२००८-११-२४

"उडिशा" दर्शन-३

गोपालपूर

बरकूलहून गोपालपूरला जातांना आम्हाला वाटेत नारायणी मंदिर आणि टंपारा सरोवर पाहायचे होते. नारायणी मंदिरात छोटिशी टेकडीच चढून जायची असल्याने आमच्या चक्रधारी (म्हणजे शुद्ध मराठीत ड्रायव्हर) ने चपला घालूनच जाण्याचा सल्ला दिला. मात्र मंदिराच्या बऱ्याच आधी चपला-बूट काढून ठेवावे लागले. पुढेही बरेच चालायचे होते. आमचे 'देह देवळात आणि चित्त खेटरात' असे झाले होते. नारायणी आणि ठाकुरजींचे दर्शन करून आम्ही एका वेगळ्याच मार्गाने खाली उतरत होतो. तेव्हा आता आपली चपला-बुटांशी नक्की फारकत होणार असे वाटले. पण आश्चर्यकारकरीत्या आम्ही जिथे चपला-बूट काढलेले होते तिथेच पावते झालो. महागाईची पादत्राणेही जशी आम्ही ठेवलेली होती तशीच होती. जे आमच्या मनात होते, ते त्या स्थानिक लोकांच्या आचरणातही नव्हते. त्यामुळे मनाला आपलीच लाज वाटली. नारायणी मंदिरात एका झाडाला कंकण बांधून वरदान मागण्याची प्रथा आहे. मी सांगितले गेले त्याप्रमाणे कंकण बांधून परत आलो. मात्र, आल्यावर वरदान मागायची गोष्ट समजल्यामुळे कुठलेही वरदान मागितलेलेच नव्हते. आता देवी "नारायणी" आणि देव "ठाकूरजी" सर्वज्ञानी असल्यामुळे त्यांनी आमच्या व्यथा, समस्या परस्पर दूर केल्या असणारच ह्यावर आमचा विश्वास आहे. एरव्ही आमचे 'उडिशा'दर्शन विघ्नविहीन, सुरळित संपन्न होते ना!

08 Tampara

ज्या कारणाने महानदीच्या मुखाशी चिल्का सरोवर निर्माण झालेले आहे त्याच कारणाने ओरिसातील बव्हंशी सर्व प्रमुख नद्यांच्या मुखाशी पाण्याची विशाल सरोवरे निर्माण झालेली आहेत. ऋषीकुलया नदीच्या मुखाशी झालेल्या सरोवरास टंपारा म्हणतात. टंपारा सरोवरास आम्ही भेट दिली तेव्हा दुपारी ११-१२ चा सुमार असावा. तिथे वाऱ्यावर चालणाऱ्या शिडाच्या होड्या कशा चालवाव्यात याचे प्रशिक्षणवर्ग सुरू होते. किनाऱ्यावरून जीवनरक्षक बंडी (लाईफ जॅकेट) घालून होडीच्या, उथळ शिंपल्यागत दिसणाऱ्या, फळकुटावर उतरून शिड उभारतांना आम्ही प्रशिक्षणार्थी पाहिले. सरोवरात अनेक शिडाच्या होड्या विहरत होत्या. मात्र शिड उभारताच प्रवाहित होणाऱ्या होड्या परतताना परततात कशा? का त्या उचलून आणतात ह्या मनातील प्रश्नाचे उत्तर शोधायला आम्हाला पुरेसा वेळ सापडला नाही.

09 Gopalpur

गोपालपूरचा समुद्रकिनारा अतिशय प्रसिद्ध आहे. दीपगृहाजवळ दिसणारी हिरवाई म्हणजे ओबेराय हॉटेलचा हिरव्या वनश्रीने नटलेला परिसर आहे. मग युथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि त्यानंतर पंथनिवास, एकास एक लागूनच आहेत. पंथनिवासाच्या (समुद्रकिनाऱ्याकडे तोंड करून उभे राहिले असता) डाव्या बाजूकडे थोडेसे चालून गेल्यावर गोपालपूरचा सार्वजनिक किनारा दिसतो. या किनाऱ्याच्या बांधीव पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर एका बाजूला मत्स्यकन्येचे तर दुसऱ्या बाजूला गोगलगाईचे दगडी शिल्प उभारलेले आहे. ते दृश्य लागलीच लक्ष वेधून घेते. सगळ्याच परिसरातून दीपगृह सतत दिसतच राहते. संध्याकाळी आम्ही पंथनिवासाच्या खासगी किनाऱ्यावर खूप विहरलो. मग आम्ही आळीपाळीने फोटो काढत, लाटांसोबत पायाखालच्या सरकत्या वाळूचा मनसोक्त अनुभव घेतला. फिरत-फिरत आम्ही गोपालपूरच्या सार्वजनिक किनाऱ्यावर गेलो. तिथल्या मत्स्यकन्या आणि गोगलगाय यांच्या शिल्पाकृती नजरेत न भरत्या तरच नवल. दुसऱ्या दिवशी आम्ही गोपालपूरच्या किनाऱ्यावरून सूर्योदय अनुभवला. किनाऱ्यावर एका दोऱ्यास आमिष बांधून समुद्रात खोलवर जाऊन ते तिथे टाकून ठेवून लाटेच्या पाण्यासरशी ओढून बारकाले मासे पकडणारे कोळी दिसत. साऱ्या जगाच्या व्यवहारांपासून अलूफ, बेदखल राहूनही अशाप्रकारे उपजीविका मिळवणाऱ्या कोळ्यांचे मला कौतुक वाटले. ते कुणावरच अवलंबून नव्हते. दर्यादिल सागर त्यांच्या किमान गरजा सहज पुरवण्यास समर्थ होता.

तप्तपाणी

तप्तपाणीला वज्रेश्वरीसारखे गरम पाण्याचे झरे आहेत. मात्र, तप्तपाणी हे एक अभयारण्यही आहे. अभयारण्यातील अतिथी-निवासा(गेस्ट- हाऊस)सारखे, इथे पंथनिवास वसलेले आहे. पहिल्यांदा आम्हाला एका काष्ठ-कुटीत (लॉग- हाऊस) मध्ये जागा दिली होती. तिथे एक डिस्कव्हरीतल्यासारखा कोळी दिसला. पहिल्यांदा तो खोटाच वाटला. मग फुलपाखरू खातांना दिसला तेव्हा खरा असल्याची खात्री पटली. तिथल्या बगीच्यात अनेकानेक प्रकारचे गुलाब होते.

पंथनिवासात गरम पाण्याच्या कुंडातील पाणी आणून आंघोळीच्या हौदात भरण्याची सोय केलेली होती. आत सर्वत्र गंधकाचा गंध आणि वाफ परिमळत होती. जरा दूर कपडे ठेवायला दांडी होती. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ असल्याने पायऱ्यांवर पाण्याची पातळी सहज कळून येत नव्हती.

10 Taptapani

बाहेर एका ठिकाणी वेणीच्या पेडांसारखी दिसणारी पाने होती. आवाराबाहेर तीन गवताने शाकारलेल्या झोपड्या दिसत होत्या. ओरिसातील प्रवासात अनेक अतिप्रचंड वड दिसत. त्यातलाच एक त्या झोपड्यांशेजारी आढळला होता.

पंथनिवासासमोरच्या रस्त्यावरच समोरच्या बाजूला थोड्या वरच्या बाजूस तप्तपाणीचे प्रसिद्ध कुंड होते. ओरिसातील प्रथेप्रमाणे त्या मंदिरास एक सिंघद्वार (मुख्यद्वार, महाद्वार) होते. आतमध्ये एक शिवमंदिर आणि एक प्रचंड वृक्ष होता. पुढे एक दुर्गा-काली मंदिर व शेजारीच ते तप्तपाण्याचे कुंड होते. कुंडातून बाहेर पडणारे पाणी एका बाजूस एका पाईपद्वारे एका मोरीत सोडलेले होते, जिथे पाय धुण्याची, ते पाणी भरून नेण्याची सोय होती. दुसऱ्या बाजूस ते पाणी एका हौदात भरून स्नानाची सोयही केलेली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही चंद्रगिरीस तिबेटी निर्वासितांच्या छावणीस भेट देण्यास गेलो होतो. तिथे आमची कर्मा लामा यांच्याची भेट झाली.

तप्तपाणीहून चंद्रगिरीला जातांना राज्य महामार्ग क्रमांक १७ आणि ३४ यांचेवरून प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा आंबा, चिंच, सुवर्णचंपक, पांढरा चाफा, वड, पिंपळ इत्यादी विशाल वृक्षांच्या रांगा आहेत. वड तर इतके विस्तारलेले आहेत की मूळ खोड कुठले आणि पारंबी कुठली हे ओळखता येऊ नये. भवताली हिरवीगार शेते. त्यात भात व मका शेती, आणि केळी व पेरू इत्यादींचे मळे आहेत. अनेक घरांतून अंगणात मक्याची कणसे सोलून वाळत घातलेली दिसून आली. गवताने शाकारलेली घरे, शेळ्या, गाई, म्हशी यांचे कळप आणि ते हाकत जाणारे गुराखी. गुराखीही एक तालपत्रांची विणलेली टोपी घालून उन्हापावसांपासून स्वतःला वाचवतांना दिसत होते.

रांभा

रांभाच्या रस्त्यावर आम्हाला बकऱ्या, गाई, म्हशींचे कळप दिसत. त्यांचे गुराखी तालपत्राने विणलेल्या विशिष्ट प्रकारच्या टोप्या घालत.

11 Rambha

रांभा हे चिल्का सरोवराकाठचे, पूर्व किनारी रेल्वेचे एक स्टेशन आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ वरचे एक शहर आहे. इथे पंथनिवास असून त्याचेपासून चिल्का सरोवरात स्वयंचलित नावेने फेरफटका मारता येतो. इथे हवामानखात्याची एक प्रयोगशाळा असून हवामानविषयक मापने करण्याची सोय आहे. इथेच आम्हाला भारतीय संचारनिगमचे विनिमयकेंद्र आणि मनोराही आढळला. आम्ही इथल्या पंथनिवासात एक दिवस मुक्काम केला होता आणि सकाळच्या सुमारास स्वयंचलित नावेने ब्रेकफास्ट आयलँड, घण्टशिलाचा डोंगर, बर्डस आयलँड आणि हनिमून आयलँड इत्यादी, चिल्का सरोवरातील चार बेटांवर फेरफटका करून आलो.

रांभाच्या जेटीच्या टोकाशी सिमेंट काँक्रीटचे व्यवस्थित जिने बोटींत चढ-उतार करण्यासाठी बांधलेले होते. आम्ही नावेत बसलो खरे. मात्र, लगेचच भुरूभुरू पाऊस सुरू झाला. वातावरण ढगाळलेलेच होते. गार वारे सुटले. आणि थंडी वाजू लागली. मग आम्ही ब्रेकफास्ट बेटाकडे वाटचाल करू लागलो. बेटाच्या नावाखातर एक मनोरा आणि एक छोटीशी खोलीवजा बांधकामच काय ते दिसत होते. दूरवरून पांढऱ्या ठिपक्यासारखे दिसणारे बांधकाम जवळ आल्यावर असे दिसू लागले. उन्हाळ्यात पाणी उतरल्यावर त्याच्याभोवतीचे बेट वर येऊन दिसू लागते असे नावाडी सांगत होता. मनोऱ्याजवळच्या चौथऱ्यावरील दगडाला होडी बांधून आम्ही वर चढलो. एव्हाना पाऊस थांबला होता. खोलीच्या मनोऱ्याकडील बाजूला दार, म्हणजे त्या आकाराचा उघडा भाग होता. तर इतर तीन बाजूंना उभट आयाताकृती झरोके होते. एकातून बर्डस आयलँड दिसे तर तर दुसऱ्यातून हनिमून आयलँड. तिथून उतरून आम्ही मनोऱ्याकडच्या बाजूच्या डोंगरातील घण्टशिलाच्या गुहेकडे निघालो. गुहेत एक हार घातलेला फोटो होता. वर चढून गेल्यावर वरल्या अंगाने बाहेरही पडता येत असे. आम्ही मात्र पुन्हा माघारी परतलो. होता होता आम्ही बर्डस आयलँडजवळ पोहोचलो. ते पाहिले. स्थलांतरित पक्षी मात्र मुळीच दिसले नाहीत. ते डिसेंबरनंतर येतात असे समजले.

आता आम्ही बर्डस आयलँड मागे टाकून हनिमून आयलँडकडे निघालो होतो. मग हनिमून आयलँड दिसू लागले. जेटी बांबूंचीच बनवलेली आहे. तिथे एक ताल वृक्ष दिसला. ओरिसात तालपत्रांच्या टोप्या, तालपत्रांची घरे, शिवाय तालपत्रांवर कोरलेली रंगचित्रे इत्यादी पाहिलेली असल्याने तालवृक्ष जवळून पाहण्याचे कौतुक पुरे करून घेतले. काही तालपत्रेही तोडून सोबत घेतली. आपल्याला कोरीव काम करता येते का ते बघायला!

हनिमून आयलँड हे चिल्का सरोवरातील एका मोठ्याशा बेटाचे नाव आहे. ओरिसा पर्यटन विकास महामंडळाने इथे सिमेंटचे चौथरे बांधून, त्यांचेवर कायमस्वरूपी लोखंडी पाईपचे सांगाडे उभारून ठेवलेले आहेत. म्हणजे वर कापड पसरले की तंबू तयार. आतमध्ये पाश्चात्य पद्धतीचे कमोडही बसवलेले आहेत. मधुचंद्र साजरा करू पाहणाऱ्या नवपरिणत युगुलांना, मंडळ इथे भाड्याने तंबू बांधून राहू देत असावे. बेटावर एक विहीर आहे. एक बाई पाणी काढतांनाही दिसली. काही स्थानिक रहिवासी व त्यांची गवताने शाकारलेली घरे आहेत. नुकत्याच आलेल्या मच्छीमार होडीतून एक मुलगा धावत आला. त्याने त्या रहिवाशाच्या हातात मोठेसे दिसणारे काही मासे ठेवले. बेटाचा बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जात असावा. उन्हाळ्यात बेट खूपच विस्तारलेले दिसत असावे.

हजाराहून जास्त वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या आणि शेकडो बेटांना स्वतःच्या विस्तारात सामावून घेणाऱ्या चिल्का सरोवराने लाखो स्थलांतरित पक्षांना सालोसाल शीतकालीन आसरा द्यावा आणि साऱ्या परिसराचाच समतोल राखावा या निसर्गचमत्काराचे आता आम्हीही साक्षीदार झालेलो होतो. अनेक किलोमीटर दूरपर्यंत नावाडी आणि आम्ही प्रवासी यांव्यतिरिक्त सारेच निर्मनुष्य असावे, चहूबाजूंस हिरव्यागार पाण्याव्यतिरिक्त कुठेही किनारा नजरेस येऊ नये, अशा नौकाविहाराचे अविस्मरणीय सौख्यही आता आम्ही गाठीस जोडलेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: