२००९-१०-२७

मेवाडदर्शन-३

मेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू

आधी हॉटेलातच परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. मग “श्री अर्बुद विश्वनाथ महादेव मंदिर” दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिराच्या इमारतीसच पिंडीचा आकार दिलेला असल्याने, गेरूच्या रंगाने रंगवलेली ती इमारत दुरूनच नजरेत भरत होती. त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यापीठाचे मुख्यालय “युनिव्हर्सल पीस हॉल” ऊर्फ विश्वशांतीदालन बघितले. पुढल्या चित्रपट्टीतले मधले चित्र त्याचेच आहे. त्यांच्या आचारपद्धतीबाबत प्राथमिक माहितीही दिली गेली, मात्र ती पुरेशी वाटली नाही. आम्हाला अधिक वेळही नसल्याने इतर प्रवाशांप्रमाणेच आम्हीही पुढच्या स्थळाकरता सिद्ध झालो. ते होते अर्बुदा माता मंदिर. ३६५ पायर्‍या चढून डोंगरावरच्या मंदिरात जायचे होते.

अर्बुदादेवी किंवा अधरदेवी चे मंदिर माऊंट अबूच्या उत्तरेला ३ किलोमीटर अंतरावरील एका गुहेत आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास ३६५ पायर्‍या चढाव्या लागतात. मंदिरात वाकूनच प्रवेश करावा लागतो. मोबाईल, बॅगा वगैरे वस्तू गाभार्‍यात नेऊ देत नाहीत. मंदिराच्या वाटेवर काटेरी झुडूपांची दाट हिरवळ असल्याने चढतांना थकवा जाणवत नाही. आजूबाजूचे निसर्गसौंदर्यही वाखाणण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात पदोपदी दिसणारे अश्वत्थ वृक्ष वड, पिंपळ आणि औदुंबर इथे क्वचितच दर्शन देतात. आंबा, फणस, काजू, चिक्कू, संत्री, पेरू, सिताफळे यांसारख्या झाडांनी जणू मेवाडवर बहिष्कारच टाकला आहे की काय असे वाटते. महाराष्ट्रात आढळणार्‍या केळी, ऊस इत्यादींच्या बागा तर विसरायलाच हव्यात. मात्र खेजडी (खजूर), बाभूळ, आवळे यांच्या बागा होत असल्याचे अनोखे दृश्य यानंतर अनेकदा नजरेस पडले. या अशाप्रकारच्या वृक्षसंपदेमुळे इथल्या कुठल्याही युद्धात गनिमी कावा शक्य होत असेल असे मला वाटे ना. मात्र महाराणा प्रतापांनी गनिमी काव्यानेच अकबराला हैराण करून सोडल्याची, तसेच चित्तौड वगळता सार्‍या मेवाडवर पुन्हा ताबा मिळवल्याची कहाणी पुढे समजणारच होती.

अर्बुदादेवीचा डोंगर उतरतांना ताक, दही, उसाचा रस आणि भरपूर इतर खाद्यपेये उपलब्ध होती. खरे तर गार वार्‍यांतून केलेल्या उल्हासदायक चढ-उतारानंतर श्रमपरिहाराची तशी फारशी आवश्यकताही जाणवत नव्हती. तरीही आम्ही सगळ्यांनी उत्तम ताकाचा (छाछ) आस्वाद घेतलाच. इथे टेकडीवर माकडे खूप आहेत. आम्ही जे चणे प्रसादाकरता म्हणून घेतले होते, खाली उतरल्यावर, ते चणे माकडांना खाऊ घालण्याकरता विकत होते असे लक्षात आले. चणे खाऊन पाहिले असता त्याची खात्रीच पटली. ते कडक कुडकुडीत होते. (आमच्याकडे हळदीकुंकवाला म्हणून काही बोरे विकत असत. ती अजिबात खाण्याच्या दर्जाची नसत. तसलाच हा प्रकार वाटला.) मात्र माकडे ते चणे आवडीने खातांना दिसली.

सरतेशेवटी मात्र आम्हाला, उन्हाचा त्रास टाळण्याकरता, स्थलदर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन थोडे उलटे करायला हवे होते असे वाटले. म्हणजे अर्बुदादेवीचा डोंगर आधी आणि नंतर अर्बुद विश्वनाथ महादेव व मग विश्वशांतीदालन पाहिले असते तर जास्त बरे झाले असते, असे.

जेवण व थोड्याशा विश्रांतीनंतर दिलवारा जैन मंदिर पाहायला गेलो. संगमरवरी मूर्तीकलेचे माहेरघरच आहे ते. मात्र कॅमेरा, मोबाईल, बॅगा वगैरेला आत परवानगी नाही. त्यामुळे फोटो काढलेले नाहीत.

या ठिकाणी पाच मंदिरे आहेत. त्यातले पहिले मंदीर, चालुक्य महाराज भीमदेव(प्रथम) यांचे मंत्री व सेनापती असलेले विमलशहा यांनी, इसवी सन १०३१ साली बांधून पूर्ण केले. म्हणून त्यास विमलवसाही म्हणतात. त्यात प्रथम जैन तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी यांची मूर्ती प्रतिष्ठित आहे.

दुसरे मंदीर गुजरातचे सोळंकी राजा भीमदेव (द्वितीय) यांचे मंत्री वस्तुपाल आणि त्यांचे लहान बंधू तेजपाल यांनी आबूचे राजा सोमसिंह यांच्या अनुमतीने, विमलवसाही मंदिराजवळच त्याचेचप्रमाणे सफेद संगमरवरातून इसवी सनाच्या १२८७ मधे बांधून प्रतिष्ठित केले. तेजपाल यांचे पुत्र लावण्यसिंह यांचे नावाने ते मंदीर लूणवसाही म्हणवले जाते. त्यात जैनांचे २२ वे तीर्थंकर श्री नेमीनाथ यांची कसौटीच्या दगडातील अत्यंत रमणीय मूर्ती प्रतिष्ठित आहे. लूणवसाहीची हत्तीशाळाही संगमरवरात संजीवित करण्यात आलेली आहे.

तिसरे मंदीर आहे पीतलहर मंदीर. हे गुजरातच्या भीमाशाह यांनी घडवले असल्याने यास “भीमाशाह यांचे मंदीर” असेही संबोधले जाते. याचे निर्माण इसवी सनाच्या १४३३ मधे पूर्ण झाले. १४६८ मधे जीर्णोद्धारात जैनांचे प्रथम आचार्य ऋषभदेवजी यांची पंचधातूंची मूर्ती स्थापित करण्यात आली.

चौथे मंदीर नववे तीर्थंकर श्री सुविधिनाथ यांचे आहे.

पाचवे मंदीर तीन मजली चिंतामणी पार्श्वनाथ मंदीर आहे. हे श्वेतांबर जैनांच्या खरतरगच्छ समुदायाचे अनुयायी “मंडलिक” यांनी इसवी सन १४५८ मधे बांधून पूर्ण केले. याच्या चारही बाजूंना भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती प्रतिष्ठित असल्याने या मंदिरास “चौमुखा पार्श्वनाथ मंदीर” असेही म्हणतात. संगमरवरी शिल्पकलेचा स्वर्गच वाटावा अशा या मंदिरांचे रूप केवळ अवर्णनीय आहे. शिवाय, रंग फक्त शुभ्रधवलच असल्याने, ते सौंदर्य, कुठल्याही प्रकारच्या फोटोग्राफीत सापडणारे नाही. म्हणून प्रत्यक्षच पाहावे. आयुष्यात एकदा तरी.

नंतरचा उर्वरित दिवस सचिनने मोकळाच सोडलेला होता. त्यांचाच मार्गदर्शक मग सांगू लागला, की तुम्हाला पाहायचे असेल तर, गुरूशिखर आपल्याला पाहता येईल. मी वाहनव्यवस्था करू शकेन. मात्र १०० रुपये माणशी इतका खर्च येईल. सचिनतर्फेच ही व्यवस्था का केली जात नाही? याचे उत्तर, आमची बस तिथे नेण्याची अनुमती नाही असे आले. तरीही ही निराळी वाहनव्यवस्था सहलकार्यक्रमातच अंतर्भूत करायला हवी होती, यावर सर्व प्रवाशांचे एकमत झाले. असो. मग मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच वाहनव्यवस्था करून आम्ही स्वखर्चाने गुरूशिखर पाहण्याकरता गेलो. गेलो नसतो तर एका अद्वितीय अनुभवास मुकलो असतो.

गुरूशिखर

दिलवारा अचलगढ रस्त्यावर ३ किलोमीटर पासून, एक ७ किलोमीटर लांबीची डांबरी सडक उंच पर्वतावरील गुरूशिखरापर्यंत घेऊन जाते. गुरूशिखर हे अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १,७२२ मीटर (म्हणजेच ५,६७६ फूट), तर त्याचे ठिकाण माऊंट अबू पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. गुरूशिखरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रयाची सुरेख मूर्ती आहे. इथेच एक भव्य, पुरातन, पितळी घंटा होती, जिच्यावर ख्रिस्तपूर्व १,४११ मधील कोरीव काम होते. आता मात्र तिच्या जागी नवी घंटा बसवलेली आहे. मंदिरापासून आणखी थोड्या उंचीवरील सर्वोच्च ठिकाणी चरण पादुकांचे एक छोटेसे मंदिर आहे. इथून सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते. इथे वेगवान वारे सदा सर्वकाळ वाहत असतात. गोरक्षनाथांनी म्हटलेच आहे की “पवन ही योग, पवन ही भोग, पवन ही हरे छत्तीसो रोग”. इथल्या प्रवाही वार्‍यांमुळे इथे कायमच आरोग्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे.

गुरूशिखरावर वरच्या भागी दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे देऊळ आहे, तर खालच्या बाजूला दिसतंय ते आहे दत्तमंदिर. दुसर्‍या चित्रात वरच्या बाजूला एक शंखाकृती आणि खालच्या बाजूला एक भव्य खोबण असलेला खडक, गुरूमंदिराच्या वाटेवर उठून दिसतात. खालच्या चित्रपट्टीतील पहिले चित्र शंखाकृती खडकाचे आहे तर दुसरे खोबणीच्या खडकाचे. संपूर्ण छत असलेल्या, मात्र तळाशी सपाट बूडच नसलेल्या या खोबणी, राहण्यास गुहा म्हणून मुळीच वापरता येण्यायोग्य नाहीत. हा खोबण असलेला खडक, गुरूशिखराच्या वाटेवर सहजच नजरेत भरतो. याच चित्रपट्टीतील तिसर्‍या चित्रात दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे मंदिर दिसत आहे. मंदिरावर जे काही लिहिलेले दिसत आहे ते आहे “गुरू दत्तात्रेय की चरण पादुका. दर्शन करके घण्टा बजाये, मनोकामना पुरी होती है।“. शेवटले चित्र आहे त्याच घंटेचे, जिचा उल्लेख चरण पादुकांच्या मंदिरावरल्या लिखाणात केलेला आहे.

मंदिराजवळ “फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी”ने चालवलेली“माऊंट अबू वेधशाळा” आहे. या वेधशाळेत १.२ मीटर अवरक्त दुर्बीण आहे. इथे अवकाशीय वस्तूंच्या अवरक्त किरणांचे भूमीवरून निरीक्षण करण्या करताची भारतातील पहिलीच प्रमुख सुविधा आहे. इथे उंचीवरच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो (एरोनॉमी). ज्यात विघटन आणि मूलकीकरण महत्त्वाचे असते. या विषयावरचे अनेक प्रयोगही येथे केले जातात. http://www.prl.res.in/. या प्रयोगशाळेचा फोटो चरणपादुकांच्या मंदिराजवळून उत्तम प्रकारे काढता येतो. हा फोटो मात्र आंतरजालावरून साभार उचललेला आहे.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: