२०१२-०९-११

उत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी

नैनिताल सरोवर, नैनादेवी मंदिर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत प्राणिसंग्रहालय, रज्जूमार्गाने वर जाऊन दुर्बिणीतून दूरदर्शन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे नैनिताल गावात आहेत. सारीच स्थळे उत्तम आणि जरूर पाहावीत अशी आहेत. सरोवरातील वल्ह्याच्या नौकेतून मारलेला सुमारे तासभराचा फेरफटका तर अविस्मरणीय. आम्ही सर्वच गोष्टीत खूप रस घेतला. प्राणीसंग्रहालय तर आम्हाला बेहद्द आवडले. तिथून बाहेर पडल्यावर आमच्या बसमधील सर्व मुलांनी, मग पोलिसचौकीसमोर एका ओळीत उभे राहून पिपाण्या फुंकत आपला आनंद व्यक्त केला.



दुसरे दिवशी रानीखेतच्या कुमाऊँ रेजिमेंटचे लष्करी वस्तुसंग्रहालय पाहिले. इथे फारसे लक्षात राहावे असे काही नाही. तिसरे दिवशी नौकुचियाताल, भीमताल हे तलाव बघितले. तरीही नैनिताल पाहिल्यावर मग त्यांच्यात फारसे पाहण्यासारखे काही खास उरत नाही. चवथे दिवशी आम्ही कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य पाहणार होतो. सकाळी नास्ता करून निघाल्यावर जेवायला आम्ही कॉर्बेट जंगलानजीकच्या लि-रॉय हॉटेलात पोहोचलो. हे हॉटेल मात्र दिल्लीच्या त्यांच्या भावंडापेक्षा एकदमच निराळे आहे. सुंदर, स्वच्छ, प्रशस्त आणि सुव्यवस्थित आहे. आम्हाला आवडले. जेवण झाल्यावर सुमारे तास दीड तास प्रथम बसने आणि मग जिप्सीतून प्रवास करून आम्ही प्रत्यक्ष जंगलाच्या दारात जाऊन पोहोचलो होतो. त्यावरून हे हॉटेल जंगलापासून खूपच दूर असावे असे दिसते.

प्रवेशद्वाराशी कुठल्या जिप्सीसोबत कुठल्या मार्गदर्शकाने जावे ह्यावरून सुमारे अर्धा तास मोडल्यावर आमच्या लक्षात आले की आमचे टूर-लीडर्स गायब आहेत. मोबाईलवरही अनरीचेबल आहेत. केवळ दोन तासच मिळण्यासारखे असतांना अशा प्रकारचा वेळाचा र्‍हास होतांना वाईट वाटत होते. सगळ्यांनीच निकराने प्रयास केल्यावर, वन-अधिकार्‍याचे मार्गदर्शकाशी असलेले गणित पटून आम्ही निघायला तयार झालो.

आमच्या दुर्दैवाने त्याच दिवशी राजस्थानहून नैनितालला आलेले प्रचंड धुळीचे वादळ त्याच सुमारास जंगलात अवतीर्ण झाले. सकाळपासूनच ढग ढग होते. आकाश अंधारलेले होते. अधून मधून धूळ उडत होती. आता मात्र कधीही पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले. धुळीने आकाश भरून गेले. कॅमेरे बंद करावे असे वाटू लागले. मात्र महत्प्रयासाने जिप्सी, मार्गदर्शक, चालक अशी सगळी जय्यत तयारी झाल्यावर परत फिरण्याचा प्रश्नच नव्हता. जंगलात दिसेल काय हे मात्र अनिश्चित होते. तरीही आम्हाला फारसे खाली उतरू न देता, किरकोळ माहिती देत त्यांनी भरभर पुढे चालवले. जंगलाच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या वनखात्याच्या कँटीनजवळ नेऊन उभे केले. पर्यटकांना खाद्य-पदार्थ-चहा यांत रांगा लावाव्या लागून त्यात अर्धा तास लोप पावला. मग परततांनाही घाई घाई, फारसे न थांबता त्यांनी प्रवेशद्वाराजवळ पावते केले. क्रमप्राप्त वातावरणात ह्याहून अधिक काही पदरी पडणार नाही अशी पर्यटकांची खात्री पटवल्यावर आम्हाला मुक्कामी परत आणले.

तरीही मला हे जंगल आवडले. त्याच्या वाटेवर दुतर्फा आंबा, लिची इत्यादींच्या बागा होत्या. जंगलात टिटवी, तांबट, मोर, शेखरू तसेच एक स्वर्गीय पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी कावळ्याहून किंचित लहान, रंगाने शुभ्र पांढरी असलेली लांबलचक (सुमारे दोन फूट) शेपटी कम पिसे असलेले होते. उडले तेव्हा शेपट्या पतंगाच्या शेपटीसारख्या सळसळत जात असतांना दिसल्या अगदी अद्भूत दृश्य. असेही क्षण बघता आले म्हणूनच आम्हाला पर्यटनाचे सव्यापसव्य सार्थकी लागले असे वाटले. त्यांचे फोटो मात्र कुणालाच काढता आले नाहीत. एकतर त्यांच्या अत्यंत चपळ आणि अवखळ हालचाली, दुसरे म्हणजे धुळीचे वादळ सुरू असलेले आणि तिसरे म्हणजे जिप्सीवाल्यांना आधीच सुमारे तास वाया गेल्याने भरभर फेरी संपवण्याची असलेली घाई, ह्यामुळे चालत्या जिप्सीतून जे केवळ नेत्रच पाहू शकतात ते कॅमेरे कसे टिपू शकतील. असो. केवळ पावसाळ्यात वाहणर्‍या नद्यांना तिथे बरसाती म्हणतात. अशाच एका कोरड्या ठक्क पडलेल्या बरसातीत आम्हाला मोर दिसला. मग शेखरांची एक जोडी झपाट्याने पळतांना दिसली. कॅमेरा रोखताच येईना. जिप्सीने पाठलाग करत आम्ही मागे मागे जात होतो. ती जोडी मग एका खूप उंच झाडावर चढली. वर जातांना कॅमेरा रोखला, तेव्हा खाली येतांना केवळ शेपटी पकडता आली.

माकडे आणि हरणे बरीच दिसली. निष्पर्ण झालेली मात्र फळांनी लगडलेली खूप बेलफळाची झाडे दिसली. जंगलभर इथे तिथे बेलफळे पडलेली दिसत होती. आम्ही सोबतही बरीच उचलून घेतली.

दुसरे दिवशी सकाळी हॉटेल सोडतांना, समोरच्याच जंगलात अकल्पितपणे कोल्हा दिसला. आजूबाजूच्या परिसरात इतका मिसळून गेलेला होता की दिसला नाही दिसला हे नक्की होईपर्यंत तो नाहीसाही झालेला होता. माझ्या तर केवळ एकाच फोटोत कोल्हा ओळखू येतो आहे. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी ऋषीकेश दर्शन केले. तिथे मंदिरे तर पाहिलीच पण लक्षात राहिला तो लक्ष्मण-झुला. सालोसाल इमाने इतबारे सेवा देणारा, जनावरांमुळे अवघडून बंद होणारा पूल.



इथे उल्लेखनीय हे आहे की १९३० मध्ये जेव्हा शिवप्रसाद तुल्शान बहादूर ह्यांनी आपल्या वडिलांनी म्हणजेच राय सूरजमल झुनझुनवाला यांनी बांधलेल्या आणि १९२४ सालच्या मोठ्या पुरात वाहून गेलेल्या पुलाचा जीर्णोद्धार करत असता, हा सध्याचा पूल बांधला आणि त्यावर लिहीले,

“ह्या पुलावर कधीही पथकर आकारण्यात येणार नाही!”

हा होता, जनतेचा पैसा कसा निस्वार्थपणे वापरावा, ह्याचा आदर्श दाखला.

त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही मसूरीला पोहोचलो. मॉलरोडवर फिरायला गेलो असता तिथे, केंब्रिज- बुक-स्टॉलमध्ये दर शुक्रवारी विख्यात लेखक रस्किन बाँड बसतात आणि विकत घेतलेल्या आपल्या पुस्तकावर स्वाक्षरी करून देतात अशी पाटी पाहिली. लगेचच आमच्या बसमधली मुले तिथे गेली. आदित्यने “डस्ट ऑन द माऊंटन” हे पुस्तक घेतले आणि त्यावर रस्किन साहेबांनी स्वाक्षरी केली.



मसुरीला दुसरे दिवशी स्थलदर्शन होते. केम्प्टी फॉल बघितला. गोंडोल्यातून मजेदार प्रवास केला. मात्र तिथली मुंबईला लाजवेल अशी शरीरास शरीर भिडवणारी गर्दी पाहून मग मुंबईच बरी वाटू लागली. निदान शिस्तीची तरी आहे.

संध्याकाळी रज्जूमार्गावरून टेकडीवरचा प्रवास होता. अगदी व्ह्यू-पॉईंट म्हटला तरी तिथून काहीच दिसण्यासारखे नव्हते कारण हवाच धूसर होती. मात्र वरती जणू जत्राच भरलेली होती. तिचाही आम्ही भरपूर लाभ घेतला. गरम-गरम वाफाळते मोमो खाल्ले. खालच्या चित्रात दिसत आहेत मोमो आणि बालमिठाई.



आता बालमिठाईची गोष्ट सांगावीच लागणार. एका मंदिरात आमची भेट मराठी बोलणार्‍या तिथल्याच एका नुकतेच लग्न झालेल्या मुलीशी झाली. त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. तिचा नवरा तिथलाच रहिवासी होता. ती मात्र होती नवी मुंबईची. त्यामुळे आम्हाला मराठी बोलतांना पाहून तिला माहेरचेच कुणी आलेत असे क्षणभर वाटले. बोलता बोलता मग असे कळले की तिथली प्रसिद्ध मिठाई, “बाल-मिठाई” म्हणून ओळखली जाते. मग त्या बुक-स्टॉलपाशीच एका दुकानात ती मिळालीही. पेढ्याचा ऐवज चॉकलेटी होईस्तोवर परतायचा, मग त्यावर बारके हलवे जडवून तयार होते “बाल-मिठाई”. आम्हाला ती आवडली.

परततांना संध्याकाळ झाली होती. रात्र पडू लागली. मॉलरोडवरून हळूहळू परत येत असता थंडी जाणवू लागली. मुंबईसारखेच तापमान असलेली मसुरी मग खर्‍या अर्थाने मसुरी वाटू लागली. थोड्या वेळाने तर, स्वेटर घेऊन निघणार्‍यांना हसणारे आम्ही, आता अक्षरशः कुडकुडू लागलो होतो. उन्हाळ्यातल्या संध्याकाळची मॉलरोडवर फिरण्याची गंमत, तिथे जाऊनच अनुभवावी अशी आहे. उद्या आम्ही हरिद्वारला निघणार होतो.

सकाळी आम्ही खिडकी उघडली आणि मग वाटू लागले की, अरे वा, असली खिडकी असली तर कितीही दिवस इथे आरामात मौज करता येईल. तीच ही खिडकी. ब्रेंटवूड हॉटेलची.



उशीला टेकून बसून तर पाहा, खाली काय दिसतेय ते! दूरवर खोलात पसरलेली दून व्हॅली. सकाळी उठताच आम्ही पाहिले की दाराशी “पिठ्ठू” जमा झालेले. पिठ्ठू म्हणजे पाठीवरून प्रवाशांचे सामान वाहून नेणारे हमाल. आमचे हॉटेल मॉलरोडवर. तिथे बस येण्यास मनाई. मग दूरवरून सामानाची ने-आण करतात हे पिठ्ठू. ६०-७० किलोचे वजन पाठीवर लादून सतत चढ-उतार आणि नाग-मोडी वळणांनी जाणारा रस्ता, ते रिकाम्या चाललेल्या प्रवाशांहूनही वेगाने पार करत होते. तिथला आवडलेला आणखी एक प्रकार म्हणजे कुल्हडीतला चहा. कदाचित चहातले पाणी मातीत शोषले जाऊन निव्वळ घट्ट चहा त्यामुळेच चांगला लागत असावा.



मग आम्ही हरिद्वारला गेलो. दुपारचे जेवायलाच खरे तर आम्ही तिथे होतो. जेवण झाल्यावर केवळ एकच कार्यक्रम पत्रिकेवर होता. संध्याकाळी सात वाजताच्या गंगा-आरतीचा. मग आमच्यापैकी अनेक लोक स्वतःचे स्वतःच मनसादेवी मंदिरात जाऊन आले. आम्हाला टूर-लीडर्सनी, जाल तर परत यायला उशीर होईल, इत्यादी कारणे देऊन परावृत्त केले. प्रत्यक्ष गंगा-आरतीला जाऊन आल्यावर मग आम्हालाही जाणवले, आम्ही काय गमावले होते ते. गंगेचा घाट अलौकिक आहे. तिथल्या पाण्याचा वेग संस्मरणीय आहे. तिथे पाहण्यासारखे इतके काही आहे की आम्ही वस्तुतः जेवण झाल्यावर तडक इकडे निघून यायला हवे होते अशी खात्री पटली.



रोज संध्याकाळी सात वाजता हर की पौडी वर गंगा मंदिर आहे. तिथे आरती होत असते. भारतभरातून हजारो-लाखो लोक रोज तिथे जमतात. सगळे बहुधा नवे असतात. तरीही शिस्त, भक्तीभाव आणि देशप्रेम ह्या गोष्टींनी प्रेरित होत्साता, गंगेवरील प्रत्येक यात्रेकरू तिथे उत्साहाने, उमेदीने आलेला असतो. लाजलज्जा न बाळगता स्त्री-पुरूष सहजपणे तिथे कोणत्याही वेळी स्नान करत असतात. आईला लेकरू भेटते तेव्हा कधीही भेटले तरी प्रेमाचे भरते येतेच. तसेच आम्ही सारे गंगेची लेकरे आहोत. हिंदू आणि मुस्लिम, ब्राम्हण आणि शुद्र, देशी आणि परदेशी, हवशे-नवशे-गवशे सगळेच ह्या सोहळ्याचे साक्षी असतात. हा सोहळा न चुकता रोज साजरा होतो. पाऊस असो, ऊन असो, कुडकुडती थंडी असो. न गंगेच्या प्रवाहास कधी खळ पडला आहे, न यात्रेकरूंच्या उत्साहास. शेकडो, हजारो वर्षे हे असेच चालत आलेले आहे. म्हणूनच तर लग्नाच्या मंगलाष्टकांत, एक असे आहे कीः

यावत्‌ वीचितरंगात वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया।
यावत्‌ आकाशमार्गे तपति दिनकरो भास्करो लोकपाल: ॥
यावत्‌ वज्रेंद्रनीलस्फटिकमणीशिला वर्तते मेरुश्रुंगे ।
तावत्‌ शंभोप्रसादात स्वजनपरिवृतौ जीविताम दंपति वै ॥

मात्र सगळे शुभंकर असले तरी काही गोष्टींचा सल मनातून जात नाही. गंगा-आरतीच्या फोटोंपैकी पहिल्या फोटोच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात वर्षानुवर्षे उभे असलेले प्लॅस्टरही न केलेले मंदिर मला सलते. तुम्हाला? मला वाटते ते तिथे नसावे. भारतातील प्रत्येकास गौरवान्वित करेल असे उत्तम काहीतरी तिथे ताबडतोब तयार व्हावे. त्या जागेची, त्या गंगेची, त्या घाटाची शान वाढवेल असे काहीतरी तिथे लगेचच व्हावे. वस्तुतः असे वाटणारा मी काही एकटा किंवा पहिला नाही. पण हे होऊ शकत नाही हीच आपली, भारताची खंत आहे.

दुसर्‍या दिवशी आम्ही दिल्लीला परतलो. जेवायला मेरठमधल्या मारवाडी भोजमध्ये आम्हाला नेले गेले. तिथे मात्र जेवण “मारवाडी” कसे असू शकते ते आम्हाला अनुभवायला मिळाले. ह्या हॉटेलात आधीच प्रचंड गर्दी झालेली होती. त्यात आम्ही दोन बसचे सुमारे पन्नास प्रवासी उतरलो. प्रत्येकास बसायला जागा मिळेपर्यंत सुमारे अर्धा तास गेला. बसायला जागाही मुंबईत दादरमध्ये खुर्चीच्या पाठीमागे उभे राहून मिळवावी लागते तशी मिळवावी लागली. तेव्हा पुन्हा वाटले मुंबईच बरी. निदान शिस्त तरी असते. मग वेटरच्या हातातून ताटे ओढून घेण्यापर्यंत पाळी आली. एव्हाना सुरवातीस जेऊ लागलेले बाहेरही पडू लागले होते. रिकाम्या ताटांतून पंधरा पंधरा मिनिटे कुणी वाढायला येईना. कारण क्षमतेपेक्षा ग्राहक किमान दुप्पट तरी झालेले होते. आमच्या बसमधील अनेकांनी जमतील ते उपाय करून, मिळेल ते खाऊन घेतले. काहींनी तर केवळ आईस्क्रीम चटकन मिळण्यासारखे होते म्हणून तेच खाऊन जेवण संपवले. वेळ निघून चाललेली होती. बसही सुटली नाही तर आमचीच गाडी चुकणार होती. काही जणांची विमानांचीही तिकिटे होती. म्हणून इतर कुठलाही विचार न करता प्रवासी बसमध्ये जाऊन बसले. सहल संपन्न झाली.

परतल्यावर “मारवाडी भोज” हॉटेल आणि सचिन ट्रॅव्हल्स ह्यांना ई-मेलने सारा वृत्तांत कळवून ह्याहून चांगल्या व्यवस्थापनाची अपेक्षा व्यक्त केली. त्याला उत्तर देण्याचे सोडाच, पण पोचही देण्याचे सौजन्य दोघांनीही दाखवले नाही. त्यामुळे मी “पर्यटन व्यवसायाने आम्हाला काय द्यावे, आमच्या काय अपेक्षा आहेत” ह्याबाबत एक सविस्तर लेखच लिहिला. तो आहे ह्या मालिकेचा शेवटला म्हणजे सातवा भाग. तळाशी मी “मारवाडी भोज”ला लिहिलेल्या पत्राचा मसुदा आहे. केवळ माहितीकरता.

संदर्भः

१. स्वर्गीय पक्षी http://animals.nationalgeographic.com/animals/birds/bird-of-paradise/
२. बाल-मिठाई http://www.merapahadforum.com/culture-of-uttarakhand/bal-mithai-(-)-famous-delicious-sweet-of-uttarakand/
३. धुळीचे वादळ http://www.amarujala.com/city/badaun/Badaun-41936-119.html

Recently we had a very frustrating experience at “Marwadi Bhoj, Meerut”. We reached your place around 1200 hrs on 21-05-2012 on way to Delhi. Dinning hall was jam packed. Crowd was pouring in. Rush was beyond manageable. No body attended to us. After several reminders by our Tour Leaders, thalis were put before us after half an hour. Follow-up services were still invisible. Tourists were running after waiters. One Mr.Goyal was trying to pacify customers. Some of us were offered ice-creams to pacify. We had to leave without completing our lunch and make our arrangement elsewhere. We could not avail the services we had already paid for. This was highly embarrassing. Why do you accept more customers than your capacity? This has left us un-satisfied and dis-pleased. The financial and vital-time loss is simply beyond compensation. I recommend Sachin Travels to discontinue being your customer.
.

२ टिप्पण्या:

Yeshwant Karnik म्हणाले...

श्री. नरेंद्र गोळे यांना,
आपल्या ’उत्तराखंडाची सहल’ चा सहावा भाग वाचला. आपण अत्यंत सुंदर शब्दांत सहलीचे वर्णन केले आहे. १९७२-७७ या काळात मी गोव्याच्या राज्यपालांचा स्टाफ ऑफिसर म्हणून अनेक वेळा डेहराडूनला गेलो होतो (राज्यपाल एस.के.बॅनर्जी यांच्या आई तिथे राहत असत व पुढे त्यांचा धाकटा मुलगा डून स्कूल मध्ये शिकू लागला), त्यावेळी हरद्वार आणि हषिकेश पाहायला मिळाले पण निवांतपणे नाही. वनश्री पाहून मन प्रसन्न झाले पण सर्व ठिकाणी स्वच्छतेचा अभाव जाणवला. असो. तीर्थांच्या ठिकाणी असे होतेच. फार सुंदर लेख वाचल्याचे समाधान मिळाले. आपले अभिनंदन.
यशवंत कर्णिक.
karnikyeshwant@gmail.com

awdhooot म्हणाले...

Very good. Expecting more detailed description sir.