२०१२-०९-१२

उत्तराखंडाची सहल भाग-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे?

प्रस्तावना

वाढत्या व्यस्ततेमुळे आणि मध्यमवर्गाच्या वाढत्या सधनतेमुळे पर्यटनाकरता पर्यटक-संस्थांची मदत घेणे अपरिहार्य ठरू लागलेले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय शहरवासियांत, त्यामुळेच मार्गदर्शित सहली लोकप्रिय होत आहेत. अशा सहलींचे स्वरूप, त्यामधे असलेली पर्यटकाची बाजू, पर्यटक-संस्थांची बाजू आणि पर्यटन स्थळातील पर्यटन-व्यावसायिकांची बाजू यांच्या प्रस्थापित समतोलाचे सिंहावलोकन करण्याचा हा प्रयास आहे. ह्याच तिन्ही पक्षांच्या परस्पर सहयोगातून आजच्या देशांतर्गत पर्यटन-प्रणालीचा विकास झालेला आहे. अशा ह्या पर्यटन-प्रणालीकडून, पर्यटकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याबाबतची ही निरीक्षणे आहेत. ह्या निरीक्षणांचा देशांतर्गत, भावी मार्गदर्शित-पर्यटनावर यथोचित परिणाम व्हावा आणि ते उत्तरोत्तर पर्यटकानुकूल, पर्यटकाभिमुख होत जावे हाच उद्देश आहे. ह्याचा उपयोग पर्यटक, पर्यटन-संस्था आणि पर्यटन स्थळांतील पर्यटन-व्यावसायिक ह्या तिन्ही संबंधित पक्षांना होऊ शकेल.

विख्यात पर्यटक संस्था

राजा-राणी ट्रॅव्हल्स, केसरी ट्रॅव्हल्स, सचिन ट्रॅव्हल्स, आकांक्षा ट्रॅव्हल्स, भाग्यश्री ट्रॅव्हल्स, चितारी ट्रॅव्हल्स, चौधरी यात्रा कंपनी इत्यादी अनेक विख्यात पर्यटक संस्था आज कार्यरत आहेत. प्रत्येक संस्थेचा पर्यटनविषयक दीर्घ अनुभव आणि अभ्यास आहे. त्या परस्परांत आर्थिक स्पर्धा आहे. पर्यटन संबंधित मानव-संसाधने विकसित करण्याच्या, त्यांच्या प्रशिक्षणाच्या आणि अध्ययन-अध्यापनाच्या सोयीही त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्याच फलस्वरूप, आज भारतातील अग्रगण्य सहलस्थानांवर पर्यटन करण्याच्या सोयी, शहरांतील पर्यटकांस सहजपणे उपलब्ध आहेत. अगदीच कमी वेळ पर्यटनाच्या नियोजनाकरता देऊनही, वर्षाकाठी आठ-दहा दिवस, देशांतर्गत कुठल्याही पर्यटनस्थळी आज आनंदाने सहल संपन्न करता येत आहे.

पर्यटनाच्या नियोजनाची गरज

पर्यटन करण्यास आपल्या घरातील किती आणि कोणत्या व्यक्ती तयार आहेत? त्यांना सोयीचे दिवस कोणते असणार आहेत? ज्या स्थळी पर्यटन करावयाचे त्याची निवड, ह्या उपलब्ध दिवसांवर अवलंबून असते. वर्षातून आपल्याला उपलब्ध असलेल्या दिवसांत पर्यटनास अनुकूल असणारे ऋतुमान कोण-कोणत्या जागी उपलब्ध असते? तिथे जाण्या-येण्याकरता ज्या प्रवासी मार्गाची निवड करायची असते त्यानुसार नियोजन करावे लागते. हल्ली रेल्वेचे आरक्षण चार-चार महिने आधीच होत असल्याने, हे नियोजनही किमान तितकेच आधी करावे लागते. या सार्‍यांचा विचार करूनच पर्यटन-संस्था आपापल्या जाहिरातीही, त्यापूर्वीच प्रकाशित करत असतात.

१. पर्यटन स्थळी आणि प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहावे,
२. विविध पर्यटक सुविधा मिळवण्याबाबत आपली फसवणूक होऊ नये,
३. पर्यटनास उपलब्ध असलेल्या आपल्या सर्व वेळाचा यथोचित उपयोग होऊन पर्यटनकर्त्या सर्व सदस्यांस अधिकाधिक आनंद प्राप्त व्हावा,
४. पर्यटनादरम्यान खान-पानाच्या अव्यवस्थेपोटी पर्यटक आजारी पडून रसभंग होऊ नये,
५. पर्यटनस्थळापर्यंतचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, त्यात दोन-दोन तासांच्या अंतराने खानपानसेवा मिळत राहाव्यात, प्रसाधन सुविधा मिळत राहाव्यात, मन उल्हसित राहावे; इत्यादी अपेक्षा मनात असतातच.

पर्यटन नियोजनादरम्यानच, ह्या सार्‍यांबाबतच्या आपल्या माहितीची अपूर्णता जाणवू लागते. त्यासाठी आवश्यक त्या संपर्कांची उणीव भासू लागते. आरक्षणे हव्या त्या दिवशी, हव्या त्या तपशीलाने मिळवण्यातील आपली असमर्थता लक्षात येऊ लागते. म्हणून मग पर्यटक, पर्यटक-संस्थांचा आधार घेण्यास प्रवृत्त होतात.

पर्यटक-संस्थांचे प्रस्ताव

पर्यटक-संस्था आपापल्या संभाव्य पर्यटकांच्या अशा गरजा लक्षात घेऊन मार्गदर्शित सहलींचे आपापले प्रस्ताव तयार करतात. हल्ली, आठ ते दहा दिवसांच्या सहलीस लोक सहजी तयार होतात. कारण कमी दिवसांच्या सहलींत जाण्या-येण्यात जास्त वेळ जाऊन, सहलीचा आनंद फारसा पदरात पडू शकत नाही. तर दुसर्‍या बाजूस जास्त दिवस प्रवास करण्यास वेळच उपलब्ध नसतो, शिवाय आठ-दहा दिवसांनंतरचे पर्यटन, यथावकाश त्यातील नाविन्य सरत जाऊन कंटाळवाणे होऊ लागते. पर्यटक-संस्था, पर्यटन-स्थळीच्या-व्यावसायिकांशी चर्चा करून आपापली गणिते सोडवतात. प्रवासात वापरल्या जाणार्‍या बसचा प्रवास, बस-मालकास लाभकारक व्हावा, अतिथीगृहचालकास पर्यटक सोयीचा ठरावा आणि पर्यटन-संस्थेस सज्जड लाभ पदरात पडावा, ह्यादृष्टीने तडजोडी करून प्रस्ताव तयार केले जातात. ते प्रस्ताव पर्यटकांस कसे लाभदायक आहेत हे दाखवून देणार्‍या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. प्रत्यक्षात वरील सर्व प्रकारचे नियोजन करण्यास असमर्थ असल्यानेच पर्यटक अशा पर्यटन-संस्थेप्रत पोहोचलेला असतो. त्याला फारसे पर्याय उपलब्ध नसतात.

ज्यांना नियोजनास खूप वेळ उपलब्ध असतो, खूप माहिती ज्यांनी मिळवलेली असते आणि ज्यांना स्वबळावर सहल यशस्वी करण्याची उमेद असते; ते इतरांस सोबत घेऊन असे पर्यटन यशस्वी करूनही दाखवतात. पुढे तेही पर्यटन-संस्था काढतात किंवा तिच्यात सहभागी होतात अशीही उदाहरणे आहेत.

पर्यटक संस्थांच्या प्रस्तावांतील अपरिहार्य तडजोडी

अशा प्रस्तावांत पर्यटकास काय हवे आहे त्याचा विचार, प्रस्तावास विक्रियोग्य करण्यापुरताच सीमित राहतो. पर्यटकही उपलब्ध प्रस्तावांचाच विचार करून, व त्यांच्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित, त्यातील एकाची निवड करून पर्यटन करत असतो. माझ्या पाहण्यात अशा प्रवासांत काही अपरिहार्य तडजोडी अनुस्यूत असतात. त्यांचीच चर्चा इथे करायची आहे.

१. पर्यटकास भारतीय शौचकूप हवा असतोः पर्यटक भारतीय असतो. त्यास, अपवाद-वगळता भारतीय शौचकूप हवा असतो. भारतीय रेल्वे तीनास एक ह्या प्रमाणात भारतीय शौचकूप उपलब्ध करून देत असते. असे असूनही अपवाद-वगळता सर्व पर्यटन-संस्था विदेशी कमोड असणारी अतिथीगृहेच उपलब्ध करून देत असतात. ह्याबाबत कुठलाही पर्यटक, कुठल्याही पर्यटक-संस्थेकडे, कोणतीही तक्रार, कधीही करत नाही. ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

२. पर्यटकांस दोघांकरताच्या खोलीत दोन स्वतंत्र पलंग हवे असतातः मधुचंद्रास जाणार्‍यांचा अपवाद करता सर्व पर्यटकांस दोघांकरताच्या खोलीत, दोन स्वतंत्र पलंग हवे असतात. मात्र अशा खोल्यांत जोडलेले पलंग किंवा दोघांकरता एकच विशाल मंचक आणि जोडलेले किंवा एकच विशाल पांघरूण पदरी पडते व त्याचीच ओढाताण रात्रभर करत राहावे लागते. ह्याबाबत कुठलाही पर्यटक, कुठल्याही पर्यटक-संस्थेकडे, कोणतीही तक्रार, कधीही करत नाही. ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

३. दोघांच्या खोलीतील अतिरिक्त तिसर्‍यास पलंग हवा असतोः बहुधा अशा तिसर्‍यास जमिनीवर पसरण्याकरता गादी आणून दिली जाते. त्या गादीच्या संचातीलही अपूर्णतांबाबतच्या तक्रारी करण्यात असे पर्यटक आपला अमूल्य वेळ अनेकदा गमावत असतातच. तरीही ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

४. कडक पलंगावर, पातळ कापसाची आरामदायक गादी हवी असतेः नेहमी मिळणार्‍या गाद्यांत अशी गादी क्वचितच आढळून येते. भारतीय ऋतुमानात जाड-जाड, कृत्रिम गाद्या सुखाची झोप घेऊ देत नाहीत. हे अतिथीगृहाच्या मालकांना कोण सांगणार?

५. खोली ताब्यात देतेवेळी पुरेसे पिण्याचे पाणी पिण्यायोग्य अवस्थेत उपलब्ध हवे असतेः पाणी भरण्याचे भांडे रिकामे असते, शिळेच पाणी बाळगत असते, त्यालाच वास येत असतो, ते माग-मागून मिळवावे लागते. तरीही ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. वस्तुतः प्रत्येक खोलीत जल-शुद्धीकरण-यंत्र बसवून व विल्हेवाटीस योग्य कागदी पेले पुरवून हा प्रश्न सोडवला जाऊ शकेल. ह्या कारणांमुळेच काही पर्यटक संस्थांनी पर्यटकांना प्रत्येकास दरदिवशी खनिज-जल-बाटल्या पुरवणे सुरू केलेले आहे. हा पर्यायही परस्परांस सोयीचा आहे. मात्र ह्यामुळे अप्रत्यास्थ पदार्थाचा (प्लॅस्टिकचा) अनिर्बंध प्रसार होण्याचा वाढता धोका आहे.

६. भ्रमणध्वनी आणि प्रकाशचित्रकांच्या विजेर्‍यांच्या ऊर्जा-पुनर्भरणार्थ सोयी हव्या असतातः अनेक अतिथीगृहांतून अशा सोयी उपलब्ध नसतात व म्हणूनच मग विमानतळांवर-रेल्वेत भ्रमणध्वनी टांगून पर्यटकांना बसावे लागते. ही तडजोडही अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. याकरता कोणी प्रस्ताव नाकारल्याचे ऐकिवात नाही.

७. पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य असणारे स्थळ कार्यक्रमपत्रिकेत हवेच असतेः उदाहरणार्थ अबूला गेल्यावर गुरूशिखर करायचे नाही, हे पर्यटकास रुचणारे नसतेच. पर्यटन-संस्था ते कार्यक्रमपत्रिकेत का ठेवत नाहीत, हा त्यांच्या, इतर-पर्यटन-व्यावसायिकांशी न पटलेल्या गणिताचा भाग असतो. ही तडजोडही अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. मात्र पर्यटक मग स्वतःच स्थानिक जुळवाजुळव करून हवे ते साधण्याचा प्रयत्न करतो. कधी यशस्वी होतो. तर कधी उगाच राहतो. मात्र केवळ ह्या कारणाने प्रस्ताव नाकारू शकत नाही.

८. पर्यटनस्थळी विख्यात असलेल्या स्थळाकरता पर्याय हवा असतोः उदाहरणार्थ अजमेरला दर्ग्यास भेट देण्याची इच्छा नसलेल्यास, पुष्करला भेट देण्याचा पर्याय हवा वाटत असतो. प्रस्तावात मात्र अशा पर्यायांचा विचार कधीच केला जात नाही. नवीन धरणे, उद्द्याने, ऊर्जा-संयंत्रे व अन्य विकासकामांच्या स्थळांचा असे पर्याय म्हणून जाणीवपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. प्रस्तावाची कार्यक्रम-पत्रिका जितकी अधिक लवचिक करता येईल तितकी ती पर्यटक-धार्जिणी होईल. मात्र हे पर्यटक-संस्थांनी का करावे? अशी आजची स्थिती आहे!

९. खरेदीसाठी नियोजित स्थळास पर्याय हवा असतोः प्रत्येक प्रस्तावात खरेदीसाठी नियोजित स्थळ असते, स्थानिक पोषाखात प्रकाशचित्रणाकरता नियोजित स्थळ असते, तसेच सूर्योदय-सूर्यास्त दर्शनाकरताही नियोजित स्थळ असते. सारेच पर्यटक अशा स्थळांचे चाहते नसतात. काहींना इतर काही पर्याय हवा वाटत असतो. मात्र तो उपलब्ध नसतो. अशा स्थळांना देखण्या उद्यानांचा, स्थानिक नाटक-चित्रपट-नृत्य-गायन-वादन-लोककला इत्यादी कला-कौशल्याच्या कार्यक्रमांचा सशक्त पर्याय उपलब्ध असायला हवा. ह्याचा विचार प्रामुख्याने स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी जाणीवपूर्वक करायला हवा आहे.

१०. कालौघात अति-व्यावसायिकीकरण झालेल्या किंवा वातावरणानुरूप दर्शनीयता ठरणार्‍या स्थळांना नवे पर्याय शोधायला हवे असतातः केम्टी फॉल ह्या स्थळाचे अति-व्यावसायिकीकरण झालेले आहे. मसूरीस जाऊनही केम्टी फॉल नको वाटणार्‍यांकरता सशक्त पर्याय शोधायला हवा आहे. मसूरीस अनेकदा धूसर हवामानामुळे गन-हिल-पॉईंट दर्शनीय राहत नाही. दार्जिलिंगला कांचनजंगाही अनेकदा धूसर हवामानामुळे दर्शनीय राहत नाही. अशावेळी त्यांचेकरता सशक्त पर्याय (उदा. पुष्पप्रदर्शन, निवडुंगांची लागवड इत्यादी) शोधायला हवा आहे.

पर्यटक ह्या अपरिहार्य तडजोडींसकट प्रस्ताव स्वीकारतात आणि मिळेल तो आनंद साजरा करून घेतात. मात्र असे प्रस्ताव तयार करतांना पर्यटन-संस्था प्रवासी-वाहन-धारकांकडून आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांकडूनही उप-प्रस्ताव मागवत असतात. हे उप-प्रस्ताव पर्यटकांना कळत नाहीत. मात्र पार्श्वभूमीत हे व्यवहार सुरूच असतात. सहलीचे सारे अर्थकारण, बहुतकरून अशा प्रस्तावांवरच आधारलेले असते. ते प्रस्ताव आणि त्यांखातर पर्यटकांना कराव्या लागणार्‍या तडजोडी आता आपण पाहू या.

प्रवासी-वाहन-धारकांचे उपप्रस्ताव आणि त्याबाबत पर्यटकास कराव्या लागणार्‍या तडजोडी

कुठल्याही वाहनधारकास, दिवसाला अमूक एक अंतर प्रवास केल्याविना वाहन, लाभकारक ठरत नसते. म्हणून दिवसागणिक वाहन-प्रवास वाढविण्याकडे त्याचा कल असतो. वस्तुतः हा कल पर्यटकाच्या हिताच्या कायमच विरोधात असतो. मात्र, वाहनधारक पर्यटक-संस्थेशी देव-घेव करून असे प्रश्न मार्गी लावत असतो. पर्यटक-संस्थेनी पर्यटकाचे हितरक्षण करावे अशी या व्यवहारात पर्यटकाची अपेक्षा असते. मात्र “प्रस्ताव” विक्रियोग्य ठरेल इतपतच पर्यटन-संस्था, पर्यटक हिताचे रक्षण करतात. ही तडजोड पर्यटकास नाइलाजाने स्वीकारावीच लागते. कधीकधी केवळ ह्या कारणानेच पर्यटक-संस्थेचा प्रस्ताव नाकारण्याची पाळी पर्यटकावर येत असते. रस्त्यावरील वाहनातून सलग दोन तासांहून, रुळांवरून २४ तासांहून आणि विमानातूनही शक्य तोवर दोन तासांहून सलग देशांतर्गत प्रवास करू नये. तरच तो सुखकर होत असतो. त्याकरता सुयोग्य थांबे घेण्याची आणि तेथे प्रसाधनाची, विश्रांती घेण्याची किंवा राहण्याची योग्य सोय करायला हवी असते. पर्यटन-संस्था अशा सोयींची बर्‍यापैकी नीट काळजी घेतात असे दिसते.

शिवाय वाहनप्रवासारंभाच्या वेळा सोयीस्कर असाव्यात. विशेषतः सकाळी सहाची विमाने कधीच सोयीस्कर ठरत नाहीत. ती निवडल्यास पर्यटनाची सुरूवातच जागरण आणि थकव्याने होते. कोकण प्रवासाकरता पहाटे ५ ला प्रवास सुरू करण्याचे अनेकदा सुचवले जाते. वाहन-व्यावसायिकाचे दृष्टीने हे कदाचित सोयीचे असूही शकेल मात्र पर्यटकास ते नेहमीच तणावग्रस्त करत असते. पर्यटकाने आदर्शतः सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यानच संयमित प्रवास केल्यास तो अधिक सुखकर ठरू शकतो. अशा उप-प्रस्तावांतील धोके, ताबडतोब लक्षात न आल्याने किंवा नाइलाजाने पत्करल्यामुळे पर्यटन सुखकर न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तुमच्याही पाहण्यात असतील.

स्थानिक अतिथीगृहचालकांचे उपप्रस्ताव आणि त्याबाबत पर्यटकास कराव्या लागणार्‍या तडजोडी

स्थानिक अतिथीगृहचालक, अनेकदा खानपानासहितचे उप-प्रस्ताव देत असतात. अनेकदा ते विमानतळा/रेल्वेस्थानका पासून/पर्यंत च्या प्रवास सुविधाही पुरवण्याचे उप-प्रस्ताव देत असतात. अशा उप-प्रस्तावांमुळे पर्यटन-संस्थाही प्रभावित होत असतात. अशा सुविधा पर्यटक अनेकदा वापरूच शकत नाहीत. तरीही त्यांचा भुर्दंड पर्यटकांना सोसावाच लागत असतो. उदाहरणार्थ कलकत्याहून सिक्कीमला नेल्या जाणार्‍या सहली, मुंबई-कलकता-न्यू-जलपैगुडी रेल्वे-प्रवासास अनुकूल योजिल्या जातात. वेळ आणि कष्ट वाचवण्याकरता प्रवासी, मुंबईहून विमानाने कलकत्त्यास येणे पसंत करतात. त्यांना स्वखर्चाने अतिथीगृहाप्रत पोहोचावे लागते.

पर्यटकाने पर्यटक-संस्थेवर असलेल्या विश्वासापोटी मूळ प्रस्ताव पत्करलेला असल्याने, स्थानिक अतिथीगृहचालकास पर्याय शोधणे त्याला सोयीचे वाटत नाही. अशा वेळी पर्यटकाचे वतीने पर्यटक-संस्थेने समस्येवर उपाय शोधावा अशी अपेक्षा असते. मात्र पर्यटक संस्थेस त्याची गरज वाटत नाही. कारण त्यांचा मूळ प्रस्ताव आता विकला गेलेला असतो.

पर्यटनस्थळी जीवित आणि सामानाची सुरक्षितता व फसवणूक न होण्याची हमी, ह्या दोन गोष्टी जर पर्यटन-संस्था, पर्यटकास, स्थानिक-पर्यटन-व्यावसायिकांचे मदतीने मिळवून देऊ शकत असेल तर त्याचे उचित मूल्य देण्यास खरे पर्यटक केव्हाही तयारच असतात. तसा पुढाकार त्यांनी घ्यावा अशीच पर्यटकांची अपेक्षा असते.

मायबोली डॉट कॉम वरील प्रकाशनाचे दुवे

उत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी
उत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी
उत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती
उत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा
उत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी
उत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी
उत्तराखंडाची सहल भाग-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे?
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: