20120402

निजेला लॅपटॉप६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही. आम्हाला डेक्कन एक्सप्रेस अशी रिकामी पाहण्याची खरे तर सवयच नव्हती. डब्यात इतस्ततः काही माणसे बसलेली होती. गाडी काय रिक्कामी आहे. भरपूर झोपायला जागा. असे म्हणतोय... तेवढ्यात जरा मागे वळून पाहिले तर एक तरुण मुलगा चक्क लॅपटॉप उशाला घेऊन निवांत झोपलेला. दृश्य पाहायला जरा अभूतपूर्व आणि विस्मयकारकच होते.

गाडीने लोणावळा पार केले. तेव्हा मुलगा लॅपटॉप उघडून काम करतांना दिसला. म्हणजे लॅपटॉप नादुरुस्त नव्हता. दिखाव्याचा नव्हता. त्या आकाराचा रिकामा डबा नव्हता. तर खराखुरा, कामाचा लॅपटॉप होता. मुलगा त्यावर काम करतांना दिसत होता. मग डोक्याखाली का बरे घेतला असावा? डोक्याखाली घेण्याचे दोन फायदे मग माझ्या लक्षात आले. एक म्हणजे झोप लागली असतांना लॅपटॉप चोरीला जाण्याची भीती नाही. आणि दुसरा म्हणजे गाडी रिकामी असली तरी उशाला काय हो? म्हणून तोच कामी आला. मला कदाचित लॅपटॉपला काही होईल. किमान तो बिघडेल अशी भीती तरी वाटली असती. तो मात्र झोपलेला असतांना निर्घोर होता. खरे तर निवांत घोरत होता.

डोक्यात विचारचक्र सुरू झाले. पूर्वी प्रवासात भूक नाही तरी शिदोरी असावी म्हणून शिदोरी बांधून घेत आणि वाट चालता चालता जर थकवा आला तर एखाद्या झाडाखाली विश्रांतीला आडवे होत. म्हणूनच “भुकेला कोंडा, आणि निजेला धोंडा” अशी म्हणही तयार झाली. पुढे एक टोपीविक्या टोप्यांचे गाठोडे डोक्याखाली घेऊन झोपलेला असतांना, गुपचुप त्याच्या गाठोड्यातील टोप्या माकडांनी पळवल्याचेही त्याच्या लक्षात आलेले होते. म्हणजे डोक्याखाली घेतलेली वस्तू सुरक्षित राहतेच ह्याचीही काही खात्री देता येत नाही. मात्र सदरहू तरूणास तसली भीतीच नव्हती. एकतर गाडीत माकडे नव्हती आणि गुपचुप काढून घेता येतील असे सुटे भागही त्या लॅपटॉपला दिसत नव्हते.

बरे लॅपटॉपव्यतिरिक्त कुठले इतर सामानही त्याचेपाशी नव्हते. मला आश्चर्य वाटले. ऑफिस बॅग, शबनम, कपडे, किमान पाण्याची बाटली तरी असतेच की हो. मात्र त्याच्याजवळ तसले काहीच नव्हते. त्याच्याजवळ असलेली एकमेव वस्तू म्हणजे लॅपटॉप. तोच उशाला घेतल्यावर, निवांत विश्रांती. विश्रांती झाल्यावर त्यावरच पोहोचल्यानंतर करावयाच्या कामाची तयारी. काय सुटसुटीत जीवनशैली होती त्याची. मला त्याच्याबद्दल हळूहळू आदर वाटायला लागला. आम्हाला तळेगावला उतरायचे होते. तळेगाव आले. आम्ही उतरलो. तेव्हा तरी तो गंभीरपणे लॅपटॉपवर काहीतरी करतांना दिसत होता.

आता आम्ही बाहेर पडून आपल्या कामाला लागणार. तेव्हा त्याचा विचार मनातून काढून टाकायलाच हवा. जाता जाता एवढेच जाणवले की ’निजेला धोंडा’ पासून तर ’निजेला लॅपटॉप’ पर्यंत माणसाची प्रगती झालेली आहे, नाही का. कालाय तस्मै नमः!
.

No comments: