुंबते. पण त्याचे काय एवढे मनाला लावून घ्यायचे! पुढेमागे धर्मगाय-मालक-चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे ह्यासंदर्भात आपण आपले नम्र निवेदन सादर करावे, झाले!

अशा दुकानांची वेळापत्रके, दरपत्रके, त्यांच्या मांडणीची सुरेख प्रकाशचित्रे, दुकानचालकांच्या मुलाखती, ग्राहकांचा तौलनिक, सांख्यिकी अभ्यास इत्यादी विषय, शोधक पत्रकारांच्या लक्ष्यवेधावर (हिटलिस्ट) राहण्यास आमची काहीच हरकत नाही. वाचकांपैकी कुणी ह्यावर काही काम केल्यास अवश्य कळवावे.

आरोग्यपेये

आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य (म्हणजे विद्युत पारेषण तारांच्या खालच्या जागेतील, रेल्वेकाठच्या चिरटोळ्या, सुशोभित जागांवरील, किंवा “नाना-नानी पार्क” ह्या नावाने इतरांकरता, पक्षी, हास्यक्लबांकरता निर्माण केलेल्या महापालिकेच्या) उद्यानांच्या महाद्वारांकाठच्या जागा, ह्या अशा “आरोग्यपेयां”च्या दुकानांसाठी फारच सोयीच्या असतात. स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने, किंवा त्याच्याच नातेवाईकांना चालविण्याकरता असे व्यवसाय अत्यंत सोयीचे मानावेत. अशा दुकानांतून दुधी, गाजर, काकडी, मुळा, भाजीपाले इत्यादीकांचे रस कलंकहीन पोलादाच्या (सरळ स्टेनलेस्टीलच्या म्हणा की राव!) बरण्यांतून विक्रीस उपलब्ध केले जात असतात. वेळ सकाळी सहा ते सात. अशाप्रकारे नित्यनियमाने रसपान करणारे लोक आरोग्याने मुसमुसत आहेत असे कुणाला लक्षात आल्यास, सदरहू लेखकाचे निदर्शनास आणून द्यावे. रसनिष्पादनार्थ वापरल्या जाणार्‍या फळ-भाज्यांची गुणवत्ता, दरपत्रके, ग्राहकांच्या आवडी-निवडीतील प्राधान्ये ह्याबाबतच्या माहितीत, एखादा मुमुक्षू वाचकही मोलाची भर घालू शकेल.

कबुत्तरपालन

कुठल्याशा मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी २,००० कबुत्तरे मुक्त करण्यात आली! अशी बातमी वाचल्यावर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, मुळात ती कुठून बंदिस्त करून आणली? का आणली? आता इथे मुक्त केल्याने आसपासच्या लोकांना ती कशीकाय लाभदायक ठरू शकतील? इत्यादी इत्यादी. पण मग ते म्हणतील की, तुम्ही शंकाखोरच फार आहात बुवा. जाऊ द्या ना!

खैर, जाऊ दिले. आता हा व्यवसाय सुरू झालेला आहे. कसला? पुण्यार्जनाचा. जागा - आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या कुठल्याही रस्त्यावर किराणा मालाच्या दुकानासमोर. वेळ - सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास. पोरकिडे, सोंडे न लागलेले ज्वारी, बाजरी, असले आरोग्यदायी धान्य भस्सकन पदपथावर भिरकावले जाते. निमिषार्धात असंख्य कबुत्तरे कुठुनशी फडफडत येतात. दाणे टिपू लागतात. दूर गुजरातेत, कच्छच्या रणात तर दररोज शेकडो पोती धान्य, वाहने भरभरून “पक्षी-चुग्गा-घरात” आणून टाकतात. सायबेरियातून आलेले पाहुणे, ते खाद्य अत्यंत आदराने उदरस्थ करतात. ते सोडा. पण शहराच्या पदपथावरली ही दुकाने, महापालिकेच्या जागेवर पुण्यार्जनसोहळा बारा महिने, दररोज सकाळी सुखेनैव पार पाडतात. पादचार्‍यांना तेवढ्यापुरते काहीसे पाय-उतार व्हावे लागते इतकेच काय ते!

सार्वजनिक-श्वान तारण

म्हणजे अर्थातच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे तारण करणे. त्यांना बिस्किटे पुरविणे. पेडिग्री (कुत्र्यांचे आवडते, विलायती, पशुखाद्य) पुरविणे. कुत्रा चावल्याची असंख्य प्रकरणे रोज घडत असतात. भटक्या कुत्र्याने लहान मुलाचे लचके तोडल्याची घटनाही ऐकिवात आहे. त्यांच्या भुंकण्याच्या उच्छादाने त्रस्त झालेले लोकही काही कमी नाहीत. त्यामुळेच, भटक्या कुत्र्यांना पूर्वी महापालिकेचे लोक ठार मारत असत. मग प्राणीरक्षकांच्या भूतदयेस न्यायालये कुमक पुरवू लागली. काही प्राणीरक्षक तर इथपर्यंत म्हणू लागले की एखाद्या मुलाचे लचके तोडलेही असतील, म्हणून काय समस्त श्वानजातीच्याच निर्मुलनाचे उपाय करायचे की काय? त्यामुळे माननीय न्यायालयाचा आता भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा हुकूम आहे.

तुम्ही काहीही करा हो! पण जोपर्यंत “सार्वजनिक-श्वान तारण” हा व्यवसाय म्हणून स्थिरपद आहे, तोवर कुणाची काय बिशाद आहे, भटक्या कुत्र्यांचे अन्न तोडण्याची! तर हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारा, त्यातून कुठलीही भौतिक गोष्ट मिळवत नाही. कदाचित आनंद मिळवत असेल. कदाचित पुण्य. पण हा व्यवसाय चालतो मात्र महापालिकेच्याच जागेवर. विनामूल्य. श्वान-भोजन-काळात पादचार्‍यांना जरा वळणाची वाट चालावी लागते इतकेच.

उन्नतमाथा

हे सर्व चारही व्यवसाय करणारे लोक नेहमीच उन्नतमाथा राहत असतात. त्यांना सार्वजनिक जागेचा आपण आपल्या व्यवसायाकरता उपयोग करून घेत आहोत हे चांगलेच माहीत असते. मात्र त्याखातर उगाचचची अपराधी भावना बाळगण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. आपल्या समाजाचीही धारणा अशीच राहिलेली आहे की, स्वार्थासाठी जर कुणी सार्वजनिक जागेचा वापर करत असतील तर त्यांचा जीव तीळ-तीळ तुटतो. मात्र परमार्थाकरता चाललेल्या गैर- (का असेना) वापराकडे ते जाणून बुजून काणा-डोळाच करतात. ह्या व्यवसायिकांचीही दृढ श्रद्धा अशीच असते की, “आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे.” ह्या व्यवसायिकांच्या कामाच्या वेळाही काहीशा आगळ्याच असल्याने, महापालिकेचे कर्मचारी त्यावेळी काम करण्यासाठी नियुक्तच नसतात.

डोळस सिंहावलोकन आवश्यक आहे

आता अशा प्रकारच्या व्यवसायिकांनी माझे काय घोडे मारले आहे? म्हणून मी असल्या चांभार चौकशा चालविल्या आहेत? कुठलेही नाही. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, काही व्यवसाय हे मुळातच अनावश्यक असतात. जसे की वकीली. तसेच मला हेही व्यवसाय अनावश्यक वाटतात. त्याच्यामुळे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. माणसे अनावश्यक व्यवसाय करू लागली की, समाज दिशाहीन होत भरकटत जातो, असे मला (उगाचच) वाटत राहते. तुम्ही काय म्हणता?

३ टिप्पण्या:

Aditya Patil म्हणाले...

अगदी मुद्द्यावर बोट ठेवलं आहे आपण! कोणीही उठावं. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करावी आणि पैसा कमवावा असे चित्र हल्ली वारंवार दिसू लागलं आहे. स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या अयोग्य गोष्टीविरुद्ध आवाज उठविण्याची सामान्य माणसाची इच्छाशक्ती किमान पातळीवर पोहोचली आहे हे फार चिंतेची बाब आहे!

नरेंद्र गोळे म्हणाले...

आदित्य पाटील साहेब,

आपल्याला मुद्दा पटला. हे वाचून आनंद झाला.

आपला समाज कधी स्वतःचा भार स्वतःचेच शिरावर उचलायला शिकणार? इतरांना त्रास न होता आपण आपला व्यवसाय करू शकू काय? ह्याचे प्रशिक्षण आपल्या संस्कृतीत गुंतवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

mannab म्हणाले...

नवे व्यवसाय असे शीर्षक पाहिल्यावर मला कल्पना नव्हती, की आपण लिहिलेला हा लेख नव्या दृष्टीकोनातून लिहिला आहे. वाचता वाचता आपले विचार पटले या संदर्भात नव्याने निघालेले अनेक व्यवसाय आणि त्यांची यादी देता येईल. हल्ली बोकाळलेले दूरचित्रवाणीचे कार्यक्रम आणि त्यातून पोट भरण्याची मिळालेली संधी हे आणि इतर ! नव्या व उद्बोधक विचारांसाठी मी आपली अनुदिनी पाहात असतो. आज पुनः अनुभव आला.
मंगेश नाबर