20110422

पुस्तक परिचय: परत मायभूमीकडे

समकालीन प्रकाशनच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ६ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाली. किंमत फक्त रु.१२५/-. पृष्ठे १०७.

मायबोली डॉट कॉम वर “परतोनी पाहे” सदरात अनेक लोकांनी आपापले विचार मांडले. पुढे परतून पाहणारे यशस्वीही होतांना दिसू लागले. अशांपैकीच एक आहेत डॉ.संग्राम पाटील. पाटील लिहीतात, “अविकसित ग्रामीण व दुर्गम जगतात समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी शांत व निस्वार्थीपणे अविरत काम करणार्‍या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक अर्पण.”

डॉ.अभय बंग प्रस्तावनेत लिहीतात, “संग्राम व नूपुर पाटील हे महाराष्ट्रातले एक तरूण डॉक्टर जोडपे एका वेगळ्या प्रवासावर निघाले आहे. डॉक्टरांनी आयुष्यात काय करावे याचा रूढ व प्रतिष्ठित मार्ग चालता चालता त्यांनी अचानक वाट बदलली आहे. ब्रिटनहून परतून ते एरंडोलच्या वाटेने चालायला लागले आहेत. माझ्या मते, संग्राम व नूपुरची कहाणी हे एक आश्वासक चिन्ह आहे. एका संवेदनाशील तरूण मनाचा डोळस प्रवास, एक अंतर्द्वंद्व व त्यातून विवेकाने घेतलेला साहसी निर्णय याची कहाणी संग्रामने उत्तम व रोचकपणे या पुस्तकातून मांडली आहे. ती कहाणी समाजाला समृद्ध करणारी, शिवाय तरूण पिढीसमोर एक उत्तम उदाहरण पेश करणारी आहे.”

“मला डॉक्टर व्हायचाय”, “एम.बी.बी.एस. ते एम.डी. व्हाया मेळघाट”, “चलो परदेश”, “इंग्लंडच्या वैद्यकीय सेवेत”, “इंग्लंडची अपुर्वाई”, “ब्रिटनमधली ’पूर्वाई’ ”, “मी इथे काय करतोय” आणि “एक प्रयत्न... ग्रामीण आरोग्याच्या दिशेने” या आठ प्रकरणांतून हे पुस्तक मांडलेले आहे.

पहिल्या चार प्रकरणांतील हकिकती नेहमी घडतात तशाच आहेत. निराळे आहे ते त्यांनी केलेले प्रेम, लग्न. त्याची लपवलेली माहिती. परस्परांवरील अतूट प्रेम. घरच्यांची अतूट जातनिष्ठा. विमनस्क अवस्थेत घर सोडून जावे लागणे. मात्र परदेशात जाणार हे समजल्यावर घरच्यांनी, देशातून जाऊ नये म्हणून त्यांचा स्वीकार करणे, त्यांचे मन वळवण्याचा प्रयास करणे, मला निराळे वाटले. ग्रामीण समाजातल्या समजूतदारीचे ते चिरंतन प्रतीक वाटले. असे प्रयास पुण्या-मुंबईतील कुटुंबांत होत असल्याचे दृश्य फारसे पाहण्यात नाही. कदाचित ग्रामीण कुटुंबांतल्या परस्पर संबंधांच्या घट्ट वीणीचे ते अपरिहार्य पर्यवसान असावे.

चौथ्या प्रकरणात इंग्लंडमधल्या वैद्यक सेवेचा स्वानुभवातून घेतलेला आढावा डॉक्टरांनी यथातथ्य चित्रित केलेला आहे. रोचक आणि वास्तव. वृद्धापकाळ ब्रिटनमधेच घालवलेला बरा. स्वदेशात वृद्धापकाळ घालवणे निव्वळ कष्टमय. ही त्यांची टिप्पणी क्लेशदायक असली तरीही वस्तुस्थितीला धरूनच आहे.

इंग्लंडची अपूर्वाई सांगतांना ते म्हणतात, “”ब्रिटनच्या शैक्षणिक व्यवस्थेतल्या पारदर्शकतेचा प्रत्यय माझ्या व नूपुरच्या ब्रिटनमधील वास्तव्यात वेळोवेळी आला. विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासतांना गोरा किंवा काळा अथवा स्थानिक किंवा परदेशी असा भेदभाव मला अजिबात दिसून आला नाही.” लंडनहून मुंबईस परततांना एकदा त्यांना बोलक्या वृद्ध गोर्‍याशी संवाद साधावा लागला. तो ८९ वर्षांचा आहे हे कळल्यावर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो त्यांना ७० वर्षाचा असावा असेच वाटले होते. पुढे मुंबई विमानतळावर ७० वर्षे वयाच्या भारतीय महिलेला सामान ट्रॉलीवर चढवण्यात मदत करतांना पाहून, डॉक्टरांना युरोपिअन आरोग्य-व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. ही इंग्लंडची अपूर्वाई.

ब्रिटनमध्ये राहणार्‍या पौर्वात्य लोकांचा सुरेख आढावा त्यांनी पुढल्या प्रकरणात घेतलेला आहे. मुळातच वाचायला हवा इतका तो सुरस आहे. मात्र भारतातून तिथे गेलेले कित्येक लोक, पात्रतेपेक्षा कितीतरी निम्न दर्जाची कामे पत्करूनही ब्रिटनमध्येच का राहतात ह्याचे त्यांना आश्चर्य वाटे.

“मी इथे काय करतोय” प्रकरणात त्यांनी परतण्याचा निर्णय कसा घेतला त्याची कारणमीमांसा दिलेली आहे. यथातथ्य आणि निखळ राष्ट्राभिमानी. पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्वखुशीने, अत्यंत असुरक्षित अवस्थेतही परत जाण्यास उत्सुक मित्र भेटले तेव्हा, त्यांना भारतात परतण्याचा निर्णय घेणे सोपे वाटले. ते मित्र म्हणाले इतर लोकांना पाकिस्तान असुरक्षित वाटतो. असेलही. आमचे मात्र तेच घर आहे. आम्ही घरी जायला का घाबरावे? आपली मुले कदाचित, “मी भारतीय नाही, माझे आई-वडील भारतात वाढले” असे म्हणतील ही शक्यताही त्यांना नको वाटली. हे निराळे आहे. हे आगळे आहे.

अखेरीस डॉक्टर म्हणतात, “भारतात परतण्याने आमच्या मनातील ध्येयाला, आपल्या लोकांसाठी काम करण्याविषयीच्या खोलवर रूजलेल्या आमच्या भावनांना व आमच्या एकूण अस्तित्वालाच आम्ही न्याय दिला असं आम्हाला वाटतं. याच मार्गावर चालत राहिलो तर एक जन्मही अपुरा वाटेल एवढे काम इथे पडले आहे. ही फक्त सुरूवात आहे.”

वयाच्या तिशीतच, दोन छोट्यामुलांसह, पाच वर्षांच्या ब्रिटनमधील यशस्वी कारकीर्दीस पूर्णविराम देऊन संग्राम-नूपुर भारतात परतले. मलेरिया, व्यसनाधीनता इत्यादी शत्रूंशी मुकाबला करता करताच, आपल्या मुलांनाही व्यवस्थित शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नवीन शाळाच उघडणार्‍या या डॉक्टर दांपत्यास पुढील सर्व वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!

मला ही “परत मायभूमीकडे” चाललेली वाट, तिचे वर्णन आणि हे एकूण पुस्तकच आवडले. तुम्हालाही नक्कीच आवडेल. विचारास प्रवृत्त करेल. कुणी सांगावे, कदाचित आचारासही प्रवृत्त करेल!
.

No comments: