२०१०-११-३०

दंतकथा

एक जमाना होता. जेव्हा दात दुखायला लागला की उपटून टाकत. माझे बहुतांशी दात त्याच जमान्यात शहीद झाले. जे उरले, त्यांचे दुखणे नव्या जमान्यातले होते. त्याचे उपचारही नव्या जमान्याच्या इतमामाने झाले. मात्र त्यापूर्वी दात दुखायला लागल्यापासून तर उपटून टाकेपर्यंत अक्षरशः जीवनच दुःखमय होत असे. त्या दिवसातले दुःखनिवारण एक दंतवैद्यच काय तो करू शके. (खरे तर ते काम आजही दंतवैद्यच करत असतो.) मात्र तोही वेळीच मिळेल तर मग दुःख ते कशाला उरेल? तर ही आहे त्याच काळातली कथा. एक सर्वसामान्य दंतकथा!

दंतकथा

दातांचे अवघे दुःख, संपूनी होईल सुख, का कधी? ।
ते घडून, दुःख संपून, आठवण नुसती राहिली ॥ १ ॥

ती सारी दंत कहाणी, शब्दरूप करून पुराणी, राखिली ।
कधी कुणास ऐशी प्रचिती, न येवो म्हणुनी मी ती, सांगतो ॥ २ ॥

दातवर्ण मोतीय झाला, कवळीही मौक्तिकमाला, तरी का नको ।
मऊ सरस सेवने करता, कसूर निगेतही घडता, व्हावे कसे ॥ ३ ॥

रसपूर्ण जेवणे करता, कुचकामी ठरती दाढा, शेवटल्या ।
अन् तसेच काही दांत, वरचेही ठरती बाद, आपोआप ॥ ४ ॥

त्यांवरती चढुनी लेप, रसाचे थेट, कवच पोखरती ।
चहा, फळांचे रस, सार अन् सुपे, दातांच्या भिंती क्षरिती ॥ ५ ॥

माझेही असेच झाले, किडल्या दाढा, अन् दांतही वरचे काही, भंगले ।
प्रतिदिनी चहाची पुटे, चिकट बिस्किटे, चघळून सर्वही दांत, खंगले ॥ ६ ॥

मग दुखता त्यातील एक, कळ उरांत नुरली मूक, करी अस्वस्थ ।
दंतवैद्य बघता सगळे, एकजात मजला कळले, होते व्यस्त ॥ ७ ॥

वेदना घरी मी नेता, निस्तेज म्लान प्रतिबिंब, दाखवी आरसा ।
व्यस्तताच त्यांची ठरते, आरोग्यस्थितीचा, प्रत्ययी आरसा ॥ ८॥

पण ठरली पुढली वेळ, कंठवे न मधला काळ, धरिता धीर ।
मग लवंग, कापूर, मंजन लावून विको, कंठले दिवस ॥ ९ ॥

शेवटास तो दिन आला, दंतवैद्य करता झाला, शल्यचिकित्सा।
अलगद देऊन भूल, घेऊनी शस्त्रे, दाताशी झुंजू निघाला ॥ १० ॥

मजबूत एवढा दांत, कीडीने दैववशात, खुडावा लागे ।
ह्या रंजीस येऊनी माझे, सर्वथैव व्याकुळ झाले, अंतर ॥ ११ ॥

उपटता शर्थीने दांत, कवळीचे सोडुनी नातं, तो ढळला ।
तो निघता तेथून दांत, सर्वही विषाक्त रक्त, ओघळले ॥ १२ ॥

ते साठ उत्तरी दुःख, पाच उत्तरी सरले, शल्यक्रियेने ।
मम कृतज्ञतेची साक्ष, वैद्या मी तुजला देत, स्मरत कौशल्या ॥ १३ ॥

नरेंद्र गोळे २००३
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: