20091027

मेवाडदर्शन-९

मेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर

जयपूरचा इतिहास

जोधाबाईः उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा, उर्फ हरखा बाई (जन्मः ऑक्टोंबर १, १५४२, मृत्यूः १६२२)

जोधाबाई उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा, उपाख्य हरखा बाई, ही एक राजपूत राजकन्या होती, जी मुघल सम्राज्ञी झाली. कच्छ्वाह राजपूत, अंबरचे राजे राजे भारमल यांची ती ज्येष्ठ कन्या होती.

विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारातील नवरत्ने होती धन्वंतरी, क्षपणक, अमरसिंह, शंकू, वेताल भट्ट, घट कर्पर, वराह मिहीर, वररुची आणि कालिदास. त्याचप्रमाणे अकबराच्या दरबारातही नवरत्ने असायची असा समज आहे. ती नवरत्ने म्हणजे अकबरनामा, आईने-अकबरी या ग्रंथांचा रचयिता तसेच बायबलचा पर्शियन अनुवादकार अबुल फजल; लीलावती या हिंदू गणितविषयक ग्रंथाचा अनुवादकर्ता, कवी फैझी, जो अबुल फजल याचा भाऊही होता; मियाँ तानसेन उर्फ तन्ना मिश्रा; महेशदास उर्फ राजा बिरबल, हा एक कवीही होता त्याच्या रचना भरतपूरच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत; राजा तोडरमल जो अकबराचा महसुली विभाग सांभाळत असे व ज्याने प्रमाणित वजने व मापे सुरू केली; अंबरचा राजा मानसिंग; अब्दुल रहीम खान-ए-खाना हा अकबराच्या कुमारवयातील पालनकर्त्या बैरामखानाचा मुलगा होता; फकीर अझिआओ-दिन हा गूढवेत्ता आणि मुल्लाह दो पिआझा हा विद्वान.

जोधाबाई या नवरत्नांतील राजा मानसिंग यांची आत्या. जोधाबाईचा अकबराशी विवाह झालेला असल्याने अंबरच्या राजांना मुघल दरबारात मानाचे स्थान प्राप्त झालेले होते. अकबर मानसिंगास “फर्जंद” म्हणजे पुत्र मानत असे. त्यास त्याने ७ हजारी (सर्वोच्च) मनसबदारी दिलेली होती. अकबराचे वतीने महाराणा प्रताप यांचा, हल्दीघाटीत, याच मानसिंगाने पराभव केला होता. मानसिंगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र भाऊसिंग गादीवर बसला. भाऊसिंगांनंतर त्यांचे पुतणे, मिर्जाराजे जयसिंग अंबरचे राजे झाले.

मिर्झा राजे जयसिंग (जन्मः जुलै १५, १६११, मृत्यूः ऑगस्ट २८, १६६७)

जयसिंग वयाच्या १० व्या वर्षी अंबरचे राजे झाले. पुढे १६२७ मधे शहाजहानच्या राज्यारोहणप्रसंगी, जयसिंगांच्या दक्षिणेतील सुभेदाराने -खान जलाल लोदी- याने बादशाही सत्ता झुगारून दिली असता जयसिंगांनी ते बंड शमवले. याखातर त्यांस ४ हजारी सरदार करण्यात आले. त्यानंतर १६३६ मधे शहाजहानने दक्षिणेतील सल्तनतींविरुद्ध उघडलेल्या अभियानांतर्गत गोंडांवरील लढाईत गाजवलेल्या शौर्याखातर जयसिंगांस ५ हजारी सरदार करण्यात आले. १६३८ मधे कंदाहारच्या किल्ल्यावर विजय मिळवतांना शहाजहानने ५०,००० फौज जमा केलेली होती. या प्रसंगी जयसिंगांस “मिर्झाराजे” हा किताब देण्यात आला. १६५७ मधे शहाजहान गंभीररीत्या आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमधे सत्तासंघर्ष सुरू झाला. गुजरातमधील पुत्र मुराद व बंगालातील पुत्र शुजा यांनी स्वतःच स्वतःस सम्राट घोषित केले. आग्र्यातील सर्वात मोठा मुलगा दारा याने जयसिंगांस ६ हजारी सरदार करून, दिलेरखान पठाण सोबत आपला मुलगा सुलेमान याचेबरोबर बंगालात शुजाचे बंड शमवण्याकरता पाठवले. दरम्यान औरंगजेबाने धर्मत आणि समूगढच्या लढाया जिंकून आग्र्यावर ताबा मिळवला होता. हे पाहून जयसिंग व दिलेरखान यांनी औरंगजेबाची सत्ता मान्य केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ७ हजारी (सर्वोच्च) सरदार नेमले. पुढे १६५९ मधे शिवाजीने अफजलखानाचा वध केला आणि १६६३ मधे शाहिस्तेखानाची बोटे कापली. नंतर १९६४ मधे शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ४४ हजाराची फौज देऊन शिवाजीच्या बंदोबस्तास पाठवले. पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी महाराजांना आग्र्यास जावे लागले. मात्र विजापूरच्या मोहिमेस अपेक्षित यश न मिळाल्याचे कारण देऊन औरंगजेबाने जयसिंगांस खूप अपमानित केले. पुढे औरंगजेबाच्या आज्ञेने जयसिंगांस विषप्रयोग करण्यात आला असा प्रवाद आहे. या सार्‍या प्रकारामुळे जयसिंगांच्या मुलांच्या उन्नतीसही खीळ बसली. जयसिंगांनंतर त्यांचे पुत्र रामसिंग (पहिला) मिर्जाराजे झाले, तर त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र बिशनसिंग. बिशनसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सवाई जयसिंग राजे झाले.

महाराजा सवाई जयसिंग (द्वितीय) (जन्मः नोव्हेंबर ३, १६८८, मृत्यूः सप्टेंबर २१, १७४३)

उंच अवकाशातून राजस्थान पाहत पाहत खाली येत गेल्यास, सर्वात वयस्कर अशा अरवली पर्वतांच्या बेलाग कड्यावर वसलेले अंबर (amber, आम्बेर, आमेर) व जयगड किल्ले दृष्टीत भरू लागतात. तत्कालीन आसपासच्या परिसरावर राज्य करण्यास योग्य अशा प्रकारे उंचावर, अंबरात वसवलेला डोंगरी किल्ला तो “अंबर”. तीच तत्कालीन अंबर साम्राज्याची राजधानी होती. अंबर राज्यात सूर्यवंशी राजपूत असलेल्या कच्छवाह घराण्याचे राज्य होते. १६९९ मधे महाराज बिशनसिंग यांचा देहांत झाला त्यावेळी त्यांचे पुत्र महाराज जयसिंग, जे त्यावेळी केवळ ११ वर्षे वयाचे होते, ते अंबरच्या गादीवर बसले. “खेलना” इथली लढाई जिंकल्याखातर बक्षिसी म्हणून औरंगजेबाने त्यांना “सवाई” हा किताब दिला म्हणून ते सवाई जयसिंग म्हणूनही ओळखले जातात. हेच महाराजा जयसिंग (द्वितीय), मिर्जाराजे जयसिंग यांचे पणतू होत. १७४३ मधे ५४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार जयपूरच्या उत्तरेस असणार्‍या गायतोड येथील राजेशाही घाटावर करण्यात आला. त्यांचे नंतर त्यांचे पुत्र ईश्वरीसिंग गादीवर बसले.

१६७९ मधे औरंगजेबाने बसलेला जिझिया कर १७२० मधे सम्राट महंमद शाह यांचेकरवी रद्द करवून घेण्यात सवाई जयसिंग द्वितीय, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गयेत हिंदू यात्रेकरूंवर बसवलेला करही यांचे शब्दाखातरच हटवण्यात आला. यांनीच अनेक शतकांनंतर पुन्हा अश्वमेध (१७१७) आणि वाजपेय (१७३४) यज्ञ केले. ते निंबार्क संप्रदायाचे अनुयायी होते. सतीची प्रथा बंद करणे, लग्नांतील खर्चिकतेस आळा घालणे इत्यादी समाजोद्धारक कार्यांमुळे ते लोकप्रिय झाले.

सम्राट महंमद शाह रंगीला यांच्या दरबारातील, शाही प्रस्थानास मुहूर्त शोधण्याकरता झालेल्या कालनिश्चितीबाबतच्या चर्चेस साक्षी राहिल्यानंतर महाराज जयसिंग यांना अवकाशवेधांच्या अभ्यासाची गरज भासली. अशा प्रकारच्या अभ्यासास प्रोत्साहन देऊन त्यांनी पाच अवकाशनिरीक्षण वेधशाळा प्रस्थापित केल्या. दिल्ली, मथुरा (त्यांच्या आग्रा प्रांताची राजधानी), बनारस, उज्जैन (त्यांच्या माळवा प्रांताची राजधानी) आणि जयपूर येथे त्या वेधशाळा स्थापन केलेल्या होत्या. त्यांना “यंत्रमंदिर” म्हणून ओळखले जात असे. त्याचा अपभ्रंश होत होत त्यांना हल्ली “जंतर-मंतर” म्हणून ओळखले जाते. त्यापैकी फक्त जयपूरची वेधशाळा अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. हिदू व मुस्लीम अवकाशवेध शास्त्रांवर आधारित बांधलेल्या या वेधशाळा ग्रहणे व तत्सम अवकाशीय घटनांचे पूर्वभाकीत करू शकत. त्यांत “रामयंत्र” (मध्यभागी गोलाकार स्तंभ असलेली आकाशास खुली दंडगोलाकृती इमारत), “जयप्रकाशयंत्र” (अंतर्वक्र, अर्धगोलाकृती इमारत), “सम्राटयंत्र” (प्रचंड संपातदर्शी अर्धवर्तुळाकृती इमारत), “दिगांशयंत्र” (एका गोल स्तंभाभोवती उभारलेल्या दोन वर्तुळाकार भिंती असलेली इमारत) आणि “नारीवलययंत्र” (दंडगोलाकृती भिंतीच्या आकाराची इमारत) या यंत्रांचा समावेश होतो. त्यांनी युरोपातून पाचारण केलेले ख्रिस्ती अवकाशशास्त्रज्ञ वापरत असत त्यांपेक्षाही, या वेधशाळांतील उपकरणे व तंत्रे जास्त प्रगत आणि उच्च प्रतीची होती.

जयनगर (जयपूर) नगर वसवणे ही जयसिंगांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती. विद्याधर भट्टाचार्य नावाच्या बंगाली स्थापत्यकलानिपूण शिल्पशास्त्र्याच्या नियोजनाखाली १७२७ मधे पायाभरणी करून नव्या राजधानीचे काम सुरू झाले. १७३३ मधे संपूर्ण नगर सज्ज होऊन, कच्छवाहांची राजधानी अंबर मधून जयनगरात स्थलांतरित करण्यात आली. केवळ सहा वर्षांत जयपूरसारखे नियोजनबद्ध नगर राहण्यायोग्य तयार करणे, ही आजच्या निकषांनीही अतुलनीय कामगिरीच ठरावी. ३,००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक संस्कृतींच्या शोधात सापडलेल्या शहरांप्रमाणे, संस्कृत शिल्पसूत्रांबरहुकूम, नगरनियोजन केलेल्या औरस-चौरस संरचनेत जयपूर नगर वसवलेले आहे.

वरील नकाशा पाहा. हा नकाशा राजस्थान सरकारच्या पर्यटनविभागाने २००४-२००५ मधे प्रसिद्ध केलेल्या नकाशातील जुन्या शहराचा केवळ तटबंदीतील भाग कापून, १६ अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवून तयार केलेला आहे. नजरेत भरणारी नगररचना, भौमितिक विभागणी आणि शिस्तबद्ध रीतीने केलेली रस्त्यांची आखणी ही याची वैशिष्ट्ये आहेत. सुरजपोल ते चॉंदपोल रस्ता पूर्व-पश्चिम नसून १६ अंश दक्षिणेकडे कललेला आहे. याचे काय कारण असावे? जे असेल ते निश्चितस्वरूपाने खगोलशास्त्रीय असावे असे मला वाटते.

हल्ली महाराज भवानीसिंग हे जयपूरचे महाराज आहेत. ते जयपूरच्या नगर महालात राहत असतात. महालावर दोन झेंडे फडकत असलेले पाहून मी मार्गदर्शकास त्याचे कारण विचारले असता त्याने महाराजांच्या “सवाई” या बिरुदाचा निर्वाळा दिला. एक पूर्ण, आणि त्याचेच वर, एक चतुर्थांश आकाराचा दुसरा, असे दोन ध्वज राजप्रासादावर फडकत असतात. १९७१ मधे संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यावर ही बिरुदे नावाचीच काय ती उरलेली आहेत. मात्र महाराज भवानीसिंग यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात गाजवलेल्या शौर्याखातर त्यांना भारत सरकारने “महावीरचक्र” देऊन सन्मानित केले आहे. पुढे १९९४ ते १९९८ दरम्यान ते भारताचे ब्रुनेईतले उच्चायुक्तही राहिलेले होते.

इथले रेल्वेस्टेशन पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण टोकाला आहे. जयपूर नगर दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी नगर’ आणि तटबंदीच्या दक्षिणेला वसलेले नवे जयपूर नगर. जयपूर शहराच्या उत्तरेला ’अंबर’/’आंबेर’/’आमेर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग त्या गुलाबी दगडांनी बांधलेल्या असोत वा नसोत, त्यांना गुलाबी रंग देणे कायद्याने बंधनकारक केलेले असल्याने, शहराचा गुलाबी (खरे तर गेरुआ म्हणजे गेरूचा) रंग सर्वदूर भरून राहिलेला दिसतो. राजस्थानात दरवाज्याला ’पोल’ म्हणतात. गुलाबी शहराच्या पश्चिमेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’चांद’पोल म्हणतात, तर पूर्वेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’सूरज’पोल म्हणतात. दोन्ही दरवाजांना जोडणारा आडवा रस्ता गुलाबी शहरातला मुख्य रस्ता होय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुलाबी नगर उभ्या-आडव्या रस्त्यांवर प्रशस्तपणे वसलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी ’इशारलट’ नावाचा उंच जयस्तंभ आहे. महाराज ईश्वरीसिंग यांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून तो जयपूर शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आहे. गुलाबी शहराच्या अतिपूर्वेला एक उंचसा डोंगर आहे. त्यावर एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते म्हणजे ’गलताजी’ उर्फ गालव मुनींचे मंदिर. इथून, चौरस सुनियोजित रस्त्यांतून वसलेले जयपूर नगर अतिशय रमणीय दिसते. गुलाबी शहराच्या दक्षिणेकडील तटबंदीतून मुख्य शहराकडे जाणारे तीन प्रमुख रस्ते आहेत. अजमेर रस्ता ’अजमेरी गेट’ मधून बाहेर पडतो. ’मोतीडुंगरी” उर्फ ’एमडी’ रोड मोतीडुंगरी राजप्रासादाकडे घेऊन जातो. डुंगरी म्हणजेच टेकडी. हा राजप्रासाद उंच टेकडीवर बांधलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो.

सकाळीसच आम्ही जयपूर मधील नगरप्रासाद पाहण्याकरता जाऊन पोहोचलो. राजमहाल चौसोपी; प्रशस्त; पत्थरातील कोरीव काम, रंगकाम, नक्षीकाम आणि मीनाकाम (काच, आरसे, निरनिराळ्या रंगच्छटांचे दगड तसेच रत्ने यांचे शुभ्र संगमरवरावर केलेले जडावकाम) यांनी अलंकृत आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असाच आहे. पिढ्यानुपिढ्यांच्या समृद्धतेने सतत संपन्न होत राहिलेल्या अनेक राजप्रासादांचा तो समूह आहे.

राजवाडा कळस-कमानींनी ठायी ठायी अलंकृत केलेला आहे. पुष्पवाटिकांनी प्रफुल्लित केलेला आहे. विस्तीर्ण अंगणांनी प्रासादाच्या भव्यतेत भर घातलेली आहे.

मोठमोठ्या भिंतीवर बहारदार नक्षिकाम करून, महिरपी, कमानींनी सजवून महालास कलात्मकता आणलेली आहे. देवड्या, ओसर्‍या, दिवाणखाने, दालने, कक्ष, इत्यादी सारा परिसर पाहता पाहता आपण आणखीही बराचसा भाग पाहिलेलाच नाही हेही लक्षात येऊ लागले. सारा राजवाडा इतमामाने पाहायचा तर आवश्यक असणारा वेळ आमच्याकडे नव्हता. (खरे तर कुठल्याच पर्यटकाकडे इतका वेळ नसतो की, शतकानुशतके समृद्ध होत राहिलेला नगरप्रासाद भेटीच्या तुटपुंज्या वेळात, मनाचे समाधान होईस्तोवर पाहता येईल.)

राजप्रासादाच्या समोरच आहे जंतरमंतर म्हणजेच “यंत्रमंदीर”. आत प्रवेश करताच मार्गदर्शकाने लघुसम्राटयंत्रावर तत्कालीन वेळ, सूर्यकिरणांमुळे मधल्या भिंतीच्या वक्राकार-संगमरवरी-उताण्या-कमानींवर पडणार्‍या सावलीच्या स्थानावरून, कशी सांगता येते ते कृतीसह दाखवून दिले. कमानींवर खोदलेल्या मापनरेषा, २० सेकंदापर्यंतच्या कमीतकमी फरकाने, वेळ वर्तवू शकत होत्या. तिथली अनेकविध यंत्रे कशी वापरायची ते शिकण्याकरता तिथे राहून संशोधन करणारे विद्यार्थी आम्ही पाहिले. त्यांच्या पासंगास पुरेल एवढाही वेळ आमच्यापाशी नव्हता. तरीही आपल्या संस्कृतिक समृद्धतेच्या वारशाचे भरभक्कम पुरावे पाहून मन भरून आले. असलेच काहीतरी दैदिप्यमान आपल्यालाही करता यावे अशी उमेद जागली. याच्यासारख्या स्थळांच्या पर्यटनाने साधण्यासारखे यापरता जास्त काय असू शकेल.

जंतरमंतर नंतर जेवण उरकून आम्ही जयपूरच्या जलमहाच्या दिशेने कूच केले. ऊन तापू लागले होते. जलमहालापर्यंत जाता येणारच नव्हते. मात्र तळ्याच्या पाळीवरूनच जलमहालाचा फोटो काढता आला.

मग आम्ही अंबरच्या किल्ल्याकडे गेलो. बस जाऊ शकत होती तोपर्यंत बसने आणि मग पुढे जीपने. मग खाली पायउतार होऊन किल्याच्या दिशेने चालू लागलो. तटबंदीच्या काठाशी एक युवक पारंपारिक राजस्थानी पोशाखात एक स्थानिक वाद्य, तालीन होऊन वाजवत असलेला दिसला. गाणेही ओळखीचे होते. नागीण सिनेमातले “मेरा तन डोले, मेरा मन डोले, मेरे दिल का गया करार”. आम्हीही ऐकू लागलो. त्याचे चलचित्रणच केले. मग त्याला विचारले की ह्या वाद्याला काय म्हणतात? तो म्हणाला “रावणहट्टा!”.

माझा मावसभाऊ अजित डोंगरे आमच्या सोबत होता. तो बासरी-पावा खूप छान वाजवतो. त्याला संगीतातली बर्‍यापैकी जाण आहे. मागे तो म्हणाला होता की अशा प्रकारचे काही वाद्य अस्तित्वातच नसावे. म्हणून मी त्याला पुराव्यानिशी “रावणहट्टा” दाखवले. त्याने ते विकत मिळू शकेल का विचारले. तो विकत आणून द्यायलाही तयार झाला. आम्ही किल्ला पाहून येईपर्यंत त्याने एक वाद्य आणून ठेवले होते. पण त्याच्या तारा, तुंबा आणि धनुष्य यांचा मेळ योग्य प्रकारे बसत नव्हता म्हणून तो प्रयास मग तसाच सोडून द्यावा लागला. आमेर किल्ल्याचे तपशीलवार वर्णन मी माझ्या यापूर्वीच्या जयपूरच्या प्रवासवर्णनात आधीच करून ठेवलेले असल्याने इथे पुनरावृत्ती करत नाही.

मेवाडदर्शन-८

मेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर, चोखी धानी (जयपूर)

सकाळी सकाळी उठून तयार होऊन आम्ही सगळे बाहेर उभे होतो. मग वीस सीटर कँटर गाड्या आल्या. स्थानापन्न होऊन आम्ही अभयारण्याकडे निघालो. दवबिंदूंनी ओलसर झालेले गवत, धूसर प्राचीतून अलगद डोकावत असणारे सूर्यबिंब, मंद गार वारा अशा उत्साहवर्ध वातावरणात कॅमेरे सज्ज करून आम्ही हळूहळू अरण्यात शिरलो. समोरच रणथंभोरचा किल्ला सारखा दर्शन देत होता. तो चढून जाणे सहलीत अंतर्भूत असायला हवे होते असे वाटू लागले. खूप मज्जा आली असती. असो. सध्यातरी त्याच्या सान्निध्यातूनच आम्ही वाट चालत होतो. अचानक हिरवळीत, झाडाझुडूपांत मोर दिसू लागले. झाडावर बसलेले एक घुबडही दिसले. एका नैसर्गिक जलाशयाच्या तीरावर उगवत्या हिवाळ्याची प्रसन्न सकाळ अलगद अवतरत होती. इथे नक्कीच काहीतरी पाहायला मिळणार म्हणून कँटर थांबले. मार्गदर्शकाने हातावर बिस्किटाचे तुकडे धरले. आणि काय आश्चर्य, सोनचिडिया म्हणून ओळखला जाणारा एक कावळ्याहून किंचित लहान आकाराचा दिमाखदार पक्षी हातावर बसून ते तुकडे टिपू लागला. त्याच सोनचिडीयाचा हा फोटो.


सारे दृश्यच भारलेले होते. सकाळच्या अरण्यातले तर्‍हतर्‍हेचे आवाज, किलबिल अनोखी वातावरणनिर्मिती करत होते. आम्ही पुढे निघालो. वाघ दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र वाघ दिसला नाही. काळतोंडी माकडे भरपूर दिसली. तसेच अस्ताव्यस्त पसरलेले वटवृक्षही इतस्ततः विखुरलेले दिसत होते. आतापर्यंत पाहिलेल्या मेवाडातील भूमीवर एवढे विशालकाय वृक्षच आम्ही बघितलेले नव्हते. इथे मात्र भव्य वडाची झाडे सर्वत्र दिसून येत होती. दोन तासांनी आम्ही परतलो.

जेवण झाल्यावर दुपारी जयपूरच्या “चोखी धानी”मधे जायचे होते. जेवणही तिथेच होणार होते. हाही प्रवास तसा मोठाच होता. मात्र आता एखादा तास वेळ होता. शेजारीच हस्तकलेच्या वस्तुंचे एक दुकान होते. तिथे जाऊन मनसोक्त खरेदी केली. कोरीव लाकडाच्या वस्तू, कपडे, रणथंभोरच्या शिक्क्यांचे, बोधचिह्नांचे रेशमी भरतकाम केलेले टी-शर्ट, बांधणीचे कापड इत्यादी.

मराठीत आपण राजाच्या गावाला “राजधानी” म्हणतो. हा शब्द मराठीला राजस्थानी भाषेची मिळालेली देणगी आहे. धानी म्हणजे गाव. राजाचे गाव म्हणून राजधानी. तसेच चोखीधानी म्हणजे चोख, खरेखुरे गाव. नमुनेदार राजस्थानी गाव. मात्र “चोखीधानी” या नावाच्या हॉटेलांचा एक गटच आहे. आणि निरनिराळ्या शहरांतून तो “चोखीधानी” हॉटेल चालवत असतो. हल्लीच पुण्याजवळच्या “चोखीधानी”त जाऊन आल्याचे, आनंद घारे यांचे वर्णन वाचल्याचे आठवते. मागे मी इंदौरजवळच्या “चोखीधानी”तही गेलो होतो त्याचीही आठवण जागवली गेली. दक्षिणेकडून जयपूर शहरात शिरतांना, टोंक रस्त्यावर डाव्या बाजूला चोखीधानी वसलेले आहे.
.

मेवाडदर्शन-७

मेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर, रणथम्भोर

पुष्करचे आमचे “हॉटेल मास्टर्स पॅराडाईज” कलाकुसरीने परिपूर्ण होते. ब्रह्मदेवाच्या मंदिरात कॅमेरा नेता येत नसल्याने, आम्ही पुष्करला काढलेल्या फोटोंपैकी बहुतेक फोटो या हॉटेलातीलच आहेत. तिथे तरण तलाव होता. कलापूर्ण बैठका, दिवे, स्तंभ, शिल्पे इत्यादींनी सजवलेले, हिरव्यागार हिरवळींनी परिपूर्ण, असे उद्यान होते. आवळ्या, पपयांनी लगडलेली झाडे होती. सकाळी उठून फेरफटका करतांना आवळ्यांच्या झाडांखाली हिरव्या-पोपटी, ताज्या आवळ्यांचा सडाच पडलेला होता. आवळे खाण्याची परवानगी विचारल्यावर, हवे तेवढे आवळे घ्या असे सांगण्यात आले होते. म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढे आवळे चाखले, जमतील तेवढे सोबत घेतले. तरीही जमिनीवर सडा पडलेला दिसतच होता. धन्य ते आवळे आणि धन्य त्या बागेचे करविते. माळीकाका सर्वप्रकारची फुले खुडून हार तयार करत बसलेले होते. दवबिंदूंनी ओल्या झालेल्या हिरवळीवर मोठमोठी कासवे मजेत विहरत होती. वातावरणात प्रसन्नता कशी आणता येते याचा जणू जिताजागता वस्तुपाठच होता तो. मी अनेक हॉटेलांत आजवर राहिलेलो आहे, तरीही बाहेर पडतांना “तुमचे हॉटेल चांगले आहे हो!” असा अभिप्राय व्यक्त करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.

या चित्रात हॉटेलातील खोलीच्या भिंतीवरील, सळईच्या जोडकामातून घडवलेली युवती, आवळ्यांनी लगडलेले झाड, दगडातून कोरून तयार केलेला बाक आणि हिरवळीवर विहरणारे कासव दिसत आहे.

नंतर आम्ही पुष्कर सरोवरावर गेलो. सावित्री घाटावर सचिनने नेमलेल्या पुजार्‍याकरवी इच्छुकांनी पूजा केली. मात्र पुष्कर तलावात पाणीच नव्हते. साफसफाईचे काम सुरू असल्याने पाणी दूरवर अडवून ठेवलेले होते. जे.सी.बी. यंत्रे दगड-माती-गाळाची उठाठेव करत होती. आम्हाला वेळ कमी असल्याने पुष्कर सरोवराच्या पाण्यात डुबकी घेणे, किमान पाय बुडवणे हे काही साधले नाही. मग आम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतले. उंटगाड्या बघितल्या. उंट पाहिले. उंटावर बसून घेतले. ऊंटांच्या कातड्याच्या जूती, मोजड्या पाहिल्या, विकत घेतल्या. आज रणथंभोरपर्यंतचा मोठा प्रवास करायचा असल्याने मग आम्ही बसमधे बसून रणथंभोरकडे कूच केले.

रणथंभोरला पोहोचता पोहोचता रात्र झाली. आम्ही हमीर रिसॉर्ट ह्या प्रसिद्ध हॉटेलात उतरलेलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी रणथंभोरच्या अभयारण्यात कँटरने फेरफटका करायचा असल्याने आज लवकरच निजायला लागणार होते.
.

मेवाडदर्शन-६

पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर

सकाळीसच बाहेर पडून आम्ही चित्तौडगढाची वाट चालू लागलो. चित्तौडगढला पोहोचल्यावर हॉटेल मीरामधे आम्ही ताजेतवाने झालो. तिथे पोहोचून सहा सीटर रिक्षा केल्या. कारण बसला चित्तौडगढात फिरण्याची परवानगी नव्हती. या रिक्षा आपल्याकडच्या तीन सीटर रिक्षांप्रमाणेच असून आपल्याकडे जी सामानाकरता जागा असते ती पाठीमागून उघडी ठेवून पाठीकडे तोंड करून बसण्याची आणखी तीन व्यक्तींची सोय केलेली असते. चित्तौडगढात अशाच रिक्षा सर्वत्र फिरतांना दिसत होत्या. सर्वात प्रथम आम्ही कुंभा महालाकडे गेलो. त्याच्या ओवरीतच मार्गदर्शकाने इथल्या भागाचा इतिहास सांगितला. राणा कुंभा हे सूर्यवंशी होते. सूर्योदय पाहण्याची त्यांची प्रथा होती. याकरता खास जागा तयार केलेली असे. तिला सूरज-गोखरा म्हणत. ओवरीतूनच तो कुंभा महालचा सूरज गोखरा दिसत होता. मग दिसला तो कुंभा महालाचा चबुतरा. इथून खाली गावाकडे जाण्याकरता भुयार आहे, असे मार्गदर्शक सांगत होता. आता मात्र ते बंद करून ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही पट्टा हवेली पाहिली. वाटेत एका जागी एक कमळपुष्पासारखा घडवलेला दगड दिसला. तो बहुधा कुठल्याशा पुष्करणीतील कारंजाकरता घडवलेला कारंजमुखाचा दगड असावा. इथेच आम्हाला एक मुंगूस ऐटीत फिरतांना दिसले होते.

विजयस्तंभाच्या सर्वोच्च कक्षातील छतावरील नेत्रदीपक कला कुसर.

मग पुन्हा रिक्षांमधे बसून आम्ही विजयस्तंभाकडे गेलो. इथेच सतीचे मैदान दिसले जिथे इतिहासात तीन वेळा जौहार करण्यात आलेला होता. गोमुखातून शिवास अभिषेक होतो ते मंदिर. त्याचे शेजारचा जलाशय, चित्तौडगढाची तटबंदी इत्यादी पाहून मग आम्ही विजयस्तंभावर चढून गेलो. स्तंभावरून संपूर्ण चित्तौडगढाचे विहंगम दृश्य नजरेत येते.

नंतर पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही पोहोचलो पद्मिनी महालाजवळ. तिथल्या एका महालाच्या प्रवेशद्वारावरही स्फटिकतुरा बसवलेला दिसला. हा मात्र काचेसारखाच पारदर्शक दिसत होता. तिथला राजप्रासाद पाहिला. मार्गदर्शकाने, अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचे दर्शन आरशातून कसे घडवण्यात आले त्याचे कृतीसह निरूपण केले.

अखेरीस रिक्षात बसून आम्ही कुंभास्वामी मंदिराचे प्रवेशद्वाराशी पोहोचलो. या संकुलात दोन मंदिरे आहेत. मीराबाईंचे आणि कुंभास्वामींचे. मीराबाईंच्या मंदिरासमोर मीराबाईंच्या गुरूंचे स्मारक बांधलेले आहे. समोरच मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंची मूर्ती छान सजवून ठेवलेली दिसत होती. कुंभास्वामी मंदिराच्या डाव्या भिंतीवरची गणेशाची मूर्ती छान दिसत होती, तिचा फोटो काढला. कुंभास्वामी मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे, ती बघितली. कुंभास्वामी मंदिराचे विशाल स्तंभ पाहत मग आत शिरलो. कुंभास्वामी मंदिरात मूर्ती तीन आहेत. बलराम, कृष्ण आणि राधा. परततांना “हॉटेल मीरा”पाशी पुन्हा बसमधे बसलो आणि पुष्कर मार्गावरील हॉटेल वूडलँडमधे जाऊन जेवण घेतले, आणि अजमेरचे रस्त्याला लागलो.

रात्री आठचे सुमारास अजमेरमधे पोहोचलो. शहरात अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे गुंतागुंतीचे नियम असल्यामुळे बस दूरवरच सोडावी लागली. तिथून एका लहान मेटॅडोरमधे बसून पंधरा मिनिटे प्रवास केल्यावर आम्ही ख्वाजा मुईनुद्दिन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या जवळपास जाऊन पोहोचलो. आजूबाजूच्या दुकानांतून कधी न पाहिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, पूजेचे साहित्य, जूती-मोजड्या इत्यादींची दुकाने दिसत होती. दर्ग्यात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. दर्ग्यात जातांना डोके झाकलेले असावे लागते म्हणून आणि तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. आपल्या मंदिरांतून पंडे असतात तसेच इथेही असतात. त्यांना “खादिम” म्हणतात.

सचिनतर्फेही एक खादिम नेमण्यात आलेला होता. मग ज्या कुणाला फुले, चादर इत्यादी चढवायचे होते त्यांनी ते खादिमाच्या सल्ल्याने विकत घेतले. दर्ग्यात जाण्याकरता तिकीट नाही. मात्र गर्दी खूपच असते. म्हणून काळजीपूर्वक निवडलेल्या रात्री साडेआठच्या वेळीही खूपच गर्दी होती. दर्गा चौरस खोलीत असून सभोवती स्टेनलेस स्टीलचे कठडे बांधलेले आहेत. कठड्यांच्या आत खादिम उभे असतात. बाहेरून प्रदक्षिणा घालत समोर समोर सरकत चालावे लागते. कठड्यास लगटून दर्ग्याकडे तोंड करून खूपशा स्त्रिया ख्वाजांना आपले गार्‍हाणे घालत होत्या व म्हणूनच तिथून हलायला तयारच नव्हत्या. तसेच भिंतींशी खेटून मुसलमानी क्रोशाच्या टोप्या घातलेले भक्तगण दर्ग्याकडे तोंड करून, निरनिराळी स्तोत्रे पुटपुटत होते, तर काही अनिमिष नेत्रांनी दर्ग्यास पाहत होते. या दोन ओळींमधून प्रवेश करणार्‍या भक्तांना कशीबशी वाट काढावी लागत होती. तिरुपतीच्या मंदिरात असतात तसे भक्तांना पुढे पुढे ढकलणारे पुजारीही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दर्ग्यास गार्‍हाणे घालत जागीच खिळून राहणार्‍या भक्तांचे पाठी सारीच गर्दी अडून राही.

त्यातच आम्हाला असे सांगण्यात आलेले होते की मुद्दाम गर्दी करून पाकीट-पर्स पळवण्याचे प्रकारही इथे घडत असतात. म्हणून आम्ही सगळेच सतर्क होतो. स्त्री-पुरूषांना एकाच चिरटोळीतून मार्ग काढावा लागत असल्याने खूपच लोटालोटी होत होती. हळूहळू पुढे सरकत आम्ही चाललो होतो. आम्ही गर्दीच्या रेट्याने सावकाश पुढे सरकत दर्ग्यातून बाहेर पडलो. बाहेर आमचा खादिम आमची वाटच पाहत होता. त्याने मंत्र पुटपुटत, प्रत्येकाचे गळ्यात गंडा बांधला. ऊर्दूत म्हटलेल्या त्या मंत्राचा अर्थ “आम्ही तुझ्या दरबारात लावलेली हजेरी कबूल करून घे” असा असावा, असा माझा समज झाला. मात्र सर्व धर्मी लोकांच्या श्रद्धेस पात्र ठरलेल्या बाबांच्या दर्ग्यास प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान मनात होते. दर्ग्याबाबत अधिक माहिती त्यांच्या http://khwajagharibnawaz.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रात्री नऊचे सुमारास आम्ही “हॉटेल मास्टर्स पॅराडाईज” या पुष्करच्या हॉटेलात पोहोचलो.
.

मेवाडदर्शन-५

चौथा दिवसः उदयपूर

सहेलियों की बाडी

हल्लीच्या स्वरूपातील “सख्यांचे घर” बाग, फतेहसागर तलावाच्या बंधार्‍याच्या पूर्वेस, महाराजा फतेहसिंग यांनी इसवीसन १८८८ मधे बांधली आहे. पूर्वी १६६८ मधे मिर्झाराजे जयसिंग यांनी जो मातीचा बंधारा इथे बांधलेला होता, तो २०० वर्षांनंतर वाहून गेल्यामुळे हा बंधारा महाराज फतेहसिंग यांना पुन्हा बांधून घ्यावा लागलेला होता. प्रफुल्लित कमळ पुष्करण्या, लांब रूंद हिरवळींच्या विस्तीर्ण बागा, तर्‍हतर्‍हेच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे यांनी ही बाग सदा बहरलेली दिसते. पुष्करण्यांच्या तीरांवर चहुबाजूंना संगमरवरी हत्ती आपल्या वळवलेल्या सोंडांतून पुष्करणीतील कमळांवर कारंजी उडवत असतात. पक्षांच्या चोचींतून, हत्तींच्या सोंडांतून आणि निरनिराळ्या सूप्त मुखांतून उत्साहाने उसळणारी कारंजी; फतेहसागर तलावाच्या बंधार्‍यातून नैसर्गिक गुरूत्वीय शक्तीने संचालित केलेली आहेत.

त्या कारंजांना उडवण्याकरता पंप वापरलेले नाहीत. कारंजी इथे इतक्या मोठ्या संख्येने आहेत की या बागेस “कारंजांचा बाग” असेही म्हटले जाते. या कारंजांच्या तुषारांनी सारी बागच भारित झालेली असते. पर्यटकास परी-राज्यातच फेरफटका करतो आहोत असा आभास होतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथेच झाल्याचे मार्गदर्शक सांगतात. इथेच पारंपारिक राजस्थानी पेहरावात फोटो काढवून घेण्याचीही सोय आहे. इथले सारे वातावरणच भारून टाकणारे, अविस्मरणीय आणि आनंदित करणारे आहे.

चित्रपट्टीत डाव्या बाजूची छत्री काळसर संगमरमराची बनवलेली असली तरीही धातूचीच वाटते. एवढे कौशल्य तिच्या घडणीत सामावलेले आहे. शिवाय इतक्या नाजूक, काटकुळ्या खांबांवर टनावारी वजनाची छत्री शतकानुशतके कशी तोलून धरली आहे हेही एक आश्चर्यच. उजव्या बाजूस दगडी हत्तीच्या सोंडेतून उसळणारे कारंजे दिसत आहे तर त्याचे खाली पक्षाच्या चोचीतून कारंजाचे तोंड घडवलेले दिसत आहे.

फतेहसागर तलावात तीन बेटे आहेत. चार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या मोठ्या बेटावर नेहरूपार्क आहे. त्यावर लोकप्रिय उद्यान, उपाहारगृह तसेच प्राणीसंग्रहालयही आहे. तिथे जाण्याकरता मोतीमगरीच्या पायथ्यापासून मोटार बोटींची सोय आहे. दुसर्‍या ०.०६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या लहान बेटावर सार्वजनिक उद्यान आहे. तिसर्‍या १.२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर “उदयपूर सौर वेधशाळा (Udaipur Solar Observatory-USO)” वसवलेली आहे.

नगरमहाल (सिटीपॅलेस)

उदयपूर नगर, महाराज उदयसिंगांनी वसवले. चित्तौड अकबराचे हाती गेल्यानंतर मेवाडची राजधानी उदयपूरच राहिली. या नात्याने इथे राजमहाल असणे साहजिकच आहे. मात्र मी भारतात इतरत्र पाहिलेल्या राजप्रासादांचे मानाने उदयपूरचा राजप्रासाद भव्य, दिव्य आणि वैभवशाली ठरला. इथल्या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली कलाकुसरींनी नटलेली दालने आणि इथली भव्यता. स्फटिकसज्जा (crystal galary) हे इथले आणखी एक आकर्षण. राजवाड्याच्या फतेह पोल मधून बाहेर पडल्यावर समोरच्या तलावात दिसणारा जलमहालही इथले आकर्षणच ठरावा. प्रथम आम्ही वरच्या मजल्यापर्यंत फिरून राजवाडा पाहिला. तिथे एका दर्शनीय प्रवेशद्वारावर बसवलेले स्फटिकतुरे सोन्यासारखे पिवळेधमक झळकत होते.

राजप्रासादाच्या भिंती काचा व निरनिराळ्या रंगछटांचे दगड जडवून सुशोभित केलेल्या होत्या. कित्येक ठिकाणी तर त्या त्या दालनाची प्रवेशद्वारे ऋतुमानानुसार रंगछटांनी सजवण्याकरता विशिष्ट रंगाच्या संगमरवराचा सुबकतेने वापर दिसत होता. काचा जडवून तयार केलेले मोर तर अद्वितीयच होते. शुभ्र संगमरवराचे सुंदर हत्ती प्रवेशद्वाराशी झुलत होते. या चित्रपट्टीत वरच्या बाजूला प्रवेशद्वारावरील संगमरमरी हत्ती, दारावरले स्फटिकतुरे, ऋतूनिदर्शक सज्जासजावट दिसत असून खालच्या बाजूला लाकडी चौकटीच्या सजावटीचे दार, काचा जडवलेली सालंकृत भिंत आणि रत्नजडित कलाकुसरीने घडवलेले मोराचे चित्र दिसत आहेत.

उदयपूरच्या नगरप्रासादातील दरबार दालन. इथेच आमचे चहापान झाले. नंतर श्राव्यसहल यंत्र सोबत घेऊन आम्ही दरबार दालन तसेच स्फटिक सज्जेची (क्रिस्टल गॅलरीची) प्रदक्षिणा केली.

मात्र इथे कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्याने चित्रे दाखवता येणार नाहीत. त्यांच्याच माहितीपत्रकावरचे एक चित्र इथे देत आहे त्यावरून दरबार दालनाची कल्पना करता येईल. दालनाच्या भवताली पत्रकारसज्जा असते तशी दीर्घा, पहिल्या मजल्यावर होती.

तिच्या प्रदक्षिणामार्गात जागोजाग स्फटिककाचेची तसेच पैलू पाडलेल्या काचेची (कट ग्लास) विविध भांडी (चहापानाची भांडी, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, हळदीकुंकवाची भांडी, कप, बशा, पेले, दारूचे प्याले, बाटल्या इत्यादी अनेकविध वस्तू), उपकरणे, बैठकीचे सामान (मेज, खुर्च्या, घडवंच्या, दिवाण, चौरंग, पाट, पायदाने, तिवया व इतर अनेक ज्यांची नावेही आठवत नाहीत) अशा नानाविध वस्तू काचेच्या कपाटांतून बैजवार मांडून प्रदर्शित केलेल्या होत्या. त्या त्या जागांवर लिहिलेले क्रमांक आपापल्या श्राव्य उपकरणांच्या कळांवर दाबले असता कानाला लावलेल्या श्रवणसंचातून त्या त्या विभागाची माहिती इंग्रजीतून ऐकू येण्याची सोय होती. आजूबाजूच्या ऐश्वर्याने दिपून जात आणि भवतालच्या गर्भश्रीमंती थाटाने भारावून जातच आम्ही तिथून बाहेर पडलो.

उदयपूरचा जलमहाल. याचेबाबत इतकेच सांगता येईल की याची वर्णने करतांना मार्गदर्शक थकत नाहीत, कित्येक चित्रपटांची चित्रीकरणे इथेच झालेली आहेत, आणि श्रीमंतातले श्रीमंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्या इथे राहण्यास कायमच उत्सुक असतात.

बाहेर संध्याकाळ व्हायला आलेली होती. जलमहालावर संध्याकाळचे ऊन पडून अवर्णनीय शोभा उदयास आलेली होती. आता आमच्या हातात आमचे कॅमेरेही आलेले होते. मग काय विचारता. आतापर्यंत दाबून ठेवलेली प्रकाशचित्रणाची हौस प्रत्येकाने असंख्य चित्रे काढूनच भागवून घेतली. तर कित्येकांनी मनःपूत चलतचित्रणही करून घेतले.

संध्याकाळी आम्ही उदयपूरच्या सूरजपोल ते हाथीपोल दरम्यानच्या बाजारात खरेदीप्रीत्यर्थ गेलो खरे. मात्र रविवारचा दिवस असल्याने बराचसा बाजार बंद होता. त्यामुळे काहीसा हिरमोड झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी चित्तौडगढ पाहून संध्याकाळी अजमेरपर्यंतचा प्रवास करून ख्वाजा मुईनुद्दीन चिस्तीचा दर्गा पाहायचा व शेवटास पुष्करच्या हॉटेलात जाऊन मुक्काम करायचा होता. म्हणून आम्ही जरा लवकरच बिछाने गाठण्याचा बेत निष्ठेने अंमलात आणला. आमच्या सार्‍या एकवीस प्रवाशांपैकी सारेच्या सारेच अतिशय वक्तशीर असल्यामुळे कधी कुणामुळे पाच मिनिटे उशीर झाला असे झालेच नाही. हे एक सुखद आश्चर्य होते. याचकरता आमचा हा गट आमच्याकरता अविस्मरणीय ठरला आहे. शिवाय उत्साहही एवढा की प्रत्येकजण गुरूशिखरावरही चढून गेलेला होता. इथे हेही नमूद करणे गरजेचे आहे की विशीतले फक्त तीन जण होते. इतर सर्व पन्नाशी-साठीच्या घरातले.

मेवाडदर्शन-४

तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार

चितौडचा इतिहास

इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्‍या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.

बाप्पा रावल यांच्या पश्चात त्यांच्याच गहलोत घराण्यातच सत्ता राहिली. इसवी सन १३०३ मधे दिल्लीच्या अल्लाउद्दिन खिलजी याने पद्मिनीकरता चित्तौडवर हल्ला केला. तत्कालीन राजे, रावल रतनसिंग युद्धात मारले गेले. त्यांची पत्नी पद्मिनी हिने जौहार केला. चित्तौडवर अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता स्थापन झाली. इसवीसन १३२७ मधे गेहलोत घराण्यातीलच हमीरसिंग यांनी पुन्हा सत्ता परत मिळवली. हमीरसिंग यांचा जन्म ज्या शिसोदा गावात झाला होता, त्यावरून मग या राजघराण्यास शिसोदिया असेही म्हणू लागले.
राणा हमीरसिंग यांचे पणतू महाराणा कुंभकर्ण ऊर्फ कुंभा १४३३ चे सुमारास गादीवर बसले. १४४२ मधे माळव्याचा सुलतान महमूद खिलजी याने चित्तौडगढवर आक्रमण करून मच्छिंद्रगढ, पाणगढ आणि चौमुखा ताब्यात घेतले. या अनिर्णायक लढाईत गुजरात व माळव्याच्या संयुक्त फौजांचा पराभव झाल्याने सुलतान मांडूस परतला. पुढे दहा वर्षेपर्यंत मग चित्तौडवर आक्रमण होऊ शकले नाही. या विजयाची आठवण म्हणून १४४८ मधे महाराणा कुंभा यांनी चित्तौडमधे एक विजयस्तंभ उभारण्यास सुरूवात केली. तो १४५८ मधे बांधून पूर्ण झाला. ३७ मीटर उंचीच्या या स्तंभास नऊ मजले असून १५७ पायर्‍या आहेत. दगडातून शिल्पे साकारून सजवलेले, एकातून एक उमलणारे, शंखाप्रमाणे उलगडत जाणारे जिने आणि हवेशीर कलात्मक खिडक्यांनी विभूषित, भरभक्कम बांधणीच्या या स्तंभाचा सर्वात वरचा मजला तर शिल्पकलेने अप्रतिम सजलेला आहे. इसवीसनाच्या पंधराव्या शतकातील भारतीय तंत्रज्ञानाचे दैदिप्यमान उदाहरण म्हणून या विजयस्तंभाचा उल्लेख अभिमानानेच करावा लागेल.

महाराणा कुंभा यांनी १४५८ पर्यंत राज्य केले. १४५८ मधे त्यांचेच पुत्र उदयसिंग (प्रथम) यांनी सत्तासंपादनार्थ, त्यांचा वध केला. महाराणा कुंभांच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या कलागुणांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली. मेवाडमधील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले बांधले गेले. यांच्यातच मेवाडमधील, चित्तौडनंतरचा सर्वात अभेद्य किल्ला, कुंभलमेर किंवा कुंभलगढचा समावेश होतो. महाराणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढचाच. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. तसेच राजस्थानात महाराणा प्रतापांचे जन्मस्थळ कुंभलगढ आहे. कुंभलगढची तटबंदी ३६ किलोमीटर लांबीची आहे. चीनच्या भिंतीनंतर, जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी आहे ही. महाराणा कुंभांच्याच कारकीर्दीत राणकपूरचे त्रैलोक्य-दीपक जैन मंदिर, चित्तौडची कुंभास्वामी आणि आदिवर्ष तसेच शांतिनाथ जैन मंदिरे बांधली गेली. स्वतः महाराणा कुंभांनी “संगीत-राजा”, गीतगोविंदावरची “रसिक-प्रिय” ही टीका, “सूडप्रबंध” आणि “कामराज-रतिसार” या ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याच कार्यकाळात विद्वान अत्रींनी “चित्तौडच्या कीर्तीस्तंभाची प्रशस्ती” लिहीली आणि कहना व्यास यांनी “एकलिंग-महात्म्य” लिहीले.

१५२७ मधे राणा संग्रामसिंग (राणा संगा) यांनी खानवा येथे बाबराशी निकराची लढाई केली. त्यात बाबराचा जय झाला. पुढे जखमी झालेले राणा संग्रामसिंग थोड्याच वर्षांत मृत्यू पावले. १५३५ मधे गुजरातचा राजा बहादुरशहा चित्तौडवर चालून आला असता संग्रामसिंगाची पत्नी राणी कर्मवती हिच्याकडे चित्तौडची सूत्रे होती. तिने यावेळी बाबराचा मुलगा हुमायूनची मदत मागितली. त्याने होकारही दिला. मात्र हुमायून पोहोचण्यापूर्वीच बहादुरशाहने चित्तौड काबीज केल्यामुळे राणी कर्मवतीसह सर्व स्त्रियांनी जौहार केला तर गडावरील सर्वच्या सर्व ३२,००० लोक धारातीर्थी पडले.

वरील चित्रपट्टीत पहिले चित्र कुंभलगढाचे आहे तर दुसर्‍या चित्रात बनवीर, उदयसिंग समजून चंदनचा वध करत असतांनाचे चित्र दिसत आहे. बनवीर, राजपुत्र उदय याचा शिरच्छेद करण्याकरता आला असता, पन्नाधायने आपला स्वतःचा पुत्र चंदन याला राजपुत्राचे जागी झोपवले आणि उदयला आधीच दूर पाठवून त्याचे प्राण वाचवले. त्या अत्युच्च त्यागाची ही स्मृती.

१५२८ मधे राणा संग्रामसिंग यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात त्यांचा सर्वात मोठा हयात असलेला मुलगा रतनसिंग राणा झाला. १५३१ मधे रतनसिंग मारला गेला व त्याचाच भाऊ विक्रमादित्यसिंग गादीवर बसला. विक्रमादित्याच्याच राज्यकाळात बहादुरशाहने चित्तौडवर कब्जा मिळवला. उदयसिंग यास सुरक्षेच्या कारणास्तव बुंदीस रवाना करण्यात आले. पुढे १५३७ मधे विक्रमादित्यास मारून बनवीर गादीवर बसला. तेव्हाच तो उदयसिंगासही मारणार होता. पण पन्नाधायने त्याचे जागी आपल्या चंदन नावाच्या मुलास बळी देऊन त्याचे प्राण वाचवले. पन्नाधाई स्वतः उदयसिंगासोबत कुंभलगढ इथे आश्रयार्थ जाऊन राहिली. कुंभलगढाचा तत्कालीन शास्ता आशाशाह व इतर सरदारांच्या मदतीने १५४० मधे बनवीरचा पराभव करून उदयसिंग राजा झाला.

महाराणा उदयसिंग (जन्मः ऑगस्ट ४,१५२२, मृत्यूः फेब्रुवारी २८, १५७२)

त्यानंतर महाराणा उदयसिंग यांनी चित्तौडवर राज्य केले. ते राणा संग्रामसिंग व राणी कर्मवती यांचे चौथे पुत्र होते व त्यांचा जन्म झाला तेव्हा राणा संग्रामसिंग हयात नव्हते. मेवाडच्या राजघराण्यातील ते ५३ वे शासक होते. महाराणा उदयसिंगांनी राजपूत राज्यव्यवस्थेचे एकचालकानुवर्तित्व घातक ठरत असल्याचे जाणून जाणत्यांच्या सामूहिक प्रशासनास जन्म दिला. या राज्यव्यवस्थेचा उपयोग पुढे अकबराच्या आक्रमणाचे काळी झाला. तेव्हा सर्वांच्या सल्ल्याने उदयसिंग चित्तौड सोडून निघून गेले होते. तरीही चित्तौडने चार महिनेपर्यंत शर्थीची झुंज दिली. २५ फेब्रुवारी १५६८ रोजी पुन्हा एकदा चित्तौड पडले आणि सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा जौहार करावा लागला. चित्तौड राज्य करण्यास सुरक्षित राहिलेले नाही हे पाहून महाराणा उदयसिंग यांनी उदयपूर शहराची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात महाराणा उदयसिंगांनी आपल्या आवडत्या जगमल्ल नावाच्या पुत्रास राज्याची सूत्रे सुपूर्त केली. मात्र त्यांनीच घडवलेल्या सामूहिक प्रशासनास हे रुचले नाही. महाराणा प्रताप हे महाराणा उदयसिंगांचे थोरले पुत्र होते. ते पराक्रमी आणि राज्यकर्ते म्हणून सर्वमान्य होते. म्हणून, त्या सामूहिक प्रशासनाने त्यांस गादीवर बसवले. महाराणा प्रतापांनी अकबराच्या आक्रमणाविरुद्ध हल्दीघाटीत निकराची लढाई केली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचा आवडता घोडा चेतकही मारला गेला. महाराणा प्रताप वाचले. त्यांनी चित्तौड वगळता सारे मेवाड पुन्हा ताब्यात घेतले. चित्तौड ताब्यात येईपर्यंत सारे राजभोग सोडून दिले. पत्रावळीत जेवण्याची शपथ घेतली. पण अखेरपर्यंत ते चित्तौडवर ताबा मिळवू शकले नाहीत.

हल्दीघाटी

अशा तीव्र संघर्षाचा आणि प्रखर स्वाभिमानाचा इतिहास असलेल्या चित्तौडगढाकडे आम्ही आता अग्रसर होत होतो. मग जगप्रसिद्ध हल्दीघाटी लागली. खरोखरीच तिथे आजही हळदीसारखे खडक दिसून येतात. ही एक खूपच अरुंद खिंड आहे. जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा डांबरी रस्ता त्यातून पलीकडे घेऊन जातो. बाहेर पडल्यावर एक खासगी वस्तुसंग्रहालय आहे. त्यात हल्दीघाटीचा इतिहास शिल्परूपाने अंकित करण्यात आलेला आहे. एक ग्रंथालयही आहे. तसेच तत्कालीन चित्तौड साकार करणारे देखावेही आहेत. सोबतच स्थानिक पद्धतीच्या जेवणाचीही सोय आहे. तिथे आम्हाला दाल-चुर्मा, बाजरीची भाकरी-ताडाचा गूळ-साजुक तूप, छाछ इत्यादींसहित सुग्रास जेवण घेता आले.

महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक, याला हत्तीची खोटीच सोंड जोडलेली असे. हत्ती आपल्या पिल्लावर हल्ला करत नाही म्हणून हत्तीच्या हल्ल्यातून वाचण्याकरता या युक्तीचा उपयोग होत असे. मानसिंगाच्या हत्तीवर चेतक चाल करून गेला तेव्हा मात्र, मानसिंगाच्या हत्तीने, सोंडेत दिलेल्या तरवारीने चेतकाच्या मागल्या पायावर गंभीर हल्ला केला. हेच वरील चित्रपट्टीतील पहिल्या चित्रात दर्शवण्यात आलेले आहे. दुसर्‍या चित्रात महाराणा प्रताप यांचे सेनापती हकीमखान सूरी, आदिवासींचे राजे राणा पुंजा आणि महाराणा प्रताप यांचाच वेष घेऊन लढून शहीद झालेले झाला मान (हे महाराणा प्रताप यांच्या प्रमाणे दिसत होते म्हणून त्यांच्यामुळे महाराणांचा प्राण वाचू शकला होता.), हे महाराणा प्रताप यांचे तारक त्रिकूट दर्शवलेले आहे.

हल्दीघाटीच्या ग्रामीण वस्तुसंग्रहालयात जेवण करून मग आम्ही नाथद्वारच्या श्रीनाथजी मंदिराकडे निघालो. नाथद्वारच्या मंदिरात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. नाथद्वार गावात खूपच अरुंद गल्ल्याबोळ असल्याने बस दूरच उभी करावी लागली. श्रीनाथजी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती असल्याने, देवाला दिवसात अनेकदा निरनिराळे भोग चढवण्यात येत असतात. भोग चढवणे म्हणजे देवासमोर तर्‍हतर्‍हेचे नैवेद्य सुबक रचनेने मांडून ते देवास अर्पण करणे. ही प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने, सगळ्यांकरता खुल्या दर्शनाच्या वेळा मर्यादित होतात. अशा दैनंदिन भोग चढवण्याच्या आणि दर्शनास मंदीर खुले असण्याच्या वेळा आधीच नक्की केलेल्या असतात. सचिनच्या प्रतिनिधींनी त्या आधीच माहीत करून घेतलेल्या होत्या.

आम्ही पोहोचलो त्या वेळी मंदीर पंधरा मिनिटे खुले राहणार होते. आम्ही चालत चालत मंदिराजवळ पोहोचलो. सगळ्यांनी एकाच जागी पादत्राणे काढली. तिथे सचिनचे प्रतिनिधी उभे होते. मंदिराच्या दरवाज्यासमोरच्या गर्दीत जाऊन उभे राहिलो. स्त्रिया व पुरूषांचे प्रवेश निरनिराळ्या दरवाजाने होणार होते. या मंदिरात दर्शन झाले तर झुंबडीनेच साध्य होते. नाहीतर भोग चढण्याची वेळ सुरू होऊन दरवाजे बंद होतात व मग ते पुन्हा उघडण्याची वाट पाहत राहावे लागते. अशी माहिती आम्हाला आधीच पुरवलेली असल्याने आम्ही डोंबिवलीकर गाडीत शिरतो, त्या आवेशाने दरवाजा उघडताच समोर झेपावलो. दर्शन झाले. स्त्रिया व पुरूष एकाच दरवाजातून बाहेर पडत होते. तिथून बाहेर आलो. मग सचिनतर्फे कुल्हडीतून चहा पाजण्यात आला. तो खूपच चवदार आणि मधुर लागला. आजूबाजूच्या दुकानांतून दुधातुपाच्या मिठायांचा वास येत होता. तो आसमंतात भरून राहिला होता. आम्ही पुन्हा तसेच दहा पंधरा मिनिटे चालत बसमधे जाऊन पोहोचलो.

इथून आम्ही एकलिंगजी मंदिराकडे गेलो. हे मंदिर महाराजांच्या खासगी मालकीच्या जागेवर असल्याने इथे निराळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. मंदिराचा बराचसा भाग पर्यटकांसाठी खुला नाही. दर्शनार्थ एक लांबच लांब रांग होती. इतरही अनेक मंदिरे या मंदिराजवळच्या मंदिरसमूहात आहेत. मार्गदर्शकाने त्यातील काही मंदिरे व्यवस्थित दाखवली. नंतर पुन्हा बसमधे बसून आम्ही उदयपूरच्या मुख्य रस्त्यावरील सुभाषनगरातील “ओरिएंटल पॅलेस” या हॉटेलात जाऊन राहिलो.
.

मेवाडदर्शन-३

मेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू

आधी हॉटेलातच परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. मग “श्री अर्बुद विश्वनाथ महादेव मंदिर” दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिराच्या इमारतीसच पिंडीचा आकार दिलेला असल्याने, गेरूच्या रंगाने रंगवलेली ती इमारत दुरूनच नजरेत भरत होती. त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यापीठाचे मुख्यालय “युनिव्हर्सल पीस हॉल” ऊर्फ विश्वशांतीदालन बघितले. पुढल्या चित्रपट्टीतले मधले चित्र त्याचेच आहे. त्यांच्या आचारपद्धतीबाबत प्राथमिक माहितीही दिली गेली, मात्र ती पुरेशी वाटली नाही. आम्हाला अधिक वेळही नसल्याने इतर प्रवाशांप्रमाणेच आम्हीही पुढच्या स्थळाकरता सिद्ध झालो. ते होते अर्बुदा माता मंदिर. ३६५ पायर्‍या चढून डोंगरावरच्या मंदिरात जायचे होते.

अर्बुदादेवी किंवा अधरदेवी चे मंदिर माऊंट अबूच्या उत्तरेला ३ किलोमीटर अंतरावरील एका गुहेत आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास ३६५ पायर्‍या चढाव्या लागतात. मंदिरात वाकूनच प्रवेश करावा लागतो. मोबाईल, बॅगा वगैरे वस्तू गाभार्‍यात नेऊ देत नाहीत. मंदिराच्या वाटेवर काटेरी झुडूपांची दाट हिरवळ असल्याने चढतांना थकवा जाणवत नाही. आजूबाजूचे निसर्गसौंदर्यही वाखाणण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात पदोपदी दिसणारे अश्वत्थ वृक्ष वड, पिंपळ आणि औदुंबर इथे क्वचितच दर्शन देतात. आंबा, फणस, काजू, चिक्कू, संत्री, पेरू, सिताफळे यांसारख्या झाडांनी जणू मेवाडवर बहिष्कारच टाकला आहे की काय असे वाटते. महाराष्ट्रात आढळणार्‍या केळी, ऊस इत्यादींच्या बागा तर विसरायलाच हव्यात. मात्र खेजडी (खजूर), बाभूळ, आवळे यांच्या बागा होत असल्याचे अनोखे दृश्य यानंतर अनेकदा नजरेस पडले. या अशाप्रकारच्या वृक्षसंपदेमुळे इथल्या कुठल्याही युद्धात गनिमी कावा शक्य होत असेल असे मला वाटे ना. मात्र महाराणा प्रतापांनी गनिमी काव्यानेच अकबराला हैराण करून सोडल्याची, तसेच चित्तौड वगळता सार्‍या मेवाडवर पुन्हा ताबा मिळवल्याची कहाणी पुढे समजणारच होती.

अर्बुदादेवीचा डोंगर उतरतांना ताक, दही, उसाचा रस आणि भरपूर इतर खाद्यपेये उपलब्ध होती. खरे तर गार वार्‍यांतून केलेल्या उल्हासदायक चढ-उतारानंतर श्रमपरिहाराची तशी फारशी आवश्यकताही जाणवत नव्हती. तरीही आम्ही सगळ्यांनी उत्तम ताकाचा (छाछ) आस्वाद घेतलाच. इथे टेकडीवर माकडे खूप आहेत. आम्ही जे चणे प्रसादाकरता म्हणून घेतले होते, खाली उतरल्यावर, ते चणे माकडांना खाऊ घालण्याकरता विकत होते असे लक्षात आले. चणे खाऊन पाहिले असता त्याची खात्रीच पटली. ते कडक कुडकुडीत होते. (आमच्याकडे हळदीकुंकवाला म्हणून काही बोरे विकत असत. ती अजिबात खाण्याच्या दर्जाची नसत. तसलाच हा प्रकार वाटला.) मात्र माकडे ते चणे आवडीने खातांना दिसली.

सरतेशेवटी मात्र आम्हाला, उन्हाचा त्रास टाळण्याकरता, स्थलदर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन थोडे उलटे करायला हवे होते असे वाटले. म्हणजे अर्बुदादेवीचा डोंगर आधी आणि नंतर अर्बुद विश्वनाथ महादेव व मग विश्वशांतीदालन पाहिले असते तर जास्त बरे झाले असते, असे.

जेवण व थोड्याशा विश्रांतीनंतर दिलवारा जैन मंदिर पाहायला गेलो. संगमरवरी मूर्तीकलेचे माहेरघरच आहे ते. मात्र कॅमेरा, मोबाईल, बॅगा वगैरेला आत परवानगी नाही. त्यामुळे फोटो काढलेले नाहीत.

या ठिकाणी पाच मंदिरे आहेत. त्यातले पहिले मंदीर, चालुक्य महाराज भीमदेव(प्रथम) यांचे मंत्री व सेनापती असलेले विमलशहा यांनी, इसवी सन १०३१ साली बांधून पूर्ण केले. म्हणून त्यास विमलवसाही म्हणतात. त्यात प्रथम जैन तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी यांची मूर्ती प्रतिष्ठित आहे.

दुसरे मंदीर गुजरातचे सोळंकी राजा भीमदेव (द्वितीय) यांचे मंत्री वस्तुपाल आणि त्यांचे लहान बंधू तेजपाल यांनी आबूचे राजा सोमसिंह यांच्या अनुमतीने, विमलवसाही मंदिराजवळच त्याचेचप्रमाणे सफेद संगमरवरातून इसवी सनाच्या १२८७ मधे बांधून प्रतिष्ठित केले. तेजपाल यांचे पुत्र लावण्यसिंह यांचे नावाने ते मंदीर लूणवसाही म्हणवले जाते. त्यात जैनांचे २२ वे तीर्थंकर श्री नेमीनाथ यांची कसौटीच्या दगडातील अत्यंत रमणीय मूर्ती प्रतिष्ठित आहे. लूणवसाहीची हत्तीशाळाही संगमरवरात संजीवित करण्यात आलेली आहे.

तिसरे मंदीर आहे पीतलहर मंदीर. हे गुजरातच्या भीमाशाह यांनी घडवले असल्याने यास “भीमाशाह यांचे मंदीर” असेही संबोधले जाते. याचे निर्माण इसवी सनाच्या १४३३ मधे पूर्ण झाले. १४६८ मधे जीर्णोद्धारात जैनांचे प्रथम आचार्य ऋषभदेवजी यांची पंचधातूंची मूर्ती स्थापित करण्यात आली.

चौथे मंदीर नववे तीर्थंकर श्री सुविधिनाथ यांचे आहे.

पाचवे मंदीर तीन मजली चिंतामणी पार्श्वनाथ मंदीर आहे. हे श्वेतांबर जैनांच्या खरतरगच्छ समुदायाचे अनुयायी “मंडलिक” यांनी इसवी सन १४५८ मधे बांधून पूर्ण केले. याच्या चारही बाजूंना भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती प्रतिष्ठित असल्याने या मंदिरास “चौमुखा पार्श्वनाथ मंदीर” असेही म्हणतात. संगमरवरी शिल्पकलेचा स्वर्गच वाटावा अशा या मंदिरांचे रूप केवळ अवर्णनीय आहे. शिवाय, रंग फक्त शुभ्रधवलच असल्याने, ते सौंदर्य, कुठल्याही प्रकारच्या फोटोग्राफीत सापडणारे नाही. म्हणून प्रत्यक्षच पाहावे. आयुष्यात एकदा तरी.

नंतरचा उर्वरित दिवस सचिनने मोकळाच सोडलेला होता. त्यांचाच मार्गदर्शक मग सांगू लागला, की तुम्हाला पाहायचे असेल तर, गुरूशिखर आपल्याला पाहता येईल. मी वाहनव्यवस्था करू शकेन. मात्र १०० रुपये माणशी इतका खर्च येईल. सचिनतर्फेच ही व्यवस्था का केली जात नाही? याचे उत्तर, आमची बस तिथे नेण्याची अनुमती नाही असे आले. तरीही ही निराळी वाहनव्यवस्था सहलकार्यक्रमातच अंतर्भूत करायला हवी होती, यावर सर्व प्रवाशांचे एकमत झाले. असो. मग मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच वाहनव्यवस्था करून आम्ही स्वखर्चाने गुरूशिखर पाहण्याकरता गेलो. गेलो नसतो तर एका अद्वितीय अनुभवास मुकलो असतो.

गुरूशिखर

दिलवारा अचलगढ रस्त्यावर ३ किलोमीटर पासून, एक ७ किलोमीटर लांबीची डांबरी सडक उंच पर्वतावरील गुरूशिखरापर्यंत घेऊन जाते. गुरूशिखर हे अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १,७२२ मीटर (म्हणजेच ५,६७६ फूट), तर त्याचे ठिकाण माऊंट अबू पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. गुरूशिखरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रयाची सुरेख मूर्ती आहे. इथेच एक भव्य, पुरातन, पितळी घंटा होती, जिच्यावर ख्रिस्तपूर्व १,४११ मधील कोरीव काम होते. आता मात्र तिच्या जागी नवी घंटा बसवलेली आहे. मंदिरापासून आणखी थोड्या उंचीवरील सर्वोच्च ठिकाणी चरण पादुकांचे एक छोटेसे मंदिर आहे. इथून सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते. इथे वेगवान वारे सदा सर्वकाळ वाहत असतात. गोरक्षनाथांनी म्हटलेच आहे की “पवन ही योग, पवन ही भोग, पवन ही हरे छत्तीसो रोग”. इथल्या प्रवाही वार्‍यांमुळे इथे कायमच आरोग्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे.

गुरूशिखरावर वरच्या भागी दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे देऊळ आहे, तर खालच्या बाजूला दिसतंय ते आहे दत्तमंदिर. दुसर्‍या चित्रात वरच्या बाजूला एक शंखाकृती आणि खालच्या बाजूला एक भव्य खोबण असलेला खडक, गुरूमंदिराच्या वाटेवर उठून दिसतात. खालच्या चित्रपट्टीतील पहिले चित्र शंखाकृती खडकाचे आहे तर दुसरे खोबणीच्या खडकाचे. संपूर्ण छत असलेल्या, मात्र तळाशी सपाट बूडच नसलेल्या या खोबणी, राहण्यास गुहा म्हणून मुळीच वापरता येण्यायोग्य नाहीत. हा खोबण असलेला खडक, गुरूशिखराच्या वाटेवर सहजच नजरेत भरतो. याच चित्रपट्टीतील तिसर्‍या चित्रात दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे मंदिर दिसत आहे. मंदिरावर जे काही लिहिलेले दिसत आहे ते आहे “गुरू दत्तात्रेय की चरण पादुका. दर्शन करके घण्टा बजाये, मनोकामना पुरी होती है।“. शेवटले चित्र आहे त्याच घंटेचे, जिचा उल्लेख चरण पादुकांच्या मंदिरावरल्या लिखाणात केलेला आहे.

मंदिराजवळ “फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी”ने चालवलेली“माऊंट अबू वेधशाळा” आहे. या वेधशाळेत १.२ मीटर अवरक्त दुर्बीण आहे. इथे अवकाशीय वस्तूंच्या अवरक्त किरणांचे भूमीवरून निरीक्षण करण्या करताची भारतातील पहिलीच प्रमुख सुविधा आहे. इथे उंचीवरच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो (एरोनॉमी). ज्यात विघटन आणि मूलकीकरण महत्त्वाचे असते. या विषयावरचे अनेक प्रयोगही येथे केले जातात. http://www.prl.res.in/. या प्रयोगशाळेचा फोटो चरणपादुकांच्या मंदिराजवळून उत्तम प्रकारे काढता येतो. हा फोटो मात्र आंतरजालावरून साभार उचललेला आहे.
.

मेवाडदर्शन-२

मेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आमच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी आम्ही अरावली एक्सप्रेसने “आबूरोड”ला जाऊन पोहोचलो. तिथे सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी आम्हाला उतरवून घेण्याकरता एस-४ बोगीसमोर सज्ज असणार होते. आम्ही झपाट्याने तिथे जाऊन पोहोचलो. आता फक्त वाटच पाहायची होती.

बाहेरून, आबूरोड स्टेशनचे घुमट प्रेक्षणीयच दिसत होते.

तेवढ्यात स्टेशनवर “आबू की रबडी” बोर्ड पाहिला. मेवाडदर्शन सहलीच्या पूर्वतयारीतच रबडी, घेवर, गजक, राजकचोरी इत्यादी फर्मास पदार्थांच्या आस्वादाची अपेक्षा तयार झालेली होती. म्हणून जेव्हा आम्ही आबूरोड स्टेशनवर “आबू की रबडी” बोर्ड पाहिला, तेव्हा लगेचच “आबू की रबडी” चाखून पाहण्याचा मोह झाला. पेल्याच्या आकाराच्या मातीच्या कुल्हडीतून “आबू की रबडी” घेतली. दर कुल्हडीस फक्त पंधरा रुपये फक्त. मात्र कुल्हडीत पाणी शोषल्या गेल्यामुळे की काय, पण रबडी अपूर्व लागत होती. मधुर, गोड आणि लच्छेदार. मन खूश झाले.

दरम्यान, सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी श्री.सुशांत जोशी आणि श्री.शैलेश दोंदे, त्यांच्या टोप्यांसह तिथे हजर झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना एकत्र आणले, त्यांचे सामान ताब्यात घेतले, आणि आम्ही ३५ आसनांच्या, २ x २, वातानुकूलित बसकडे वाट चालू लागलो. सगळे २१ प्रवासी आणि सहलप्रणेते बसमधे बसले, ड्रायव्हर किन्नरांचे इशारे झाले आणि बस माऊंट अबूची रमणीय वाट चालू लागली.

जेवणखाण आटोपून थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्यास्त बघण्याकरता आम्ही सूर्यास्तदर्शनस्थळाकडे निघालो. जिथे बस थांबली तिथून पाच मिनिटांवर ते आहे. मात्र तिथे एक अभिनव वाहन आम्हाला दिसले. ते म्हणजे बाबागाडी. मग एक खडक जणू हात जोडून स्वागत करतांना आढळला.

आणि तिथवर पोहोचलो तेव्हा आढळली ती माऊंट अबूची सर्वोत्कृष्ट मिठाई. सोहन पापडी. ती मुळीच पापडी वाटत नव्हती. पांढुरक्या पिवळ्या रंगाची कापसागत किंवा “बुढ्ढी के बाल” वाटावी अशी साखरेची, अगदी तरलपणे तोंडात विरघळून जाणारी मिठाई. अतिशय हलकी. तिच्या, वाटीच्या आकाराच्या मुदी बनवून ठेवल्या होत्या आणि प्रत्येकी पाच रुपयांना एक अशा विकत होते.

मग सूर्यास्त पाहण्याकरता मोक्याची जागा हुडकण्यासाठी धावपळ सुरू झाली. सूर्यास्ताला आणखी अर्धा तास तरी असावा. मग तिथे आसपासच्या दृश्यांवरच चर्चा सुरू झाली. तिथे खूप घाणेरीची झुडुपे इतस्ततः विखुरलेली होती. सुंदर फुलांचे घोस होते. शिवाय मिर्‍याच्या आकाराची काळी काळी फळेही गुच्छांनी लगडलेली होती. तिथल्या गप्पांतून, घाणेरीला फळे येतात ही नवीनच माहिती मिळाली. ही फळे खायला गोड लागतात. आरोग्यवर्धक असतात. शिवाय मूळव्याधीवरचा उत्तम उपायही ठरतात, असेही समजले. लगेचच स्वतः खाऊन खात्री पटवली. इथे तत्काळ मेहंदी काढण्याकरता लाकडाचे साचे विकतही होते आणि तत्काळ मेहंदी काढूनही देत होते. अनेक महिलांनी सूर्यास्तापर्यंतच्या वेळाचा सदुपयोग तत्काळ मेहंदी रंगवून घेण्याकरता करून घेतला. निरनिराळे खाद्यपदार्थ हिरीरीने विकले जात होते. त्यामधे, द्रोणांत सोलून ठेवलेले डाळिंबाचे दाणे हा नवा पदार्थही विकायला होता.

मग सावकाश सूर्यास्त झाला. मात्र तो क्षितिजाआड सूर्य दडून नव्हे. कारण आकाश ढगाळ तर होतेच शिवाय धुकेही होते थोडेसे. त्यामुळे सूर्यास्त पाहण्याचा काहीसा विरसच झाला.

त्यानंतर “नक्की” तलावावर जायचे होते. नखाने निर्माण केलेला म्हणून “नखकी ताल” असे नावही कळले. पण अंधार आधीच पडू लागलेला असल्याने काही प्रवाशांना खरेदीत रस वाढू लागला होता, तर आमच्यासारखे काही प्रवासी अजूनही बोटिंगचा हुरूप बाळगून होते. म्हणून शिस्तीत वाटणी झाली आणि आम्ही बोटिंगला निघालो. सहा जणांची वल्हवायची बोट मिळाली, नावाड्यासकट. अर्धा-पाऊण तास पाण्यात विहरून मग आम्हीही खरेदीच्या सत्रात रुजू झालो. बांधणीच्या साड्या, सूट, कलात्मक शोभेच्या वस्तू, मोजड्या, परतल्यावर इतरांना वाटता येतील अशी स्मृती-चिन्हे, काय अन काय. प्रवासी खरेदीदारांचा माऊंट अबूमधील माल रोड, हा तर स्वर्गच आहे.

मेवाडदर्शन-१

२००९ च्या ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आम्ही मेवाडदर्शन सहल सचिन ट्रॅव्हल्सच्या सोबत केली. या पर्यटनाची पूर्वतयारी; प्रत्यक्ष प्रवास-निवास, खानपान, कलास्वाद, खरेदी; आणि प्रवासा अखेरीस या सर्वांतून झालेले मेवाडदर्शन; अशा स्वरूपात हे प्रवासवर्णन लिहीत आहे. यातील इतिहासात्मक वेचे, बहुतेकदा, विकिपेडियावरून स्वैर अनुवाद करून घेतलेले आहेत. ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर हे दोन दिवस रेल्वेच्या प्रवासातच खर्ची पडले. तसेच ९ ऑक्टोबर जयपूरला खरेदीखातर खर्चलेला असल्याने, पर्यटनाचे प्रत्यक्षात आठच दिवस पदरी पडलेले होते. म्हणून, प्रस्तावनेचा हा पहिला भाग आणि दर दिवशीच्या पर्यटनाचा प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ भागात हे प्रवासवर्णन लिहीलेले आहे.

यंदा गणपती ते दिवाळीच्या दरम्यान मेवाड पाहायला जायचे असा निश्चय झाल्यावर तिथला उत्तम काळ कोणता (खरे तर मेवाड दर्शनार्थ पक्ष पंधरवड्यासारखा काळ शोधूनही सापडणार नाही), आपल्याला कधी वेळ उपलब्ध आहे, सुट्ट्या कधी काढता येतील या सगळ्याचा अंदाज घेऊन सहलीच्या नियोजनास सुरूवात झाली. माझा आवडता समज असा आहे की पर्यटन सहल ८-१० दिवस तरी लांबीची असावी. कमी असल्यास, नुसता जाण्या-येण्यातच घालवलेला वेळ, सहलीत प्रत्यक्ष दर्शनार्थ घालवलेल्या वेळापेक्षा जास्त ठरून, सहलीकरता उपलब्ध असलेल्या वेळाचा अपव्यय होतो. तसेच जास्त असल्यास, पर्यटनाचा उत्साह मावळत मावळत अखेरीस ते पर्यटन आनंदचे राहत नाही. म्हणून सहल ८-१० दिवसांची असावी असाही निर्णय झाला. शिवाय रेल्वेचा प्रवास रात्रभराहूनही जास्त असल्याने येणे-जाणे विमानानेही करता येईल काय याची चाचपणी करायचे ठरले. मग काय काय पाहायचे आहे, काय पाहण्यासारखे आहे, मेवाडचा इतिहास काय आहे, तिथे काय काय खाण्याचे अभिनव पदार्थ चाखता येतील, कुठकुठल्या कलांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येईल, कोणकोणती निसर्गसौंदर्ये आस्वादता येतील याची जंत्री सुरू झाली. प्रत्यक्ष सहल जरी ८-१० दिवसांचीच होणार असली तरीही माझ्या प्रथेप्रमाणे तीन महिने आधीपासूनच माहिती काढणे, आरक्षणे करणे, पर्यटनसाहित्याची जमवाजमव इत्यादीस जोमाने सुरूवात झाली.

यात्राकंपनीसोबत पर्यटन केल्यास अल्पावधीत नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, तसेच जुळवाजुळवीत जीव आटवणे कमी होते हे खरेच, पण पैशाच्या रूपात त्याचे मूल्य चुकवावेच लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा तर हे करायलाच हवे, मग जास्त खर्च झाला तरी चालेल असा निर्णय झाला. त्यानुसार इंडियन एअरलाईन्स, केसरी, सचिन इत्यादींच्या संचालित सहलींचा तपास हाती घेतला. इंडियन एअरलाईन्सच्या देकारात विमानप्रवासाच्या खर्चाला पहिली प्राथमिकता होती. स्थानिक पर्यटन स्थानिक हॉटेलांवर सोपवतात असा आमचा मागचा अनुभव होताच. शिवाय संपूर्ण सहलीचा माणशी खर्च त्यांचाच सर्वाधिक होता. केसरी आणि सचिनच्या संकेतस्थळांवर सहलींची माहिती व्यवस्थितपणे दिलेली दिसत होती. मात्र केसरीच्या देकारात काय काय समाविष्ट होते ते नीटपणे कळू शकत नव्हते. सगळ्यात माहितीतत्पर सहलविपणन सचिनचे होते. माहिती विचारायचा अवकाश की हवी ती माहिती तत्काळ सादर होत होती. त्यांच्या सवलती देण्याच्या पद्धती नीटपणे कळलेल्या असल्याने, प्रत्यक्षात किती खर्च होईल याचा अदमास लगेचच आला. त्यांचाच दरमाणशी सहलखर्चही सर्वात कमी येत होता. डोंबिवलीला त्यांचे कार्यालयही होते. म्हणून मग सचिनसोबत जाण्याचा निर्णय झाला.

मात्र जरी ते रेल्वे आरक्षण करून देऊ म्हणत होते तरी प्रत्यक्षात आम्हाला हव्या असलेल्या १०-१०-२००९ च्या गाडीचे आरक्षणच रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. शिवाय त्यांच्या सहलीची सुरूवात आबूरोडपासून होत होती. म्हणजे विमानाने अहमदाबादपर्यंत जाऊन आबूला जाण्याचे सव्यापसव्य करूनही त्याचा पुरेसा लाभ होणारच नव्हता. हे त्यांना सांगून, रेल्वे आरक्षणाची त्यांची काही विशेष व्यवस्था आहे काय असे विचारता, ती तशी नाही असेच उत्तर आले. मग रेल्वेचे आरक्षण झाल्याखेरीज सहलनोंदणी करायची नाही असे ठरवले आणि त्यांच्या नक्की केलेल्या दुसर्‍या कुठल्या तारखेस जुळवून घेता येईल का, ही चाचपणी सुरू केली. ३०-०९-२००९ लाच त्यांची पहिली सहल सुरू होत होती. पण त्याकरताचे आरक्षण तर आता मिळणारच नाही असे वाटत होते. तरीही रेल्वेचे संकेतस्थळ बघितले, आणि काय आश्चर्य, ३०-०९-२००९ चे आरक्षण उपलब्ध होते. सचिनला विचारून घेतले की आमचे आरक्षण होईपर्यंत आमच्या जागा राखून ठेवता येतील का? ते हो म्हणाले. मग जाण्या-येण्याचे आरक्षण लगेचच करून घेतले आणि सचिनसोबत सहलनोंदणी केली.

मेवाडः एक बहुचर्चित पर्यटनवर्तुळ

मग तपासादरम्यान असे लक्षात आले की मेवाड पर्यटन हा काही साधासुधा प्रकार नाही, तर तो भारतातला सर्वात जास्त पर्यटकांच्या आवडीचा पर्यटन मार्ग आहे. आनंददायी, प्रेरणादायी आणि सुखाचा. मेवाडास मिळालेले निसर्गाचे वरदान म्हणजे अरावली पर्वत.

अर्बुद आवली म्हणजे अरावली. अर्बुद म्हणजे गळू, टेंगूळ, टेकाड, शिखर, कळस. हरियाणा, राजस्थान तसेच गुजरातच्या भूभागांवर ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा हेच अरावली पर्वताचे स्वरूप आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतांचे स्वरूप भिंतींसारखे आहे. मात्र अरावली पर्वत सुट्ट्या टेकड्या टेकड्यांचा मिळून घडलेला आहे. पश्चिमेकडल्या थरच्या वाळवंटास रोखून धरण्याचे महत्त्वाचे कार्य अरावली पार पाडतो आहे. याच कारणाने इथे अर्बुदादेवीची पूजाही सर्वत्र केली जाते. अरावली पर्वतातून बनास, लुनी, गंभीरा, चंबळ, (सर्व पूर्ववाहिनी) तसेच साबरमती (पश्चिमवाहिनी) इत्यादी नद्या उगम पावतात.

हल्लीच्या राजस्थानाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. थरच्या रुक्ष वाळवंटाची मरूभूमी असलेला मारवाड आणि तलाव-अरण्यांनी जिवंत झालेला, अरवली पर्वताच्या कुशीत वसलेला मेवाड.

भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे. दिल्लीचे तख्तनशिन बादशाहसुद्धा भरतभूमीच्या वैभवाचे उपभोग घेऊ शकले नसतील, एवढे वैभव राजपुतान्यातील राजांनी अनुभवले आहे. आज दिल्लीत म्हणण्यासारखा राजवाडा नाही. मात्र राजस्थानात सारेच राजेशाही. मेवाडातील अंबरचे राजे कच्छवाह. यांनीच जयपूर वसवले. तिथे राज्य केले. दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच जुळवून घेतले आणि सार्‍या भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात ठेवली. तिचा उपभोग घेतला. चित्तौडचा इतिहास महाभारतापासूनचा आहे. इथे बाप्पा रावळांच्या गहलोत वंशाने राज्य केले. पुढे ते शिसोदिया म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी उदयपूर नगर वसवले. हे कायमच दिल्लीच्या सत्तेविरुद्ध संघर्षरत राहिले. तरीही जयपूर असो की चित्तौड, दोन्हीही ठिकाणी जे राजप्रासाद आज पाहायला मिळतात ते भरतवर्षातील संपत्तीच्या साठ्याचे निदर्शक आहेत. मात्र अंबर व चित्तौड यांच्यात एक मुख्य फरक आहे. भरतवर्षाच्या रक्षणार्थ आणि स्वाभिमानार्थ अंबरकरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर चित्तौडकरांनी संघर्षाचा मार्ग पत्करलेला दिसून येतो. सार्‍या भरतवर्षातील संपत्तीचा राजपुतान्यात संचय करण्यात मात्र दोन्ही घराण्यांनी कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. वायव्येस असल्याने अंबरकरांना कायमच आक्रमकांचा त्रास सहन करावा लागे. तर चित्तौडकर बव्हंशी सुरक्षिततेच्या नैसर्गिक आवरणात राहिल्याने तडजोडीस धार्जिणे राहिले नाहीत.

आपल्या बुद्धिवैभवाने मातृभूमीस परम वैभवाप्रत नेण्याकरता राजपुतांनी जयपूर, उदयपूरसारखी नयनमनोहर शहरे वसवली; यंत्रमंदिरा (जंतरमंतर) सारख्या वेधशाळा निर्माण करून अवकाश निरीक्षणास, संशोधनास प्रतिष्ठा दिली; दिलवाडासारखी मंदिरे, कुंभलगड, चित्तौडगड, अंबर, रणथंभोर यांसारखे कोटकिल्ले व त्यावरील गढ्या-प्रासादांनी कलेचे स्वर्गच भुईवर आणले आणि राजस्थानच्या मरुभूमीत “सहेलियों की बाडी”, जलमहल यांसारखी मानवी उपभोगाची चिरंतन रम्य स्थळे साकार केली.

निसर्गाचे दान सढळ हस्ते मिळालेले असतांना, ते मानवनिर्मित लेण्यामंदिरांनी विभूषित करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यात राजपुतांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही रस्ते, वीज, प्रवासीनिवास यांबाबत हे राज्य कायमच पर्यटनानुकूल राहत आलेले आहे. त्यामुळे आज तो राजपुताना पर्यटनाचा स्वर्गच मानला जातो. तोच स्वर्ग आज जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतो. आणि म्हणूनच भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे.
.

20091017

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


चैतन्य दिवाळी,
मनात भरते भारी।
ती खाद्यखुशी हो,
अथवा आतिष चारी ॥

आतिष म्हणजे दिप्ती, निखारे,
फटाके फोडणे, फुलून येणे.
रोषणाई, रुचीपालट,
रंगभूषा आणि रीतीसौष्ठव
या चार प्रकारे
सुगीच्या संपन्नतेची
बहार साजरी केली जाते.

या दिवाळीतही आपण सारे
सुगीची बहार साजरी करू या!

सर्व दर्शकांना आणि त्यांच्या आप्तस्वकियांना,
इष्टमित्रांना, तसेच हितचिंतकांना ही दिवाळी,
उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमृद्धी
मिळवून देवो हीच हार्दिक शुभेच्छा!

देवो ही दिवाळी, तुम्हास आयुरारोग्य ।
प्रार्थी मी सुबत्ता, समाधान आणि सौख्य ॥
.