२०१२-१०-०२

ऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिश्चला विजये

आज गांधी जयंती. बरोब्बर अठ्ठावीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ च्या महात्मा गांधी जयंतीस लिहिलेल्या, प्रो.मॅक्स मुल्लर ह्यांच्या चरित्राच्या [१] प्रस्तावनेत विख्यात संस्कृत विद्वान श्रीधर भास्कर वर्णेकर, लिहितात की, भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रभावामुळे प्राचीन काळात येथील जनतेच्या शील-चारित्र्याचा स्तर किती उंचावला होता, त्याबाबतचे काही परदेशी विद्वानांचे उद्‍गार मोठे स्फूर्तीप्रद आहेत. त्याकरता त्यांनी पुढील दाखले दिलेले आहेत.

१.      इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातील ग्रीक इतिहासकार एरियन म्हणतात, असत्य भाष्य करणारा भारतीय कोणीही कोठेही पाहिला नसेल.

२.      स्ट्रेबो नावाचा दुसरा इतिहास लेखक म्हणतो, भारतीय लोक इतके चारित्र्यसंपन्न आहेत की, ते घराला कुलूप लावत नाहीत. त्यांच्या आर्थिक व्यवहारात लिखापढी नसते.

३.      चीनचा प्रसिद्ध प्रवासी पंडित ह्यू-फू-त्सु (युवान च्वांग किंवा ह्यु-एन-त्संग म्हणून प्रसिद्ध असलेला) म्हणतो, सत्यनिष्ठा आणि निष्कपटीपणा याबाबतीत भारतीय लोक सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या राजकीय व्यवहारात हेच गुणवैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवते. ते अन्यायाने द्रव्याचा अपहार करीत नाहीत.

४.      तेराव्या शतकात भारतामध्ये आलेला सयामचा प्रतिनिधी सुवे म्हणतो, हिंदु लोक अत्यंत सरळ, विश्वासपात्र, सत्यनिष्ठ आणि न्यायप्रवण आहेत. ते शपथ कधीही मोडत नाहीत. दुष्टपणा आणि फसवेगिरी यांचा लेशमात्र त्यांच्या ठिकाणी नाही.

५.      याच सुमारास भारतात आलेला मार्को पोलो हा आपल्या प्रवासवृत्तांतात म्हणतो, ब्राम्हण लोकांसारखे सत्यनिष्ठ, विश्वासपात्र लोक जगात कोठेही नाहीत. लाभासाठी आणि लोभापायी ते कधीही खोटेपणा करीत नाहीत.

६.      प्राचीन काळातील सुसंस्कृत हिंदु समाजाच्या चारित्र्याचे असे महिम्नस्तोत्र अबुल-फाजल-कमालुद्दिन समरकंदी, मिल, स्लीमन इत्यादी अनेक परदेशी विद्वानांनी आणि प्रवाशांनी परोपरीने गायिलेले आहे.

७.      प्रसिद्ध संस्कृत विद्वान मॅक्स मुल्लर म्हणतात, विद्येच्या क्षेत्रात असा एकही विभाग नाही की ज्यामध्ये भारतीयांनी नवचैतन्य आणि नवतेज निर्माण केलेले नाही. संस्कृत वाङमयाच्या प्रकाशाने जगातील सर्व धर्म व सर्व पुराणकथा यांना एक आगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. .... मानवाच्या इतिहासामध्ये वेदवाङमयाने जे कल्याणकार्य केले आहे ते इतर कोणत्याही ग्रंथाने केलेले नाही. ... ज्या कोणाला आपल्या बुद्धीचा विकास व्हावा असे वाटत असेल त्याने वेदाभ्यास अवश्य करावा.

८.      डॉक्टर हसलर या अमेरिकन पंडिताने महाभारत प्रथमच वाचले तेव्हा त्याच्या लोकोत्तर वैशिष्ट्याने मोहित होऊन त्याने लिहिले, असा लोकोत्तर ग्रंथ मी कोठेही पाहिला नाही. याच्या वाचनाने माझे हृदय जसे मोहित झाले तसे इतर कोणत्याही ग्रंथाच्या वाचनाने कधी झाले नाही. आत्मचिंतनासाठी मी ग्रंथातील हजारापेक्षा अधिक सूक्तरत्ने गोळा करून ठेवलेली आहेत. ... जगताच्या उत्पत्तीविषयी या ग्रंथात प्रतिपादन केलेले सिद्धांत वाचून या ग्रंथाविषयीचा माझा आदर वृद्धिंगत झाला.

स्वतः रामाने रामायणात लक्ष्मणाजवळ आपल्या मातृभूमीविषयी पुढील जगप्रसिद्ध उद्गार काढलेले आहेत.  अपि स्वर्णमयि लंका न मे लक्ष्मण रोचते ।  जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ॥ म्हणजे जरी सुवर्णमय असली, तरी मला लंका आवडत नाही. जन्मदात्री, मात्रुभू स्वर्गाहूनही महान वाटते.

मग आपण खरे आहोत तरी कसे, आपला देश आहे तरी कसा? त्याचे वर्णन पुढील संस्कृत काव्यात यथातथ्यपणे केलेले आहे. [२]

शूरा वयं धीरा वयं वीरा वयं सुतराम्‌।
गुणशालिनो बलशालिनो नयगामिनो नितराम्‌ ॥ ध्रु ॥
दृढमानसा गतलालसा प्रियसाहसा सततम्‌ ।
जनसेवका अतिभावुका शुभचिन्तका नियतम्‌ ॥ १ ॥
धनकामना सुखवासना न च वन्चना हृदये ।
ऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिश्चला विजये ॥ २ ॥
गतभीतयो धृतनीतयो दृढशक्तयो निखिलाः ।
यामो वयं समराङ्गणं विजयार्थिनो बाला ॥ ३ ॥
जगदीश हे परमेश हे सकलेश हे भगवन्‌ ।
जयमङ्गलं परमोज्ज्वलं नो देहि हे भगवन्‌ ॥ ४ ॥
आपण कसे आहोत? कसे असावे, ह्या सत्प्रेरणेचा, आदर्शवत्‌ उद्‌घोष ह्या कवितेत केलेला आहे. आपण आपल्या आदर्शवत्‌ सनातन समाजजीवनास पुन्हा साकार करू या! त्याकरता ही कविता नक्कीच प्रेरणादायक ठरेल. खालील दुव्यावर श्राव्य आवृत्तीही अधोभारणास (डाऊनलोड करण्यास) उपलब्ध आहे. अवश्य ऐका आणि आपल्या आदिम आकांक्षांचा पुनरुच्चार करा!

संदर्भः

१.      भारतीय मनाचा माणूस: प्रो. मॅक्स मुल्लर, तारा पंडित, नवचैतन्य प्रकाशन, प्रथमावृत्ती जुलै २०००, मूल्यः रु.१५०/- फक्त.

५ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

कोणे एके काळी समाजात 'सगळेच' लोक चांगले होते असे म्हणणे जरा काल्पनिक वाटते. पण चांगल्याला प्रतिष्ठा होती तेव्हा - आजच्यासारखी चुकीच्या मूल्यांना डोक्यावर बसवून ठेवलेले नव्हते त्या काळच्या समाजाने - असं फार तर म्हणता येईल.

"शूरा वयं..." ही माझी आवडती कविता (गाणं?)आहे .. खूप दिवसांनी वाचायला मिळाली ..पाठ होती, विसरले होते .. आता संदर्भ राहील इथं तिचा!

नरेंद्र गोळे म्हणाले...

पृथ्वीतलावर इतर देशांत जी प्रचलित मूल्ये होती त्याचे मानाने आपल्या देशातील मूल्ये नक्कीच सरस असावीत असा अर्थ बाहेरील प्रवाशांच्या वर्णनांतून ध्वनित होतो.

हल्ली मात्र, जे प्रवासी भारतदर्शनास येत आहेत ते एवढे चांगले अभिप्राय लिहू शकतील अशी अवस्था नाही. तशी ती पुन्हा प्राप्त व्हावी ह्याकरता आपण सारेच समाजात मूल्यप्रस्थापनेचे काम करू शकतो. करावे. त्याकरता प्रेरित व्हावे हीच तर इच्छा आहे!

Naniwadekar म्हणाले...

> स्वतः रामाने रामायणात लक्ष्मणाजवळ आपल्या मातृभूमीविषयी पुढील जगप्रसिद्ध उद्गार काढलेले आहेत. अपि स्वर्णमयि लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
>---

या वचनाविषयी तज्ज्ञांमधे बरीच चर्चा झालेली आहे / अज़ूनही होते. माझ्या माहितीनुसार रामायणाच्या 'अधिकृत' प्रतीमधे हे वचन अन्तर्भूत नाही. (कुठली प्रत अधिकृत मानल्या ज़ाते, हे मी विसरलो आहे.) ते प्रक्षिप्त आहे, तस्मात् रामाशी त्याचा संबंध नाही, असा सल्ला मी वाचलेला आहे. त्याऐवजी 'नभि नक्षत्रे --- (परि मज़) आईची झोपडी प्यारी' हे सावरकर-वचन उपलब्ध आहेच.

जननी जन्मभूमिश्च जाह्-नवी च जनार्दनः।
(जाह्-नवी = जाह्नवी)
जनकः पंचमश्चैव जकाराः पञ्च दुर्लभाः॥
या सुभाषितातला पहिला चरण रामाच्या नांवावर ठोकून देण्यात आलेला आहे.

- नानिवडेकर

Naniwadekar म्हणाले...

> वन्चना --- समराङ्गणं
-----

यांतला अर्धा-न् वापरून लिहिलेला 'वन्चना' शब्द चूक आहे, हे सांगणे न लगे. 'समराङ्गणं' सारखे शब्द अङ्-गण असे हलन्त सानुनासिक वापरून लिहायचा माझा अट्टाहास अक्षरमाला software वापरून छान भागवता येत असे, पण इतर वेळां मी वापरत असलेली प्रणाली ज़े करेल ते स्वीकारावे लागते आहे, किंवा अङ्-गण सारखा विचित्र पर्याय वापरावा लागतो. आणि 'अक्षरमाला' linux वर उपलब्ध नाही.

संस्कृत-भारती संघटनेचे अनेक कार्यकर्ते अशा विषयांची गूगल-microsoft मधल्या लोकांशी चर्चा करून त्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्धा ह (प्रह्लाद / प्रह्-लाद सारख्या शब्दांतला) windows-7 वर वेगळा आणि जास्त चांगला दिसतो, हा माझ्या लक्षात आलेला अलिकडचा स्वागतार्ह बदल.

Naniwadekar म्हणाले...

> विख्यात संस्कृत विद्वान श्रीधर भास्कर वर्णेकर
>
या निमित्तानी रा स्व संघाच्या शाखांत म्हटले ज़ाणारे (केशव: संघनिर्माता - हेडगेवार-वंशज:, वगैरे मज़कूर असलेले) प्रात:-स्मरण लिहिणा-या वर्णेकरांविषयीच्या एक-दोन आठवणी इथे नोन्दवायला हरकत नसावी. त्यांना एकदा एक पुरस्कार मिळाला. मानपत्रांत 'एस बी वर्णेकर' यांच्या कार्याचा गौरव केल्या ज़ात आहे, वगैरे माहिती होती. वर्णेकरांनी 'मराठी मानपत्रांत मला इंग्रजी आद्याक्षरे चालणार नाहीत' म्हणून मानपत्र परत केले आणि 'श्री भा वर्णेकर' असा नांवात बदल करून मानपत्र परत तयार करा आणि मग मला द्या, असा सल्लाही दिला. ती मागणी पूर्ण करण्यावाचून संयोजकांना पर्यायच नव्हता.

एका उद्दाम वाहनचालकामुळे १०-१२ वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातांत वर्णेकर गेले. सध्या वर्णेकरांचे चिरंजीव नागपूरांत संस्कृत-प्रचाराचं काम करताहेत.

पी व्ही नरसिंह राव पन्तप्रधान झाल्यावर श्री भां नी नागपूरच्या तरूण भारत वर्तमानपत्रांत पत्र लिहून त्यांचा उल्लेख 'पा वें नरसिंह राव' असा करावा अशी सूचना केली होती.

- डी एन् (वर्णेकरांनी क्षमा करावी)