20100425

सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था

हिमालयन पर्वतारोहण संस्था

सकाळी ०४०० वाजता उठून ०४३० ला आम्ही सगळ्यांनीच टायगर हिलकडे प्रस्थान केले. दार्जिलिंग- गोर्खा- हिल- कौन्सिलने बांधलेल्या बंद निवार्‍यातील काचघरांतून सूर्यदर्शन आणि कांचनजंगा पर्वत-उदयाचे विलोभनीय दृश्य पाहणे त्यामुळे शक्य होणार होते. त्या बंदिस्त निवार्‍यात ते प्रथम पोहोचेल त्यासच बसण्यास जागा देतात. इतरांना कडाक्याच्या थंडीत बाहेर बसून वा उभे राहूनच सूर्योदय पाहावा लागतो. गेले तीन दिवस सतत दार्जिलिंगमधे पाऊस पदत असल्याने सूर्योदय पाहता आलेला नव्हता ही खबर आम्हाला होतीच. आज मात्र उघडीप होती. पावसाची मेहेर होती. सकाळी सहाच्या सुमारास यथावकाश सूर्योदय आणि कांचनाप्रमाणे उजळलेले कांचनजंगा दोन्हीही मनसोक्त अनुभवता आले.


नंतर आम्ही हॉटेल आनंद पॅलेस दार्जिलिंग येथे जाऊन नास्ता केला. मग चहाच्या मळ्यात पारंपरिक पोशाखांत फोटोसत्र साजरे केले. त्यानंतर तेनझिंग खडकावर प्रस्तरारोहणाचा खास अनुभव घेतला. वरील प्रकाशचित्रात उजवीकडले वरचे चित्र तेनझिंग खडकाचे आहे, तर खाली पद्मजा नायडू प्राणी-उद्यान तसेच हिमालयन-पर्वतारोहण-संस्था यांच्या प्रवेशद्वाराचे आहे. त्या संस्थेकडेच मग आम्ही रवाना झालो. प्रवेशद्वारापूर्वीच आमचे लक्ष वेधून घेतले ते एका डौलदार, उंचच-उंच, लाललाल फुलांनी बहरलेल्या एका सुंदर वृक्षाने. तो होता ’लाली गुरांच’ म्हणजेच र्‍होडोडेन्ड्रॉन. ही फुले अतिशय आरोग्यकारक मानली जातात. यांचा गुलकंदही केला जातो. आमच्या सिक्कीम प्रवासात मग अनेकदा हे वृक्ष आम्हाला दिसतच राहिले.


मग दिसला एडका. एडक्याचा ए शिकलो त्याला आता ४५ वर्षे उलटली आहेत. मात्र तेव्हापासून ते आजतागायत एडका नावाचा हाडामासाचा प्राणी पाहिलेलाच नव्हता. आजच प्रथम पाहत होतो. शिवाय, त्यावेळेसही एडक्याचे पुस्तकात जे चित्र देले जायचे त्यात दोन एडके परस्परांशी टक्कर घेतांनाच दाखवलेले असत. इथे एकटा सुटा एडका, गवत खात उभा असलेला पाहून, चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले.


इथेच आम्हाला आणखीही एतद्देशीय प्राणी भेटले. ते म्हणजे काळं अस्वल आणि याक.


लाल पांडा सिक्कीमचा राष्ट्रीय प्राणी समजला जातो. (१९७५ पूर्वी सिक्कीम हे एक स्वतंत्र राष्ट्रच होते.) त्याचीही भेट सरतेशेवटी या उद्यानातच झाली. उंच झाडाच्या टोकावर तो राहत होता. आमच्या स्थिरचित्रण चित्रकाने तो पुरेसा आवाक्यात येईना. मग चलचित्रकवाले सरसावले. दूरवरच्या पांड्याला दृष्टीच्या पल्ल्यात आणला आणि प्रकाशचित्रे काढली गेली. पण ती पाहिल्यावर मात्र, तो त्याच्या ख्यातीप्रमाणेच रुबाबदार असल्याचे जाणवले.


मग जपानी पॅगोडा-मठ पाहायला आम्ही इथे आलो. मठाला हिंदू मंदिरांप्रमाणेच सिंहद्वार होते. वरच्या मजल्यावरील बुद्धमंदिरात आरती सुरू असतांना आम्ही पोहोचलो. झार्‍याच्या आकाराचे चामड्याचे तालवाद्य दांडीने हाती धरून त्यावर वेताच्या वळलेल्या काडीने ढुम असा ताल धरून प्रत्येक भक्त खालील मंत्र म्हणत असे. “नमो म्यो हो रें गे क्यो ... ढुम.” मुख्य ढोल वाजवणारा कषायवस्त्रे नेसून एका मोठ्या ढोलापुढे बसून जाडशा ठोक्याने ढुम आवाज करत असे.

आम्ही पर्य़टकही जेव्हा आत गेलो तेव्हा त्याने आम्हाला भिंतीलगत ठेवलेली झारा-सदृश तालवाद्ये हाती घेण्यास सांगितली. ती घेऊन आम्ही त्या भक्तांसोबत खाली मांडी घालून बसलो. सुमारे पाच-दहा मिनिटे तोच मंत्र अत्यंत समरसून म्हटला. याचे पर्यवसान असे झाले की मग पुढे बसमधेही वारंवार मजेने तो म्हटला जात असे.


मठाला सिंहद्वार होते. पॅगोड्याभोवतालच्या शिल्पांमधे आम्हाला एक परीही टांगलेली आढळली. तेव्हा, बुद्ध जातक कथांमधे सिंहद्वार आणि परी कुठून आली याचा आता शोध घ्यायला हवा.


तिथून निघालो ते आम्ही खडकावरले उद्यान ऊर्फ रॉक गार्डन बघायला गेलो. एका नैसर्गिक धबधब्याच्या दोहो बाजूस सुरेख पायर्‍या पायर्‍यांचे टप्पे बांधून सुंदर उद्यानाची रचना त्या धबधब्याच्या दुतर्फा केलेली होती. एका बाजूने वर चढून, हवे तर अधे मधे पुलांवरून तीर बदलत, आम्ही दुसर्‍या तीरावरून खाली उतरलो. हा सर्वच अनुभव अगदी प्रसन्न करणारा वाटला.
.

No comments: