२००९-१०-२७

मेवाडदर्शन-६

पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर

सकाळीसच बाहेर पडून आम्ही चित्तौडगढाची वाट चालू लागलो. चित्तौडगढला पोहोचल्यावर हॉटेल मीरामधे आम्ही ताजेतवाने झालो. तिथे पोहोचून सहा सीटर रिक्षा केल्या. कारण बसला चित्तौडगढात फिरण्याची परवानगी नव्हती. या रिक्षा आपल्याकडच्या तीन सीटर रिक्षांप्रमाणेच असून आपल्याकडे जी सामानाकरता जागा असते ती पाठीमागून उघडी ठेवून पाठीकडे तोंड करून बसण्याची आणखी तीन व्यक्तींची सोय केलेली असते. चित्तौडगढात अशाच रिक्षा सर्वत्र फिरतांना दिसत होत्या. सर्वात प्रथम आम्ही कुंभा महालाकडे गेलो. त्याच्या ओवरीतच मार्गदर्शकाने इथल्या भागाचा इतिहास सांगितला. राणा कुंभा हे सूर्यवंशी होते. सूर्योदय पाहण्याची त्यांची प्रथा होती. याकरता खास जागा तयार केलेली असे. तिला सूरज-गोखरा म्हणत. ओवरीतूनच तो कुंभा महालचा सूरज गोखरा दिसत होता. मग दिसला तो कुंभा महालाचा चबुतरा. इथून खाली गावाकडे जाण्याकरता भुयार आहे, असे मार्गदर्शक सांगत होता. आता मात्र ते बंद करून ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही पट्टा हवेली पाहिली. वाटेत एका जागी एक कमळपुष्पासारखा घडवलेला दगड दिसला. तो बहुधा कुठल्याशा पुष्करणीतील कारंजाकरता घडवलेला कारंजमुखाचा दगड असावा. इथेच आम्हाला एक मुंगूस ऐटीत फिरतांना दिसले होते.

विजयस्तंभाच्या सर्वोच्च कक्षातील छतावरील नेत्रदीपक कला कुसर.

मग पुन्हा रिक्षांमधे बसून आम्ही विजयस्तंभाकडे गेलो. इथेच सतीचे मैदान दिसले जिथे इतिहासात तीन वेळा जौहार करण्यात आलेला होता. गोमुखातून शिवास अभिषेक होतो ते मंदिर. त्याचे शेजारचा जलाशय, चित्तौडगढाची तटबंदी इत्यादी पाहून मग आम्ही विजयस्तंभावर चढून गेलो. स्तंभावरून संपूर्ण चित्तौडगढाचे विहंगम दृश्य नजरेत येते.

नंतर पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही पोहोचलो पद्मिनी महालाजवळ. तिथल्या एका महालाच्या प्रवेशद्वारावरही स्फटिकतुरा बसवलेला दिसला. हा मात्र काचेसारखाच पारदर्शक दिसत होता. तिथला राजप्रासाद पाहिला. मार्गदर्शकाने, अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचे दर्शन आरशातून कसे घडवण्यात आले त्याचे कृतीसह निरूपण केले.

अखेरीस रिक्षात बसून आम्ही कुंभास्वामी मंदिराचे प्रवेशद्वाराशी पोहोचलो. या संकुलात दोन मंदिरे आहेत. मीराबाईंचे आणि कुंभास्वामींचे. मीराबाईंच्या मंदिरासमोर मीराबाईंच्या गुरूंचे स्मारक बांधलेले आहे. समोरच मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंची मूर्ती छान सजवून ठेवलेली दिसत होती. कुंभास्वामी मंदिराच्या डाव्या भिंतीवरची गणेशाची मूर्ती छान दिसत होती, तिचा फोटो काढला. कुंभास्वामी मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे, ती बघितली. कुंभास्वामी मंदिराचे विशाल स्तंभ पाहत मग आत शिरलो. कुंभास्वामी मंदिरात मूर्ती तीन आहेत. बलराम, कृष्ण आणि राधा. परततांना “हॉटेल मीरा”पाशी पुन्हा बसमधे बसलो आणि पुष्कर मार्गावरील हॉटेल वूडलँडमधे जाऊन जेवण घेतले, आणि अजमेरचे रस्त्याला लागलो.

रात्री आठचे सुमारास अजमेरमधे पोहोचलो. शहरात अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे गुंतागुंतीचे नियम असल्यामुळे बस दूरवरच सोडावी लागली. तिथून एका लहान मेटॅडोरमधे बसून पंधरा मिनिटे प्रवास केल्यावर आम्ही ख्वाजा मुईनुद्दिन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या जवळपास जाऊन पोहोचलो. आजूबाजूच्या दुकानांतून कधी न पाहिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, पूजेचे साहित्य, जूती-मोजड्या इत्यादींची दुकाने दिसत होती. दर्ग्यात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. दर्ग्यात जातांना डोके झाकलेले असावे लागते म्हणून आणि तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. आपल्या मंदिरांतून पंडे असतात तसेच इथेही असतात. त्यांना “खादिम” म्हणतात.

सचिनतर्फेही एक खादिम नेमण्यात आलेला होता. मग ज्या कुणाला फुले, चादर इत्यादी चढवायचे होते त्यांनी ते खादिमाच्या सल्ल्याने विकत घेतले. दर्ग्यात जाण्याकरता तिकीट नाही. मात्र गर्दी खूपच असते. म्हणून काळजीपूर्वक निवडलेल्या रात्री साडेआठच्या वेळीही खूपच गर्दी होती. दर्गा चौरस खोलीत असून सभोवती स्टेनलेस स्टीलचे कठडे बांधलेले आहेत. कठड्यांच्या आत खादिम उभे असतात. बाहेरून प्रदक्षिणा घालत समोर समोर सरकत चालावे लागते. कठड्यास लगटून दर्ग्याकडे तोंड करून खूपशा स्त्रिया ख्वाजांना आपले गार्‍हाणे घालत होत्या व म्हणूनच तिथून हलायला तयारच नव्हत्या. तसेच भिंतींशी खेटून मुसलमानी क्रोशाच्या टोप्या घातलेले भक्तगण दर्ग्याकडे तोंड करून, निरनिराळी स्तोत्रे पुटपुटत होते, तर काही अनिमिष नेत्रांनी दर्ग्यास पाहत होते. या दोन ओळींमधून प्रवेश करणार्‍या भक्तांना कशीबशी वाट काढावी लागत होती. तिरुपतीच्या मंदिरात असतात तसे भक्तांना पुढे पुढे ढकलणारे पुजारीही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दर्ग्यास गार्‍हाणे घालत जागीच खिळून राहणार्‍या भक्तांचे पाठी सारीच गर्दी अडून राही.

त्यातच आम्हाला असे सांगण्यात आलेले होते की मुद्दाम गर्दी करून पाकीट-पर्स पळवण्याचे प्रकारही इथे घडत असतात. म्हणून आम्ही सगळेच सतर्क होतो. स्त्री-पुरूषांना एकाच चिरटोळीतून मार्ग काढावा लागत असल्याने खूपच लोटालोटी होत होती. हळूहळू पुढे सरकत आम्ही चाललो होतो. आम्ही गर्दीच्या रेट्याने सावकाश पुढे सरकत दर्ग्यातून बाहेर पडलो. बाहेर आमचा खादिम आमची वाटच पाहत होता. त्याने मंत्र पुटपुटत, प्रत्येकाचे गळ्यात गंडा बांधला. ऊर्दूत म्हटलेल्या त्या मंत्राचा अर्थ “आम्ही तुझ्या दरबारात लावलेली हजेरी कबूल करून घे” असा असावा, असा माझा समज झाला. मात्र सर्व धर्मी लोकांच्या श्रद्धेस पात्र ठरलेल्या बाबांच्या दर्ग्यास प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान मनात होते. दर्ग्याबाबत अधिक माहिती त्यांच्या http://khwajagharibnawaz.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रात्री नऊचे सुमारास आम्ही “हॉटेल मास्टर्स पॅराडाईज” या पुष्करच्या हॉटेलात पोहोचलो.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: