20090513

कल्पना चित्रण-२: भारतमाता

भारतमातेच्या पायांशी हिंदी महासागर आहे.
उजव्या हाताशी सिंधुसागर आहे.
डाव्या हाताशी बंगालचा उपसागर आहे.
शिरोभागी देवतात्मा हिमालय आहे.

हिमालयाच्या उत्तरेला असलेल्या विस्तृत पठारावर, मध्यभागी `मन: सरोवर' आहे.
मन: सरोवराच्या उत्तरेला कैलास पर्वत विराजमान आहे.

मन: सरोवराच्या पश्चिमेकडील रंध्रातून एक ओहोळ बाहेर पडतो.
ओहोळाचा ओढा, ओढ्याचा नाला, नाल्याची नदी होते.
उत्तुंग कड्यांवरून खोल, खोल दऱ्यांमध्ये उड्या घेत ती नदी पंजाबात उतरते.
त्या नदीचा आकार एवढा विशालकाय होतो की तिला `नद' म्हणू लागतात.
पुढे पंजाबातून वाहत, वाहत ती सिंधुसागरास मिळते.
हीच ती सुप्रसिद्ध सिंधू नदी.

त्याचप्रमाणे, मन: सरोवराच्या पूर्वेकडील रंध्रातून एक ओहोळ बाहेर पडतो.
ओहोळाचा ओढा, ओढ्याचा नाला आणि नाल्याची नदी होते.
पिवळ्या पठारावरून, पूर्वेकडे वाहत, वाहत ती विस्तृत भूप्रदेशांतील जलांना स्वत:त सामावते.
त्या नदीचा आकार एवढा विशालकाय होतो की तिला `नद' म्हणू लागतात.
आसाम, पूर्व बंगालातून वाहत, वाहत ती नदी बंगालच्या उपसागरास मिळते.
हीच ती सुप्रसिद्ध ब्रम्हपुत्रा नदी.

जणूकाही कैलास पर्वत आपल्या मन: सरोवररूपी विशाल जलकुंभातून
भारतमातेला महामस्तकाभिषेक करीत आहे.
तिच्या दोन्ही अंगांनी, सिंधू व ब्रम्हपुत्रा नद्यांतून वाहणारे पाणी
भारतमातेला सचैल स्नान घालून तिर्थोदक,
जणू हिंदी महासागरास पावते होत आहे.

असे हे वर्तुळाकार उदक, प्रपातांनी वेष्ठीत `उदकमंडलम्', भारतमातेचे निवासस्थान आहे.
आम्ही सारेच ह्या निवाऱ्याचे निवासी आहोत.
आमची स्वस्थता आणि स्वातंत्र्य अक्षय राहो.

2 comments:

रोहन चौधरी ... said...

अरबीसमुद्र नव्हे तर 'सिंधू सागर' ... सुप्रसिद्ध सिंधू नदी समुद्राला मिळते आपण त्यास आज दुर्दैवाने 'अरबी समुद्र' म्हणतो...

कल्पना चित्रण छान लिहिले आहे ... :

नरेंद्र गोळे said...

रोहन,

अर्थोचित दुरुस्ती त्वरित सुचवल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद!

आपल्या सूचनेनुसार इष्ट बदल तत्काळ केलेला आहे.

आपल्या सूचनेनेच, आपल्या मनांत भारतमातेचे मानचित्र
किती स्पष्टपणे सतत तेवत असते ते व्यक्त होते.

आपल्या देशाभिमानाचे सर्वच देशभक्तांस कौतुक आहे.

अपल्या पुण्यपावन भारतभूमिस परंवैभवाप्रत नेऊ या!

आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे