20091027

मेवाडदर्शन-९

मेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर

जयपूरचा इतिहास

जोधाबाईः उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा, उर्फ हरखा बाई (जन्मः ऑक्टोंबर १, १५४२, मृत्यूः १६२२)

जोधाबाई उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा, उपाख्य हरखा बाई, ही एक राजपूत राजकन्या होती, जी मुघल सम्राज्ञी झाली. कच्छ्वाह राजपूत, अंबरचे राजे राजे भारमल यांची ती ज्येष्ठ कन्या होती.

विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारातील नवरत्ने होती धन्वंतरी, क्षपणक, अमरसिंह, शंकू, वेताल भट्ट, घट कर्पर, वराह मिहीर, वररुची आणि कालिदास. त्याचप्रमाणे अकबराच्या दरबारातही नवरत्ने असायची असा समज आहे. ती नवरत्ने म्हणजे अकबरनामा, आईने-अकबरी या ग्रंथांचा रचयिता तसेच बायबलचा पर्शियन अनुवादकार अबुल फजल; लीलावती या हिंदू गणितविषयक ग्रंथाचा अनुवादकर्ता, कवी फैझी, जो अबुल फजल याचा भाऊही होता; मियाँ तानसेन उर्फ तन्ना मिश्रा; महेशदास उर्फ राजा बिरबल, हा एक कवीही होता त्याच्या रचना भरतपूरच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत; राजा तोडरमल जो अकबराचा महसुली विभाग सांभाळत असे व ज्याने प्रमाणित वजने व मापे सुरू केली; अंबरचा राजा मानसिंग; अब्दुल रहीम खान-ए-खाना हा अकबराच्या कुमारवयातील पालनकर्त्या बैरामखानाचा मुलगा होता; फकीर अझिआओ-दिन हा गूढवेत्ता आणि मुल्लाह दो पिआझा हा विद्वान.

जोधाबाई या नवरत्नांतील राजा मानसिंग यांची आत्या. जोधाबाईचा अकबराशी विवाह झालेला असल्याने अंबरच्या राजांना मुघल दरबारात मानाचे स्थान प्राप्त झालेले होते. अकबर मानसिंगास “फर्जंद” म्हणजे पुत्र मानत असे. त्यास त्याने ७ हजारी (सर्वोच्च) मनसबदारी दिलेली होती. अकबराचे वतीने महाराणा प्रताप यांचा, हल्दीघाटीत, याच मानसिंगाने पराभव केला होता. मानसिंगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र भाऊसिंग गादीवर बसला. भाऊसिंगांनंतर त्यांचे पुतणे, मिर्जाराजे जयसिंग अंबरचे राजे झाले.

मिर्झा राजे जयसिंग (जन्मः जुलै १५, १६११, मृत्यूः ऑगस्ट २८, १६६७)

जयसिंग वयाच्या १० व्या वर्षी अंबरचे राजे झाले. पुढे १६२७ मधे शहाजहानच्या राज्यारोहणप्रसंगी, जयसिंगांच्या दक्षिणेतील सुभेदाराने -खान जलाल लोदी- याने बादशाही सत्ता झुगारून दिली असता जयसिंगांनी ते बंड शमवले. याखातर त्यांस ४ हजारी सरदार करण्यात आले. त्यानंतर १६३६ मधे शहाजहानने दक्षिणेतील सल्तनतींविरुद्ध उघडलेल्या अभियानांतर्गत गोंडांवरील लढाईत गाजवलेल्या शौर्याखातर जयसिंगांस ५ हजारी सरदार करण्यात आले. १६३८ मधे कंदाहारच्या किल्ल्यावर विजय मिळवतांना शहाजहानने ५०,००० फौज जमा केलेली होती. या प्रसंगी जयसिंगांस “मिर्झाराजे” हा किताब देण्यात आला. १६५७ मधे शहाजहान गंभीररीत्या आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमधे सत्तासंघर्ष सुरू झाला. गुजरातमधील पुत्र मुराद व बंगालातील पुत्र शुजा यांनी स्वतःच स्वतःस सम्राट घोषित केले. आग्र्यातील सर्वात मोठा मुलगा दारा याने जयसिंगांस ६ हजारी सरदार करून, दिलेरखान पठाण सोबत आपला मुलगा सुलेमान याचेबरोबर बंगालात शुजाचे बंड शमवण्याकरता पाठवले. दरम्यान औरंगजेबाने धर्मत आणि समूगढच्या लढाया जिंकून आग्र्यावर ताबा मिळवला होता. हे पाहून जयसिंग व दिलेरखान यांनी औरंगजेबाची सत्ता मान्य केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ७ हजारी (सर्वोच्च) सरदार नेमले. पुढे १६५९ मधे शिवाजीने अफजलखानाचा वध केला आणि १६६३ मधे शाहिस्तेखानाची बोटे कापली. नंतर १९६४ मधे शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ४४ हजाराची फौज देऊन शिवाजीच्या बंदोबस्तास पाठवले. पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी महाराजांना आग्र्यास जावे लागले. मात्र विजापूरच्या मोहिमेस अपेक्षित यश न मिळाल्याचे कारण देऊन औरंगजेबाने जयसिंगांस खूप अपमानित केले. पुढे औरंगजेबाच्या आज्ञेने जयसिंगांस विषप्रयोग करण्यात आला असा प्रवाद आहे. या सार्‍या प्रकारामुळे जयसिंगांच्या मुलांच्या उन्नतीसही खीळ बसली. जयसिंगांनंतर त्यांचे पुत्र रामसिंग (पहिला) मिर्जाराजे झाले, तर त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र बिशनसिंग. बिशनसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सवाई जयसिंग राजे झाले.

महाराजा सवाई जयसिंग (द्वितीय) (जन्मः नोव्हेंबर ३, १६८८, मृत्यूः सप्टेंबर २१, १७४३)

उंच अवकाशातून राजस्थान पाहत पाहत खाली येत गेल्यास, सर्वात वयस्कर अशा अरवली पर्वतांच्या बेलाग कड्यावर वसलेले अंबर (amber, आम्बेर, आमेर) व जयगड किल्ले दृष्टीत भरू लागतात. तत्कालीन आसपासच्या परिसरावर राज्य करण्यास योग्य अशा प्रकारे उंचावर, अंबरात वसवलेला डोंगरी किल्ला तो “अंबर”. तीच तत्कालीन अंबर साम्राज्याची राजधानी होती. अंबर राज्यात सूर्यवंशी राजपूत असलेल्या कच्छवाह घराण्याचे राज्य होते. १६९९ मधे महाराज बिशनसिंग यांचा देहांत झाला त्यावेळी त्यांचे पुत्र महाराज जयसिंग, जे त्यावेळी केवळ ११ वर्षे वयाचे होते, ते अंबरच्या गादीवर बसले. “खेलना” इथली लढाई जिंकल्याखातर बक्षिसी म्हणून औरंगजेबाने त्यांना “सवाई” हा किताब दिला म्हणून ते सवाई जयसिंग म्हणूनही ओळखले जातात. हेच महाराजा जयसिंग (द्वितीय), मिर्जाराजे जयसिंग यांचे पणतू होत. १७४३ मधे ५४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार जयपूरच्या उत्तरेस असणार्‍या गायतोड येथील राजेशाही घाटावर करण्यात आला. त्यांचे नंतर त्यांचे पुत्र ईश्वरीसिंग गादीवर बसले.

१६७९ मधे औरंगजेबाने बसलेला जिझिया कर १७२० मधे सम्राट महंमद शाह यांचेकरवी रद्द करवून घेण्यात सवाई जयसिंग द्वितीय, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गयेत हिंदू यात्रेकरूंवर बसवलेला करही यांचे शब्दाखातरच हटवण्यात आला. यांनीच अनेक शतकांनंतर पुन्हा अश्वमेध (१७१७) आणि वाजपेय (१७३४) यज्ञ केले. ते निंबार्क संप्रदायाचे अनुयायी होते. सतीची प्रथा बंद करणे, लग्नांतील खर्चिकतेस आळा घालणे इत्यादी समाजोद्धारक कार्यांमुळे ते लोकप्रिय झाले.

सम्राट महंमद शाह रंगीला यांच्या दरबारातील, शाही प्रस्थानास मुहूर्त शोधण्याकरता झालेल्या कालनिश्चितीबाबतच्या चर्चेस साक्षी राहिल्यानंतर महाराज जयसिंग यांना अवकाशवेधांच्या अभ्यासाची गरज भासली. अशा प्रकारच्या अभ्यासास प्रोत्साहन देऊन त्यांनी पाच अवकाशनिरीक्षण वेधशाळा प्रस्थापित केल्या. दिल्ली, मथुरा (त्यांच्या आग्रा प्रांताची राजधानी), बनारस, उज्जैन (त्यांच्या माळवा प्रांताची राजधानी) आणि जयपूर येथे त्या वेधशाळा स्थापन केलेल्या होत्या. त्यांना “यंत्रमंदिर” म्हणून ओळखले जात असे. त्याचा अपभ्रंश होत होत त्यांना हल्ली “जंतर-मंतर” म्हणून ओळखले जाते. त्यापैकी फक्त जयपूरची वेधशाळा अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. हिदू व मुस्लीम अवकाशवेध शास्त्रांवर आधारित बांधलेल्या या वेधशाळा ग्रहणे व तत्सम अवकाशीय घटनांचे पूर्वभाकीत करू शकत. त्यांत “रामयंत्र” (मध्यभागी गोलाकार स्तंभ असलेली आकाशास खुली दंडगोलाकृती इमारत), “जयप्रकाशयंत्र” (अंतर्वक्र, अर्धगोलाकृती इमारत), “सम्राटयंत्र” (प्रचंड संपातदर्शी अर्धवर्तुळाकृती इमारत), “दिगांशयंत्र” (एका गोल स्तंभाभोवती उभारलेल्या दोन वर्तुळाकार भिंती असलेली इमारत) आणि “नारीवलययंत्र” (दंडगोलाकृती भिंतीच्या आकाराची इमारत) या यंत्रांचा समावेश होतो. त्यांनी युरोपातून पाचारण केलेले ख्रिस्ती अवकाशशास्त्रज्ञ वापरत असत त्यांपेक्षाही, या वेधशाळांतील उपकरणे व तंत्रे जास्त प्रगत आणि उच्च प्रतीची होती.

जयनगर (जयपूर) नगर वसवणे ही जयसिंगांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती. विद्याधर भट्टाचार्य नावाच्या बंगाली स्थापत्यकलानिपूण शिल्पशास्त्र्याच्या नियोजनाखाली १७२७ मधे पायाभरणी करून नव्या राजधानीचे काम सुरू झाले. १७३३ मधे संपूर्ण नगर सज्ज होऊन, कच्छवाहांची राजधानी अंबर मधून जयनगरात स्थलांतरित करण्यात आली. केवळ सहा वर्षांत जयपूरसारखे नियोजनबद्ध नगर राहण्यायोग्य तयार करणे, ही आजच्या निकषांनीही अतुलनीय कामगिरीच ठरावी. ३,००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक संस्कृतींच्या शोधात सापडलेल्या शहरांप्रमाणे, संस्कृत शिल्पसूत्रांबरहुकूम, नगरनियोजन केलेल्या औरस-चौरस संरचनेत जयपूर नगर वसवलेले आहे.

वरील नकाशा पाहा. हा नकाशा राजस्थान सरकारच्या पर्यटनविभागाने २००४-२००५ मधे प्रसिद्ध केलेल्या नकाशातील जुन्या शहराचा केवळ तटबंदीतील भाग कापून, १६ अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवून तयार केलेला आहे. नजरेत भरणारी नगररचना, भौमितिक विभागणी आणि शिस्तबद्ध रीतीने केलेली रस्त्यांची आखणी ही याची वैशिष्ट्ये आहेत. सुरजपोल ते चॉंदपोल रस्ता पूर्व-पश्चिम नसून १६ अंश दक्षिणेकडे कललेला आहे. याचे काय कारण असावे? जे असेल ते निश्चितस्वरूपाने खगोलशास्त्रीय असावे असे मला वाटते.

हल्ली महाराज भवानीसिंग हे जयपूरचे महाराज आहेत. ते जयपूरच्या नगर महालात राहत असतात. महालावर दोन झेंडे फडकत असलेले पाहून मी मार्गदर्शकास त्याचे कारण विचारले असता त्याने महाराजांच्या “सवाई” या बिरुदाचा निर्वाळा दिला. एक पूर्ण, आणि त्याचेच वर, एक चतुर्थांश आकाराचा दुसरा, असे दोन ध्वज राजप्रासादावर फडकत असतात. १९७१ मधे संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यावर ही बिरुदे नावाचीच काय ती उरलेली आहेत. मात्र महाराज भवानीसिंग यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात गाजवलेल्या शौर्याखातर त्यांना भारत सरकारने “महावीरचक्र” देऊन सन्मानित केले आहे. पुढे १९९४ ते १९९८ दरम्यान ते भारताचे ब्रुनेईतले उच्चायुक्तही राहिलेले होते.

इथले रेल्वेस्टेशन पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण टोकाला आहे. जयपूर नगर दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी नगर’ आणि तटबंदीच्या दक्षिणेला वसलेले नवे जयपूर नगर. जयपूर शहराच्या उत्तरेला ’अंबर’/’आंबेर’/’आमेर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग त्या गुलाबी दगडांनी बांधलेल्या असोत वा नसोत, त्यांना गुलाबी रंग देणे कायद्याने बंधनकारक केलेले असल्याने, शहराचा गुलाबी (खरे तर गेरुआ म्हणजे गेरूचा) रंग सर्वदूर भरून राहिलेला दिसतो. राजस्थानात दरवाज्याला ’पोल’ म्हणतात. गुलाबी शहराच्या पश्चिमेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’चांद’पोल म्हणतात, तर पूर्वेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’सूरज’पोल म्हणतात. दोन्ही दरवाजांना जोडणारा आडवा रस्ता गुलाबी शहरातला मुख्य रस्ता होय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुलाबी नगर उभ्या-आडव्या रस्त्यांवर प्रशस्तपणे वसलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी ’इशारलट’ नावाचा उंच जयस्तंभ आहे. महाराज ईश्वरीसिंग यांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून तो जयपूर शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आहे. गुलाबी शहराच्या अतिपूर्वेला एक उंचसा डोंगर आहे. त्यावर एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते म्हणजे ’गलताजी’ उर्फ गालव मुनींचे मंदिर. इथून, चौरस सुनियोजित रस्त्यांतून वसलेले जयपूर नगर अतिशय रमणीय दिसते. गुलाबी शहराच्या दक्षिणेकडील तटबंदीतून मुख्य शहराकडे जाणारे तीन प्रमुख रस्ते आहेत. अजमेर रस्ता ’अजमेरी गेट’ मधून बाहेर पडतो. ’मोतीडुंगरी” उर्फ ’एमडी’ रोड मोतीडुंगरी राजप्रासादाकडे घेऊन जातो. डुंगरी म्हणजेच टेकडी. हा राजप्रासाद उंच टेकडीवर बांधलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो.

सकाळीसच आम्ही जयपूर मधील नगरप्रासाद पाहण्याकरता जाऊन पोहोचलो. राजमहाल चौसोपी; प्रशस्त; पत्थरातील कोरीव काम, रंगकाम, नक्षीकाम आणि मीनाकाम (काच, आरसे, निरनिराळ्या रंगच्छटांचे दगड तसेच रत्ने यांचे शुभ्र संगमरवरावर केलेले जडावकाम) यांनी अलंकृत आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असाच आहे. पिढ्यानुपिढ्यांच्या समृद्धतेने सतत संपन्न होत राहिलेल्या अनेक राजप्रासादांचा तो समूह आहे.

राजवाडा कळस-कमानींनी ठायी ठायी अलंकृत केलेला आहे. पुष्पवाटिकांनी प्रफुल्लित केलेला आहे. विस्तीर्ण अंगणांनी प्रासादाच्या भव्यतेत भर घातलेली आहे.

मोठमोठ्या भिंतीवर बहारदार नक्षिकाम करून, महिरपी, कमानींनी सजवून महालास कलात्मकता आणलेली आहे. देवड्या, ओसर्‍या, दिवाणखाने, दालने, कक्ष, इत्यादी सारा परिसर पाहता पाहता आपण आणखीही बराचसा भाग पाहिलेलाच नाही हेही लक्षात येऊ लागले. सारा राजवाडा इतमामाने पाहायचा तर आवश्यक असणारा वेळ आमच्याकडे नव्हता. (खरे तर कुठल्याच पर्यटकाकडे इतका वेळ नसतो की, शतकानुशतके समृद्ध होत राहिलेला नगरप्रासाद भेटीच्या तुटपुंज्या वेळात, मनाचे समाधान होईस्तोवर पाहता येईल.)

राजप्रासादाच्या समोरच आहे जंतरमंतर म्हणजेच “यंत्रमंदीर”. आत प्रवेश करताच मार्गदर्शकाने लघुसम्राटयंत्रावर तत्कालीन वेळ, सूर्यकिरणांमुळे मधल्या भिंतीच्या वक्राकार-संगमरवरी-उताण्या-कमानींवर पडणार्‍या सावलीच्या स्थानावरून, कशी सांगता येते ते कृतीसह दाखवून दिले. कमानींवर खोदलेल्या मापनरेषा, २० सेकंदापर्यंतच्या कमीतकमी फरकाने, वेळ वर्तवू शकत होत्या. तिथली अनेकविध यंत्रे कशी वापरायची ते शिकण्याकरता तिथे राहून संशोधन करणारे विद्यार्थी आम्ही पाहिले. त्यांच्या पासंगास पुरेल एवढाही वेळ आमच्यापाशी नव्हता. तरीही आपल्या संस्कृतिक समृद्धतेच्या वारशाचे भरभक्कम पुरावे पाहून मन भरून आले. असलेच काहीतरी दैदिप्यमान आपल्यालाही करता यावे अशी उमेद जागली. याच्यासारख्या स्थळांच्या पर्यटनाने साधण्यासारखे यापरता जास्त काय असू शकेल.

जंतरमंतर नंतर जेवण उरकून आम्ही जयपूरच्या जलमहाच्या दिशेने कूच केले. ऊन तापू लागले होते. जलमहालापर्यंत जाता येणारच नव्हते. मात्र तळ्याच्या पाळीवरूनच जलमहालाचा फोटो काढता आला.

मग आम्ही अंबरच्या किल्ल्याकडे गेलो. बस जाऊ शकत होती तोपर्यंत बसने आणि मग पुढे जीपने. मग खाली पायउतार होऊन किल्याच्या दिशेने चालू लागलो. तटबंदीच्या काठाशी एक युवक पारंपारिक राजस्थानी पोशाखात एक स्थानिक वाद्य, तालीन होऊन वाजवत असलेला दिसला. गाणेही ओळखीचे होते. नागीण सिनेमातले “मेरा तन डोले, मेरा मन डोले, मेरे दिल का गया करार”. आम्हीही ऐकू लागलो. त्याचे चलचित्रणच केले. मग त्याला विचारले की ह्या वाद्याला काय म्हणतात? तो म्हणाला “रावणहट्टा!”.

माझा मावसभाऊ अजित डोंगरे आमच्या सोबत होता. तो बासरी-पावा खूप छान वाजवतो. त्याला संगीतातली बर्‍यापैकी जाण आहे. मागे तो म्हणाला होता की अशा प्रकारचे काही वाद्य अस्तित्वातच नसावे. म्हणून मी त्याला पुराव्यानिशी “रावणहट्टा” दाखवले. त्याने ते विकत मिळू शकेल का विचारले. तो विकत आणून द्यायलाही तयार झाला. आम्ही किल्ला पाहून येईपर्यंत त्याने एक वाद्य आणून ठेवले होते. पण त्याच्या तारा, तुंबा आणि धनुष्य यांचा मेळ योग्य प्रकारे बसत नव्हता म्हणून तो प्रयास मग तसाच सोडून द्यावा लागला. आमेर किल्ल्याचे तपशीलवार वर्णन मी माझ्या यापूर्वीच्या जयपूरच्या प्रवासवर्णनात आधीच करून ठेवलेले असल्याने इथे पुनरावृत्ती करत नाही.

2 comments:

Prashant Kalkute said...

अप्रतिम!!!

ऊर्जस्वल said...

धन्यवाद प्रशांत!