20100425

सिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन

कलकत्ता स्थलदर्शन

पर्यटनाचा पहिला दिवस कलकत्ता दर्शनाचा होता. पार्क पॅलेस हॉटेलमधून नास्ता करून आम्ही २x२ बसने बेलूर मठाकडे निघालो. कलकत्ता शहर हुगळी (गंगा, पद्मा) नदीच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांवर वसलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाणारी नदी पुढे पश्चिमवाहिनी होते. मात्र त्याआधीच नदीवर दोन मोठे पूल आहेत. रविंद्रसेतू म्हणजेच विख्यात हावडाब्रिज आणि विद्यासागर सेतू म्हणजे दक्षिणेकडला मोठा पूल. मुख्य शहर पूर्वेलाच आहे. त्यातही दक्षिणेलाच जास्त. कालीघाट, बालीगंज सारखे वर्दळीचे भाग तिथे आहेत. विमानतळ ईशान्येला आहे. विमानतळाहून हॉटेलात येत असतांना जागजागी विस्तीर्ण जलाशय दिसत होते.

आमचे हॉटेलही तिथेच गरिया-हाट-रोडवरच होते. तिथून रविंद्रसेतूकडे आणि मग बेलूर मठाकडे वाटचाल सुरू झाली. वाटेत मोठमोठे हिरवेगार वृक्ष दिसून येत होते. सावरीच्या कापसाची झाडेही खूप होती. मठाचे वातावरण अत्यंत स्वच्छ, शांत आणि प्रसन्न आहे. मोठ्या आवाजात न बोलण्याच्या सूचनाही जागोजाग लिहिलेल्या आहेत. फोटोग्राफीही निषिद्धच आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असूनही गजबजाट नाही. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्या व्यक्तिगत वापरातील वस्तू प्रदर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. बाजूलाच गंगाघाट आहे. पश्चिम तीरावर दक्षिणेश्वराचे मंदिर आहे. अर्थात्‌ फेरी बोटीने पलीकडे जाण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविकच आहे. आम्हालाही तशी इच्छा झाली. गटात केवळ १६ माणसेच असल्याने सहलप्रणेते “फेरी”करता तयार झाले. बस पलीकडे पाठवून दिली आणि आम्ही बोटीवर स्वार झालो.

११०० वाजण्याचा सुमार असेल. प्रवाहाच्या दिशेनेच खालच्या बाजूला दक्षिण तीरावर दक्षिणेश्वर मंदिर आहे. सुमारे अर्ध्या तासाचा प्रवास. बोटीला छत नाही. त्यामुळे टळटळीत उन्हात प्रवास सुरू झाला. सगळ्यात प्रथम जाणवला तो गंगेच्या प्रवाहाला असलेला वेग. मग जाणवले की नदीतून फोटोग्राफीस मनाई नाही. त्यामुळे कॅमेरे बाहेर निघाले. तीरावरील स्थावरांची उत्तम प्रकाशचित्रे निघू लागली. बाली पुलाखालून पार झाल्यावर थोड्याच वेळात दक्षिणेश्वराचे मंदिर दिसू लागले. बोट किनार्‍याला लागली. दक्षिणेश्वरास आलेले भक्तगण गंगेच्या पवित्र पाण्यात डुबक्या घेत होते. लहानथोर, स्त्रीपुरुष, उच्चनीच कुठलाच भेदभाव त्यांच्यात दिसून येत नव्हता. आम्हीही हलकेच पायउतार झालो. दक्षिणेश्वराचे दर्शन घेतले. सभोवतालच्या परिसरात सुमारे तासभर विहार केला. अतिशय प्रसन्न वाटले. पुण्यतोया नदीच्या पावनस्पर्शाचीच किमया म्हणायची.


तिथून आम्ही “जतीनदास पार्क” नावाच्या मेट्रोस्थानकावर जाऊन पोहोचलो. आता मेट्रोप्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. तिकिटे काढली. स्थानकाचे फलाट आपल्या लोकलच्या फलाटाच्या मानाने पार पाताळात गेलेले. खूप खोलवर उतरून गेल्यावर फलाट लागला. स्थानक बर्‍यापैकी स्वच्छ होते. जमिनीखाली खोलात असूनही वायुवीजन कमी आहे असे कुठेही वाटले नाही. गाड्यांची वारंवारताही बर्‍यापैकी होती. दर पाचसहा मिनिटाला गाड्या येत होत्या. आम्ही सगळेच एका गाडीत चढलो. मेट्रोमधेही फोटो निषिद्धच आहे. काही स्थानकांनंतर मेट्रोमधून उतरून आम्ही हल्दीराम रेस्तराँमधे जेवायला गेलो. जेवणानंतर व्हिक्टोरिया स्मारक आणि सायन्स सीटी पाहण्याचा कार्यक्रम होता. व्हिक्टोरिया स्मारकाच्या आतल्या भागात फोटो निषिद्धच होते. मात्र बाहेरील भागात, तसेच सायन्स सिटीत सर्वत्र फोटोग्राफीस पुरता वाव होता.


व्हिक्टोरिया स्मारक प्रेक्षणीय आहे. आतील वस्तुसंग्रहालय फारसे लक्षात नाही. त्यातील वस्तूही वेगळ्याने वर्णन करून सांगाव्यात अशा आठवात नाहीत. मात्र वास्तूची बाहेरील भव्यता, कितीही दूरवरून सारखा दृष्टीस पडत राहणारा चित्ताकर्षक घुमट, शिल्पकला, परिसराची कलापूर्ण आखणी, विस्तीर्ण उद्याने, हिरवीकंच वृक्षराजी यामुळेच स्मारक आमच्या स्मरणात राहिले आहे. आणि हो. दारापासचे सिंहही विसरता येणारे नाहीत. शिवाय, बाहेर पडतांना आम्हाला एक खरीखुरी व्हिक्टोरियाही (बग्गी) नजरेस पडली. अर्थातच तीही आमच्याकरता स्मारकच ठरली. व्हिक्टोरिया स्मारकानंतर आम्ही सायन्स सिटीकडे निघालो. ती पाहायला चारपाच तासही अपुरेच पडतात, असे सांगितले गेले होते. म्हणून काय काय पाहायचे याची यादी प्रत्येकजण करत होता.


आम्ही सुमारे साडेपाच वाजता प्रवेश करत होतो. सातच्या सुमारास आम्हाला बाहेर पडणे गरजेचे होते. कारण, त्यानंतर जेवण करून रात्री दहाची दार्जिलिंग मेल पकडायची, तर इथून सातपर्यंत बाहेर पडायलाच हवे होते. म्हणून मी मात्र स्वतःपुरते असे ठरवून टाकलेले होते की समुद्रसफरींचे संग्रहालय आणि आरसेमहाल यांचाच पूर्णपणे आनंद घ्यायचा. सर्वप्रथम समुद्रसफरींच्या संग्रहालयात गेलो. निरनिराळ्या जहाजांच्या प्रतिकृती, त्यांचेवरील शिडे, डोलकाठ्या, गळ यांच्या विकासाचा इतिहास, आणि एकूणच समुद्रपर्यटनात घडत गेलेल्या प्रगतीचा सुंदर इतिहास इथे समूर्त साकार केला गेलेला आहे. तो अतिशय मनोरंजक वाटला.

त्यानंतर मग आम्ही गेलो आरसे महालात. खरेतर लहान पोरांचाच खेळ म्हणायचा. पण मी तिथे तासभर कसा गुंगून गेलो याचा पत्ताच लागला नाही. आरशांच्या अक्षरशः असंख्य गमतीजमतींनी प्रकाशशास्त्राच्या वैज्ञानिक रहस्यांचा सहज उलगडा होत होता. मनोरंजनही साधत होते.

जाडी, रोडकी, वाकडीतिकडी प्रतिबिंबे दाखवणारे वक्र आरसे पाहिले. कॅलिडोस्कोपसारखी माणसाचीच प्रतिबिंबे रचून दाखवणार्‍या रचना पाहिल्या. एकाच माणसाभोवती आरसे रचून त्याला त्याच्या प्रतिबिंबांशीच बैठक घेत असण्याचे दृश्य साकारणारी रचना मला सर्वात जास्त आवडली. खिडकीसारख्या पोकळीत खिडकीबाहेर सर्व बाजूंनी आरसे रचून, त्यात वाकून पाहिले असता एखाद्या अनंत लांबीच्या बोगद्यात आपल्याच प्रतिबिंबांचे असंख्य फोटो काढता येतात हा विस्मयकारक शोधही लागला.


मग आमच्याच गटातील इतर लोक भेटू लागले. कुणी डायनासुरांच्या नगरीस भेट देऊन आलेले होते तर कुणी अवकाश तंत्रज्ञानाच्या दालनातून परतत होते. कुणी यांत्रिक साधनांच्या दालनातून तर कुणी तर्‍हेतर्‍हेचे प्रयोग पाहून. दृक्‌श्राव्य खेळ खेळूनही बरेच जण परतत होते. सारेच जण उत्साहात होते. वेळ अपुरा पडत होता. आमच्या गटाचे सरासरी वय पन्नासापुढेच होते. त्यामुळे बहुतेकांना पायांचे तुकडे पडत असल्याची जाणीवही प्रकर्षाने होऊ लागली होती. तहानही लागली होतीच. मात्र तिथले पाणी मचूळ होते. त्यामुळे अनिच्छेनेच का होईना पण एकएकजण हळूहळू काढता पाय घेऊ लागला. नियत वेळेपावेतो आम्ही सर्वच बाहेर आलेलो होतो. तरीही पुन्हा संधी मिळाल्यास अत्यंत आवडीने सगळे मन भरून पाहण्याची अनिवार इच्छा मनात घेऊनच, आम्ही त्या चित्तचक्षुचमत्कारिक विज्ञाननगरीचा निरोप घेतला.

No comments: