20130308

महिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी

अणू अविभाज्य ठरला तरीही तो, विजक (इलेक्ट्रॉन), धनक (प्रोटॉन) आणि विरक्तक (न्युट्रॉन्स) अशा कणांनी मिळून घडत असतो हे आपल्याला माहीतच असते. मात्र जेव्हा विश्वकिरणांचा म्हणजे अवकाशातून पृथ्वीवर येणार्‍या वस्तुमानधारी किरणांचा अभ्यास केला गेला तेव्हा अण्वंतर्गत इतर कणांचाही शोध लागत गेला.

इथे हे नमूद करावे लागेल की विख्यात अणुवैज्ञानिक डॉ.होमी भाभांनीही विश्वकिरण वर्षावांचा अभ्यास केलेला होता. गरम हवेच्या फुग्यांतून आकाशात उंचावर जाऊन त्यांनी हा अभ्यास केला. कारण विश्वकिरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशताच, असे कण, आपली ऊर्जा गमावत जात. भूपृष्ठावर उतरता उतरता ते वातावरणास ऊर्जा वाटत गेल्यामुळे, अतिशय क्षीण होत जाऊन, कित्येकदा आपल्याला माहीत असलेल्या विजक, धनक आणि विरक्तक ह्या कणांत रुपांतरित होत असत. त्यामुळे विश्वकिरणांत नवीन कणच नाहीत असे भासे. म्हणून उंच पर्वतांवर, उंच हवेत, विमानांतून विश्वकिरणांचा अभ्यास केल्यास नवीन प्रकारचे कण आढळून येतील असा कयास वैज्ञानिकांनी केला होता. अभ्यासांनी तो खराही ठरवला.

त्या कणांपैकी जे सशक्त बलांनी बांधलेले असत त्यांना सशक्त-कण (हैड्रॉन) आणि जे अशक्त बलांनी बांधलेले असत त्यांना अशक्त-कण (लेप्टॉन) अशा प्रकारे वर्गीकृत करण्यात आले. एक कल्पना अशी मांडण्यात आली की, अशा मोठ्या आकाराच्या सशक्त-कणांना भरपूर ऊर्जा देऊन परस्परांवर आदळवल्यास कदाचित अतिशय भव्य आकाराचा मोठा कण प्राप्त होईल, ज्यापासून हे सगळे कण, आणि म्हणूनच हे विश्व निर्माण झालेले आहे. अशा भव्य कणाचे भाकीत अनेकांनी केलेले होते. तो कण, एका कादंबरीकाराच्या अभिव्यक्तीमुळे गॉड पार्टिकल किंवा ईश्वरी कण म्हणून विख्यात झाला. अशा कणाच्या शोधार्थ मग, जिनिव्हामध्ये एका प्रयोगाची निर्मिती करण्यात आली. त्याचे नाव भव्य-सशक्त-कण-टक्कर (लार्ज-हैड्रॉन-कोलायडर) प्रयोग असे ठेवले गेले. अनेक देश ह्या प्रयोगांत सहभागी झाले. भारतानेही त्यात सहभाग घेतला.

भारतातर्फे अनेक संस्थांतील अनेक तज्ञांची ह्या प्रयोगात काम करण्यासाठी निवड करण्यात आली. भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ वैज्ञानिक अनुपमा पद्माकर कुलकर्णी यांचीही अशाच एका चमूत निवड करण्यात आली होती. आज डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या वतीने, जागतिक महिला दिनानिमित्त, डोंबिवलीतील सुयोग सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, त्यांचा सन्मान केला जात आहे.

साप्ताहिक सकाळच्या, २४-०९-२०११ च्या अंकात, यंग अचिव्हर्स सदरात करून देण्यात आलेली त्यांची ओळख त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उभा करेल [१]. त्यानंतर ०९-०७-२०१२ रोजी श्री.सुधीर मुतालिक ह्यांनी ए ग्रेट कराडिअन म्हणून करून दिलेली त्यांची ओळखही बोलकी आहे[२]. टाईम्स.कंटेंट संकेस्थळावरील वृत्ताने प्रकाशचित्राद्वारे ही माहिती परिपूर्ण होते [३].

मुळात वैज्ञानिक म्हटले की त्यांना समाजात मान मिळायला हवा. पण तशी आपल्या समाजाची धारणा नाही. त्यात स्त्री-वैज्ञानिक तर अप्रसिद्धीच्या रुक्ष वाळवंटातच कायम काम करत असतात. टीव्ही-सिनेमातील कलाकारांइतकाही सन्मान आपला समाज त्यांना देत नाही. अशा परिस्थितीत ह्या निमित्ताने का होईना पण कर्तबगार स्त्री शास्त्रज्ञाचे कौतुक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आपला समाज त्यांना एरव्हीच्या दैनंदिन जीवनातही योग्य तो मान-सन्मान देईल, तोच दिवस खर्‍या आनंदाचा मानता येईल.

माझ्याकरता मात्र, ही घटनाही अधिक आनंदाचीच आहे. कारण, अनुपमा माझी विद्यार्थीनी आहे! सातत्याने, चिकाटीने आणि अथक परिश्रमाने, पुरूषी वर्चस्वातून मार्ग काढत, अनुपमाने समाजमनात आज मानाचे स्थान मिळवले आहे. तिची कहाणी उदयोन्मुख स्त्री शास्त्रज्ञांना प्रेरणादायी ठरो हीच सदिच्छा.

अनुपमाकष्टसातत्य आणि निदिध्यास यांचे बळावर खूप काही साध्य करता येते, याचे तू उत्तम उदाहरण आहेस! तुझे काम जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्या कामाने मी प्रभावित आहे. पुरूषांनाही अवघड वाटावे अशा परिस्थितींतून तू निर्भयपणे आणि धडाडीने काम केलेले आहेस. तुझ्या सहकार्‍यांनाही तुझ्याबद्दल जो आदर वाटतोत्यातून तुझ्या कर्तृत्वाची झलक पाहायला मिळते. भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करण्याची संधी तुला मिळो हीच प्रार्थना! मला विश्वास वाटतोकी त्या संधीचे तू सोने करशील.


संदर्भ

१.      साप्ताहिक सकाळच्या यंग अचिव्हर्स सदरात करून देण्यात आलेली अनुपमा कुलकर्णी यांची ओळख http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20110924/4892827376573750178.htm
२.      श्री.सुधीर मुतालिक ह्यांच्या अनुदिनीवर अनुपमा कुलकर्णी यांच्या गौरवपर लिहिलेला लेख
३.     अनुपमा कुलकर्णी  यांबाबतचे वृत्त http://www.timescontent.com/syndication-photos/reprint/news/298277/dr-anupama-kulkarni.html

6 comments:

aativas said...

'वाचल्याने आनंद झाला' या प्रकारातली ही बातमी. आमच्यापर्यंत तो पोचवल्याबद्दल आभार.

ऊर्जस्वल said...

धन्यवाद सविताजी!

खरे तर ह्याच अनुषंगाने आपलेही कौतुक करायला हवे आहे. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

mannab said...

प्रिय नरेंद्रजी,
डॉ . अनुपमा कुलकर्णी यांचा परिचय उत्साहवर्धक वाटला . आभार . समविचारी मित्रांना अग्रेषित करत आहे.
मंगेश

आशा जोगळेकर said...

Jevadh kautuk karaw tevadh thodach aahe. Stree vaidnyanike vishayee sarth abhiman watatoy. Dhanyawad hee batami shar kelya baddal.

Ninad Kulkarni said...

वाचल्याने आनंद वाटला

ऊर्जस्वल said...

धन्यवाद निनाद! असेच वाचत राहा. प्रतिसाद देत राहा. तुम्हाला तुमच्या सर्वच सदुपक्रमांकरता हार्दिक शुभेच्छा.