20110211

कालाय तस्मै नमः

काही दिवसांपूर्वीच मला श्री.मंगेश नाबर यांनी एक विपत्र पाठवले होते. श्री.रमाकांत ओवळेकर यांनी १९९० साली लिहिलेल्या "दॅटस्‌ ऑल माय लॉर्ड!" या आत्मचरित्राची एखादी प्रत अजूनही त्यांच्या डोंबिवली येथील प्रकाशकाकडे असेल असे त्यांना वाटत होते. त्यांनी विचारले होते की, तुम्ही डोंबिवलीत राहता, तर तिथे चौकशी करून ती मिळण्यासारखी असल्यास पाहता काय?

मला प्रकाशकाकडे जाणे जमले नाही मात्र मॅजेस्टीक बुक डेपोत मी चौकशी केली. तेव्हा ते पुस्तक कधीपासूनच उपलब्ध नसल्याचे समजले. मग आंबेडकर सभागृहात, अक्षरधाराचे पुस्तक-प्रदर्शनही भरले होते. तेथेही पाहिले. पण ते मिळाले नाही. मी नाबरांना त्याप्रमाणे कळवले.

आजच आपण वकील श्री.रमाकांत ओवळेकर यांच्या दुःखद निधनाची बातमी वृत्तपत्रात वाचली. त्यांच्या निधनाची वार्ता वाचून मला हे सर्व आठवले.

त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेली काही प्रकरणे, उदा. गोदरेज कंपनीच्या ताब्यातील विक्रोळी येथील प्रचंड जमीन आणि स्वतः श्री.ओवळेकर यांनी केलेली बेकायदेशीर शिकार, इत्यादी वाचनीय आहेत असे मला नाबरांनी पुन्हा कळवले. मला मात्र १९८५ मधील सिमेंट घोटाळ्याने विख्यात झालेल्या अंतुलेसाहेबांचे वकील म्हणूनच त्यांची आठवण आहे.

गोष्ट चांगली असो की वाईट, काळ तिच्यावर एक मोठासा पडदा टाकतो. मग ती गोष्ट, घटना, वस्तू, जीव, केवळ स्मरणास योग्य होऊन राहतात. राजा भर्तृहरीच्या एका सुभाषितात ह्याचे सुरेख वर्णन केलेले आहे.

सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः

म्हणजेः

ती रम्या नगरी, महान राजा, सामंतपरिषदही ती
ती विद्वानसभा, तशाच तेथील ललनाही चंद्रानना
तो गर्वोन्नत राजपुत्रही, तसे ते भाट, त्यांच्या कथा
हे ज्याने स्मरणात पार केले, काळास त्या वंदू या

कालाय तस्मै नमः

हेच खरे!
.

2 comments:

प्रभाकर फडणीस said...

श्री. ओवळेकरांचे आत्मचरित्र विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालयात मला वाचावयास मिळाले होते. अजूनहि बहुतेक तेथे असेल.

विनायक रानडे (VK) said...

नमस्कार, तुम्ही समतोल कसा सांभाळू शकता हे मला कोडेच आहे. लिखाणात शब्द मोजकेच असतात. तुमची ओळख अशीच कायम राहो.