20081112

'उडिशा' दर्शन-१


महानदीचे मुख

मी १८ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ओरिसात, चिल्का सरोवराच्या कडेकडेने प्रवास केला. ओरिसातील प्रवासास उद्युक्त झाल्यापासून कशीकशी माहिती मिळत गेली, काय काय पाहावेसे वाटू लागले, तिथे काय काय पाहण्यासारखे आहे इत्यादी अभ्यासांचे फलित, तसेच प्रवासात काढलेली प्रकाशचित्रे आणि ओरिसाच्या भौगोलिक, नैसर्गिक व पर्यटनासंदर्भातील वर्तमान स्थितीबाबतच्या माझ्या आकलनाची ही कहाणी आहे. ती चार भागांत पूर्ण लिहावी असा विचार आहे. त्यातलाच हा पहिला भाग.

ओरिसात काय आहे? ओरिसा वादळभूमी आहे. ओरिसा पुरातन मंदिरांची भूमी आहे. ओरिसात सम्राट अशोकाला विरक्तीचा मार्ग सापडला आहे. बुद्ध धम्मातील शांतीसार गवसले आहे. पण यांखेरीज ओरिसात जगातील सर्वात अनोखा नैसर्गिक आविष्कार आहे. तो म्हणजे चिल्का सरोवर. महानदीचे मुख. भारताच्या राजकीय नकाशात ओरिसा ज्या दिशेला, ज्या ठिकाणी आढळून येतो, जवळपास त्याच दिशेला, त्याच ठिकाणी, नैसर्गिक ओरिसाच्या नकाशात चिल्का सरोवर दिसून येते. चिल्का सरोवराची उपग्रहातून काढलेली चित्रे, ओरिसातील जनजीवन, चिल्का सरोवराच्या परिसरप्रणालीवर कशाप्रकारे अवलंबून आहे ते चांगल्या प्रकारे दर्शवतात.

आपण मराठी लोक ओरिसा म्हणतो. तिथले लोक 'उडिशा' म्हणतात. त्यांच्या बोलीभाषेतला 'ड'चा उच्चार 'र'च्या आसपासचा असतो. शिवाय 'स' ला 'श' म्हणायचीही प्रथा आहे. म्हणजे ते 'बडकूल' म्हणतात तेव्हा आपल्याला 'बरकूल' असे ऐकू येते. शिवाय 'उ' च्या जागी बंगाल्यांप्रमाणे 'ओ' म्हणायचीही प्रथा आहे. म्हणून आपल्याला ते ओरिसा म्हणताहेत असे वाटते. तलावाला आपण सरोवर म्हणतो, ते तलावाला 'हृदो' म्हणतात. चिल्का (याचा चिलिका असाही उच्चार प्रचलित आहे) सरोवर तिथले सर्वात मोठे 'हृदो' आहे. मात्र ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 'उडिशा'तील सर्वात मोठे 'मधुर जल हृदो' 'अंशुपा' आहे. हे सरोवर कटक जवळ आठगढ इथे आहे. अर्थातच महानदीच्या कुशीत.

टैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मुखाशी जसे मध्यपूर्वेचे आखात निर्माण झाले, त्याचप्रमाणे ब्रह्मपुत्रा आणि गंगा नद्यांच्या मुखाशी जे मोठे आखात निर्माण झाले ते म्हणजेच बंगालचा उपसागर. गंगेच्या पूर्ववर्ती प्रवाहाने ब्रह्मदेशाचा पश्चिम किनारा घडवला, तर ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणवर्ती प्रवाहाने भारताचा पूर्व किनारा. भारताच्या पूर्व किनाऱ्यास जिथे कठीण कातळ उघडा पडला तिथवर जाऊन जमिनीचे क्षरण थांबले. मग कठीण कातळास उल्लंघून भूमीचा ऱ्हास करणे सागरी प्रवाहांना आणि लाटांना शक्य राहिले नाही. मात्र भूमीतील वेगवती नद्यांचे प्रवाह समुद्रपातळीपर्यंत जलौघांना आणतच राहिले. त्याच कातळांनी ते जलौघ सागरास पावते होण्यापासून रोखले गेले आणि महानदीच्या मुखाशी गोड्या पाण्याचे भव्य सरोवर निर्माण झाले. ते म्हणजे चिल्का. आता निरंतर येणारे जलौघ, ते सरोवर साठवणार तरी किती? शेवटी सरोवराचे पाणी सागरास मिळणे क्रमप्राप्तच होते. ते समुद्राची वाट शोधत गेलेच. ते आहे महानदीचे मुख. चिल्का सरोवराचे मुख. मग याच मुखातून भरतीच्या लाटांनाही सरोवरात शिरण्याचा मार्गच सापडला आणि चिल्का सरोवराचे पाणी खारे झाले.

जगभरातील मोठ्या नद्या जिथे जिथे समुद्रास मिळतात तिथे तिथे मोठाले त्रिभूज प्रदेश निर्माण झालेले दिसून येतात आणि त्या नद्या असंख्य मुखांनी समुद्रास मिळतात. महानदी मध्यभारतातील एक मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. अमरकंटकच्या डोंगरात, विंध्य पर्वतात उगम पावून ती नदी गंधमादन पर्वतश्रेणींतून वाहत वाहत, मैदानात, कटकपाशी उतरते. (कटक पूर्वी ओरिसाची राजधानी होती. ) कटकपाशी महानदी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराकडे झेपावू लागते. त्यातला सगळ्यात दक्षिणेकडील फाटा चिल्का सरोवरात परिणत होतो. अशाप्रकारे महानदीच्या मुखाशी त्रिभूज प्रदेश तर आहेतच, शिवाय साडेअकराशे वर्ग किलोमीटर विस्ताराचे भव्य चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवर उत्फुल्ल होऊन वाहू लागते आणि सागराची वाट शोधते. दोन मुखांशी जाऊन ह्या शोधाचे समापन होते.


उत्तरेचे मुख आहे जुने आणि दुसरे दक्षिणेकडले मुख आहे नवे. इसवी सन २००० पूर्वी हे नवे समुद्रमुख नव्हते. २३ सप्टेंबर २००० रोजी ते उघडण्यात आले. त्याची कहाणी अशी आहे. काळाच्या ओघात जुन्या समुद्रमुखाशी गाळ साठत गेला. मुख अरुंद होत गेले. उथळ होत गेले. मग चिल्का सरोवराची पातळीही उंचावत गेली. गावे पाण्याखाली बुडू लागली. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवू लागली. या समस्येवर इलाज शोधला जाऊ लागला. पुण्याच्या केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक (Central Water and Power Research Station), यांच्या शोधाचे फलित म्हणून असा निष्कर्ष काढण्यात आलेला होता की कायलातील (कायल = lagoon = उडिया भाषेत हृदो) क्षार आणि लाटांचे ओघ (flux), कायलाचे मुख (mouth of the lagoon), मुख्य कायलाच्या जवळ आणल्याखेरीज सुधारणार नाहीत. त्यांच्या, त्रिमिती आकडेशास्त्रीय प्रारूप (3-dimentional numerical prototype) अभ्यासाच्या आधारे, त्यांनी शिफारस केली की १०० मीटर रुंद आणि कायलातील कमीत कमी जल-पातळीच्या २. ५ मीटर खालच्या पातळीवर एक नवे मुख निर्माण करायला हवे. म्हणजे कायलातील क्षारांशाचा ओघ ४०% पर्यंत सुधारेल आणि कायलातील लाटांचा ओघ ४५% पर्यंत सुधारू शकेल. यामुळे कायलातील पर्यावरण-प्रणाली पुनः संजीवित होऊन अपेक्षित क्षारांशाची पातळी -म्हणजेच उन्हाळ्यात उत्तर भागातील क्षारांश लाखात १. ५ भाग- साध्य करता येईल.

यानुसार नवे कायलमुख सिपकुड गावाजवळ २३ सप्टेंबर २००० रोजी समुद्रास खुले करण्यात आले. हे, केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक, पुणे व समुद्र अभियांत्रिकी केंद्र (Ocean Engineering Centre), भारतीय प्रौद्योगिकी संस्था (Indian Institute of Technology), चेन्नई यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली साध्य करण्यात आले. राष्ट्रीय समुद्रतळ-आलेखन संस्था (National Institute of Oceanography), गोवा, यांनी कायलातील परिवर्तनांची देखरेख केली.

२००१ मध्ये चिल्का सरोवरातील बेटांवरची व आसपासची खेडी पुरप्रभावित झाली नाहीत. नंतरच्या दोन-तीन वर्षांत खेकड्यांचे उत्पादन १०-१५ पटींनी वाढले व सरोवरातील क्षारांश दुपटीने वाढला. शिवाय जुन्या समुद्रमुखातून होणाऱ्या क्षीण जलौघापायी, ५०,००० हेक्टर जमिनीवरील खरीफाच्या पीकांचे होणारे नुकसान, नवे समुद्रमुख उघडताच थांबले. ही उपलब्धी चिल्का विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नमूद केलेली आहे.

ओरिसाला जाणार हे ठरल्यावर कधी हा प्रश्न आला. ओरिसातील पर्यटनासाठी ओक्टोंबर ते मे हा काळ योग्य समजतात. मग दिवाळीच्या सुट्ट्यांचा मौसम सोयीचा ठरला. आठ दिवसच मिळत होते. ओरिसातील दक्षिण भाग, जो चिल्का सरोवराकाठी वसलेला आहे तो जास्त प्रगत, जास्त पर्यटकांना आकर्षित करणारा आणि जास्त सोपा आहे. ओरिसाच्या उत्तरेलाही मगरींसाठी प्रसिद्ध असलेले भीतरकणिका अभयारण्य, हत्ती व सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले सिमिलीपाल अभयारण्य, ललितगिरी व रत्नगिरी ही बुद्धांची तीर्थक्षेत्रे, रौप्य कलाकुसरीचे माहेरघर आणि ओरिसाचे पुणे म्हणता येईल अशी सांस्कृतिक राजधानी कटक इत्यादी अनेक प्रवासीप्रिय गोष्टी आहेत. पण उपलब्ध वेळेच्या मर्यादेत कुठल्या तरी एकाच दिशेचा प्रवास अर्थपूर्ण होण्यासारखा होता. म्हणून आम्ही जास्त चोखाळला गेलेला दक्षिणपंथ निवडला.

त्यात ओरिसाला जायचे म्हटल्यावर भुबनेश्वर, पुरी आणि कोणार्क तर पाहायलाच हवे. म्हणून उर्वरित दिवसांत चिल्का सरोवर सर्व बाजूंनी पाहावे असे वाटले. पुढे तप्तपाणीची माहिती समजली. मग त्याचाही समावेश झाला. एव्हाना ऋषीकुलया नदीच्या काठावरील एका पहाडावरच्या तरतारिणी मंदिराबाबतही माहिती समजली होती. मात्र वेळेअभावी तो कार्यक्रम वगळावा लागला. एवढे करूनही सातपाड्याला राहून नावेतून डॉल्फिन्स पाहण्याच्या कार्यक्रमावरही वेळेअभावी पाणीच सोडावे लागले. तरीही सर्वसंमतीने खालील कार्यक्रम निश्चित झाला.

ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची प्रवासीनिवासांची एक मालिका (Orissa Tourism Development Corporation's Hotel Chain) आहे. त्यातील प्रवासीनिवासांना पंथनिवास म्हणून ओळखले जाते. ओरिसा पर्यटन विकास महामंडळाने काढलेल्या "निसर्ग पर्यटन सहलीचा" कार्यक्रम स्वीकारून, आम्ही आठ रात्री आणि नऊ दिवसांचा आमचा ओरिसा पर्यटनाचा कार्यक्रम नक्की केला. यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही भुबनेश्वरला येऊन तिथल्या पंथनिवासात राहणार होतो. त्या दिवशी 'एकम्रा हाट', 'राममंदिर' इत्यादी पाहण्याचा कार्यक्रम होताच. दुसऱ्या दिवशी बरकूलच्या पंथनिवासात पोहोचून जेऊन मग बरकूलच्या जेटीवरून तीन तासांची स्वयंचलित नावेने सफर करणार होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी नारायणी मंदिर, टंपारा सरोवर पाहत पाहत गोपालपूरला जाऊन किनारा बघणार होतो. सकाळी सूर्योदय पाहणार होतो. मग चवथ्या दिवशी तप्तपाणीला जाऊन राहणार होतो. कुण्ड पाहणार होतो. स्नान करणार होतो. तिथले अभयारण्य, हरीणबाग (डिअरपार्क) पाहणार होतो. पाचव्या दिवशी सकाळी चंद्रगिरी पाहून, दुपारी रांभाच्या पंथनिवासात जाऊन राहणार होतो. सहाव्या दिवशी रांभाच्या चिल्का सरोवरात अडीच तीन तासांचा फेरफटका स्वयंचलित नावेने घेऊन मग भुबनेश्वरच्या पंथनिवासात जाऊन राहणार होतो. वाटेत खुर्दारोडवरच्या उदयगिरी व खंडगिरी लेण्या पाहण्याचाही विचार होता. सातव्या दिवशी पुरीच्या पंथनिवासात राहून जगन्नाथाचे दर्शन, किनारादर्शन आणि खरेदीची योजना होती. आठव्या दिवशी सकाळी कोणार्क मंदिर पाहून व दुपारी भुबनेश्वरचे नंदनकानन पाहून आमचा कार्यक्रम संपूर्ण होणार होता. नवव्या दिवशी परतीचा प्रवास होणार होता.

2 comments:

प्रभाकर फडणीस said...

आपला लेख खूप माहितीपूर्ण आहे. चिलकासाठी केली गेलेली उपाययोजना महाराष्ट्रात फार थोड्यांच्या वाचनात आली असेल. मी चिल्का पाहिले ते खूप वर्षांपूर्वी.
गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांमुळे बंगालचा उपसागर निर्माण झाला ही आपली समजूत चुकीची आहे. plete techtonic theory प्रमाणे दक्षिण भारत हा एक भूभाग संथपणे उत्तरेकडे सरकत जाऊन आशिया खंडाला मिळाला व त्याच्या दाबामुळे भूपृष्ठ उचलले जाऊन हिमालय व विंध्य दोन्ही निर्माण झाले आणि मधला मुळात समुद्राखाली असलेला भाग वर येऊन जमीन निर्माण झाली असे आता मानले जाते. त्यापूर्वी अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे एकत्रच होते व ती आशिया खंडाची दक्षिण हद्द होती.

नरेंद्र गोळे said...

फडणीससाहेब नमस्कार,

आपण लेख वाचून अभिप्राय दिलात याखातर धन्यवाद!

गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांमुळे बंगालचा उपसागर निर्माण झाला ही आपली समजूत चुकीची आहे. >>>>>
नाही. ही समजूत मुळात अशी आहे की, त्या नद्यांच्या ओघांनी भारतीय उपखंडाची रूपरेषा घडवली.

plete techtonic theory प्रमाणे दक्षिण भारत हा एक भूभाग संथपणे उत्तरेकडे सरकत जाऊन आशिया खंडाला मिळाला व त्याच्या दाबामुळे भूपृष्ठ उचलले जाऊन हिमालय व विंध्य दोन्ही निर्माण झाले आणि मधला मुळात समुद्राखाली असलेला भाग वर येऊन जमीन निर्माण झाली असे आता मानले जाते. त्यापूर्वी अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे एकत्रच होते व ती आशिया खंडाची दक्षिण हद्द होती. >>>>>>>
हे ढोबळपणे खरेच आहे. मात्र भारताच्या पूर्व किनार्‍यावर आता उघड झालेली कातळी भिंत आणि तिच्या आकाराचाच किनारा, हे त्या नद्यांच्या ओघांमुळे, मूळ निराळ्या आकाराच्या असलेल्या खंडाचे क्षरण होऊन, घडून आलेली वस्तुस्थिती आहे. आपण सबंध लेख नीट लक्षात घेतल्यास, हा अर्थ स्पष्ट होऊ शकेल.

आता तुम्ही सांगा माझ्या या समजुतीला आधार आहे असे वाटते की नाही?

विशेष रुची घेऊन अभिप्राय नोंदवलात, त्याखातर पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!

आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे