20110126

पुस्तक परिचय: पर्यटन सम्राट


पुस्तकः पर्यटन सम्राट

लेखकः डॉ.विजय ढवळे, कॅनडा
mnewby@rogers.com

प्रकाशकः नवचैतन्य प्रकाशन
प्रकाशनकाळः पहिली आवृत्तीः जुलै २०१०
पृष्ठेः २१२
बांधणीः कडक खर्ड्याची सुबक बांधणी
किंमतः रु.३५०/-फक्त



प्रस्तावनाः मनोहर जोशी, खासदार, माजी लोकसभा सभापती

ते म्हणतात, “पर्यटन सम्राट कै.राजाभाऊ पाटील यांची स्फूर्तीदायक जीवनगाथा” हे पुस्तक माझे मित्र डॉ.विजय ढवळे यांनी लिहिले आहे. अनेक वर्षे कॅनडात राहूनही त्यांनी, राजाभाऊंना त्यांच्या मृत्यूनंतरही पुन्हा प्रकाशझोतात आणले, ह्याचा आनंद मी कोणत्या शब्दांत सांगू?

मी आयुष्यात अनेक व्यवसाय केले. पण मनात असूनही पर्यटनाचा व्यवसाय करू शकलो नाही. तो राजाभाऊंनी केला. राजाभाऊंचे सुवाच्य अक्षर, स्वदेशाभिमान, शिस्त, वक्तशीरपणा, रंगवून गोष्टी सांगण्याचा छंद, ’लर्न टू ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल टू लर्न’ हे त्यांचे ब्रीदवाक्य, त्यांची गुणग्राहकता अशासारखे राजाभाऊंचे गुण ते यानिमित्ताने पुन्हा उजागर करतात.

’पुस्तकात महत्त्वाची असते ती प्रस्तावना’ असे ढवळे यांनीच राजाभाऊंच्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहून ठेवलेले आहे. प्रस्तावना वाचनीय वाटली तरच राजाभाऊंच्या वाचनाची गाडी पुढे सरकायची. या पुस्तकाची रसग्रहणात्मक प्रस्तावना सरांनी अतिशय रोचक लिहिलेली आहे.

ते म्हणतात, “राजाभाऊंना पुस्तकरूपाने श्रद्धांजली वाहणे आणि त्यांची जडण-घडण कशी झालेली असावी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणे या दोन उद्देशांनी” ढवळे यांनी हे पुस्तक लिहीले आहे. प्रमाणपत्रे देणे हा माझा व्यवसाय आहे. ढवळे यांचे हे दोन्हीही उद्देश सफल झाले आहेत असे मी प्रमाणपत्र देतो.

डॉ.विजय ढवळे यांचा मलपृष्ठावर दिलेला अल्प-परिचय

डॉ.विजय ढवळे हे गेली तीन तपे कॅनडामधे एक अत्यंत यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. कॅनडियन सरकारचे सर्वोच्च सन्मान दोन वेळा मिळवलेले ते एकमेव भारतीय आहेत. शिवाय त्यांना आँटेरिओ राज्यानेही गौरवले आहे. आजपर्यंत त्यांना ६८ पुरस्कार, प्रशस्तीपत्रके व मानपत्रे मिळालेली आहेत. उत्तर अमेरिकेतील मराठी भाषकांतील सर्वात उठून दिसणारे व्यक्तिमत्व अशा शब्दांत अमेरिकेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांचा जाहीर गौरव केलेला आहे. खाण-व्यवसायात त्यांनी प्रचंड गुंतवणुक केलेली आहे.

डॉ.ढवळे हे “साऊंडस ऑफ इंडिया” या टी.व्ही. कार्यक्रमाचे दहा वर्षे यजमानपद भूषवत होते. ते चांगले वक्ते आणि लेखकही आहेत. त्यांच्याकडे क्युबात तयार होणार्‍या कोडावरील प्रभावी औषधाचे वितरण हक्क असून त्यामुळे ९५ कोडग्रस्त रोगी पूर्णपणे बरे झालेले आहेत. डॉ.ढवळे यांचे चरित्र अशोक चिटणीसांनी “कर्मयोगी उद्योजक” या नावाने प्रसिद्ध केलेले आहे.

लातूरला भूकंप झाला, डॉ.ढवळे ह्यांनी २ कोटी रुपयांची मदत पाठवली. जानेवारी २००१ मध्ये भूजला भूकंप झाला, डॉ.ढवळे ह्यांनी ४४ कोटी रुपयांची मदत कॅनेडियन सरकारकडून मिळवून दिली. निरपेक्ष समाजकार्य करणार्‍या ९ संस्थांमध्ये ते नेहमी कार्यरत असतात. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर हे त्यांचे सूत्र आहे. दुसर्‍यांच्या गुणांचा गुणाकार व दोषांची वजाबाकी करण्याची त्यांची सवय आहे. त्यांचा स्वभाव विनोदी असल्याने ते कॅनडा व महाराष्ट्रात विख्यात आणि लोकप्रिय आहेत.

मनोगत

मनोगतात ढवळे लिहितात, “माझ्या मनात खंत होती, की स्वतः राजाभाऊ किती ग्रेट होते हे लोकांना कधी समजलेच नाही. त्यांच्यावर शिंतोडे उडवणारे, टीका करणारे भरपूर आहेत; पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ मूल्यमापन अजून झालेलेच नाही. मग मनात विचार आला की मीच ते काम का करू नये? मीच ते निःपक्षपातीपणे करू शकेन. कारण मी कॅनडात राहत असल्याने विरोधी प्रचारापासून अलिप्त होतो! राजा ट्रॅव्हल्सचे ९५% ग्राहक मराठी. म्हणून ते मराठीतून लिहिणे गरजेचे होते. मात्र राजा ट्रॅव्हल्सचे जगभर पसरलेले स्नेहसंबंध पाहता मला ते इंग्रजीतूनही प्रकाशित करणे आवश्यक वाटत होते.” सावरकरांच्या मार्सेलिस येथील ऐतिहासिक उडीला ८ जुलै २०१० रोजी १०० वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने राजाराणी ट्रॅव्हल्स तर्फे जो कार्यक्रम तिथे करण्यात येणार होता, त्यात पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरले. पुस्तकाची अर्पणपत्रिकाही त्यांचेच नावे केलेली आहे.

मुंबईस दिलेल्या दोन भेटी. प्रत्येकवेळी आठवडा आठवडा केलेले इथले वास्तव्य. ३५ जणांच्या प्रत्यक्ष घेतलेल्या मुलाखती आणि काही जणांशी फोनवर केलेल्या गप्पांच्या आधारे ढवळ्यांनी हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. त्यांचा रोजचा अत्यंत व्यस्त दिनक्रम पाहता या कामाकरता वेळ काढणे अवघड होते. तरीही, सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्याकरता किमान १०० तास मिळायला हवेत म्हणून सकाळी ४ ते ७ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळांत लिहून, ठरवल्याप्रमाणे तीन आठवड्यांत त्यांनी हे काम पूर्ण केले.

परिचय

लहानपण, मुलांच्या नजरेतील आप्पा, आठवणींचा खजिना, यादों की बारात, इतीश्री आणि उपसंहार अशा प्रकरणांमध्ये हे चरित्र विभागलेले आहे.

राजाभाऊंचा खून कसा झाला असावा याची कल्पना, उपलब्ध मुलाखतींच्या आधारे करून, ’इतीश्री’ हे प्रकरण त्यांनी सर्वात आधी लिहीले आहे. ऐतिहासिक घटना एकमुस्तपणे समजाव्यात यासाठी अशी मांडणी मला अत्यंत सोयीची वाटली.

अभिजीत, विश्वजीत आणि सत्यजीत ऊर्फ भरत यांच्या मुलाखतींवर आधारित आमचे आप्पा या शीर्षकाखाली लिहीलेली तीन प्रकरणे, राजाभाऊंची मुलांच्या मनातील तसेच समाजातील निखळ प्रतिमा उत्तम उभी करतात. इतर अनेकांच्या ’आठवणींचा खजिना’ नंतर उघडलेला आहे. त्यात अरूण मणेरीकर, रमेश वारगे, काही पर्यटक यांच्या आठवणी आहेत. १९८३ सालचा राजाराणी ट्रॅव्हल्सचा रौप्यमहोत्सवी सोहळा व राजाभाऊंचा राष्ट्रीय एकता सफरीचा गाजलेला उपक्रम यांबद्दलची सुरस आणि स्फूर्तीदायक वर्णने ही या पुस्तकाची मला आवडलेली उत्तम प्रकरणे आहेत. सोमनाथ समेळांनी शब्दांकित केलेल्या, “केल्याने देशाटन” या राजाभाऊंच्या आत्मचरित्राचाही उपयोग या पुस्तकाच्या लेखनात झाला असेही डॉ.ढवळेंनी लिहून ठेवलेले आहे.

जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि सुखाचा शोध घेण्याचा हक्क ही तीन तत्त्वे अमेरिकन घटनेच्या पहिल्याच कलमात नोंदवलेली आहेत. त्यानुसार तिथले लोक मनात जागणारी देशभक्ती प्रच्छन्नपणे अभिव्यक्त करण्याकरता सर्वत्र राष्ट्रध्वज खांद्यावर मिरवतात. त्याच धर्तीवर, १९७१ च्या युद्धानंतर पर्यटनाची आक्रमक जाहिरात करतांना राजाभाऊंनी राष्ट्रध्वजाचा वापर केला. म्हणून त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा वापर, धंदा वाढवण्याकरता केला या आरोपाखाली खटला चालला. कोर्टाने राजाभाऊंच्या राष्ट्रप्रेमाविषयी गौरवोद्गार काढले, मात्र कायदा आहे त्या स्थितीत पाळला जावा म्हणून त्यांना कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा दिली. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या मालकीच्या इमारतीवर तिरंगा फडकवण्यावरूनही असाच खटला झाला. राजाभाऊ तो जिंकले. त्यांना राजाराणी पर्यटनभवनावर तिरंगा फडकवण्याची अनुमती मिळाली. ती सर्वच कहाणी लेखकाने अत्यंत रोचकपणे सादर केलेली आहे.

यादोंकी बारातमधे पर्यटन व्यवसायात राजाभाऊंना आलेले संस्मरणीय अनुभव सुरसपणे गुंफलेले आहेत. फटकळ, संशयी आणि शिस्तीबाबत हट्टाग्रही स्वभावामुळे मुले, नातेवाईक आणि निष्ठावंत कर्मचारीही हळूहळू त्यांच्यापासून कसे दुरावत गेले त्याचे वर्णनही सुसंगतपणे केलेले आहे. मात्र त्यांच्या हत्येनंतर ज्या प्रेरणेने ते सर्व पुन्हा एकत्र येऊन, त्यांनी तो व्यवसाय पुन्हा प्रवाही केला त्याचेही वर्णन यथास्थित केले आहे. त्यांच्या गुणांबद्दलचा जनमानसातील आदर किती भक्कम होता हे अधोरेखित करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे केलेले वर्णन आणि तिची पुढे कशी वाट लागली त्याचेही वर्णन मुळातच वाचायला हवे.

पुन्हा यादोंकी बारात हे प्रकरण तर अगदी खास लिहिले आहे. पर्य़टन व्यवसायावर कुठला अभ्यासक्रम पुढे मागे कधी निर्माण झालाच तर, हे प्रकरण त्याकरता बायबल ठरेल. अमेरिका-युरोपात पर्यटन करायचे तर आपल्या परंपरागत सवयींना कशी मुरड घालणे अगत्याचे ठरते याचे प्रशिक्षणच ते पर्यटकांना देत असत. थॉमस कूक यांच्या ऑफिसात त्यांना, “आम्ही चोवीस तासात रिफंड देतो” अशी पाटी पाहायला मिळाली. प्रत्यक्षात त्यांना मोजून चोवीस मिनिटांत रिफंड मिळाला. या घटनेने राजाभाऊ खूपच प्रभावित झाले. आपल्याही ऑफिसात त्यांनी तशीच कार्यप्रणाली विकसित केली. हे सर्व वर्णन रसदार करावे तर डॉ.ढवळेंनीच.

पुस्तक परिचय फार लांबू नये, म्हणून आवरते घेतो. मात्र इतक्या गोष्टी ह्यात सांगण्यासारख्या आहेत की मोह आवरत नाही. तरीही, यामुळेच हे पुस्तक चरित्र न वाटता, पर्यटन व्यवसायाचा आढावा घेणारे एक स्वतंत्र पुस्तकच आहे असे वाटते. कसेही असले तरी वाचनीय. शेवटी ते डॉ.ढवळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेले ओघवते कथन आहे. कुठेच कंटाळवाणे होत नाही. सुरस वाटते.
.

20110120

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)
लेखक: शोभा बोंद्रे
प्रकाशक:मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
प्रकाशनकाल: पहिली आवृत्ती: ७ ऑगस्ट २०१०
पृष्ठे: २२७
किंमत: रु. २५०/-फक्त

इडली, ऑर्किड आणि मी, एक असतो बिल्डर, ही तो ’श्री’ची इच्छा व मुंबईचा अन्नदाता, या लोकप्रिय पुस्तकांचे शब्दांकन; ’लेगॉसचे दिवस’ हे आत्मकथन; आभाळमाया, अभिलाषा, ऊनपाऊस, अर्धांगिनी इत्यादी मालिकांचे संवादलेखन; याशिवाय कथा, कादंबरी इत्यादी विपुल साहित्याचे सृजन करणार्‍या शोभा बोंद्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले हे पुस्तक वाचनीय आहे. एकदा हातात धरल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही इतके ते सुरस झालेले आहे.

मुळात ज्या चार सत्यकथा सांगायला घेतलेल्या आहेत, त्या पूर्णतया सत्य स्वरूपात कथन करण्याचे धोरण अखेरपर्यंत अबाधित राखल्याने, लिखाणास तथ्यात्मक वैधता प्राप्त झालेली आहे. "गुजराथी माणूस व्यवसायात हमखास यशस्वी होतो. इथे परदेशातही. ह्याचे कारण काय? ते विशद करणार्‍या, शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा! " अशीच ह्या पुस्तकाची जाहिरात मलपृष्ठावर केलेली दिसून येते; आणि ती सार्थ आहे.

मोटेल्स म्हणजे अमेरिकेतील स्वस्त आणि मस्त अशी, हायवेच्या कडेला असलेली, राहण्याची सोय. शहरभागात वसवलेल्या हॉटेल्सपेक्षा यांचे दर तुलनेने कमी असतात. जेव्हापासून अमेरिकेतल्या मोटेल्सच्या व्यवसायात गुजराती लोक बहुसंख्येने शिरले, तेव्हापासून लोक मोटेल्सना पोटेल्स म्हणू लागले. कारण या गुजराती लोकांतील बहुतांश लोक ’पटेल’ असत. तेव्हा पटेल म्हटले की केवळ पोटेल्स. हा समज रुजू झाला.

मात्र, पटेल लोक आता त्याच्याही पलीकडे जाऊन इतर व्यवसायात आपले बस्तान बसवू लागलेले दिसून येतात. एवढेच नव्हे तर, त्या त्या नव्या व्यवसायांत दैदिप्यमान यशही मिळवून दाखवत आहेत. परक्या देशात, परक्या व्यवसायांत जिद्दीने आणि अपार कष्टाने आपली ओळख निर्माण करत आहेत. परदेशातील लोकप्रतिनिधी होऊन परदेशांतील नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरण्याची किमया करून दाखवत आहेत. हे अधोरेखित करण्याकरताच ह्या पुस्तकाचे नाव ठेवलेले आहे "नॉट ओन्ली पोटेल्स"; आणि तेही पूर्ण अर्थाने सार्थ ठरले आहे.

पुस्तकाचे मनोगत लिहितांना त्या म्हणतात, "अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसंबंधी काही माहिती आणि आकडेवारी प्रकाशित झालेली होती. त्यात म्हटले होते की, अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोटेल्स आणि हॉटेल्स एकत्रित धरून सुमारे त्रेपन्न हजार प्रॉपर्टीज येतात. त्यांपैकी ५०% हून अधिक प्रॉपर्टीज भारतीयांच्या आहेत. त्यातही बहुतांश गुजराती आणि त्यातील ९९% पटेल. या प्रॉपर्टीजची किंमत आहे, चाळीस बिलियन डॉलर्स. त्यांचे मालक वर्षाला सातशे मिलियन डॉलर्स इतका कर भरतात. त्यांच्या व्यवसायात सुमारे दहा लाख कर्मचारी काम करतात. आज पटेल हे नाव केवळ मोटेल्सशी जोडलेले नाही तर हिल्टन, मॅरिऑट, स्टारवूड, हॉलिडे इन अशा अनेक नामांकित पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत पटेल. "

पहिली गोष्ट आहे मोहनभाई पटेल यांची. तिचे नाव ’वर्तुळाचे दुसरे टोक’. १९५८ साली हिमालयन ड्रग कंपनीची, औषध भरण्याच्या अल्युमिनमच्या ट्यूब्जची ऑर्डर मिळवून त्यांनी व्यवसायाचा पाया घातला. मेटलबॉक्स ह्या भारतातील विख्यात ब्रिटिश कंपनीच्या एकाधिकारशाहीस धुळीला मिळवत, आत्मविश्वासाने पदार्पण करणार्‍या मोहनभाईंनी, १९८० साली, अशा ट्यूब्ज बनवणार्‍या जगातील सर्वात मोठ्या उद्योगात आपली कंपनी कशी परिणत केली त्याची ही यशोगाथा आहे.

उमेदवारीच्या वर्षांत आय. सी. एस. होण्याकरता लंडनला गेलेले मोहनभाई, त्या वर्षीपासूनच ती परीक्षा लंडनमध्ये घेणे बंद होणार असल्याने, त्यांच्या आय. सी. एस. होण्याची शक्यता उरली नाही. म्हणून खूपच निराश झाले होते. अगदी भारतात परत जावे काय या विचारापर्यंत. पण मग त्यांनी बॅरिस्टर होण्याचे ठरवले. मात्र अखेरीस ते इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले. कसे? ती कथा लेखिकेने अतिशय सुरस सादर केलेली आहे.

पुढे टाटांच्या कंपनीत अनेक वर्षे नोकरी, इनॅमल्ड रिफ्लेक्टर्सच्या व्यवसायात पाय रोवणे, अल्युमिनमच्या कोलॅप्सिबल ट्यूब्जच्या व्यवसायात प्रवेश, मग ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती अशी यशाची शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. पण ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती सुरू करतांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीस वेळेला डाय तुटल्याने सामान्य माणूस असता तर खचूनच गेला असता. पण त्यातूनही त्यांनी धीराने मार्ग काढला. पुढे मोहनभाईंनी "सुपा फार्म" कसे निर्माण केले आणि स्वतः आदिवासी नसलेला "आदिवासी उत्कर्ष मंडळाचा" एकमेव सदस्य, तसेच अध्यक्षही कसे झाले ती कथाही लेखिकेने सुरस वर्णन केलेली आहे.

कथेचे नाव "वर्तुळाचे दुसरे टोक" असे का दिले, याचे मात्र समाधानकारक स्पष्टीकरण कथेत कुठेही सापडत नाही.

बडोदा विद्यापीठातून इंजिनियर होऊन, अमेरिकेतील सिव्हिल इंजिनियरींगमधील उच्च पदवी प्राप्त करून, पूल बांधणार्‍या एका कंपनीत नोकरीला लागलेले दलपत पटेल आणि त्यांचे बंधू मगन पटेल यांची गोष्ट, दुसरी आहे. "मोटेलवाला झाला मेयर". १९७० मध्ये या बंधुंनी एक मोटेल खरेदी केले. ते व्यवस्थित चालवले. तेव्हापासून मग गुजराथी लोक मोटेलच्या व्यवसायात धडाधड उतरू लागले आणि त्यावरूनच मग ’पोटेल’ हे नावही उदयास आले. त्यांच्या व्यावसायिक यशाचा मागोवा घेत घेत, लेखिकेने दीड वर्षे अनेक गुजराथी लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. दलपत पटेल पुढे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून न्यू जर्सीतल्या मॅन्सफिल्ड काऊंटीत, एकूण मतदानाच्या ६१% मते मिळवून कमिटीवर निवडून आले. पुढे नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी असे काम केले की लोक, "अवर मेयर हॅज डन अ गुड जॉब" असे म्हणत असत. ही सर्वच कहाणी लेखिकेने सुसंगत सादर केलेली आहे.

तिसरी गोष्ट आहे "लाईफ ऑफ अ सेल्समन. " बडोदा विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम. एस. सी. केलेल्या जयदेव पटेल यांना अमेरिकेत नोकरी मिळेना झाली. मुलाच्या संगोपनाच्या कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन, काहीसे अबोल असणारे जयदेव विमा एजंटचा व्यवसाय करण्यास तयार झाले. त्या निर्णयाने त्यांच्या पत्नी पूर्णिमा यांना रडू फुटले. अबोल जयदेव, लोकांच्या गळ्यात पॉलिसी कशी काय मारू शकेल आणि मग त्यावर आपला चरितार्थ तो कसा चालणार, या सार्थ शंकेपोटी त्यांनी जयदेवला दुसरा कुठलाही व्यवसाय करायला सांगितले. मात्र जयदेव बधला नाही.

पुढे दरवर्षी आपलेच, विमा-विक्रीचे नवनवीन उच्चांक मोडीत काढत जयदेव "आदर्श विमा एजंट" बनला. १९९२ साली वॉलस्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेतला क्रमांक एकचा विमा एजंट म्हणून जयदेवची सविस्तर माहिती छापून आली. जयदेव आणि पूर्णिमाच्या निवेदनात्मक लिखाणातून लेखिकेने ही सारीच कहाणी पुन्हा उभी केली आहे. अखेरीस गुजराथमधील सोजित्रा या आपल्या मूळ गावी कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या शाळेचा कसा जीर्णोद्धार केला तेही वर्णन मुळातच वाचावे असे, हृद्य केलेले आहे. लेखिकेच्या साहित्यिक सादरीकरणाची सर, माझ्या रूक्ष परीक्षणास कशी बरे येईल. तेव्हा ते मुळातच वाचलेले चांगले.

शेवटली "नॉट ओन्ली पोटेल्स" ही गोष्ट मात्र पटेलांची नाही. ती आहे हसू, हर्षा, जय आणि नील या चौकोनी शाह कुटुंबाची. २००१ च्या अमेरिकेतील "लॉजिंग" मासिकात कव्हर स्टोरी म्हणून त्यांचीच यशोगाथा लिहिलेली आहे. हॅरिसबर्गमध्ये राहणार्‍या, शिक्षणाने केमिकल इंजिनियर असणार्‍या आणि व्यवसायाने सरकारच्या पर्यावरणशास्त्र विभागात नोकरी करणार्‍या हसूने १९८४ मध्ये आपले पहिले हॉटेल विकत घेतले तेव्हा त्यांची मुले शाळेत शिकत होती. १९९९ पर्यंत त्यांनी आणखी पाच पार्टनर जोडले, दहा हॉटेल्स विकत घेतली, अनेक धाडशी निर्णय घेतले; "हर्षा हॉस्पिटॅलिटी ट्रस्ट" स्थापन केली. कुटुंब, व्यवसाय, समाजसेवा या सर्वच क्षेत्रांत हसूभाई आणि हर्षाबेन यांनी उत्तम ताळमेळ कसा साधला याची कहाणीही लेखिकेने सुरेख सादर केलेली आहे.

जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट यांच्या जोरावर अशक्य वाटणारी यशोशिखरे प्रत्यक्षात जिंकून घेणार्‍या चार कुटुंबांचे हे पुस्तक प्रेरणादायी आणि नमुनेदार आहे. केवळ अनुकरणीय!
.

20110108

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण (अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

ठाण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य-संमेलनाचे निमित्ताने, अनेक पुस्तके त्यादरम्यानच प्रसिद्ध झाली. हे पुस्तकही त्यातीलच एक होय.

मुख्यत्वे वेंडेल आणि ब्युला यांच्या आठवणी जपण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे लेखकानेच अर्पण-पत्रिकेत लिहून ठेवलेले असले तरीही ब्युला, वेंडेल, रिकी, एजाज, रीफ आणि जेस्सी या सहा व्यक्तींची व्यक्तीचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

या पुस्तकास धनंजय राजे यांची प्रस्तावना असून, दिलीप प्रभावळकर यांचा अभिप्राय लाभलेला आहे. प्रभावळकर लिहीतातः “अनोखी पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि चक्रावून टाकणार्‍या या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा तुम्हाला गुंतवून ठेवतात! परक्या देशात, परक्या वातावरणात, कामानिमित्त गेलेल्या डॉ.अशोक ताम्हनकरांची नव्या अनुभवांना सामोरे जाण्याची उत्कंठा तर यात दिसतेच, शिवाय भेटलेल्या व्यक्तींमधले माणूसपण जाणून घेण्याचे कुतुहलही जाणवते. अत्यंत वाचनीय अशा या कथा आहेत. एक वेगळा आणि अमेरिकेचा खराखुरा अनुभव देणार्‍या.”

डॉ.अशोक ताम्हनकर वैज्ञानिक आहेत. कामानिमित्त देशविदेशात त्यांनी केलेल्या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या –किंबहुना वैज्ञानिकांच्या- ह्या सहा कथा आहेत.

ब्युला ग्लासगो या ८४ वर्षे वयाच्या “प्रचंड ऊर्जा” असलेल्या स्त्रीच्या घरी लेखक पेईंग गेस्ट म्हणून दीर्घकाळ राहिले होते. पुढे त्या स्वतःही वनस्पतीशास्त्रातील पी.एच.डी. असल्याचे लेखकास समजले. ते लिहीतात की, “बाई ह्या वयातदेखील स्वतः गाडी चालवायच्या!”

तिथे एका धर्मगुरूंनी, “तू भारतात परत काय घेऊन जाशील?” असा प्रश्न विचारल्यावर लेखक त्यांना सांगतात, “अमेरिकन माणसाच्या चेहर्‍यावर सतत असणारे स्मितहास्य. अमेरिकेतल्या माझ्या संपूर्ण वास्तव्यात कधीही कुणाच्याही डोळ्याला माझा डोळा भिडला की, मी पाहिले आहे की ती व्यक्ती एक सुंदर स्मित देते. ते स्मित मला हवे आहे.” त्यांनी विचारले, “पण तू ते नेणार कसे?” त्यावर लेखकाने दिलेले उत्तर मननीय आहे. ते म्हणाले, “तोच भाग महा कठीण आहे. ते नेता येणार नाही. कारण ती अमेरिकेतल्या सुखी जीवनाची निशाणी आहे. पण ते स्मित निर्माण व्हायला जी कारणे आहेत, ती मला आता माहीत झालेली आहेत. ती कारणे मी जर माझ्या देशात निर्माण करू शकलो तर मी माझ्या देशातही स्वर्ग निर्माण करू शकेन. देशातल्या प्रत्येक माणसाच्या चेहर्‍यावर सुखाचे स्मित फुलवू शकेन.” त्यावर ते धर्मगुरू म्हणाले, “हे उत्तर देणारा, विकसनशील देशातून आलेला, असा तू पहिला इसम आम्हाला भेटला आहेस.” तेव्हा लेखक उत्तरले होते की, “विकसनशील देश विकास पावत आहेत. माझे उत्तर ही त्याचीच एक निशाणी आहे.”

वेंडेल हे त्यांचे अमेरिकेतील प्रशिक्षणादरम्यानचे मार्गदर्शक होते. राष्ट्राध्यक्षांच्या शिष्टमंडळांतून अनेकदा प्रवास केलेल्या उच्चपदस्थांपैकी ते एक होते. मात्र त्यांच्या वर्तणुकीतून ही गोष्ट ते कधीही जाणवू देत नसत. व्यक्तिगत जीवनातील ताण-तणावांचे प्रतिबिंबही कार्यालयीन कामकाजावर पडू देत नसत. पुढे ऑस्ट्रेलियात भेटल्यावर सत्तरीस पोहोचलेल्या वेंडेल यांनी आपण स्वतःच्या स्वीय सचिव असलेल्या मुलीशीच लग्न केले आहे, ही गोष्ट एवढ्या उत्साहाने त्यांना सांगितली की लेखक थक्क झाले. वेंडेल त्यांना म्हणाले की आम्ही आता इथे या परिषदेच्या निमित्तने येऊन, हनिमून साजरा करणार आहोत. “चल, आम्ही सायकली भाड्याने घेऊन भटकणार आहोत. येतोस?” त्यावर लेखक म्हणाले, “नाही बाबा, मी तुमच्यासारखा तरूण नाही. मी जेमतेम प्रवास करून आत्ता पोहोचतो आहे. तुम्ही जाऊन परत या, मग बोलू.” वेंडेल या संस्मरणीय व्यक्तीरेखेची ही कहाणी रंगवलीही अगदी सुरस आहे. मुळातच वाचावी अशी!

सिएटलजवळ लेवेनवर्थ नावाचे एक गाव अमेरिकेतील जर्मनी म्हणून वसवलेले आहे. तिथे झाडावर घर करून राहणार्‍या रिकीशी, लेखकांची भेट योगायोगानेच झाली. रिकी उच्चविद्याविभूषित होती. ज्येष्ठ, प्रसिद्ध शास्त्रज्ञाची पत्नी होती. तरीही, ते सर्व सोडून ती झाडावर जाऊन का राहू लागली? झाडावर राहून, गावात ती “पुस्तकघर” कसे चालवत असे?. पुस्तकघरात जागोजाग प्रसिद्ध कविता का लिहीलेल्या असत? तिथे लेखकास भगवद्गीता कशी आढळली? हे सर्व मुळातच वाचण्यासारखे चित्तवेधक वर्णन मूळ पुस्तकातच वाचावे. रिकी एकदा लेखकांस म्हणाल्या की, “अनेक भारतीयांना अमेरिकेचे खूप आकर्षण वाटते आणि बरेच भारतीय इथे येऊन राहू लागलेले आहेत, म्हणून तू अजूनही भारतात राहतोस याचे मला आश्चर्य वाटले!” त्यावर लेखकाने दिलेले उत्तरही आगळे-वेगळे आहे. ते म्हणाले, “माझा भारत मला आवडतो. जगातले अनेक देश चांगले आहेत; पण भारत हा मला एकमेवाद्वितीय वाटतो. तो सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे. तिथे अनेक अडचणी आहेत. तरीपण मला नेहमी तिथेच राहायला आवडेल. जगात जे जे आहे ते ते सगळे भारतात आहेच; पण भारतात काहीतरी वर्णनाच्या पलीकडले आहे. जे जगातल्या कुठल्याही देशात नाही. कधीतरी भेट द्यायला इतर देश ठीक आहेत.” त्यावर रिकी म्हणाल्या, “म्हणूनच मला भारताला भेट द्यायची वर्षानुवर्षे इच्छा आहे; पण अजून काही जमलेले नाही. मी आले तर तू मदत करशील?” रिकीचे वय त्यावेळेस ऐंशीचे आसपास होते, हे विशेष.

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलात झालेल्या एका जागतिक परिषदेकरता लेखक गेलेले होते. तीन दिवस राहण्याची त्यांची सोय झालेली होती. उर्वरित दोन दिवसांकरता रूममेट मिळाला असता तर त्यांना हवा होता. त्याच्याच शोधात त्यांना ऐजाज मिळाला. हिंदुस्तानी मुलीशी लग्न केलेला तो एक पाकिस्तानी तरूण शास्त्रज्ञ होता. सोबत राहू लागण्यापूर्वीच तो उचल्या असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून लेखकास त्याचेसोबत राहणे नको वाटू लागले. तरीही परिस्थितीच्या रेट्याखाली ते राहिले. त्यांची आपापसात मैत्री झाली. ती पुढेही बरीच टिकली. त्याचीच एक कथा लेखकाने लिहीली आहे.

ऐजाज जीवनाशकांच्या पर्यावरणात होणार्‍या प्रदूषणावर काम करत होता. कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आपण फवारत असतो. त्यांचे अवशेष दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात, आपल्या खाद्यशृंखलेत शिरून ती आपल्यापर्यंत पोहोचतात आणि उपद्रवकारी ठरतात. हिवताप निर्मूलनाच्या कामात वापरली जाणारी डीडीटी, मज्जातंतूंमध्ये पॅरॅलिसिस निर्माण करू शकते. ही माहिती कथेच्या अनुषंगाने लेखकाने अधोरेखित केलेली आहे.

लेखकाची, वीस वर्षीय संतप्त अमेरिकन युवकाशी -रीफ- याचेशी, ते जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत असत त्या घरीच गाठ पडली. त्या युवकाच्या संतप्ततेचे कारण उमजून घेण्याच्या कुतुहलाने, लेखकास अडचणीच्या प्रसंगात नेऊन पोहोचवले. प्रेयसीच्या खुनाकरता तुरूंगवास भोगणार्‍या त्याच्या वडिलांना भेटून समजवण्याचा विदारक प्रसंग लेखकावर आला. या कथेतून अमेरिकन सामाजिक जीवनाचे एरव्ही न दिसणारे काही पैलू लेखकाने समोर आणले आहेत.

सोनेरी सुंदर केसांची एक तरूण जर्मन शास्त्रज्ञ, लेखक अमेरिकेत असतांना, त्यांच्याच प्रयोगशाळेत काम करत असलेली त्यांना दिसली. तिचे नाव जेस्सी असल्याचे समजले. तिने एकदा “पॉटलक” मध्ये हरिणाची सागुती आणली होती. त्या भागात लेखकाने कधी हरिणे पाहिलेली नव्हती. ती म्हणाली, मी दाखवते चांगले “पांढरे हरीण”. मग ती लेखकाला प्रवेश निषिद्ध असलेल्या संरक्षण आस्थापनेत कशी घेऊन गेली, त्या भागात ठेवलेल्या अण्वस्त्रधारी प्रक्षेपणास्त्रांचे सांकेतिक नाव “पांढरे हरीण” असल्याचा समज कसा प्रचलित होता, हे सारे मुळातच वाचण्यासारखे उत्कंठावर्धक लिहीलेले आहे. ती स्त्री हेर होती का? लेखकाची त्या प्रसंगातून सुटका कशी झाली? खर्‍या-खोट्याची काल्पनिक सरमिसळ असलेल्या या कथेत, पुढे पुढे तर ही कथा सत्य की काल्पनिक हाच पेच महत्त्वाचा ठरत जातो. ह्या पेचाचा निकाल आपण हे पुस्तक वाचूनच लावू शकता.

सरळसोटपणे व्यक्तिचित्रणे न रेखाटता, वास्तविक जीवनास काल्पनिकतेची झूल चढविण्याच्या लेखकाच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेले नाही. एरव्ही, अमेरिकन शास्त्रज्ञांची व सर्वसामान्य माणसांची सुंदर व्यक्तिचित्रणे रेखाटण्यात लेखक महाशय यशस्वी ठरलेले आहेत. ज्यांची व्यक्तिचित्रणे रेखाटलेली आहेत, ते आहेतच तसे. प्रातिनिधिक!
.

20110101

गोवळकोटची काही प्रकाशचित्रे

गोवळकोटच्या करंजेश्वरी मंदिरानजीकच्या भक्तनिवासाजवळून
गोवळकोटच्या बालेकिल्ल्यावर जाणारा रस्ता.


हे आहे उद्धव ठकरे यांच्या "महाराष्ट्र देशा" पुस्तकातील एक प्रकाशचित्र.
यात करंजेश्वरीचे मंदिर आणि भक्तनिवास स्पष्टपणे दिसत आहेत.
भक्तनिवासाशेजारून उजव्या बाजूला वर चढत जाणारी पाऊलवाट,
 पुढे डावीकडे वळून वर चढत चढत चित्राच्या मध्याशी,
संगमाखाली दिसणार्‍या बालेकिल्ल्याच्या कोटात घेऊन जाते.


बालेकिल्ल्यावरल्या तोफा आणि खाली दिसणारे गोवळकोट गाव.