२०१३-११-०८

ओडिशातील ढंगाने गीता

२००८ सालच्या ऑक्टोंबरमध्ये आम्ही "ओडिशा दर्शन" सहलीदरम्यान, तप्तपाणीच्या अरण्यात गेलेलो होतो. तिथल्या वनकुटीरातील वाढपी श्री.सुरेश बेहरा ह्यांची तेव्हा भेट झाली. माणूस खूपच बोलका आणि विद्वान निघाला. बोलता बोलता त्यांनी असे सांगितले की ते, पूर्वी पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात पंडे म्हणून कार्यरत होते. साहजिकच गीतेचा विषय निघाला. मीही मला येणारे एक दोन श्लोक म्हणून दाखवले. त्यांनी मात्र एका नव्याच चालीत गीतेचा भावार्थ आम्हाला समजावून सांगितला.

ते श्लोक त्यांच्याच आवाजात खालील प्रकाशचित्रणात आढळून येतील.



दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्तिते ॥ ७-१४

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२

ह्या मूळ गीतेतील श्लोकांचा अर्थ, मराठीतील गीताईतील श्लोकांनी सहजच स्पष्ट होऊ शकेल.

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा ।
कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ॥ ७-१४

कृष्णा मी पाहतो सारी विपरीत चि लक्षणे ।
कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ॥ १-३१

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे ।
राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि ॥ १-३२

गीता देशभरात पाठ केली जाते. मात्र गीतेचे पाठ म्हणण्याचे विविध प्रकार विस्मयकारक आहेत. दक्षिण भारतीय प्रकार बहुतेकांना माहीतच असतो. हा मात्र पहिल्यांदाच त्या वेळी ऐकला होता!

आशा आहे की तुम्हालाही आवडेल.

1 टिप्पणी:

नरेंद्र गोळे म्हणाले...

मूळ गीता वचनांत, वरील लिखाणात अनवधानाने झालेल्या चुकीची दुरूस्ती केल्याखातर लेखक, श्री. धनंजय नानिवडेकर ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद देत आहे!