२०१०-०२-११

राजा भर्तृहरी

राजा भर्तृहरी

राजा भर्तृहरी एक महान कवी होता. संस्कृत साहित्यातील एक विख्यात तत्त्वचिंतक होता. अवंती-उजैनीचा राजा होता. ज्याचे नावे विक्रमसंवत ओळखले जाते, त्या सम्राट विक्रमादित्याचा वडील भाऊ होता. नीतिशतक, शृंगारशतक, वैराग्यशतक या शतकत्रयाद्वारे त्याने संस्कृत साहित्याला अलंकृत केलेले आहे. भारतीय जनमानसावर, या शतकत्रयीतील सुभाषितांची अमिट छाप आहे. संस्कृत व्याकरणावरील त्याचा "वाक्यपदीय" हा ग्रंथही तेवढाच विख्यात आहे. अशा राजा भर्तृहरीची ही परिचयकथा आहे.


हे आहे भर्तृहरीचे मंदिर. अलवार-जयपूर रस्त्यावरील सारिस्काघाटीत ३५ किलोमीटरवर एक तपोभूमी आहे, जिथे हे मंदिर आजही अस्तित्वात आहे. भर्तृहरीने आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस इथेच व्यतीत केले होते. दरसाल ऑगस्ट महिन्यात इथे यात्रा भरते.

राजा भर्तृहरीच्या दरबारात एकदा एक साधू आला. त्याने एक दिव्य फळ राजाला दिले. सांगितले की जो कुणी हे फळ खाईल तो आरोग्यसंपन्न होईल. दीर्घायू होईल. राजाचे आपल्या पिंगला नावाच्या राणीवर नितांत प्रेम होते. म्हणून त्याने ते फळ राणीस दिले. तिचे प्रेम सेनापतीवर असल्याने तिने ते फळ सेनापतीस दिले. सेनापतीचे प्रेम एका राजनर्तिकेवर होते. त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटले की, असे दिव्य फळ खाण्याकरता राजा भर्तृहरीच सर्वात योग्य व्यक्ती आहे. म्हणून तिने ते  दरबारात आणून राजास नजर केले. पुढे राजास सर्व हकिकत समजली. राजा अतिशय उद्विग्न झाला. त्याला संसाराप्रती वैराग्य उत्पन्न झाले. म्हणून त्याने आपला धाकटा भाऊ विक्रमादित्य यास राज्यशकट सोपवला आणि स्वत: वानप्रस्थाश्रमास रवाना झाला.

या सर्व हकीकतीस त्याने नीतीशतकातील एका सुभाषितात गुंफून ठेवले आहे आणि सर्व संबंधित व्यक्तींचा त्याच सुभाषितात धिक्कारही केला आहे. ते सुभाषित खालीलप्रमाणे आहे.

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता ।
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ॥
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या ।
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥

म्हणजे:

करतो ध्यान जिचे सतत मी, अनुरक्त मजवर न ती ।
जडले प्रेम जयावरी तिचे,  त्याचीही प्रिया वेगळीच ॥
मजकरता सुकवित यौवनही ती, तिजला न तो आवडे ।
धिक्‌ तिस, त्यास, मदनास, हीस; वाटे माझे मला वावडे॥



1 टिप्पणी:

Naniwadekar म्हणाले...

राजा भर्तृहरीवर १९४४ साली राजस्थानच्याच खेमचन्द प्रकाशचे संगीत असलेला 'भरथरी' नावाचा चित्रपट निघाला होता. तो चित्रपट उपलब्ध असावा, पण खात्री नाही कारण मी चित्रपट पहात नाही. त्यातली गाणी निश्चितच उपलब्ध आहेत. बरेच हौशी लोक जेव्हा सर्वोत्कृष्ट दहा संगीत-चित्रपटांची निवड करतात तेव्हा त्या यादीची सुरवात 'बरसात' (१९४९) किंवा 'तराना' (१९५१) पासून होते. क्वचित रटाळ संगीताचा देवदास (१९३५) त्याच्या कीर्तीमुळे त्या यादीत शिरतो. पण स्वातंत्र्यपूर्व सिनेसंगीत इतक्या उच्च प्रतीचे होते की नन्तर लता झाली नसती तर दहाच्या दहा चित्रपट त्या काळातून निवडता आले असते. त्या सुवर्णकाळातल्या मधुर संगीताच्या दाटीतही 'भरथरी' एकदम उठून दिसतो, आणि त्याचा उल्लेख उत्तम गाणी असणार्‍या सिनेमांच्या यादीत करावाच लागणार. एक लता सोडली तर मला अमीरबाई कर्नाटकीइतकी दुसरी कुठलीच गायिका आवदत नाही. तिची ३ बहारदार एकल गीते या सिनेमांत आहेत, आणि एक सुरेन्द्रबरोबर युगलगीत : 'भिक्षा दे दे मैया पिंगला, जोगी खड़ा है द्‌वार'. सुरेन्द्रची गाणीही आहेत. यांच्या ज़ोडीला जहाँआरा कज्जनची दोन अशक्य कोटीतली गाणी भरथरीमधे आहेत. दीनानाथ किंवा वसन्तरावांबद्‌दल बोलताना विशेषणांची खैरात करण्यावाचून मार्गच नसतो, तीच गत खेमचन्दची. कज्जन ही मादन थिएटरच्या सिनेमांत १९३२-३३ कडे गात असे, पण ते संगीत आज़ उपलब्ध नाही. या दोन गाण्यांपलिकडे कज्जनची किती गाणी मिळतात, याचा शोधच घ्यावा लागेल. मी या दोन गाण्यांची ओळख काही वर्षांपूर्वी करून दिली होती. बाईची स्मृती तेवत ठेवायला ही दोन गाणीच पुरेशी आहेत.
घूँघट पट नाही खोलूँ : http://tinyurl.com/kajjandh
कूकत कोयलिया कुंजन में : "With Khemchand, miracles were a matter of habit." http://tinyurl.com/kookatbh

- डी एन