२०१३-०७-०८

ठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ

"ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट" असे लांबलचक नाव बाळगणारे नाटक प्रत्यक्षात चांगले आहे. पाहायलाच हवे असे आहे.

१. मुलगी घरातच विकली जाते.
२. प्रणयाराधनात केवळ मुलीकडेच पाहणारा, हळूहळू कुटुंबातील तिच्या उपयुक्ततेचा विचार करतो.
३. मुली पाहतांना, “जाड वाटते” असे अभिप्राय तुंदिलतनू युवकही देत असतात.
४. स्वतःचा निर्णय स्वतःच्या विचारांनी घेणार्‍या युवतीही, निराशेच्या काळात अंधश्रद्धेस शरण जातात.
५. नोकरी करणार्‍या स्त्रियाही, स्त्रीने मुळी घराबाहेरच पडू नये असा विचार बाळगत असतात.
६. माणसाच्या योजनेपलीकडे ईश्वरी सत्ताही असते! असे मानणार्‍या स्त्रिया ह्याही युगात खूप असतात.

ह्या आणि असल्याच ठसठशीत वास्तवांवरचे परखड भाष्य म्हणजे ’ठष्ठ’. नव्या पिढीला वास्तवाचे भान आणून देऊन, भवितव्याप्रती इष्टमार्गाचे दर्शन घडवणारे हे नाटक आहे. पाहायलाच हवे असे! मात्र, कडेवरील लहान मुलांपासून, तर शाळेतल्या मुलांनाही नाईलाजाने घेऊन येणार्‍या पालकांना सावधानीचा इशारा असा की, हे नाटक त्यांना विदारक वास्तवाचे अकालीच भान आणून देऊ शकेल!!

नाटकातील भाषा हल्लीच्या पिढीची रोखठोक भाषा आहे. ती ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. शहरी नवयुवतींपुढची आव्हाने ती व्यवस्थित प्रदर्शित करते. मात्र, अनेकदा ती नाटकी, भोंगळी वाटते. रोज-वापरातील वाटत नाही. तरीही सामाजिक कान-उघडणीसाठी आवश्यक वाटते.

समलैंगिक संबंध, धूम्रपान, मदिरासेवन, अश्लील भाषा ह्यांविषयीच्या संदर्भांचा वापर; समकालीन, सम-परिस्थित स्त्रियांच्या वापरात असतो त्याहून खूप जास्त आहे. नाटकातील पात्रे मात्र, हे एरव्ही अवघड वाटणारे संवाद, ताठ मानेने आणि स्पष्ट उच्चारांत व्यवस्थित मांडतात, तेव्हा कौतुकच वाटते. कित्येकदा नाटक समलैंगिक संबंध, धूम्रपान, मदिरासेवन, अश्लील भाषा ह्यांचे समर्थन करते आहे की काय असेही वाटते. नाटकातील वैचारिकदृष्ट्या स्वच्छ, स्पष्ट, रोखठोक आणि आदर्शवत्‌ वाटावी अशी मते, अर्वाच्य भाषा आणि सवयींचा आदर्शही प्रेक्षकांसमोर ठेवते आहे असे वाटत राहते. सिगरेट-दारू आणि लैंगिक भाषा ह्यांचा वापर कमी केला असता तर कदाचित नाटक आजच्या युगातील ’उद्याचा संसार’ही ठरू शकले असते. मात्र आहे त्या परिवेषातील नाटकही कमी प्रभावी नाही. प्रेक्षकावर अंतिमतः सत्प्रभावाची छाप सोडणारे ते एक दमदार नाटक आहे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी नक्कीच संपन्न होईल.

मराठीतील लावणीची “फड सांभाळ तुर्‍याला ...”, “बुगडी माझी सांडली...” इत्यादींनी केलेली परिभाषा, “वाजले की बारा ...”, “अप्सरा आली....” इत्यादी नटरंगी लावण्यांनी पुन्हा नव्याने लिहीली. तशीच ’उद्याचा संसार’ ची नवी परिभाषा ह्या आणि अशाच अलीकडील नाटकांनी लिहीली आहे असाच माझा समज आहे.

कोण म्हणतो मराठी नाट्यसृष्टी जिवंत नाही? सळसळती नाही?

२ टिप्पण्या:

samidha v. ( pushpanjali karve ) म्हणाले...

khupach parkhad shabdat thatsht natkachi samiksha mandali aahe...! aani tarihi te natak pahayalach have he nakkich manavar thasavile aahe...! lata narvekar yanchya sntheche mage "charchoughi" he suddha ashyach udyachya sansaratil sankalpana mandanaare natak hote...! tyala barech varshe jhali pan tyatil lagna sansthelil anek sankalpana pratyakshat yet aahet... samaj maanya hot aahet... tyatilch ek "live in elationship" hi sankalpana mul dharat aahe...! tasach thatsht natakacha vishay dhadasi nasala tari ekunach aajachya muliche lagna evhadhech kay mulache lagna ya varil anek samasyavar bhashya karanara tharu shakato...!

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद समिधा!