20091027

मेवाडदर्शन-१

२००९ च्या ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आम्ही मेवाडदर्शन सहल सचिन ट्रॅव्हल्सच्या सोबत केली. या पर्यटनाची पूर्वतयारी; प्रत्यक्ष प्रवास-निवास, खानपान, कलास्वाद, खरेदी; आणि प्रवासा अखेरीस या सर्वांतून झालेले मेवाडदर्शन; अशा स्वरूपात हे प्रवासवर्णन लिहीत आहे. यातील इतिहासात्मक वेचे, बहुतेकदा, विकिपेडियावरून स्वैर अनुवाद करून घेतलेले आहेत. ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर हे दोन दिवस रेल्वेच्या प्रवासातच खर्ची पडले. तसेच ९ ऑक्टोबर जयपूरला खरेदीखातर खर्चलेला असल्याने, पर्यटनाचे प्रत्यक्षात आठच दिवस पदरी पडलेले होते. म्हणून, प्रस्तावनेचा हा पहिला भाग आणि दर दिवशीच्या पर्यटनाचा प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ भागात हे प्रवासवर्णन लिहीलेले आहे.

यंदा गणपती ते दिवाळीच्या दरम्यान मेवाड पाहायला जायचे असा निश्चय झाल्यावर तिथला उत्तम काळ कोणता (खरे तर मेवाड दर्शनार्थ पक्ष पंधरवड्यासारखा काळ शोधूनही सापडणार नाही), आपल्याला कधी वेळ उपलब्ध आहे, सुट्ट्या कधी काढता येतील या सगळ्याचा अंदाज घेऊन सहलीच्या नियोजनास सुरूवात झाली. माझा आवडता समज असा आहे की पर्यटन सहल ८-१० दिवस तरी लांबीची असावी. कमी असल्यास, नुसता जाण्या-येण्यातच घालवलेला वेळ, सहलीत प्रत्यक्ष दर्शनार्थ घालवलेल्या वेळापेक्षा जास्त ठरून, सहलीकरता उपलब्ध असलेल्या वेळाचा अपव्यय होतो. तसेच जास्त असल्यास, पर्यटनाचा उत्साह मावळत मावळत अखेरीस ते पर्यटन आनंदचे राहत नाही. म्हणून सहल ८-१० दिवसांची असावी असाही निर्णय झाला. शिवाय रेल्वेचा प्रवास रात्रभराहूनही जास्त असल्याने येणे-जाणे विमानानेही करता येईल काय याची चाचपणी करायचे ठरले. मग काय काय पाहायचे आहे, काय पाहण्यासारखे आहे, मेवाडचा इतिहास काय आहे, तिथे काय काय खाण्याचे अभिनव पदार्थ चाखता येतील, कुठकुठल्या कलांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येईल, कोणकोणती निसर्गसौंदर्ये आस्वादता येतील याची जंत्री सुरू झाली. प्रत्यक्ष सहल जरी ८-१० दिवसांचीच होणार असली तरीही माझ्या प्रथेप्रमाणे तीन महिने आधीपासूनच माहिती काढणे, आरक्षणे करणे, पर्यटनसाहित्याची जमवाजमव इत्यादीस जोमाने सुरूवात झाली.

यात्राकंपनीसोबत पर्यटन केल्यास अल्पावधीत नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, तसेच जुळवाजुळवीत जीव आटवणे कमी होते हे खरेच, पण पैशाच्या रूपात त्याचे मूल्य चुकवावेच लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा तर हे करायलाच हवे, मग जास्त खर्च झाला तरी चालेल असा निर्णय झाला. त्यानुसार इंडियन एअरलाईन्स, केसरी, सचिन इत्यादींच्या संचालित सहलींचा तपास हाती घेतला. इंडियन एअरलाईन्सच्या देकारात विमानप्रवासाच्या खर्चाला पहिली प्राथमिकता होती. स्थानिक पर्यटन स्थानिक हॉटेलांवर सोपवतात असा आमचा मागचा अनुभव होताच. शिवाय संपूर्ण सहलीचा माणशी खर्च त्यांचाच सर्वाधिक होता. केसरी आणि सचिनच्या संकेतस्थळांवर सहलींची माहिती व्यवस्थितपणे दिलेली दिसत होती. मात्र केसरीच्या देकारात काय काय समाविष्ट होते ते नीटपणे कळू शकत नव्हते. सगळ्यात माहितीतत्पर सहलविपणन सचिनचे होते. माहिती विचारायचा अवकाश की हवी ती माहिती तत्काळ सादर होत होती. त्यांच्या सवलती देण्याच्या पद्धती नीटपणे कळलेल्या असल्याने, प्रत्यक्षात किती खर्च होईल याचा अदमास लगेचच आला. त्यांचाच दरमाणशी सहलखर्चही सर्वात कमी येत होता. डोंबिवलीला त्यांचे कार्यालयही होते. म्हणून मग सचिनसोबत जाण्याचा निर्णय झाला.

मात्र जरी ते रेल्वे आरक्षण करून देऊ म्हणत होते तरी प्रत्यक्षात आम्हाला हव्या असलेल्या १०-१०-२००९ च्या गाडीचे आरक्षणच रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. शिवाय त्यांच्या सहलीची सुरूवात आबूरोडपासून होत होती. म्हणजे विमानाने अहमदाबादपर्यंत जाऊन आबूला जाण्याचे सव्यापसव्य करूनही त्याचा पुरेसा लाभ होणारच नव्हता. हे त्यांना सांगून, रेल्वे आरक्षणाची त्यांची काही विशेष व्यवस्था आहे काय असे विचारता, ती तशी नाही असेच उत्तर आले. मग रेल्वेचे आरक्षण झाल्याखेरीज सहलनोंदणी करायची नाही असे ठरवले आणि त्यांच्या नक्की केलेल्या दुसर्‍या कुठल्या तारखेस जुळवून घेता येईल का, ही चाचपणी सुरू केली. ३०-०९-२००९ लाच त्यांची पहिली सहल सुरू होत होती. पण त्याकरताचे आरक्षण तर आता मिळणारच नाही असे वाटत होते. तरीही रेल्वेचे संकेतस्थळ बघितले, आणि काय आश्चर्य, ३०-०९-२००९ चे आरक्षण उपलब्ध होते. सचिनला विचारून घेतले की आमचे आरक्षण होईपर्यंत आमच्या जागा राखून ठेवता येतील का? ते हो म्हणाले. मग जाण्या-येण्याचे आरक्षण लगेचच करून घेतले आणि सचिनसोबत सहलनोंदणी केली.

मेवाडः एक बहुचर्चित पर्यटनवर्तुळ

मग तपासादरम्यान असे लक्षात आले की मेवाड पर्यटन हा काही साधासुधा प्रकार नाही, तर तो भारतातला सर्वात जास्त पर्यटकांच्या आवडीचा पर्यटन मार्ग आहे. आनंददायी, प्रेरणादायी आणि सुखाचा. मेवाडास मिळालेले निसर्गाचे वरदान म्हणजे अरावली पर्वत.

अर्बुद आवली म्हणजे अरावली. अर्बुद म्हणजे गळू, टेंगूळ, टेकाड, शिखर, कळस. हरियाणा, राजस्थान तसेच गुजरातच्या भूभागांवर ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा हेच अरावली पर्वताचे स्वरूप आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतांचे स्वरूप भिंतींसारखे आहे. मात्र अरावली पर्वत सुट्ट्या टेकड्या टेकड्यांचा मिळून घडलेला आहे. पश्चिमेकडल्या थरच्या वाळवंटास रोखून धरण्याचे महत्त्वाचे कार्य अरावली पार पाडतो आहे. याच कारणाने इथे अर्बुदादेवीची पूजाही सर्वत्र केली जाते. अरावली पर्वतातून बनास, लुनी, गंभीरा, चंबळ, (सर्व पूर्ववाहिनी) तसेच साबरमती (पश्चिमवाहिनी) इत्यादी नद्या उगम पावतात.

हल्लीच्या राजस्थानाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. थरच्या रुक्ष वाळवंटाची मरूभूमी असलेला मारवाड आणि तलाव-अरण्यांनी जिवंत झालेला, अरवली पर्वताच्या कुशीत वसलेला मेवाड.

भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे. दिल्लीचे तख्तनशिन बादशाहसुद्धा भरतभूमीच्या वैभवाचे उपभोग घेऊ शकले नसतील, एवढे वैभव राजपुतान्यातील राजांनी अनुभवले आहे. आज दिल्लीत म्हणण्यासारखा राजवाडा नाही. मात्र राजस्थानात सारेच राजेशाही. मेवाडातील अंबरचे राजे कच्छवाह. यांनीच जयपूर वसवले. तिथे राज्य केले. दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच जुळवून घेतले आणि सार्‍या भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात ठेवली. तिचा उपभोग घेतला. चित्तौडचा इतिहास महाभारतापासूनचा आहे. इथे बाप्पा रावळांच्या गहलोत वंशाने राज्य केले. पुढे ते शिसोदिया म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी उदयपूर नगर वसवले. हे कायमच दिल्लीच्या सत्तेविरुद्ध संघर्षरत राहिले. तरीही जयपूर असो की चित्तौड, दोन्हीही ठिकाणी जे राजप्रासाद आज पाहायला मिळतात ते भरतवर्षातील संपत्तीच्या साठ्याचे निदर्शक आहेत. मात्र अंबर व चित्तौड यांच्यात एक मुख्य फरक आहे. भरतवर्षाच्या रक्षणार्थ आणि स्वाभिमानार्थ अंबरकरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर चित्तौडकरांनी संघर्षाचा मार्ग पत्करलेला दिसून येतो. सार्‍या भरतवर्षातील संपत्तीचा राजपुतान्यात संचय करण्यात मात्र दोन्ही घराण्यांनी कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. वायव्येस असल्याने अंबरकरांना कायमच आक्रमकांचा त्रास सहन करावा लागे. तर चित्तौडकर बव्हंशी सुरक्षिततेच्या नैसर्गिक आवरणात राहिल्याने तडजोडीस धार्जिणे राहिले नाहीत.

आपल्या बुद्धिवैभवाने मातृभूमीस परम वैभवाप्रत नेण्याकरता राजपुतांनी जयपूर, उदयपूरसारखी नयनमनोहर शहरे वसवली; यंत्रमंदिरा (जंतरमंतर) सारख्या वेधशाळा निर्माण करून अवकाश निरीक्षणास, संशोधनास प्रतिष्ठा दिली; दिलवाडासारखी मंदिरे, कुंभलगड, चित्तौडगड, अंबर, रणथंभोर यांसारखे कोटकिल्ले व त्यावरील गढ्या-प्रासादांनी कलेचे स्वर्गच भुईवर आणले आणि राजस्थानच्या मरुभूमीत “सहेलियों की बाडी”, जलमहल यांसारखी मानवी उपभोगाची चिरंतन रम्य स्थळे साकार केली.

निसर्गाचे दान सढळ हस्ते मिळालेले असतांना, ते मानवनिर्मित लेण्यामंदिरांनी विभूषित करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यात राजपुतांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही रस्ते, वीज, प्रवासीनिवास यांबाबत हे राज्य कायमच पर्यटनानुकूल राहत आलेले आहे. त्यामुळे आज तो राजपुताना पर्यटनाचा स्वर्गच मानला जातो. तोच स्वर्ग आज जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतो. आणि म्हणूनच भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे.
.

No comments: