२०१३-०५-२२

मूकं करोति वाचालं



पीटीआय, काठमांडु
Published: Wednesday, May 22, 2013
आठ हजार ८४८ मीटर उंचीवर यशस्वी चढाई

काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा हिने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे.

टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या  इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुणिमा मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८ हजार ८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला.

या मोहिमेवर निघण्याआधी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अरुणिमा हिने सांगितले की, मी रुग्णालयात असताना प्रत्येकाला माझी काळजी वाटत होती. मात्र माझ्याकडे दयेने बघू नये यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार माझ्या मनात घर करून होता. त्यामुळे जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेबद्दल माहिती मिळवली, तेव्हा माझा भाऊ आणि प्रशिक्षकांना सांगितले. त्यांनीही मला प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले.

गेल्या वर्षी उत्तरकाशी येथील शिबिरात अरुणिमा, टाटा स्टील  ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी जोडली गेली. तिथे, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले होते. गेल्या वर्षी ६ हजार ६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. मात्र एव्हरेस्ट सर करण्याची तिची इच्छा होती.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम्‌ ॥

 ज्यामुळे मुखर हो मूक, चढे पंगू शिखरावरी ।
ज्याचिया प्रसादे घडते हे, वंदू मोदद श्रीहरी ॥

-----------------------------------------------------------------------------------------------------------

रोज खिन्न करणार्‍या वृत्तांनी भरलेल्या वृत्तपत्रांत आज अत्यंत उत्साहजनक वृत्त दिसून आले. अरुणिमा सिन्हाने सागरमाथा शिखरास गवसणी घातली.

लहान-सहान अपयशांनी, अपघातांनी, निराशाजनक वृत्तांनी हताश होणार्‍यांना उमेदीचे नवे आकाश दाखवणार्‍या अरुणिमास, मानाचा मुजरा! तिच्या दैदिप्यमान यशाने लाखो निराश मनांना उज्ज्वल भविष्याचे वेध लागोत हीच प्रार्थना!!

संदर्भः लोकसत्ता २०१३-०५-२२

२ टिप्पण्या:

KattaOnline Marathi Blog म्हणाले...

खरंच कौतुकास्पद आहे. वाचून एका प्रसिद्ध शायरीची आठवण झाली…

खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले
खुदा बंदेसे खुद पुछे, बता तेरी रजा क्या है!

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद!