20100617

पेंच अभयारण्यात एक दिवस

२००७ च्या मे महिन्यात आम्ही नागपूरला होतो. तेव्हा एक दिवस कुठे तरी सहलीस जावे असा विचार पक्का झाला. मग परस्पर सहमतीने पेंच प्रकल्पाची निवड झाली. ती मे महिन्याची ८ तारीख होती. उन्हाळा कडाडला होता. ४८ अंशावर पारा चढला होता. तरीही अरण्यास भेट देण्याकरता तो काळ योग्यच होता. कारण उन्हाळ्यात अरण्यातील पाणवठे ओसरत जातात. जिथे अजूनही ते बाकी असतात, त्यांच्या अवती भवतीच निरनिराळे प्राणी-पक्षी आढळण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच उन्हाळ्यात, नैसर्गिक पाणवठे हुडकत अभयारण्यांतून भटकणे आनंददायी ठरू शकते. त्यातून माझा भाऊ वनाधिकारी असल्याने, सहलीसोबत सुसंगत निरुपणाची उत्तम सोय उपलब्ध होती. सकाळी सकाळीच तयार होऊन आम्ही अभयारण्याकडे कूच केले.

सुमारे दोन तासात आम्ही पेंच अरण्याबाहेरच उभारलेल्या महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटक निवासाजवळ येऊन पोहोचलो. या महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ, सिल्लारी (पेंच) पर्यटन संकुलाचे उद्‌घाटन दि.१५ डिसेंबर २००५ रोजी माननीय नामदार श्री.विजयसिंह मोहिते पाटील, मंत्री ग्रामविकास व पर्यटन, यांचे हस्ते झालेले होते. तिथल्याच उपाहारगृहात उत्तमपैकी नास्ता करून आमच्या सहलीस सुरूवात झाली.

ज्या झाडाची पाने आपण दसर्‍याला सोने म्हणून वाटतो, त्या आपट्याच्या झाडाला, मोहक, सुंदर, शुभ्र, नाजूक कलाकुसरीची फुले येतात हेही मला इथेच प्रथम पाहायला मिळाले. नंतर पुढे डोंबिवलीतील पाथर्ली नाका ते शिवाजी उद्योगनगर रस्त्याच्या उजव्या कडेवर लागलेल्या झाडावरही तसलीच नितांतसुंदर फुले आढळून आली. आणखी बारकाईने पाहू लागल्यावर, तर डोंबिवलीतील आमच्या टिळकपथावरही आपट्याची झाडे रस्त्याच्या किनार्‍याने लावलेली दिसून आली.

ऊन प्रखर होऊ लागलं होत. सूर्य माथ्यावर येत होता. सारेच प्राणी सावलीच्या शोधात असलेले दिसून येत होते. अचानकच मग हरणे दिसली. डौलदार. तीही सावलीच्याच शोधात होती. तिथेच एका सावलीत, एक हरिणी आपल्या पिल्लास पाजत असलेलीही दिसून आली.

मग आम्हाला पेंच नदीवरचे धरण दिसले. या धरणाचे सारेच पाणलोटक्षेत्र मध्यप्रदेशात आहे. धरणातून सुटणारे पाणी महाराष्ट्रात येते. त्यामुळे पाणी महाराष्ट्राचे. मात्र, पेंच जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेची वाटणी मध्यप्रदेशास ८५% तर महाराष्ट्रास १५% अशी केली जाते. धरणाच्या भिंतीवरून पलीकडे मध्यप्रदेशात जाणारा रस्ता बांधवगडच्या वनात घेऊन जातो. मोगलीची कहाणी याच वनात चित्रित करण्यात आलेली होती. इथले वन, भारतातल्या सर्वात जुन्या आणि घनदाट वनांपैकी एक आहे.

आता हे धरण आम्हाला सततच दिसत राहणार होते. कारण याच धरणाभोवती दिवसभर फिरत राहण्याचा आमचा मानस होता. दिवस बुडता बुडता आम्ही पेंच जलविद्युत प्रकल्पासही भेट दिली. धरणाच्या पाठीमागच्या जलाशयाला, तळाशी एक भोक पाडून, धरण असलेल्या डोंगराच्या पोटात एक शक्तीसंयंत्र बसवलेले आहे त्याच्या पाणचक्कीच्या पात्यांवर हे पाणी सोडलेले होते. त्यामुळे पाणचक्की फिरे. ती जनित्रांना फिरवी आणि वीज निर्माण केली जात असे. पुढे मोठाली रोहित्रे लावून ती वीज उच्च दाबावर नेऊन तिचे पारेषण केले जात होते. डोंगराच्या पोटातील त्या शक्तीसंयंत्रापर्यंत पोहोचण्याकरता एक, एक किलोमीटर लांबीचा बोगदा आम्ही पायी चालत चालत पार केला आणि संयंत्रापर्यंत जाऊन पोहोचलो. बोगद्यातून सतत हवा खेळती राहावी म्हणून, आतून मोठमोठ्या वायुक्षेपकां (काँप्रेसर्स) द्वारे बोगद्याबाहेर हवा पाठवली जात होती. त्या क्षेपकांचा आवाज संपूर्ण बोगदाभर आमची सोबत करत होता. दरम्यान भेट देण्याकरता परवानगी आधीच मिळवून ठेवलेली होती. त्यामुळे संयंत्र आत जाऊन व्यवस्थित पाहता आले. आत्ता मात्र आम्ही एका टेकडीकडे निघालो होतो, जिच्यावरून पेंच नदीचे दूरवर पसरलेले पात्र एकाच दृष्टीक्षेपात दिसू शकणार होते.

एवढ्यात भावाने एका उंच निष्पर्ण झाडाच्या टोकावरले घरटे दाखवले. तो सांगत होता की ते गिधाडाचे घरटे आहे. गिधाडे अशीच खोल घरटी, उंच झाडांच्या टोकांवर बांधलेली आढळतात. त्याने आणखीही एका ठिकाणी बोट दाखवले. तिथे एक हापशी होती. हापशीचे पाणी खाली उतरून एका कृत्रिम डबक्यात साठत होते. तो म्हणाला की हे एक अभयारण्य आहे. इथे नैसर्गिक पाणवठ्यांसोबतच वनखाते कृत्रिम पाणवठेही निर्माण करते. अशाप्रकारचे. मग मी विचारले की, “पण या कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरायचे तर कुणीतरी हापशी चालवायला नको का?”. त्यावर तो म्हणाला की तशी सोयही वनखाते करतच असते. कुणीतरी दररोज ती हापशी चालवून त्या डबक्यात पाणी भरून ठेवत असतो. तितक्यात आम्हाला काही माकडेही डबक्यात येऊन पाणी पितांना दिसली.

एव्हाना आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. वाहने तिथेच उभी केली. डोक्याला ओली फडकी गुंडाळली आणि टेकडीच्या माथ्यावर वाट चढू लागलो. टेकडीवरून पेंच नदीच्या पात्राचा विस्तार दूरपर्यंत नजरेस येत होता. वाटेवर एक अगदी निष्पर्ण झालेले उंच झाड दिसले. अशी माहिती समजली की त्या झाडाचे नाव “करू (kulu)” आहे. त्याच्या डिंका (kulu-gum) पासून औषधांच्या कॅपसूल्सची आवरणे तयार केली जातात. पांढर्‍या पांढर्‍या खवल्यांचा त्याचा बुंधा अंधारात चमकतोही. रात्री कधीकधी तर म्हणे तो भुतासारखाच वाटतो.

या वेळपावेतो बरीच पायपीट झालेली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. वनखात्याच्या, वनातल्याच एका अतिथी-गृहावर पोटपूजेकरता व्यवस्था केलेली होती. म्हणून आम्ही तिकडेच निघालो. पोहोचे पोहोचे पर्यंत जेवण तयार झालेले होते. भुकेल्या पोटी गरम गरम अन्न रुचकर लागले. उत्तम जेवण झाले.

मात्र, विश्रांतीसाठी थांबल्यास वनदर्शनास, वेळ अपुरा पडेल हे लक्षात घेऊन आम्ही लगेचच पुन्हा, उन्हासाठीचा जामानिमा करत बाहेर पडलो.  आता आम्ही निघालो होतो एका विशाल वटवृक्षाकडे, ज्याच्या छत्रछायेत, वनखात्याने पारंब्यांच्या आधारे बांबुंच्या छपर्‍या बांधलेल्या होत्या. पारंब्यांचे झोपाळे तयार केलेले होते. आम्ही तिथे बराच वेळ विहार केला.
जवळच्याच वेळुवनातही बांबुच्या पालापाचोळ्यातून एक फेरफटका मारला. उतारावरून खाली गेल्यास पेंच नदीचे पात्र लागत होते. तिथूनच मग आम्ही पेंच जलविद्युतप्रकल्प पाहण्यास गेलो होतो.


त्या वडाच्या झाडाला भेटून मला, एखाद्या थोर व्यक्तीस भेटून यावे तसेच वाटत होते. आपण भेटलेल्या थोर व्यक्तीस जसे विसरू शकत नाही, तसेच आजही मी त्या वडाची आठवण विसरू शकत नाही. वनखात्याने त्या वडाभोवतीच सहलीस योग्य असे कुंजविहार बांधून एकप्रकारे पेंच नदीकिनार्‍यावर एक उत्तम सहलस्थानच निर्माण केले आहे. आम्हाला त्या ठिकाणाचा संस्मरणीय सहवास लाभला.


वनाबाहेर पडलो तेव्हा असे लक्षात आले की प्रत्येकाजवळ काही काही वस्तू जमा झाल्या आहेत. त्यापैकी काहींचा आम्ही एक ग्रूप फोटोच काढला. दोन्ही बाजूची खालची पाने आहेत तेंदूची. म्हणजे तेंदूपत्ता हो. बिड्या वळायला वापरतात ती पाने. मधले पान आहे रबराच्या झाडाचे. डाव्या बाजूच्या पिशवीत आहे “करू”चा डिंक आणि उजवीकडच्या पिशवीत आहे अभ्रक. इकडच्या डोंगरांवर अनेकदा सापडणारे खनिज. सामान्यतः उत्तम उष्णता वाहक असणारे पदार्थ उत्तम विद्युतवाहकही असतात. अभ्रक मात्र निराळेच आहे. ते उत्तम उष्णतावाहक आहे तरीही विजेला मात्र अवरोधच करते. म्हणूनच याचा उपयोग विजेच्या अनेक उपकरणांच्या निर्मितीत केला जातो.

त्या एका दिवसात आम्ही पेंचला घालवलेल्या काही संस्मरणीय क्षणांचे वर्णन या लेखाद्वारे करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पेंचच्या राष्ट्रीय अभयारण्यातील वनसमृद्धीची वानगीदाखल छायाचित्रेही इथे दिलेली आहेत. तरीही, त्या दिवसात आम्ही मिळवलेल्या अवर्णनीय आनंदाचे आख्यान इथे लिखित मजकुराद्वारे कसे करावे हे मला समजत नाही. एवढेच सांगणे पुरेसे आहे की जर तुम्हीही कधी नागपूरला गेलात तर, एक दिवसात करता येणारी एक सुंदर सहल तुम्ही पेंचला नक्कीच करू शकता. ती संस्मरणीय होईल यात मला मुळीच संशय नाही.
.

4 comments:

राज जैन said...

Chaan lekh va photo.

surekh !

* tuhi www.mi-marathi.com var dekhil liha ashi mazi icha aahe :)

Anonymous said...

हा फोटो आपट्याच्या झाडाचा नसून, कांचन या झाडाचा आहे. आपट्याची पाने याच शेपची असली तरी लहान असतात. कांचनाची पाने जास्ती मऊ असतात. तर आपट्याचे पान जरा जाड असते. कांचनाचे झाड ७-८ फुटापर्यन्त वाढते, तर आपट्याच मोठा वृक्ष होतो. कांचनाला पांढरी किन्वा गुलाबी फुले येतात. हल्ली पुण्या मुंबईत सर्रास कांचनाची पाने आपट्याची म्हणून विकतात.

Mrs. Asha Joglekar said...

छान लेख माहिती पूर्ण. कांचना चे व आपट्याचे झाड वेग वेगळे असते तेही समजले .

क्रान्ति said...

http://agnisakha.blogspot.com/2010/08/blog-post_31.html